You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पाकिस्तानमध्ये कारवाई' : 'बालाकोटमधला जैश-ए-मोहम्मदचा सर्वांत मोठा कँप नष्ट' - भारत
बालाकोट इथं भारतीय हवाईदलाने कारवाई केली आहे, त्यात जैश-ए-मोहम्मदचे नेते मारले गेले आहेत, असा दावा परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत केला.
तर पाकिस्तानने सकाळी भारतीय विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आणि स्फोटकं टाकली, पण त्यात कोणतंही नुकसान झालेलं नाही, असा दावा केला होता.
त्यानंतर सकाळी 11.30 वाजता भारताच्या परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेतली. "जैश-ए-मोहम्मद ही संघटना देशभरात आत्मघातकी हल्ले करणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे ही कारवाई करणं आवश्यक होतं," असं गोखले म्हणाले. ही कारवाई लष्करी स्वरूपाची नव्हती तर प्रतिबंध स्वरूपाची होती," असं ते म्हणाले. हा तळ एका उंच टेकडीवर होता. तसेच या कारवाईत कोणीही सामान्य नागरिक मारले गेलेले नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे.
बालाकोट येथे जैशचा सर्वांत मोठं प्रशिक्षण केंद्र होतं. हे केंद्र मौलाना युसूफ अजहर चालवत होता, असं ते म्हणाले. "14 फेब्रुवारीला पुलवामात झालेला हल्ला जैश ए मोहम्मदने घडवला होता, तसेच 2001मध्ये संसदेवर झालेला हल्ला आणि पठाणकोट इथल्या हवाई तळावर 2016ला झालेला यातही जैशचा हात होता. ही माहिती वारंवार पाकिस्तानला देऊन जैश ए मोहम्मदवर कारवाई करावी, असं बजावलं होतं. पण पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने भारताने ही कारवाई केली," असं त्यांनी सांगितलं. "पाकिस्तानात जैशचे तळ कुठं आहेत, ही माहितीही दिली होती. पण पाकिस्तानने त्यांच्या देशातील 'दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चर' संपवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. भारताला जैश ए मोहम्मद भारतात आणखी जिहादी हल्ले करणार असल्याची विश्वसनिय माहिती मिळाली होती," असं ते म्हणाले.
भारतीय वायुसेनेच्या विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पाकिस्तानच्या सरहद्दीत शिरून भारताने कारवाई करण्याचा प्रयत्न केला, असं पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्त्यांनी म्हटलं होतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)