बडोद्याच्या महाराजांशी लग्न करण्यासाठी सीता देवींनी इस्लाम धर्म स्वीकारला होता तेव्हा

सीता देवी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराणी सीतादेवींचा जन्म 1917 साली तेव्हाच्या मद्रास प्रांतात झाला होता
    • Author, जय शुक्ला
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी

"बडोद्यातील एकमेव विमानतळाच्या धावपट्टीवर डाकोटा विमान उभं होतं. आदल्या दोन दिवसांपासून या धावपट्टीवर भरपूर सामान असलेल्या मोटारगाड्या येत होत्या. या विमानाचा वैमानिक अमेरिकन होता. इथे काय सुरू आहे याची कुणकुण त्याला लागली होती."

"भारताला स्वातंत्र्य मिळून आता दोन वर्षं झाली होती. संस्थानिकांना आता कळून चुकलं होतं की, येत्या काळात आपली संस्थानं अस्तित्वात राहणार नाहीत. त्यामुळे ते आपापली मालमत्ता विकण्याच्या मानसिकतेत होते."

"या अमेरिकन वैमानिकाने दोन वर्षांपूर्वी ब्रिटिश आर्मीकडून हे डाकोटा विमान विकत घेतलं आणि भारतात आणलं. यात थोडेफार बदल केल्यामुळे त्याला यातून सामान आणि प्रवासी नेण्याची परवानगी मिळाली होती."

"बडोदा राज्यातील मौल्यवान वस्तू घेऊन जाण्याची तयारी सुरू होती. वैमानिक हे सारं काही पाहत होता."

"गाड्यांच्या ताफ्यात एक रोल्स रॉयस आली. यातून एक सुंदर महिला उतरली. साधारण 30 वर्षांची ही महिला विमानात सामान भरल्यानंतर कॉकपिटच्या मागे बसली. तिच्यासोबत आणखी दोन महिला प्रवासी होत्या."

विमान सुरू झाल्यावर वैमानिक म्हणाला, त्या सामानात जे काही आहे त्याची मला माहिती आहे. त्यामुळे आता वाहतूक खर्च जास्त होईल.

या महिलेला वैमानिकाच्या बोलण्याचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही. असं घडू शकतं असं त्यांना कदाचित माहीतच असावं. म्हणून त्यांनी पर्समधून रिव्हॉल्व्हर काढली आणि वैमानिकाच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाल्या, 'जेवढं सांगितलं तेवढं करा'.

वैमानिकाला कळून चुकलं आणि त्याने युरोपच्या दिशेने उड्डाण केलं.

ही महिला दूसरी तिसरी कोणी नसून महाराणी सीता देवी होत्या. बडोद्याच्या महाराज प्रतापसिंह राव गायकवाड यांच्या दुसऱ्या पत्नी.

सीतादेवी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बडोद्याचे महाराज प्रतापराव गायकवाड, सीतादेवी आणि सयाजीराव गायकवाड

"त्यांच्याकडे तब्बल 56 पेट्या होत्या. यात बडोद्याच्या शाही खजिन्याचा एक मौल्यवान भाग होता."

'जेव्हा महाराणी सीता देवी पॅरिसमध्ये राहू लागल्या तेव्हा त्यांनी ही गोष्ट आपल्या काही विश्वासूंना सांगितली होती. आता यावर विश्वास ठेवायचा की नाही ते ज्याचं त्याने ठरवायचं. पण एवढ्या धाडसाने आणि आत्मविश्वासाने कोणी असं कसं करू शकतं? यावर काहींना विश्वासच बसत नव्हता. पण या सीता देवी मात्र वाघांची देखील शिकार कशी करायच्या.'

ज्वेलरी, फॅशन डिझायनर आणि लेखक असलेल्या मायलन विल्सन यांनी त्यांच्या 'व्हॅन क्लीफ अँड अर्पल्स: ट्रेझर्स अँड लेजेंड्स' या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. मायलन यांनी जुन्या (विंटेज) दागिन्यांवर संशोधन केलं असून त्यावर विस्तृतपणे लिहिलं आहे.

भारतीय संस्थानिकांच्या इतिहासात सीता देवींचं नाव खास कारण...

बडोद्याच्या या महाराणींची प्रेमकहाणी तर चर्चेत होतीच पण त्यावेळी त्यांच्या लग्नाबाबतही वाद निर्माण झाला होता. सीता देवी बडोद्याच्या महाराज प्रतापसिंह राव गायकवाड यांच्या प्रेमात पडल्या.

