राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन स्वत: धावणार की इतरांना धडका देणार?

मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे

फोटो स्रोत, ANI

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मुख्य लढत भाजपप्रणित महायुती आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी यांच्यात असली, तरी इतर पक्षांची लढतही दुर्लक्ष करता न येण्यासारखी आहे. त्यात महत्त्वाचा पक्ष म्हणजे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

राज ठाकरेंनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ते स्वबळावर उतरले आहेत. मनसेनं राज्यातील 288 पैकी 125 मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

इतर पक्षांच्या तुलनेत मनसेने आपले उमेदवर लवकर जाहीर केल्यानं तुलनेनं उमेदवारांना प्रचारासाठी अधिकचा वेळ मिळाला. तसंच, राज ठाकरेंनी राज्यभर सभांचा धडाका लावला आहे.

या सर्व गोष्टी पाहता, मनसे यंदा काही चमत्कार करू शकेल का, मनसेचा परिणाम या निवडणुकीत किती असेल, अशा नाना प्रश्नांनी राजकीय विश्लेषकांना आणि राजकीय पक्षांनाही भांबावून सोडलं आहे.

खऱ्या अर्थानं ‘अनप्रेडिक्टेबल’ म्हणावी अशी ही निवडणूक होत असताना, राज ठाकरेंच्या प्रचाराचा धडाका पाहता, यात आणखीच भर पडलीय. तरीही बीबीसी मराठीनं मनसेच्या प्रभावाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला.

मनसेची लढत कशी आहे?

मनसेनं 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 125 उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात काही ठिकाणी उतरवले आहेत.

मुंबई आणि ठाण्यात 54 मतदारसंघ आहेत. मनसे या भागात प्रबळ मानली जाते आणि यंदा या 54 पैकी 41 जागा मनसे लढवतेय. म्हणजेच, या 41 जागी महाविकास आघाडी, महायुती आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल.

मनसेने मुंबईत 27 आणि ठाण्यात 14 उमेदवार दिले आहेत.

मनसेचे उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांना आव्हान देणार असल्यानं मनसेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची गणितं बिघडू शकतात, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

किंबहुना, अशा तिरंगी लढतींमध्ये मनसेच्या उमेदवारालाही मोठा फायदा होऊ शकतो.

अमित ठाकरे आणि राज ठाकरे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अमित ठाकरे आणि राज ठाकरे

अशा तिरंगी लढती कुठे-कुठे आहेत, यावर आपण एक नजर टाकूया.

वडाळा, घाटकोपर पश्चिम, कलिना, विलेपार्ले, वर्सोवा, गोरेगाव, दहिसर आणि बोरीवली इथे ठाकरे गट, भाजप आणि मनसे अशी लढत होईल.

वरळी, माहीम, भांडुप पश्चिम, चेंबूर, विक्रोळी, कुर्ला, दिंडोशी, मागाठाणे आणि जोगेश्वरी पूर्व इथे ठाकरे गट, शिंदे गट आणि मनसे अशी लढत होईल.

तर ठाण्यातील ओवळा माजिवडा, कल्याण ग्रामीण, भिवंडी ग्रामीण, पालघर, बोईसर आणि कर्जतमध्येही मनसेमुळे तिरंगी लढत पाहायला मिळेल.

मनसेमुळे ‘या’ मतदारसंघात चुरशीची लढत

मुंबईत माहीम विधानसभा मतदारसंघाकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण इथून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मनसेचे उमेदवार आहेत. त्यात माहीम काही मनसेसाठी म्हणावी तितकी ‘सुरक्षित’ जागाही नाही.

कारण इथून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार आहेत, तर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे उमेदवार महेश सावंत आहेत. माहीममधील तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल, हे निकालातून कळेलच. पण मनसे लढत असलेल्य जागांपैकी अत्यंत चुरशीची लढत माहीममध्ये होतेय, हे निश्चित.

2009 साली माहीममधून नितीन सरदेसाई मनसेचे आमदार बनले होते. त्यानंतरही दोन निवडणुका म्हणजे 2014 आणि 2019 मध्ये मनसेने आपली मतसंख्या राखल्याचं चित्र दिसून आलं.

माहीम विधानसभा मतदारसंघातली लढत महत्त्वपूर्व असणार आहे.

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, माहीम विधानसभा मतदारसंघातली लढत महत्त्वपूर्व असणार आहे.

गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत मनसेला इथे 40 ते 42 हजार मतं मिळाली आणि उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिला.

