You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते- माईक पोम्पिओ
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी भारत प्रतिनिधी
भारत आणि पाकिस्तान 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते असं अमेरिकेचे माजी सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पिओ यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत कट्टरवाद्यांच्या तळांवर हल्ले केल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली होती. पाकिस्ताने आपण भारताची दोन युद्धविमानं पाडल्याचा दावा केला होता आणि एका वैमानिकाला ताब्यात घेतलं होतं.
संपूर्ण काश्मीर आपलं आहे असा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा दावा आहे मात्र त्यांच्या ताब्यात काश्मीरचे काही भागच आहेत.
काश्मीर खोऱ्यामध्ये फुटिरतावादी कट्टरवाद्यांना पाकिस्तान बळ देत असल्याचा भारताचा जुना आरोप आहे. पण पाकिस्तानने हा आरोप फेटाळला आहे.
या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये आजवर तीन युद्ध झाली आहेत.
नेव्हर गिव्ह अॅन इंचः फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह या पॉम्पिओ या पुस्तकात लिहितात, "भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरोधात फेब्रुवारी 2019मध्ये अणुयुद्धासाठी किती जवळ आले होते याची कदाचित जगाला कल्पना नसेल."
खरं सांगायचं झालं तर मलाही नीट माहिती नाही. पण ते युद्धाच्या अगदी जवळ आले होते हे माहिती आहे.
पॉम्पिओ म्हणतात, “ हनोईमध्ये अण्वस्त्रांसदर्भात उत्तर कोरियाशी चर्चा करत होतो आणि भारत आणि पाकिस्तानने काश्मीरच्या आपल्या जुन्या वादावर एकमेकांना धमकावणं सुरू केलं होतं, ती रात्र आपण कधीच विसरू शकणार नाही.”
पॉम्पिओ लिहितात, “इस्लामिक दहशतवादी हल्ल्यात जवळपास 40 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता, तो संभवतः पाकिस्तानच्या कट्टरवादाविरोधात कमकुवत नितीमुळे झाला होता.”
या हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानात हवाई हल्ले केले होते. यानंतर “पाकिस्तानने हवेतच झालेल्या एका लढाईत एक विमान पाडून त्याच्या पायलटला बंदी बनवलं होतं.”
आपण त्या रात्री त्यांच्या भारतीय समकक्ष व्यक्तीच्या फोनने जागे झालो होतो असं ते लिहितात. मात्र त्यांनी या समकक्ष व्यक्तीचं नाव लिहिलेलं नाही.
पॉम्पिओ लिहितात, पाकिस्तानने अणुहल्ल्याची तयारी केली आहे आणि भारतही आपली तयारी सुरू करण्याचा विचार करत आहे, असं मला सांगण्यात आलं. त्यांना मी असं काहीही करण्याची गरज नाही,
गोष्टी नीट करण्यासाठी मला थोडा वेळ द्या असं सांगितलं. त्यानंतर आपण अमेरिकन संरक्षण सल्लागार जॉन बोल्टन यांच्याबरोबर ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असं त्यांनी लिहिलं आहे.
ते सांगतात, “यानंतर भारतीय समकक्ष व्यक्तीने मला जे सांगितलं ते मी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना कळवलं.”
“हे खरं नसल्याचं ते म्हणाले. आणि लोकांना वाटत होतं तसं भारत अण्वस्त्र हल्ल्याचा विचार करतोय असं त्यांनाही वाटल्याचं सांगितलं.
इस्लामाबाद आणि दिल्लीमधील आमच्या टीम्सनी चांगलं काम केल्यामुळे काही तासांमध्ये दोन्हींपैकी कोणताही पक्ष अणुयुद्धाची तयारी करत नसल्याचा भरवसा दोघांनाही आम्ही देऊ शकलो.”
ते लिहितात, ही शक्यता टळावी यासाठी आम्ही जे त्या रात्री केलं ते कोणताही देश करू शकला नसता.
2019मध्ये भारतीय सैनिकांवर हल्ला झाल्यावर त्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद संघटनेने घेतली होती.
भारतानं त्याला प्रत्युत्तर देण्याचा निश्चय केला होता. यानंतर भारताने 1971नंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडून पाकिस्तानच्या भूभागावर हवाई हल्ला केला होता.
या हल्ल्यात अनेक कट्टरवाद्यांना मारल्याचा दावा भारताने केला होता. तर हा दावा पाकिस्तानने नाकारला होता.