पण सीता देवींचं आधीच लग्न झालं होतं आणि त्या लग्नापासून त्यांना एक मुलगाही देखील होता. ज्यावेळी महाराज प्रतापसिंह राव गायकवाड सीता देवींच्या प्रेमात पडले तेव्हा ते देखील आठ मुलांचे वडील होते. अशा परिस्थितीत त्यांच्या लग्नात अनेक अडथळे आले. मात्र, त्यावेळी सीता देवींनी उचललेलं पाऊल भारतीय राजघराण्याच्या इतिहासात अनोखं मानलं गेलं.

जेव्हा जेव्हा भारताच्या राजघराण्यातील प्रेमकथेची चर्चा होते तेव्हा तेव्हा सीता देवींचे नाव यात असतेच.

सीता देवी

फोटो स्रोत, Getty Images

केवळ त्यांचं व्यक्तिमत्वच नाही तर त्यांचे भरदार दागिने, साड्यांचा संग्रह याची त्याकाळी सगळीकडे चर्चा असायची. जाणकारांच्या मते त्या त्यांच्या काळातील ग्लॅमरस व्यक्ती होत्या, आणि अगदी ऐशोआरामाचं जीवन जगत होत्या.

ज्या काळात राजघराण्यांमधील स्त्रियांचे पदर डोक्यावरुन खाली येत नव्हते त्याकाळात त्यांनी अनेक जुन्या परंपरांविरुद्ध बंड केलं होतं.

सीता देवी कोण होत्या आणि त्या बडोद्याच्या महाराजांच्या प्रेमात कशा पडल्या?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सीता देवी यांचा जन्म 12 मे 1917 रोजी तत्कालीन मद्रास (सध्याचे चेन्नई) प्रांतात झाला. त्या श्री राज राव व्यंकटकुमार महापती सूर्यराव बहादूर गरू आणि राणी चिन्नम्मंबा यांच्या कन्या होत्या. पिठापुरम हे त्या काळी मद्रास प्रांतातील एक महत्त्वाचं संस्थान होतं.

सीता देवी यांचं पहिलं लग्न व्‍युरचे मोठे जमीनदार एम. आर. अप्पाराव बहादूर यांच्यासोबत झालं होतं. या लग्नापासून त्यांना एक मुलगाही होता.

गायकवाड कुटुंबातील सदस्य आणि प्रतापसिंह राव गायकवाड यांचे पुतणे जितेंद्रसिंह गायकवाड यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "1943 साली सीता देवी आणि महाराजा प्रतापसिंह राव गायकवाड यांची मद्रासमधील रेसकोर्सवर भेट झाली. एकमेकांना बघता क्षणी ते प्रेमात पडले."

"सीतादेवी यांचं सौंदर्य अप्रतिम होतं. महाराज त्यांच्या सौंदर्यावर भाळले. सीतादेवी महाराजा प्रतापसिंह राव यांच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित झाल्या आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला."

सरदार पटेल यांच्या अखत्यारीत राज्य मंत्रालयात सचिव म्हणून काम केलेले व्ही. पी. मेनन यांनी त्यांच्या 'इंटिग्रेशन ऑफ द इंडियन स्टेट्स' या पुस्तकात लिहिलंय की, "1939 मध्ये बडोद्याच्या सिंहासनावर बसल्यानंतर तीन-चार वर्षांत त्यांनी सल्लागारांच्या चुकीच्या प्रभावाखाली येऊन दुसरं लग्न केलं. त्यामुळे त्यांच्या पदावर आणि प्रतिष्ठेवर परिणाम झाला." (पृष्ठ क्र. 478)

त्यांच्या प्रेमातील पहिली अडचण म्हणजे सीतादेवी यांचे पती अप्पाराव यांचा विरोध. ते सीतादेवी यांना सोडायला तयार नव्हते. त्यामुळे प्रतापसिंह राव यांनी कायदेशीर सल्ला घेतला. सल्लागारांनी असा सल्ला दिला ज्यामुळे भारतीय संस्थानिकांच्या इतिहासातील एक वादग्रस्त प्रकरण जोडलं गेलं.

सीता देवी यांनी आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट देण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला.

सीता देवी

फोटो स्रोत, HISTORYOFVADODARA.IN

मेनन त्यांच्या पुस्तकात लिहितात, "प्रतापसिंह राव यांनी 1929 मध्ये महाराणी शांतादेवी यांच्याशी लग्न केलं होतं. शांतादेवी कोल्हापुरातील घोरपडे कुटुंबातील होत्या. त्यांना 8 मुलं होती. सीता देवी यांनीही 1933 मध्ये मद्रास प्रांतातील एका जमीनदाराशी लग्न केलं होतं. ऑक्टोबर 1944 मध्ये सीता देवी यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितलं की, त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि त्यामुळे त्यांचे लग्न एक करार असल्याचं मानलं जावं."