माहीममधून भाजपनं मनसेच्या अमित ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या पाठिंबाच दिलाय. मात्र, उघडपणे अर्थातच महायुकीचे सदा सरवणकर यांच्या मागे भाजप आणि शिंदे गट आहे. त्यात ठाकरे गटानं महेश सावंतांना उभं केल्यानं माहीमची लढत तिरंगी बनलीय.

मुंबईतलाच आणखी एक मतदारसंघ म्हणजे शिवडी. इथून मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर रिंगणात आहेत, तर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून विद्यमान आमदार अजय चौधरी उभे आहेत.

विशेष म्हणजे, इथे महायुतीने उमेदवार दिला नाहीय. त्यांनी मनसेच्या नांदगावकरांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे यंदा चौधरी आमदारकीची हॅटट्रिक मारतात की मनसे बाजी मारते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात तर चारही उमेदवार एकास एक आहेत. बेलापूरमध्ये मनसेकडून गजानन काळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून संदीप नाईक आणि भाजपकडून मंदा म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शिवसेनेचे नेते विजय नाहटा यावेळी अपक्ष मैदानात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होऊन या मतदारसंघातही एक वेगळे चित्र पाहायला मिळेल.

‘मातोश्री’च्या अंगणातील मतदारसंघ म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं, त्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातली निवडणूकही रंगतदार बनलीय. इथून राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी, शिवसेना ठाकरे गटाने वरुण सरदेसाई, तर मनसेकडून तृप्ती सावंत मैदानात आहेत.

तसंच, शिंदे गटाचे पदाधिकारी कुणाल सरमळकर यांनीही या मतदारसंघातून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर या भागातील मनसेचे अखिल चित्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघातील या चौरंगी लढतीमध्ये देखील आश्चर्यकारक निकाल लागण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

वरळी विधानसभा मतदारसंघ गाजतोय, तो आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे. आदित्य ठाकरे इथून विद्यमान आमदार आहेत आणि पुन्हा एकदा ते या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार आहेत.

तसंच, मनसेकडून संदीप देशपांडे आणि शिंदे गटाकडून मिलिंद देवरा रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होऊ शकतं आणि त्याचा फायदा-तोटा कुणाला होते, हेही पाहावं लागेल.

मागील काही निवडणुकीत भांडुप, घाटकोपर पूर्व, विक्रोळी, ठाणे शहर, खडकवासला, कोथरूड अशा काही विधानसभा मतदारसंघात मनसेला निर्णयक आणि चांगली मतं पडली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात देखील मनसेने या निवडणुकीत कंबर कसली आहे.

त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीत देखील मनसेला या मतदारसंघात फायदा होतो हे मनसेमुळे दुसऱ्या पक्षाचा हे निकालानंतर स्पष्ट होईल.

‘भाजप विरुद्ध मनसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार’अशी थेट लढाई कुठे आहे?

भाजपनं माहीममध्ये अप्रत्यक्षपणे आणि शिवडी विधानसभेत थेट मनसेला पाठिंबा दिला असला, तरी राज्यभरातील स्थिती तशी नाहीय. मनसे आणि भाजप थेट एकमेकांविरोधात लढणार आहेत. तर महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांसमोर देखील मनसेची लढाई असणार आहे.

  • ठाणे शहर मतदार संघ भाजपचे संजय केळकर वि. मनसेचे अविनाश जाधव वि. ठाकरे गटाचे राजन विचारे
  • दहिसर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या मनीषा चौधरी वि. मनसेचे राजेश येरुनकर वि. ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर
  • गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विद्या ठाकूर वि. मनसे कडून वीरेंद्र जाधव वि. ठाकरे गटाचे समीर देसाई
  • चारकोप विधानसभा मतदारसंघातून भाजपचे योगेश सागर वि. मनसेचे दिनेश साळवी वि. काँग्रेसचे यशवंत सिंग
  • घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राम कदम वि. मनसेचे गणेश चुकल वि. ठाकरे गटाचे संजय भालेराव
  • कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अतुल भातखळकर वि. मनसेचे महेश फरकासे वि. काँग्रेसचे कालू बुधेलिया
ग्राफिक्स
ग्राफिक्स
  • ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गणेश नाईक वि. मनसेचे निलेश बानखेले वि. अपक्ष विजय चौधरी
  • बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे वि. मनसे कडून गजानन काळे वि. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून संदीप नाईक
  • मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे किसन कथोरे वि. मनसेच्या संगीता चेंदवनकर वि. शरद पवार गट शैलेश वडनेरे
  • भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे महेश चौगुले वि. मनसेचे मनोज गुळवी वि. काँग्रेसचे दयानंद चोरगे
  • नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राजन नाईक वि. मनसेचे विनोद मोरे वि. काँग्रेसचे संदीप पांडे
  • औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अभिमण्यु पवार वि. मनसेचे शिवकुमार नागराळे,
  • जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुरेश भोळे वि. मनसेचे डॉक्टर अनुज पाटील
  • वणी विधानसभा मतदारसंघातून संजीव रेड्डी बोर्डकुरुवार वि. मनसेचे राजू उंबरकर वि. ठाकरे गटाचे संजय देरकर

