You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पाकिस्तानमध्ये कारवाई' : बालाकोटमध्ये वायुसेनेने जैश-ए- मोहम्मदचा तळ असा केला उद्धवस्त
नियंत्रण रेषा ओलांडून बालाकोट इथं करण्यात आलेल्या कारवाईला भारतीय वायुसेनेकडून दुजोरा देण्यात आला आहे. भारतीय वायुसेनेच्या सूत्रांनी बीबीसीला हवाई हल्ल्यासंबंधी माहिती दिली आहे.
बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित यांच्याशी बोलताना वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईची माहिती दिली. मंगळवारी पहाटे अंबाला इथून मिराज विमानांनी उड्डाण केलं आणि आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता निर्धारित लक्ष्यांवर बॉम्ब हल्ले करण्यात आले, अशी माहिती वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
विमानांनी LOC ओलांडली आणि नियंत्रण रेषेजवळ बालाकोट नावाच्या ठिकाणी बॉम्ब हल्ले केले. ही सर्व कारवाई अर्ध्या तासात पूर्ण करण्यात आली असल्याचं वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. विमानांनी पहाटे तीन वाजता उड्डाण केलं आणि साडे तीन वाजेपर्यंत सर्व विमानं सुखरूप परत आली, असंही त्यांनी म्हटलं.
जैश-ए-मोहम्मदच्या सर्वांत मोठ्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला
बालाकोट इथं जैश-ए-मोहम्मद संघटनेचं सर्वांत मोठं प्रशिक्षण केंद्र असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी कारवाईची माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेत दिली. मौलाना मसूद अजहरचा मेहुणा मौलाना युसूफ अजहर हे प्रशिक्षण केंद्र चालवत होता, असंही विजय गोखले यांनी म्हटलं.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही माध्यमांशी बोलताना या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. "देशाच्या संरक्षणासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. सेनेला अशाप्रकारची कारवाई करण्याचं स्वातंत्र्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं होतं. आता सेनेच्या पाठिशी संपूर्ण देश उभा आहे," असं जावडेकर यांनी म्हटलं.
जावडेकर यांनी म्हटलं, "पुलवामा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना 100 तासांच्या आत ठार करण्यात आलं. पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्यात आला. भारताच्या वाट्याचं पाणी पाकिस्तानला न देण्याचा निर्णयही घेतला गेला. आणि आता ही कारवाई करण्यात आली आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.