पुस्तकानुसार, सीता देवी यांनी आधी इस्लाम स्वीकारला आणि नंतर पतीला इस्लाम स्वीकारण्याची विनंती केली. त्यांच्या पतीने तसे करण्यास नकार दिला, म्हणून सीता देवी यांनी पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी मद्रासच्या शहर न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांचा घटस्फोटही झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आणि महाराजा प्रतापसिंह राव गायकवाड यांच्याशी विवाह केला.

मेननने पुढे लिहितात की, "26 ते 31 डिसेंबर दरम्यान त्यांनी आर्य समाज व्यवस्थेद्वारे हिंदू धर्म स्वीकारला आणि प्रताप सिंह यांच्याशी लग्न केलं." (पृष्ठ क्रमांक 478-479).

'व्हॅन क्लीफ अँड अर्पल्स: ट्रेझर्स अँड लेजेंड्स' या पुस्तकात त्यांच्या लग्नाची तारीख 31 डिसेंबर अशी नमूद करण्यात आली आहे.

आता लग्न केल्याने त्यांचे अडथळे दूर झाले होते असं नाही. गायकवाडांच्या राज्यात पहिली पत्नी हयात असल्यास दुसरं लग्न करण्यास बंदी होती. गायकवाड सरकारने दुसरा विवाह प्रतिबंध करणारा कायदा लागू केला होता. मात्र, प्रतापसिंह राव यांनी 'हा कायदा राजाला लागू होत नाही' असं सांगून आपल्याच राज्याचाच कायदा पाळण्यास नकार दिला.

पहिली पत्नी हयात असताना प्रतापरावांनी सीतादेवींशी दुसरं लग्न केलं

फोटो स्रोत, HISTORYOFVADODARA.IN

फोटो कॅप्शन, पहिली पत्नी हयात असताना प्रतापरावांनी सीतादेवींशी दुसरं लग्न केलं

गुजरातचे इतिहासकार रिजवान कादरी यांनी बीबीसी गुजरातीशी केलेल्या संभाषणात सांगितलं की, "3 जानेवारी रोजी संदेश या वृत्तपत्रात महाराजांच्या लग्नाची बातमी छापून आली. एका मराठी वृत्तपत्रात छापलेल्या वृत्ताचा हवाला देत संदेश वृत्तपत्राने खरं तर चार महिने आधीच या लग्नाची बातमी चालवली होती. यात म्हटलं होतं की, शांतादेवी आणि त्यांची मुलं मुंबई आणि मसुरीला गेले असताना, महाराज निलगिरीच्या जंगलात हत्तीची शिकार करायला गेले होते."

रिझवान कादरी यांनी 15 जानेवारी 1944 रोजी प्रसिद्ध झालेल्या वंदेमातरम् वृत्तपत्रातील एका बातमीचा हवाला देत म्हटलंय की, त्यावेळी महिला संघटनांनीही या दुसऱ्या लग्नाला विरोध केला होता. काही प्रजा मंडळांच्या नेत्यांनीही विरोध केला होता. कायदा करणारा कायदा कसा मोडू शकतो, असा सवाल प्रजा मंडळाच्या या नेत्यांनी केला होता.

'व्हॅन क्लीफ अँड अर्पल्स : ट्रेझर्स अँड लेजेंड्स' या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, "प्रतापरावांच्या या दुसऱ्या लग्नाला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आधी मान्यता देण्यास नकार दिला, पण नंतर त्यांच्या राज्याचा वारस शांतादेवीचा मुलगा असेल या अटीवर या विवाहाला मान्यता देण्यात आली. मात्र ब्रिटिशांनी सीता देवींनी महाराणी प्रोटोकॉलनुसार 'हर हायनेस'असं संबोधन वापरणं टाळलं." (पृष्ठ क्र. 32)

त्याच पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, एके दिवशी प्रतापसिंह सीता देवी यांना त्यांच्या नजरबागच्या राजवाड्यात घेऊन गेले आणि त्यांना शाही खजिना दाखवला. जगातील अनेक दुर्मिळ मौल्यवान रत्नांच्या अद्भुत वस्तू आणि हिरे, मोती आणि मौल्यवान रत्नजडित अनेक दागिने पाहून सीता देवी आश्चर्यचकित झाल्या. (पृष्ठ क्र. 32)

सीता देवींना प्रवास आणि खरेदीची आवड होती

लेखक लकी मूर यांनी लिहिलेल्या 'महाराणीज : लाइव्ह्स अँड टाइम्स ऑफ थ्री जनरेशन्स ऑफ इंडियन प्रिन्सेसेस' या पुस्तकात पान क्रमांक 565 वर उल्लेख केल्याप्रमाणे, गायकवाडांचे राज्य त्या काळात भारतातील तिसरे सर्वात श्रीमंत राज्य होते.

