You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडिया पाकिस्तानात गेली नाही तर काय होईल? स्पर्धा दुसऱ्या देशात हलवणार?
पाकिस्तानात लवकरच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगणार आहे. पण भारताच्या या स्पर्धेतील समावेशाबाबत मात्र साशंकतेची स्थिती आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या दरम्यान पाकिस्तानात होत आहे.
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पाकव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादमध्येही ट्रॉफी टूर नेण्याची घोषणा केली होती. मात्र, आयसीसी या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या संघटनेनं त्यास परवानगी नाकारली.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, बीसीसीआय या भारताच्या क्रिकेट संघटनेनं सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नसल्याचं आयसीसीला कळवलं आहे. आयसीसीनंही ही सूचना पीसीबीला कळवली आहे.
त्यामुळे आता टीम इंडिया पाकिस्तानात गेली नाही, तर आयसीसी आणि पाकिस्तानसमोर काय पर्याय असतील?
पाकिस्तानातही सध्या याबाबत प्रचंड चर्चा होत आहे. आशिया चषकाप्रमाणे पाकिस्ताननं हायब्रिड मॉडेलवर स्पर्धा आयोजित करू नये, असं तिथल्या माध्यमांचं म्हणणं आहे. म्हणजे काही सामने पाकिस्तानात आणि भारताचे सामने दुसऱ्या कोणत्या तरी देशात आयोजित केले जातात.
गेल्या वर्षी आशिया चषकात अशाच प्रकारे सामने आयोजित केले होते.
पाकिस्तानकडं स्पर्धेचं आयोजकत्व होतं अन् भारतानं पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे आयसीसीनं भारताचे सामने श्रीलंकेत आयोजित केले होते.
पण पीसीबी यावेळी हायब्रिड मॉडेलसाठी तयार नसल्याचं मत पाकिस्तानातून समोर येत आहे. मग इतर कोणते पर्याय शिल्लक राहतात?
पीसीबीचे माजी अध्यक्ष काय म्हणाले?
या स्पर्धेच्या आयोजनाबाबत आता सर्वांच्या नजरा आयसीसीकडे लागल्या आहेत. कारण आयसीसीलाच या समस्येवर तोडगा काढण्याची जबाबदारी आहे.
पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांच्या मते, आयसीसीकडं फक्त तीन पर्याय होते.
पहिला म्हणजे भारतानं पाकिस्तानात जावं, दुसरा म्हणजे हायब्रिड मॉडेल आणि तिसरा पर्याय संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानाबाहेर नेली जावी.
पाकिस्तानच्या एका खासगी वृत्तवाहिनीनं म्हटलं की, “भारताने यावर अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. भारतानं संघ पाकिस्तानात पाठवायला नकार दिला आहे. एवढंच काय पण भारतानं कबड्डी टीम आणि ब्लाइंड क्रिकेट टीमलाही पाकिस्तानात पाठवलं नाही. आधी डेविस कप साठी टेनिसपटू भारतातून पाकिस्तानात जात होते. पण आता तेही जात नाहीत.”
नजम सेठी म्हणतात की, दोन पर्याय जवळपास फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळं फक्त तिसरा पर्याय शिल्लक राहतो, तो म्हणजे स्पर्धा पाकिस्तानबाहेर खेळवण्याचा. पण तसं झाल्यास पाकिस्तान स्पर्धेचा बहिष्कार करू शकतो.
नजम सेठी यांच्या मते, “ही पाकिस्तानसाठीही अत्यंत गुंतागुंतीची स्थिती आहे. पाकिस्ताननं भारताचं म्हणणं मान्य केलं तर त्यांना मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत टीकेचा सामना करावा लागेल. पाकिस्तानला झुकतं घ्यावं लागलं, असं म्हटलं जाऊ शकतं."
सेठी म्हणतात की, “आयसीसी नेहमी बीसीसीआयची बाजू घेतं. जर त्यांनी ही स्पर्धा श्रीलंका किंबा दुबईला हलवली तर पाकिस्ताननं यात खेळायला नकार दिला तर आयसीसीचं नुकसान होईल. तसंच त्यात भारत आणि पाकिस्तान दोघांचं नुकसान होईल. कारण सामन्याच्या कमाईचा एक मोठा भाग भारत आणि एक छोटा भाग पाकिस्तानला मिळतो.”
नजम सेठींच्या मते, “यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा काही फरक पडत नाही. कारण त्यांच्याकडं भरपूर पैसा आहे. तुम्ही बाहेरही खेळले नाही तर त्यामुळं आर्थिक नुकसान होईल आणि हा मोठा मुद्दा ठरेल.”
