You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बांगलादेश आणि पाकिस्तान जवळ आल्याने भारतावर काय परिणाम होऊ शकतात?
अलीकडच्या काळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये अधिक तणाव निर्माण झाला आहे. ऑगस्ट महिन्यात बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या तीव्र आंदोलनांनंतर त्यांनी देश सोडला. तेव्हापासूनच भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत.
तसेच बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना आणि दोन्ही देशांकडून होणाऱ्या भाषणबाजीमुळे या तणावात भर पडली आहे.
मागच्या आठवड्यात इस्कॉनशी संबंधित असणारे चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर हा तणाव आणखी वाढला होता.
या अटकेनंतर त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे असणाऱ्या बांगलादेश उप-उच्चायुक्तालयाच्या इमारतीची तोडफोड करण्यात आली.
बांगलादेशने या तोडफोडीचा निषेध केला होता. भारताकडूनही या घटनेबाबत खेद व्यक्त करण्यात आला होता.
आता प्रश्न असा आहे की भारत-बांगलादेश संबंध कोणत्या दिशेने जात आहेत? ही परिस्थिती का निर्माण झाली आणि दोन्ही देशांच्या अंतर्गत राजकारणाचा या संबंधांवर कसा परिणाम होत आहे? बांगलादेशातील हिंदूंचा प्रश्न एवढा महत्त्वाचा का झालाय? बांगलादेश पाकिस्तानच्या अधिक जवळ जातोय का?
कलेक्टिव्ह न्यूजरूमचे डायरेक्टर ऑफ जर्नलिज्म असणारे मुकेश शर्मा यांनी त्यांच्या 'द लेन्स' या कार्यक्रमात, तज्ज्ञांशी या प्रश्नांवर चर्चा केली.
या चर्चेत बांगलादेशातील माजी भारतीय मुत्सद्दी अधिकारी आणि जिंदल स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेयर्सशी संबंधित बांगलादेश इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड सिक्युरिटी स्टडीजचे फेलो जितेंद्र नाथ मिश्रा, बीबीसी ईस्ट इंडियाचे प्रतिनिधी सलमान रावी आणि 'द हिंदू'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक कल्लोल भट्टचर्जी सहभागी झाले होते.
भारत आणि बांगलादेशचे संबंध
अलीकडच्या काही काळात बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि सनातन जागरण मंचचे प्रवक्ते चिन्मय कृष्ण दास यांना अटक झाल्याच्या बातम्या आल्यानंतर भारतातील हिंदू संघटनांनी आक्रमक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
बांगलादेशातही इस्कॉनविरोधी आणि भारतविरोधी मोहीम सुरू झाली.
बांगलादेशातील माजी भारतीय राजनयिक अधिकारी जितेंद्र नाथ मिश्रा म्हणतात की, बांगलादेश आणि भारत यांच्यात अलीकडे निर्माण झालेली आव्हानं नवीन नाहीत.
1975चं उदाहरण सांगताना मिश्रा म्हणाले की, "तेव्हा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होती. कोणत्याही देशात राजकीय बदल झाला की आव्हाने वाढतात, पण याचा अर्थ संबंध तुटतात असा नाही."
मिश्रा म्हणाले की, "बांगलादेश ना पाकिस्तानचा समर्थक आहे ना चीनचा, तो फक्त आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करत आहे."
जितेंद्र मिश्रा म्हणाले की, "भारत सरकारने नेहमीच बांगलादेशातील विविध राजकीय पक्षांसोबत काम केलं आहे."
ते म्हणाले की, "आम्ही बांगलादेश अवामी लीगला सहकार्य केले कारण ते आमच्या हिताचं होतं, त्यांच्याविषयी आम्हाला विशेष आस्था नव्हती."
जितेंद्र मिश्रा म्हणाले की, "बांगलादेश हा आमच्यासाठी महत्त्वाचा देश आहे, कारण इथून आम्हाला व्यापार, पर्यटन आणि इतर अनेक क्षेत्रांतून महसूल मिळतो. अवामी लीगने या सर्व क्षेत्रात भारताला सहकार्य केलेलं आहे."