'व्हॅन क्लीफ अँड अर्पल्स: ट्रेझर्स अँड लेजेंड्स' या पुस्तकात प्रतापरावांचं वर्णन भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत महाराज असं करण्यात आलं आहे.

प्रतापसिंह महाराजांकडे पैशांची कमतरता नव्हती. सीता देवींना परदेश प्रवास, महागड्या वस्तूंची खरेदी आणि शाही पार्ट्यांचा शौक होता. महागड्या ब्रँडेड वस्तू वापरण्याचा त्यांचा आग्रह असायचा.

मात्र, सीता देवींच्या आगमनाने राजघराण्यातील अनागोंदी देखील वाढली.

सीता देवींना खरेदीची आवड होती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीता देवींना खरेदीची आवड होती

महाराज प्रतापसिंह यांच्या पहिल्या पत्नी शांतादेवी आणि सीता देवी यांच्यात वितुष्ट होतं असं जाणकार सांगतात.

गायकवाड कुटुंबावर संशोधन करणारे चंद्रशेखर पाटील यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "दोन्ही राण्या वेगळ्या राहत होत्या. लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये शांतादेवी आणि मकरपुरा येथे बांधलेल्या महालात सीता देवी."

जितेंद्रसिंह गायकवाड म्हणतात, "सीता देवी यांना शिकारीची, बंदूक चालवायची, घोडेस्वारीची आवड होती. पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यात त्या पुढे असायच्या. त्यांना अनेक युरोपीयन भाषा आणि फॅशन जगताचं ज्ञान होतं."

1946 मध्ये महायुद्ध संपल्यानंतर प्रतापराव आणि सीता देवी परदेश दौऱ्यावर गेल्या. दोघांनी दोनदा अमेरिकेला जाऊन भरपूर पैसा खर्च केला. बहुतेक वेळा सीता देवींनी विलासी वस्तू खरेदी करण्यासाठी भरपूर पैसा खर्च केला.

त्यांना गाड्यांचाही शौक होता. त्यांच्याकडे मर्सिडीज डब्लू 126 होती. ही गाडी मर्सिडीज कंपनीने खास सीता देवी यांच्यासाठी डिझाइन केली होती.

मात्र, जितेंद्रसिंह गायकवाड म्हणतात की, परदेशातून चांगल्या गोष्टी इथे येतात आणि आधुनिक विचारांची देवाणघेवाण होते. नवीन तंत्रज्ञान भारतात येते आणि त्याचा फायदा लोकांना होतो.

बडोद्याच्या खजिन्यातून अनमोल वस्तू गायब

सीता देवी यांच्यासोबत अमेरिका आणि युरोपच्या सहलीसाठी महाराज प्रतापसिंह यांनी राज्याच्या तिजोरीतून लाखो रुपये काढून घेतले. नोंदीनुसार, त्यांनी शाही खजिन्यातून मौल्यवान वस्तू आणि दागिने इंग्लंडला पाठवल्याचं भारत सरकारलाही कळलं.

मेनन लिहितात, "त्यांना दरवर्षी मिळणाऱ्या 50 लाखांव्यतिरिक्त, प्रतापसिंह राव यांनी राज्य गुंतवणूक राखीव अर्थात जनतेच्या फंडातून 6 कोटी रुपये काढले. त्यांनी सातपदरी मोत्यांचा हार, अनमोल दागिने विकत घेतले. अमूल्य हिरे आणि मोत्यांचा गालिचा, इतर अनेक मौल्यवान वस्तू इंग्लंडला पाठवण्यात आल्या होत्या." (पृष्ठ क्र. 483)

यातील अनेक मौल्यवान दागिने सीता देवीपर्यंत पोहोचल्याचं सूत्रांचं म्हणणं होतं.

रिझवान कादरी सांगतात, "त्यांनी बडोद्याहून कोट्यवधी रुपयांचा खजिना परदेशात पाठवला होता. त्याचा ओघ सुनियोजित आणि बराच काळ सुरू होता."

मेनन लिहितात की, बडोद्यातील जवाहीरखानाच्या खात्यांमध्ये दीड कोटी रुपयांच्या नवीन दागिन्यांच्या खरेदीची नोंदही आढळली. यापैकी बर्‍याच वस्तू गहाळ झाल्या होत्या किंवा त्या मोडून नवीन दागिने बनवले होते. जवाहीरखान्यातही अनेक अवैध मौल्यवान वस्तू सापडल्या.