ते म्हणाले की, “पाकिस्ताननं असा निर्णय घेऊन आयसीसीच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर मग फक्त दुहेरी स्पर्धा शिल्लक राहतात. त्यातून अत्यंत कमी कमाई होते. म्हणजे 10 किंवा 20 लाख डॉलरच्या आसपासच असते. त्यामुळं पाकिस्तानला बहिष्कार करायचा असेल तर त्यामागच्या कारणाचा विचार करावा लागेल. भारताला ते काय करत आहेत, हे नेमकं माहिती आहे.”
पीसीबीच्या निर्णयावर का उपस्थित होत आहेत प्रश्न?
चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने सुरू व्हायला आता अवघ्या 100 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. तसंच पीसीबीनं चॅम्पियन्स ट्रॉफीचा टूरही सुरू केला आहे.
ही ट्रॉफी भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानसह आठ देशांमध्ये टूरसाठी जाणार आहे.
2017 मध्ये लंडनमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्ताननं भारताला 180 धावांनी पराभूत करत विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर त्यांना 2025 च्या स्पर्धेचं आयोजकत्व देण्यात आलं होतं. त्यासाठी आता इस्लामाबादमधून 16 नोव्हेंबरला ट्रॉफी टूर सुरू झाला आहे.
पाकिस्तानात हा ट्रॉफी टूर पाकव्याप्त काश्मिरात नेण्याचं वेळापत्रक जाहीर झालं तेव्हा, भारतानं आक्षेप नोंदवला होता.
पाकव्याप्त काश्मिरात ट्रॉफी टूर नेण्याबाबत नजम सेठी म्हणाले की, “पीसीबी असे निर्णय स्वतः घेत नाही. त्यांना तसा सल्ला मिळाला असेल. यापूर्वी झालेले ट्रॉफी टूर हे जास्तीत जास्त पाकिस्तानच्या तीन ते चार शहरांतच होत होते.”
“पण हे वेळापत्रक पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं. कारण टूरमध्ये गिलगिट, बाल्टिस्थान यांचाही समावेश होता. मला वाटतं हा ठरवून घेतलेला निर्णय होता, पण तो पाकिस्तानचा निर्णय नव्हता. कदाचित अंदाज घेण्यासाठी असं करण्यात आलं होतं,” असंही ते म्हणाले.
त्यांच्या मते, “अशा प्रकारची प्रतिक्रिया येणार याचा पीसीबीला हा निर्णय घेतानाच अंदाज आलेला असणार.”
नजम सेठी म्हणाले की, "पाकिस्ताननं अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा डाव उलटला. आता भारत आणखी कठोर भूमिका घेईल."
यापूर्वी ते म्हणाले की, मुत्सद्दी मार्गाने चर्चेच्या माध्यमातून भारताला राजी करण्यासाठीच्या शक्यता तपासल्या पाहिजे.
स्पर्धेसाठी 'या' देशांची नावं चर्चेत
भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी एका पाकिस्तानी वाहिनीशी बोलताना म्हटलं की, “जर या आयसीसी स्पर्धेत भारत किंवा पाकिस्तान दोन्ही देश खेळले नाही तर जवळपास दोन अब्ज डॉलरचं नुकसान होईल.”
पाकिस्तानसमोर आणखी एक चिंता आहे. ती म्हणजे त्यांनी स्पर्धेच्या तयारीसाठी प्रचंड खर्च केला आहे.
अब्दुल बासित म्हणाले की, “पाकिस्ताननं नॅशनल स्टेडियम कराची आणि गद्दाफी स्टेडियम लाहोर तसंच रावळपिंडी स्टेडियमचं नुतणीकरण आणि इतर तयारींवर जवळपास 15-16 अब्ज रुपये खर्च केले आहेत.”
क्रिकबझ या वेबसाईटच्या मते, आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जवळपास 65 मिलियन डॉलरचं बजेट ठरवलं आहे.
बासीत यांच्या मते, “भारतानं नोंदवलेले आक्षेप योग्य आहेत, असा निर्णय आयसीसीनं दिला तर ही स्पर्धा इतर देशांत हलवली जाईल.कदाचित ही स्पर्धा यूएई आणि दक्षिण आफ्रिकेत हलवली जाऊ शकते. पण आणखी एक चर्चा आहे. ती म्हणजे, भारत ही स्पर्धा त्यांच्या देशात करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. याठिकाणी क्रिकेटबद्दल प्रचंड आकर्षण आहे. प्रचंड प्रेक्षक असल्यानं याठिकाणी चांगला झगमगाट असेल.”
अब्दुल बासित यांच्या मते, “स्पर्धा देशाबाहेर गेली तर पाकिस्ताननं बहिष्कार टाकायला हवा.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)