You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बांगलादेशबरोबर ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतला महत्वाचा निर्णय
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी विक्रम मिस्री बांगलादेश भेटीदरम्यान अनेक बैठका घेणार आहेत, असं सांगितलं.
दोन्ही देशांतील संबंध ताणले गेलेले असताना त्या पार्श्वभूमीवर विक्रम मिस्री हे बांगलादेशला भेट देत आहेत.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागल्यानंतर भारत आणि बांगलादेशात हिंदूंसह इतर अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबाबत अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, बांगलादेशनं काय ही बाब फेटाळून लावली आहे.
भारत आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचं बांगलादेशचं म्हणणं आहे.
शेख हसीना यांनी देशातून पलायन केल्यानंतर त्या 5 ऑगस्ट 2024 रोजी भारतात आल्या. तेव्हापासून त्या भारतात असून सध्या बांगलादेशची सूत्रं मोहम्मद युनूस यांच्या हातात आहेत.
शुक्रवारी (6 डिसेंबर) परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रपरिषदेत रणधीर जयस्वाल म्हणाले होते की, "9 डिसेंबर रोजी परराष्ट्र सचिव बांगलादेशला जाणार असून ते बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांना भेटतील. याशिवाय अनेक बैठकाही होणार आहेत."
दरम्यान, गेल्या आठवड्यात त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे बांगलादेश उप-उच्चायुक्तालयाच्या इमारतीची तोडफोड करण्यात आली.
बांगलादेशनं यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि भारतानं याबद्दल खेद व्यक्त केला होता.
या प्रकरणी सुरक्षेतील त्रुटींबाबत भारताकडून कारवाई करण्यात आली होती. पण बांगलादेशनं आगरतळा मिशनमध्ये व्हिसा सेवा बंद केली.
बांगलादेशचं वर्तमानपत्र 'प्रोथोम आलो'नुसार बांगलादेशनं कोलकाता उप-उच्चायुक्तालयाचे उप-उच्चायुक्त शिकदार मोहम्मद अशरफुर रहमान आणि आगरतळा उप-उच्चायुक्तालयाचे उप उच्चायुक्त आरिफूर रहमान यांना परत येण्याचे निर्देश दिले होते.
यानंतर विक्रम मिस्री यांचा बांगलादेश दौरा होत आहे. मात्र, या दौऱ्यावर राजकीय तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी प्रश्न उपस्थित केलाय.
त्यांनी एक्स(पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवर एक पोस्ट केलीय. त्यात ते म्हणतात, "बांगलादेशातील अल्पसंख्यांक आणि अवामी लीग सदस्यांवर हल्ले सुरू आहेत.
मोहम्मद युनूस हे शेख हसीना, विरोधी पक्ष आणि विद्यार्थी गटांसोबत भारताशी दोन हात करण्याच्या रणनीतींवर चर्चा करण्यासाठी बैठका घेत आहेत. अशा स्थितीत भारत आपल्या परराष्ट्र सचिवांना ढाक्याला का पाठवत आहे?"
बांगलादेश आणि पाकिस्तानदरम्यान वाढती जवळीक
भारत आणि बांगलादेशातील बिघडत्या संबंधादरम्यान, मोहम्मद युनूस यांच्या सरकारबद्दल पाकिस्तानचा कळवळा वाढत चालला आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेशने दोन्ही देशांतील नागिराकांसाठी व्हिसा नियमांमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत. यासह बांगलादेशच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच कराचीहून मालवाहू जहाज बांगलादेशच्या चटगांव बंदरात गेल्या महिन्यात पोहोचले. दोन्ही देशांमधील हा पहिलाच सागरी संपर्क होता.
पाकिस्तानचे बांगलादेशमधील उच्चायुक्त सय्यद अहमद मारूफ यांनी समय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, इस्लामाबाद आणि ढाका दरम्यान हवाई प्रवासही पुढील वर्षापासून सुरू होईल.
मात्र इस्लामाबादहून ढाका येथे विमान आल्यास त्याला भारतीय हवाई हद्द वापरावी लागणार असून त्यासाठी भारताची परवानगी आवश्यक आहे.
भारतीय हवाई क्षेत्र वापरण्याच्या प्रश्नावर मारूफ म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीबाबत नियम आहेत आणि तुम्ही ते थांबवू शकत नाही.
यात काही अडचण असेल असे मला वाटत नाही. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संपर्क वाढण्यास कोणत्याही देशाने घाबरू नये. पाकिस्तानातून बांगलादेशात तांदूळ, गहू, कांदा आणि बटाटे निर्यात करता येतील. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापाराला भरपूर वाव आहे."
निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन, पाकिस्तानशी वाढत्या जवळीकीमुळे भारतात राहत असून, त्यांनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारवर तोंडसुख घेतलं आहे.
त्यांनी लिहिलं आहे की, "शत्रू पाकिस्तानपासून बांगलादेशींना वाचवण्यासाठी भारताने आपल्या 17 हजार सैनिकांचे प्राण गमावले आणि आता त्याच भारताला शत्रू मानलं जात आहे.
भारताने एक कोटी बांगलादेशी निर्वासितांना अन्न, वस्त्र आणि निवारा दिला आणि आता तोच भारत त्यांच्या शत्रू असल्याचं ते म्हणताहेत.
पाकिस्तानी सैनिकांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी भारताने शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले, पण आता तोच भारत त्यांच्यासाठी शत्रू आहे.
तस्लिमा नसरीन पुढे म्हणाल्या, "पाकिस्तानने लाखो बांगलादेशींची हत्या केली आणि महिलांवर अत्याचार केले, आणि आता त्याच पाकिस्तानला ते मित्र बनवू पाहताहेत. 1971 च्या अत्याचाराची माफीही न मागणारा पाकिस्तान आता बांगलादेशचा मित्र मानला जात आहे.
बांगलादेशातील तज्ज्ञ काय म्हणतात?
भारतासोबतच्या संबंधातील गुंता वाढत आहे, असे मत अमेरिकेतील बांगलादेशचे माजी राजदूत एम हुमायूं कबीर यांनी व्यक्त केले.
हुमायूं कबीर यांनी बांगलादेशी वृत्तपत्र 'प्रथम आलो'ला सांगितले की, "बांगलादेशचे भारतासोबतचे संबंध बहुआयामी आहेत. सध्या बांगलादेशचे भारतासोबतचे आर्थिक संबंध एकतर्फी आहेत. आम्ही भारतातून वीज, डिझेल, तांदूळ, कांदा आणि बटाटे आयात करतो. पण बांगलादेशातून भारतात फार कमी वस्तूंची निर्यात होते.
"भारताशी आमचे सांस्कृतिक संबंध आहेत. बांगलादेशातून मोठ्या संख्येने लोक शिक्षणासाठी दिल्लीला जात असत. गेल्या 15 वर्षांत बांगलादेशातील लोकांना भारतात जाण्यासाठी व्हिसा सहज मिळत असे, परंतु ऑगस्टपासून व्हिसाच्या बाबतीत नियमावली कडक करण्यात आली आहे. भारताला संबंध सुधारायचे असतील तर व्हिसा देण्याची प्रक्रियेत बदल केला पाहिजे.
हुमायूं कबीर म्हणतात, "भारताने 5 ऑगस्टनंतर बांगलादेशच्या देशांतर्गत राजकारणाचे वास्तव स्वीकारले नसल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे. बांगलादेशनेही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये याची दक्षता घ्यायला हवी. मला असं वाटतं की, दोन्ही देशांतील लोकांना चिथावणी देणारे कृत्य होऊ नये.
हुमायूं कबीर म्हणाले, "बांगलादेशातील सत्तापरिवर्तनानंतर डॉ. मोहम्मद युनूस यांनी भारतासोबतचे संबंध समानतेच्या आधारावर प्रगती करतील, असे स्पष्ट केले होते. भारतीय पत्रकारांशी संवाद साधताना मोहम्मद युनूस म्हणाले होते की त्यांना द्विपक्षीय संबंध सुधारायचे आहेत."
"बांगलादेशने सप्टेंबरमध्ये मोहम्मद युनूस यांना न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र सभेदरम्यान पंतप्रधान मोदींना भेटण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते होऊ शकले नाही. 5 ऑगस्टनंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत."
हुमायूं कबीर म्हणतात, "समस्या अशी आहे की, भारत बांगलादेशात झालेले राजकीय बदल स्वीकारू शकत नाही. बांगलादेशातील केवळ एका पक्षाशी चांगले संबंध राखणे पुरेसे आहे असे त्यांना वाटत होते.
भारताच्या तत्कालीन परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी 2014 मध्ये बांगलादेशातील निवडणुकांवर कसा प्रभाव टाकला हे सर्वांना माहीत आहे. आम्ही हे 2018 आणि 2024 मध्ये देखील पाहिले. बांगलादेशातील लोकांना काय हवे आहे हे भारताने समजून घेतले पाहिजे", असं ते म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.