बडोद्याच्या खजिन्यातून अनेक गोष्टी गायब झाल्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बडोद्याच्या खजिन्यातून अनेक गोष्टी गायब झाल्या

मेनन लिहितात की भारत सरकारने एका विशेष अधिकाऱ्याला या संपूर्ण प्रकरणाचे ऑडिट करण्यासाठी पाठवले. पण महाराज प्रतापसिंह राव यांनी त्यांच्या तपासात त्यांना मदत केली नाही.

चंद्रशेखर पाटील सांगतात, "भारतीय राजघराणे त्यांच्या खास असण्यामुळे पासपोर्ट न तपासता परदेशात जात असत. एडगर देगास आणि पिकासो यांच्या चित्रांसह अनेक महागडी चित्रं सुटकेसमध्ये भरून परदेशात पाठवण्यात आल्याचं मानलं जातं."

गायकवाड कुटुंबातील जितेंद्रसिंह गायकवाड म्हणतात, "त्यांनी काहीही चोरून नेलेलं नाही. ही त्यांची मालमत्ता होती आणि ती त्यांची वैयक्तिक बाब होती."

बडोदा आणि इतर राज्यांमध्ये अशी प्रथा होती की, राज्याच्या तिजोरीतील वस्तू वैयक्तिक वापरानंतर तिजोरीत परत ठेऊन द्यायची. या सर्व वस्तू गायब झाल्याबद्दल भारत सरकारला प्रतापसिंह रावांवर संशय होता.

याशिवाय, बडोदा राज्याचे भारतात विलीनीकरण करण्याच्या त्यांच्या व्यवहाराबाबत भारत सरकार त्यांच्यावर नाराज होते.

मात्र, महाराज प्रतापसिंह यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आणि त्यांनी केलेला खर्च परत करण्याचे आश्वासन दिले.

मेनन लिहितात की, यामुळे भारत सरकारने त्यांना 1951 मध्ये कलम 366(22) अन्वये महाराज पदावरून काढून टाकलं आणि त्यांच्या जागी त्यांचा मोठा मुलगा युवराज फतेसिंह यांना बडोद्याच्या गादीवर बसवलं.

एकीकडे महाराज प्रतापसिंहाचे सिंहासन गेले होते मात्र दुसरीकडे सीता देवींचे खर्चिक छंद कमी होण्याचं होत नव्हते.

फॅशन आणि दागिन्यांची आवड

सीता देवी यांचे सिल्क साड्या आणि दागिन्यांचे वेड त्याकाळी फॅशन जगतात चर्चेचा विषय बनले होते.

जितेंद्रसिंह गायकवाड यांनी बीबीसी गुजरातीशी केलेल्या संभाषणात म्हटलंय की, "महाराणी सीता देवी यांना भारताची वॉलिस सिम्पसन म्हटलं जायचं. वॉलिस सिम्पसन ही एक अमेरिकन समाजवादी होती. इंग्लंडचे महाराज आठवे एडवर्ड तिच्या प्रेमात पडले. पण ती घटस्फोटित होती त्यामुळे 'पुराणमतवादी ब्रिटिश समाज' तिला स्वीकारण्यास तयार नव्हता. पण तरीही महाराज आठवे एडवर्ड यांनी वॉलिस सिम्पसनशी लग्न केलं."

वॉलिस सिम्पसन आणि सीता देवी यांच्या कथा सारख्याच होत्या, ज्यामुळे लोक सीता देवी यांना भारतीय वॉलिस सिम्पसन म्हणायचे.

सीता देवी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका चित्रपटाच्या प्रिमीयरप्रसंगी जर्मन अभिनेते कर्ट हेरजन्स, त्यांनी पत्नी आणि सीतादेवी

त्यांचा माणिक, हिरे आणि मोत्याच्या दागिन्यांचा संग्रह अप्रतिम होता. या मौल्यवान रत्नांवर त्यांचा जीव होता.

त्यांच्याकडे शेकडो महागड्या साड्या, पर्स, चपला, दागिन्यांचा संग्रह होता. त्यांची कपाटं हॅरी विन्स्टन, कार्टियर सारख्या प्रसिद्ध ब्रँडने भरलेली होती.

1949 मध्ये 78.5 कॅरेट इंग्लिश ड्रेसडेन डायमंड नेकलेस परिधान केलेल्या सीता देवींचा फोटो लोकप्रिय झाला होता.

