आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंना 'नो एंट्री', लिलावात कुणावरही बोली का लागली नाही?

यंदाच्या आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग 2025) मध्ये बांगलादेशचा एकही खेळाडू सहभागी होणार नाही. 2020 नंतर पहिल्यांदाच असं होईल की, एकही बांगलादेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार नाहीत.

भारत आणि बांगलादेश यांच्यात अविश्वासाचं वातावरण तयार झालं आहे. अशातच आयपीएलच्या लिलावात बांगलादेशच्या एकाही खेळाडूवर बोली लावण्यात आलेली नाही.

दोन्ही देशांचे संबंध सध्या ताणलेले असल्यामुळे असं घडल्याचं अनेकांना वाटत आहे. सोशल मीडियावर काही कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून याचा संबंध मोदी सरकारशी जोडला जात आहे.

एका यूझरनं सोशल मीडियावर लिहिलं की, "बांगलादेशातल्या हिंदूंसोबत जे काही घडतंय ते पाहता, आयपीएल संघांच्या मालकांनी बांगलादेशच्या खेळाडूंवर बोली लावण्यापासून स्वतःला दूरच ठेवलं."

काही लोकांनी आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये मुस्तफिझूर रहमान हा एकमेव बांगलादेशी खेळाडू होता.

मुस्तफिझूरने चेन्नई सुपरकिंग्ससाठी नऊ सामने खेळले.

यावर्षीच्या आयपीएल लिलावात एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली होती. यापैकी 574 खेळाडूंना 10 संघांनी निवडले. या 574 खेळाडूंपैकी 208 खेळाडू परदेशी आहेत.

जगभरातल्या क्रिकेट खेळाडूंसाठी त्यांचा खेळ दाखवण्यासाठी आयपीएल ही एक संधी असते. फक्त पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होत नाहीत. आयपीएलची सुरुवात 2007 साली झाली आणि फक्त त्याचवर्षी आयपीएलमध्ये पाकिस्तानचे खेळाडू सहभागी झाले होते.

कुणीही बोली लावली नाही

2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय संबंध बिघडलेच पण इतर क्षेत्रातील संबंधांवरही वाईट परिणाम झाला. साहजिकच क्रिकेटवरही याचा परिणाम झाला. तेव्हापासूनच बीसीसीआयने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये प्रवेशास बंदी घातली.

2025 च्या आयपीएलच्या लिलावासाठी बांगलादेशच्या 13 खेळाडूंनी नोंदणी केली होती. यापैकी फक्त रिशाद हुसेन आणि मुस्तफिजुर रहमान हे दोन खेळाडू शॉर्टलिस्ट झाले होते. मात्र या दोघांवरही बोली लावण्यात आली नाही.

रिशादने आयसीसी टी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी करत 14 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीनंतर तो जगाच्या नजरेत आला पण भारतासोबतच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याला केवळ तीन विकेट घेता आल्या. कदाचित ही कामगिरी त्याच्या विरोधात गेली.

रिशाद हुसेनवर बोली का लागली नाही, यासाठी काही कारणं दिली जाऊ शकतात. पण मुस्तफिजुर रहमानवर कुणीही बोली न लावणं ही धक्कादायक बाब होती. मुस्तफिझुरने वेगवेगळ्या संघांकडून एकूण सात आयपीएल स्पर्धा खेळल्या आहेत.

मागच्या आयपीएलमध्ये तो चेन्नईच्या संघात होता. त्याने नऊ सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या होत्या. त्याची मूळ किंमत दोन कोटी होती आणि त्यावर कुणीही बोली लावली नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे लिलावाच्या दुसऱ्या दिवशी मुस्तफिझुरचं नाव घेण्यात आलं. तोपर्यंत सगळ्या संघांकडे असलेले पैसे संपत आले होते. याशिवाय मागच्यावर्षी मध्यातूनच त्याला परत बोलवण्यात आलं होतं, ही गोष्ट देखील त्याच्या विरोधात गेलेली दिसून येते.

शाकिब अल हसन शॉर्टलिस्टही झाला नाही

बांगलादेशचा शाकिब अल हसन दीर्घकाळापासून आयपीएलचा भाग राहिला आहे. गेल्या वर्षी झालेल्या छोट्या लिलावात त्याच्यासाठी कोणीही बोली लावली नाही आणि या वर्षी तो शॉर्टलिस्टही झाला नाही.

बांगलादेशचा एकही खेळाडू आयपीएलमध्ये प्रवेश करू शकला नाही, परंतु अफगाणिस्तानच्या खेळाडूंना संघात घेण्यासाठी स्पर्धा दिसून आली.

विशेष म्हणजे पहिल्या आयपीएलपासूनच बांगलादेशचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होत आले आहेत. आणि अफगाणिस्तानचा विचार केला तर 2007 साली हा संघ आयसीसीचा सदस्यही नव्हता.

आयपीएलचा 18वा हंगाम बांगलादेशी खेळाडूंशिवाय होणार आहे तर अफगाणिस्तानच्या सात खेळाडूंना करार मिळाला आहे.

आयपीएलमध्ये एकही बांगलादेशी खेळाडू नसल्यामुळे टी-20 क्रिकेटमध्ये त्यांची पीछेहाट होत असल्याचं बोललं जातंय.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) संचालक नझमुल आबेदीन फहीम यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, आयपीएलमध्ये केवळ खेळाडूंच्या क्षमतेचा विचार करूनच खरेदी केली जाते.

फहीम म्हणाले की, अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडे फ्रँचाइजी क्रिकेटमध्ये मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे आणि त्यामुळेच त्यांना प्राथमिकता मिळते.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने काय म्हटलं?

डेली स्टार या बांगलादेशच्या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, फहिम म्हणाले की, "मला वैयक्तिक पातळीवर दुःख झालं आहे. आमची गुणवत्ता अगदीच सामान्य आहे. जागतिक स्तरावर आमच्या खेळाडूंना संधी मिळाली तर ते त्यासाठी पात्र आहेत असं समजायचं आणि नाही मिळाली तर आमची तेवढी योग्यता नाही असा त्याचा अर्थ होतो.

आम्ही आमच्या खेळाडूंना फ्रँचायझी लीगसाठी जबरदस्ती करू शकत नाही. त्याच्याकडे पात्रता आणि क्षमता असल्यास त्यांची निवड केली जाईल."

फहीम म्हणाले की, "गेल्या वर्षी आम्हाला संधी मिळाली होती पण आम्ही ती गमावली. संधींचा फायदा करून घेण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं.

एका बाजूला आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंची संख्या वाढत आहे आणि आमचा प्रवास मात्र उलट्या दिशेने सुरू आहे."

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये सध्या कमालीचे अविश्वासाचे वातावरण आहे. चितगाव येथील इस्कॉन मंदिराचे चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना मंगळवारी देशद्रोहाच्या खटल्यात तुरुंगात पाठवण्यात आले.

यानंतर भारताने एक निवेदन जारी करून चिंता व्यक्त केली होती आणि बांगलादेशातील हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांवर अलीकडच्या काळात हल्ले वाढले आहेत.

ही त्यांची अंतर्गत बाब असल्याचे बांगलादेशने म्हटले होते. बांगलादेश सरकारचे लोक भारतीय माध्यमांनाही लक्ष्य करत आहेत आणि भारतीय मीडिया बांगलादेशच्या अंतरिम सरकारबद्दल अपप्रचार करत असल्याचा आरोप करत आहेत.

बांगलादेशच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ महमूद शोजीब भुईया यांनी बुधवारी सांगितले की, "बांगलादेशच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.