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वाद अलीकडच्या काळात सातत्याने वाढत आहे, त्यामुळे त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या सीमेलगतच्या भागात स्पष्टपणे दिसून येत आहे.
भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढवल्यामुळे तिथून ये-जा करणे कठीण झाले आहे.
बीबीसीचे प्रतिनिधी सलमान रावी यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी भारत-बांगलादेश सीमेवर लोक सहज ये-जा करू शकत होते.
सलमान म्हणतात की, "अनेक लोक शाळेत जाण्यासाठी नदी ओलांडत असत आणि कोणी आजारी पडल्यास त्यांना उपचारासाठी सीमेच्या या बाजूला आणले जायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.यामुळे लोकांना पूर्वीसारखं एका देशातून दुसऱ्या देशात जाता येत नाहीये."
सलमान रावी म्हणतात , "बांगलादेशचा सर्वांत मोठा सीमावर्ती भाग भारताला लागून आहे आणि सध्या सीमेवरील वातावरण तणावपूर्ण आहे."
"आता लोकांना भीती वाटते की सीमेच्या या बाजूला कोणी काही बोलले तर, सीमेच्या पलीकडे असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना लक्ष्य केलं जाऊ शकतं."
ते म्हणाले, "बांगलादेशचे काळजीवाहू मोहम्मद युनूस सरकार कोणतं पाऊल उचलायचं हे अजून ठरवू शकलेलं नाहीये. तेथील हिंदू समुदायाला लक्ष्य करण्याच्या वाढत्या बातम्यांमुळे भारतात खळबळ उडाली आहे."
"याचा परिणाम असा झालाय की दोन्हीं देशांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक द्वेष निर्माण झाला आहे. ज्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये नवीन समस्या निर्माण होत आहेत."
बांगलादेशातील 'हिंदूंवर अत्याचार'
बांगलादेशात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी देश सोडला. त्यानंतर त्यांचं सरकार कोसळलं.
शेख हसीना सरकारचा पाडाव झाल्यानंतर 8 ऑगस्ट रोजी तिथे अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं.
अंतरिम सरकार स्थापन होण्याआधीच्या तीन दिवसांमध्ये, देशाच्या विविध भागात अल्पसंख्याक समुदाय आणि त्यांच्या विविध आस्थापनांवर हल्ले झाल्याचे आरोप होत होते.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या आरोपांवर माजी भारतीय राजनयिक जितेंद्र नाथ मिश्रा म्हणाले, "ही काही नवीन गोष्ट नाही, बांगलादेशात हिंदूंवर नेहमीच अत्याचार होत आले आहेत. मात्र यावेळी भारताची प्रतिक्रिया वेगळी आहे आणि ती नवीन गोष्ट आहे."
बांगलादेशातील हिंदू लोकसंख्या घटल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, "1947 मध्ये पूर्वीच्या पाकिस्तानात (बांगलादेश) 25 टक्के हिंदू होते, पण आज ही संख्या केवळ 8-9 टक्क्यांवर आली आहे. ते नेमके कुठे गेले? त्यांनी स्वतःच धर्मपरिवर्तन केलं का? त्यांच्या हत्या करण्यात आल्या का? की हे लोक भारतात निघून गेले?"
जितेंद्र मिश्रा म्हणाले, "बांगलादेशात या घटना आधीपासूनच घडत आल्या आहेत, परंतु सध्या आपण ज्या प्रकारचं वातावरण पाहत आहोत, तसं वातावरण याआधी कधीही नव्हतं."
"हिंदूंवरील अत्याचार ही नवीन गोष्ट नाहीये, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकभावना भडकवण्याचे प्रयत्न आता केले जात आहेत."
द हिंदूचे वरिष्ठ सहाय्यक संपादक कल्लोल भट्टचर्जी म्हणाले, "आजच्या भारताच्या दृष्टीकोनातून जर आपण बांगलादेशचा विचार केला , तर तिथल्या अल्पसंख्याक हिंदूंच्या परिस्थितीकडे लक्ष वेधलं जातं."
"असं असूनही त्या देशातल्या हिंदूंसाठीच नाही, तर बांगलादेशातील इतर नागरिकांसाठी सुद्धा सध्याचं वातावरण आव्हानात्मक बनलं आहे."
बांगलादेशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना भट्टचर्जी म्हणाले की, युनूस सरकारच्या भीतीमुळे तेथील प्रशासन त्यांचं काम नीट करू शकत नाहीये.
बांगलादेश आणि पाकिस्तानची जवळीक वाढत आहे
चार महिन्यांपूर्वी सत्ताबदल झाल्यापासून बांगलादेशने अशी अनेक पावले उचलली आहेत, ज्यातून त्यांचे पाकिस्तानशी असणारे संबंध सुधारल्याचे संकेत मिळत आहेत.
बांगलादेशने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी सुरक्षा तपासणीची अटही काढून टाकली आहे. यावरून बांगलादेशला पाकिस्तानशी चांगले संबंध हवे असल्याचं दिसून येतं.
बीबीसीचे प्रतिनिधी सलमान रावी यांनी बांगलादेशच्या पाकिस्तानसोबतच्या वाढत्या जवळीकीवर सांगितलं की, "ज्या गोष्टी पाकिस्तानबाबत लोकांच्या मनात घर करून आहेत, त्याच गोष्टी आता बांगलादेशबाबत लोकांच्या मनात येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वातावरण तापत चाललं आहे."
ते म्हणाले, "बांगलादेशातील बरेच लोक लग्न आणि सणांच्या खरेदीसाठी कोलकाताच्या न्यू मार्केटमध्ये येत असत, परंतु आता ते मार्केट रिकामे पडले आहे. आता लोक एकमेकांशी त्याच भाषेत बोलत आहेत जी पाकिस्तानशी व्यवहार करताना वापरली जात होती."
या मुद्द्यावर कल्लोल भट्टचर्जी म्हणाले, "जर एखाद्या व्यक्ती किंवा पक्षाला शेख हसीना यांचा विरोधक म्हणून स्वतःला सिद्ध करायचं असेल तर शेख हसिनांच्या विरोधात गेलेल्या प्रत्येक गोष्टीला त्याला जवळ करावं लागेल."
"शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाविरोधात वातावरण तयार करायचं असेल तर, युनूस सरकारला पाकिस्तानशी हातमिळवणी करावी लागेल आणि असं करून आम्ही शेख हसीनांचे विरोधक आहोत हे त्यांना दाखवून द्यावं लागेल."
जितेंद्र नाथ मिश्रा म्हणतात की, "बांगलादेशची इच्छा असली तरी त्यांना पाकिस्तानच्या जवळ जाता येणार नाही. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये कोणाला एकमेकांची जास्त गरज आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे."
"शेख हसीना यांच्या काळात बांगलादेश खूप चांगल्या स्थितीत होता. आणि आता युनूस सरकारला बांगलादेशचे शेजारील देशांसोबतचे संबंध पुन्हा संतुलित करायचे आहेत."
दोन्ही देशांमधली आंदोलनं का वाढत आहेत?
भारत आणि बांगलादेशात अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात आंदोलनं करण्यात आलेली आहेत.
काही दिवसांपूर्वी ढाका विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी भारतविरोधी घोषणा देत निदर्शने केली होती.
बांगलादेशातील बिघडलेल्या परिस्थितीवर चर्चा करताना कल्लोल भट्टचर्जी म्हणाले, "ही परिस्थिती चिघळवण्यात माध्यमांनी त्यांची भूमिका अदा केली आहेच. पण, जमिनीवर काही महत्त्वाच्या घटनाही घडल्या आहेत."
शेख हसीना यांच्या अवामी लीगची विद्यार्थी संघटना आणि छात्र लीगबाबत बोलताना ते म्हणाले की,"युनूस सरकारने ऑक्टोबरमध्ये छात्रलीगला बेकायदेशीर घोषित केले, त्यानंतर ते भूमिगत झाले. त्यानंतर छत्र लीगच्या अनेक कार्यकर्त्यांनी हिंदूंशी हातमिळवणी केली. आणि ते निदर्शनांमध्ये सहभागी झाले."