त्यांच्या फॅशन आणि ज्वेलरीवरील प्रेमाची पाश्चात्य फॅशन मासिकांमध्ये वारंवार चर्चा होत असे.

'व्हॅन क्लीफ अँड अर्पल्स : ट्रेझर्स अँड लेजेंड्स' या पुस्तकात सीता देवींकडे एक मोत्याचा हार होता असा उल्लेख आहे. ज्यामध्ये 34, 36 आणि 40 मोती होते.

हे मोती बसरा मोती होते. जे लाल समुद्रातून सापडलेले दुर्मिळ मोती होते. या मोत्याच्या हाराची किंमत 599,200 डॉलर होती.

त्याच्याकडे 50,400 डॉलर्स किमतीचे आणखी दोन हार होते.

त्याच्या संग्रहात 42,00 डॉलर किमतीचे दोन काळ्या मोत्याचे हार देखील होते.

33,600 डॉलर किमतीची एकच मौल्यवान मोती असलेली अंगठी देखील होती.

याशिवाय त्यांच्याकडे जगप्रसिद्ध पर्ल कार्पेट म्हणजेच मोत्यांचा गालिचा देखील होता.हा गालिचा बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांनी बनवून घेतला होता.

पर्ल कारपेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जगप्रसिद्ध पर्ल कारपेट, यात 13 लाख मोती आहेत. सध्या हे कारपेट कतारच्या संग्रहालयात आहेत

चंद्रशेखर पाटील म्हणतात, "महाराजा खंडेरावांना मुलगा नव्हता. म्हणून त्यांना काही मौलवींनी सल्ला दिला होता की, जर तुम्ही मदिना येथील पैगंबर मोहम्मद यांच्या पवित्रस्थळी चादर दिली तर तुम्हाला मुलगा होईल. त्यामुळे खंडेरावांनी अगणित मोत्यांनी बनवलेला गालिचा तयार करवून घेतला. पण त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने तो गालिचा मदिनापर्यंत पोहोचला नाही."

मोत्यांचा गालिचा अनमोल होता. 8 फूट लांब असलेल्या या गालिचात हिरे आणि मौल्यवान रत्नांनी जडवलेल्या माणिक आणि पुष्कराजांसह असंख्य मोती होते.

त्यावेळी या मोत्याच्या गालिचाची किंमत अंदाजे 5 दशलक्ष युरो होती. (48 पृष्ठ क्रमांक)

सीता देवींकडे असलेला हा गालिचा कतारच्या राष्ट्रीय संग्रहालयापर्यंत कसा आणि कधी पोहोचला याबद्दल फार सुरस कथा आहेत. या सर्व कथांमधील एक खरी गोष्ट म्हणजे हा मोत्याचा गालिचा आता कतारच्या राष्ट्रीय संग्रहालयाचा भाग आहे.

सीता देवींच्या मृत्यूनंतर मोत्याचा हा गालिचा जिनिव्हा येथील लॉकरमध्ये सापडला होता. 1994 मध्ये त्याची विक्री करण्यात आली.

अॅमस्टरडॅममधील काही ज्वेलर्सकडे स्टार ऑफ साऊथ डायमंड आणि इतर हिऱ्यांचे दागिने सापडले.

सीता देवीकडे सोन्या-चांदीचा मुलामा असलेली ताटंही होती, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

'व्हॅन क्लीफ अँड अर्पल्स : ट्रेझर्स अँड लेजेंड्स' या पुस्तकानुसार, 2009 मध्ये त्यांच्या मालकीचा कमळाच्या फुलांचा हार 2 मिलियन युरोमध्ये विकला गेला. (पृष्ठ क्र. 25,26)

"फ्रान्समध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्या वारंवार स्वीट आणि व्हॅन क्लीफ अँड अर्पल्सचा बुटीकमध्ये जात असत."

"त्यांनी जॅक अर्पल्सला अनेक फॅशनेबल वस्तू तयार करण्याचे काम दिले. त्यांनी तयार केलेली 'हिंदू हार' ही एक अद्भूत निर्मिती होती."

सीतादेवींसाठी बनवलेला हिंदू हार

फोटो स्रोत, WWW.VANCLEEFARPELS.COM

फोटो कॅप्शन, सीतादेवींसाठी बनवलेला हिंदू हार

"हा हार बडोद्याच्या शाही खजिन्यातून आणलेल्या मौल्यवान रत्नांनी बनवला होता आणि 150 कॅरेटपेक्षा जास्त वजनाच्या 13 कोलंबियन पाचूंनी तयार करण्यात आला होता. या हाराचा आकार कमळासारखा होता."