‘आमच्यामुळे कुणाला फटका बसेल, ही वैफल्यग्रस्त भावना’

मनसे इंजिन सुसाट जाणार की मनसेमुळे फटका बसणार, यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर म्हणतात की, “मनसे हा राज ठाकरे यांनी स्वतंत्र स्थापन केलेला पक्ष आहे. मनसे हा इतर पक्षांसारखं कोणाचं चिन्ह घेतलंय किंवा सत्तेसाठी कोणाबरोबर एकत्र आले आहेत असा पक्ष नाही. लोकांमध्ये या सर्व पक्षांबद्दल राग आहे. आमचे सगळे उमेदवार हे जिंकण्यासाठी रिंगणात आहेत.

“राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय. त्यामुळे एक मोठं यश आम्हाला पुढील काळात पाहायला मिळेल आणि आम्ही सत्तेत असू. लोकशाहीत प्रत्येकाला उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे.

"आमच्यामुळे फटका बसणार, यापेक्षा त्यांच्यामुळे आम्हाला फटका बसेल असं देखील आम्ही म्हणू शकतो. हे सर्व राजकीय बोलणं झालं. मनसेमुळे कोणाला तरी फायदा होईल किंवा फटका बसेल असं बोलत आहेत, ते पराभवाच्या भीतीतून वैफल्यग्रस्त भावनेतून बोलत आहेत. आमचा विजय निश्चित आहे," असं अभ्यंकर म्हणतात.

मुंबईत माहीम विधानसभा मतदारसंघाकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईत माहीम विधानसभा मतदारसंघाकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मनसेच्या या निवडणुकीच्या लढाईबाबत राजकीय विश्लेषक रवीकिरण देशमुख बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात की, “भांडुप, घाटकोपर पूर्व, विक्रोळी, माहीम आणि राज्यातील इतर काही मतदारसंघात मनसेला सातत्याने चांगली मतं मिळालेली आहेत. अशा ठिकाणी खरंतर तिरंगी लढतीत मनसे जिंकण्याची शक्यता वाढली असती, मात्र अडचण अशी आहे की, मनसे निवडणुकीवेळी सक्रिय झाल्यासारखं चित्र आहे.

“तसंच, महत्त्वाचं म्हणजे, लोकसभा निवडणुकीत मोदींना पाठिंबा दिला. त्यापूर्वीच्या निवडणुकीत मोदींना पाठिंबा देऊ नका, असं म्हणाले. त्यामुळे मनसेची भूमिका जनतेला स्थिर वाटत नाही.

त्यामुळे या निवडणुकीत मनसे स्वतःच्या विजयासाठी लढत आहे की कोणाला मदत करतेय, असा संभ्रम लोकांच्या मनात आहे. याचा त्रास मनसेला होऊ शकतो. त्यामुळेच मनसेचे इंजिन थोडा अडथळ्यात आहे, असं वाटतंय.

मनसेची आजवरची कामगिरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्ष स्थापनेपासून तीनच विधानसभा निवडणुका लढल्यात. 2024 ची निवडणूक ही मनसेची चौथी विधानसभा निवडणूक आहे. मनसेच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकूया :

2009 विधानसभा निवडणुकीत मनसेने 143 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवर मनसेच्या उमेदवारांना विजय मिळाला होता, तर 130 जागांवर पराभव झाला होता. मात्र, 130 जागांवर मतांची टक्केवारी चांगली होती.

2014 विधानसभा निवडणुकीत 219 जागा मनसेने लढवल्या होत्या. त्यापैकी एक जाग्यावर मनसेला विजय मिळाला आणि 218 जागांवर मनसेचा पराभव झाला.

2019 विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने 101 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी एका जागेवर विजय मिळाला, तर 100 जागांवर अपयश मिळालं.

त्यामुळे या 2024 विधानसभा निवडणुकीत मनसेने 125 उमेदवार उभे केलेले आहेत, त्यात त्यांना मतांचे किती मार्क पडतात? राज ठाकरेंच्या भाषणांचा धडाका आणि मराठी मतं कुणाच्या पारड्यात पडतात आणि कुणाला धक्का देतात, हे अर्थातच 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.