भट्टचर्जी म्हणतात, "इथे हिंदू-मुस्लिम असा कोणताही मुद्दा नाही. छात्र लीगच्या लोकांना फक्त युनूस सरकारला आव्हान द्यायचं आहे आणि यामुळेच अल्पसंख्याक समुदायांकडून होणाऱ्या आंदोलनांमध्ये वाढ होत आहे."
बांगलादेशात घडणाऱ्या घटनांबाबत माध्यमांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना कल्लोल भट्टचर्जी म्हणाले, "या संपूर्ण प्रकरणात माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. बांगलादेशातील लोक भारतीय माध्यमांकडे अतिशय काळजीपूर्वक पाहतात आणि त्याचा परिणाम बांगलादेशवर होतो. तिथला समाजही महत्त्वाचा आहे."
त्यांनी विशेषत: ईशान्य भारतातील राज्यांचा उल्लेख केला, "आसाम, त्रिपुरा, मेघालय यांसारख्या भागात गेल्या काही वर्षांत अनेक नवीन चॅनेल्स आले आहेत, जे अत्यंत विवादास्पद मुद्द्यांवरच्या बातम्या ठळकपणे दाखवतात."
"अशा चॅनल्सचा बांगलादेशातील लोकांवरही परिणाम होतो, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते."
जितेंद्र नाथ मिश्रा यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर सांगितलं की, "भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि एक शक्तिशाली देश म्हणून उदयास आला आहे, अशी परिस्थिती आधी नव्हती."
"म्हणूनच भारताच्या शेजारील देशांमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याकांना आता यातून प्रोत्साहन मिळत आहे."
बीबीसीचे प्रतिनिधी सलमान रवी यांनी भारत-बांग्लादेश राजनैतिक संबंधांमधील वाढत्या तणावावर सांगितलं की, "युनूस यांना विरोध करणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की, बांगलादेशात बदल घडवून आणण्यासाठी युनूस यांची निवड झाली होती. निवडणुका होऊन लोकांनी निवडलेलं सरकार स्थापन व्हावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून होती. मात्र ते सत्तेत येताच बांगलादेशच्या चलनातील नोटांवरून मुजिबूर रहमान यांचा फोटो हटवण्यात आला. याशिवाय इतरही काही घटना घडल्या, ज्यामुळे तणावात वाढ झाली."
ते पुढे म्हणाले, "हा प्रश्न राजनैतिक मार्गाने सोडवण्याऐवजी वेगवेगळी विधानं केली जात आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) अध्यक्षांनीही अशी पोस्ट टाकली होती, ज्यामुळे परिस्थिती आणखीन चिघळली."
शेख हसीना भारतात असल्यामुळेही तणावात भर पडत आहे का?
काही महिन्यांपूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसक आंदोलनांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि देश सोडून भारतात आल्या होत्या.
अशा परिस्थितीत शेख हसीना यांना आश्रय देणं भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकतं का, असा प्रश्नही उपस्थित होतो.
यावर जितेंद्र नाथ मिश्रा म्हणतात, "शेख हसीना भारतात आल्या कारण त्यांच्या जीवाला धोका होता. पण, शेख हसीना भारतात आहेत हे भारतासाठी आव्हानही आहे."
ते म्हणाले की, "त्यामुळेच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी ढाक्याला जात आहेत. राजनैतिक संवादाची नितांत गरज आहे, कारण आमच्यातील विश्वास काही प्रमाणात कमी झाला आहे."
शेख हसीना यांचा भारतातील आश्रय आणि बांगलादेशच्या राजकारणावर 'द हिंदू'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक कल्लोल भट्टचर्जी म्हणतात, "शेजारील देशाचा एखादा नेता भारतात आश्रय घेतो ही नवीन गोष्ट नाही."
बांगलादेशच्या राजकारणात होत असलेल्या बदलांवर भट्टचर्य म्हणाले, "गेल्या अनेक महिन्यांपासून युनूस सरकार आणि विद्यार्थी संघटनांचे सल्लागार शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाविरोधात सातत्याने हा मुद्दा उपस्थित करत आहेत."
"असे दिसते की बांग्लादेशात एक नवीन राजकीय पक्ष जन्माला येऊ शकतो यासाठी ते जनतेला प्रेरित करत आहेत."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.