अशाप्रकारे, हिरे आणि मोत्यांच्या दागिन्यांमुळे त्यांना त्या काळात पॅरिसची राणी देखील म्हटलं जायचं.

जितेंद्रसिंह गायकवाड म्हणतात की, सीता देवी यांच्याकडे पारखी नजर होती. त्यांना दागिन्यांची आणि त्याच्या डिझाईनचीही समज होती.

सीता देवी आणि प्रतापसिंह राव वेगळे झाले

प्रतापराव आणि सीता देवी यांनी युरोपमध्ये राहायचं ठरवलं. प्रथम त्यांनी मोनॅको जवळ मॉन्टे कार्लो येथे एक वाडा विकत घेतला.

हे जोडपं इथे वारंवार येत असत. त्यावेळी सीतादेवीचा तो कायमचा पत्ता होता. असं म्हणतात की, प्रतापसिंह रावांनी बडोद्याच्या खजिन्यातील काही मौल्यवान वस्तू येथे हलवल्या.

त्यानंतर सीतादेवींनी पॅरिसमध्येही घर घेतलं.

'व्हॅन क्लीफ अँड अर्पल्स : ट्रेझर्स अँड लेजेंड्स' या पुस्तकात मिलन व्हॅनसेट यांनी महाराणी सीतादेवीवर एक संपूर्ण प्रकरण लिहिलं आहे. त्यात ते लिहितात की, सीतादेवी आणि प्रतापसिंह यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात 10 दशलक्ष डॉलर्स खर्च केले. (पृष्ठ क्र. 15)

8 मार्च 1945 रोजी त्यांना एक मुलगाही झाला. प्रतापसिंह राव यांनी त्यांच्या आजोबांच्या नावावरून त्यांचं नाव सयाजीराव ठेवलं. त्यांना प्रेमाने प्रिंसी म्हणायचे.

पण दोघांमधील अंतर आता वाढू लागलं आणि दोघे वेगळे झाले. त्यांचा मुलगा प्रिन्सी सीतादेवीकडे राहिला.

प्रतापसिंह रावांपासून विभक्त होऊनही त्यांनी महाराणी ही पदवी धारण केली. त्यांच्याकडे असलेल्या रोल्स रॉयस कारवरही बडोदा राजघराण्याचं प्रतीक होतं.

सीतादेवी अनेकदा क्युबन सिगार ओढताना दिसायच्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीतादेवी अनेकदा क्युबन सिगार ओढताना दिसायच्या

चंद्रशेखर पाटील सांगतात, "सीतादेवी खर्चिक होत्या. त्या मनोरंजनावर खूप पैसा खर्च करायच्या त्यामुळे दोघांमध्ये मतभेद झाले आणि 1956 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला."

जितेंद्रसिंह गायकवाड म्हणतात, "महाराज प्रतापसिंह राव यांनी इंग्लंडमध्ये घोड्यांचे फार्म बांधले होते. सीता देवीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ते तिथेच राहिले आणि 1968 मध्ये त्यांचे निधन झाले."

सीता देवींचा वॉलिस सिम्पसनशी वाद

प्रतापसिंह राव यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर सीता देवींनी अनेक मौल्यवान वस्तू विकल्या. चंद्रशेखर पाटील सांगतात, "स्वतःचे लाड पुरविण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यांची जीवनशैली खूप खर्चिक होती. त्यामुळे त्यांनी काही मौल्यवान वस्तू विकून ही गरज भागवली."

'व्हॅन क्लीफ अँड अर्पल्स : ट्रेझर्स अँड लेजेंड्स' या पुस्तकात एका घटनेचा उल्लेख आहे. ज्यामध्ये सीता देवी आणि डचेस ऑफ विंडसर वॉलिस सिम्पसन यांचा एका पार्टीत दागिन्यांवरून वाद झाला होता.

सीतादेवी

फोटो स्रोत, Getty Images

वॉलिस सिम्पसन यांनी जो दागिना घातला होता तो सीता देवींनी एका ज्वेलरला विकला होता असं त्यांचं म्हणणं होतं. त्याने डिझाइनमध्ये बदल केला होता आणि हा हार नवीन आहे हे दाखवण्यासाठी त्यात काही नवे हिरे आणि मौल्यवान रत्न जोडले होते. (पृष्ठ क्र. 42)

सीता देवींच्या या वक्तव्यामुळे सिम्पसनला राग आला.

शिवाय ज्या अमेरिकन ज्वेलर हॅरी विन्स्टनकडून हा हार बनवला होता त्याने हे आरोप फेटाळले. पण या प्रसंगामुळे सिम्पसनला अपमान वाटला आणि तिने ते दागिने हॅरी विन्स्टनला परत केले.

या कार्यक्रमानंतर सिम्पसन आणि सीतादेवी यांनी एकमेकांसमोर येणं टाळलं. या कार्यक्रमापूर्वी त्या दोघीही पाश्चात्य फॅशन, राजेशाही आणि श्रीमंत लोकांद्वारे आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये दिसायच्या. (पृष्ठ क्रमांक 42)

त्यांना धूम्रपानाचीही आवड होती. त्या जगातील सर्वांत महागड्या सिगारेट आणि सिगार ओढत असत. हवाना सिगार ही त्यांच्या आवडत्या सिगारपैकी एक होती.

त्याची सिगारेट केस व्हॅन क्लीफ अँड अर्पल्सने डिझाईन केली होती आणि त्यावर देखील माणिक जडलेले होते. त्यांच्याकडे जीभ साफ (टंग क्लीनर) करण्याची जी तार होती ती देखील सोन्याचा मुलामा असलेली होती.

सीतादेवी

फोटो स्रोत, Getty Images

'व्हॅन क्लीफ अँड अर्पल्स : ट्रेझर्स अँड लेजेंड्स' या पुस्तकात असा उल्लेख आहे की, 'महाराणी सीतादेवीबद्दल काही अफवा पसरल्या होत्या. जेव्हा त्या पॅरिसला पोहोचल्या तेव्हा बडोद्याहून आणलेल्या काही गुलामांनी त्यांच्या हवेलीत रात्रभर नृत्य केलं होतं."

'त्यांच्या सौंदर्याचं रहस्य एका भारतीय मद्यात दडलेलं आहे अशी ही एक अफवा होती. हे मद्य मोर आणि हरणांचे रक्त, सोने, मोती पावडर, केशर आणि मध घेऊन नदीच्या काठावर दीर्घकाळ आंबवून तयार केलं जातं, अशी ती अफवा होती.'

'हे मद्य घेण्यासाठी सीता देवींकडे मौल्यवान रत्नांनी जडवलेल्या पक्ष्याच्या आकाराचा सोन्याचा प्याला होता.' (पृष्ठ क्र. 25-26)

जितेंद्रसिंह गायकवाड म्हणतात, "त्यांच्याबद्दल बरेच नकारात्मक आणि अपमानकारक लिखाण झाले आहे. पण त्या तशा नव्हत्या. त्या सुशिक्षित, एक फॅशन आयकॉन होत्या. त्यांच्याकडे सौजन्य, विवेकबुद्धी आणि सोबतच अतुलनीय सौंदर्य होतं."

मुलाच्या मृत्यूने धक्का बसला

हिरे आणि मोत्यांव्यतिरिक्त त्यांचं आणखी एक प्रेम होतं. त्यांचा मुलगा प्रिन्स - सयाजीराव गायकवाड (चौथे).

1960 मध्ये सीतादेवी आणि त्यांचा मुलगा, व्हॅन क्लीफ आणि अर्पल्स यांनी आयोजित केलेल्या पार्टीत प्रमुख पाहुणे होते. या प्रसंगी पियरे अर्पल्स यांनी सयाजीराव (चौथे) यांच्या सन्मानार्थ एका हिऱ्याला प्रिन्सी असं नाव दिलं.

त्यांच्या महागड्या जीवनशैलीमुळे त्यांच्याकडचे पैसे संपले. यामुळे त्यांनी 1974 मध्ये त्यांच्या काही दागिन्यांचा लिलाव केला.

चंद्रशेखर पाटील सीता देवीच्या मुलाबद्दल माहिती देताना सांगतात, "राजकुमाराला संगीतात खूप रस होता. तो जॅझमध्ये तरबेज होता पण आईप्रमाणेच त्यालाही प्रसिद्धीचं व्यसन होतं. त्याला दारू आणि ड्रग्जचे व्यसन जडलं. 1985 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी त्याने आत्महत्या केली."

मुलाच्या आकस्मिक मृत्यूने सीतादेवींना खूप मोठा धक्का बसला.

त्यांना आता एकटेपणा जाणवू लागला होता. अशा प्रकारे पैसा आणि अनेक सुख-सुविधा असूनही सीता देवी शेवटी एकट्याच राहिल्या.

मुलाच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी 1989 मध्ये वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

त्यांच्या मृत्यूनंतर बडोद्याच्या शाही खजिन्यातून नेलेले काही मौल्यवान दागिने आणि वस्तू सापडल्या. जिनिव्हा येथील लॉकरमध्ये मोत्याचा गालिचा सापडला होता.

हेही वाचलंत का ?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)