कामाचं बोला : 'चार पाच वर्षं पोलीस भरतीत यश आलं नाही, आता नाश्त्याचं दुकान चालवतो'

- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, छत्रपती संभाजीनगर
“माझं ग्रॅज्युएशन झालंय, मी चार – पाच वर्षं पोलीस भरतीची तयारी केली. मग त्यात झालं नाही म्हणून इथे नाश्त्याच्या दुकानात माझ्या भावाला मदत करायला सुरुवात केली,” छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकाजवळ नाश्त्याचं दुकान चालवणारा शिवाजी आवटे सांगत होता.
सकाळचे 8 – 8.30 वाजले होते आणि पाठीवर सॅक, हातात पुस्तकं घेऊन जवळपास 70-80 तरुण तरुणी त्याच्या दुकानात चहा – नाश्ता करत होते.
“इथे नाश्त्याला येणारे जवळपास सगळेच तरुण कुणी पोलीस भरती, कुणी स्पर्धा परीक्षा अशी तयारी करतायत. माझं सिलेक्शन झालं नाही तेव्हा मी व्यवसायाकडे वळलो. पण जे माझ्यासारखं व्यवसायाकडे नाही वळू शकले त्यांना काहीतरी लहानमोठी नोकरीच पाहावी लागते. आज आपल्याकडच्या कंपन्या राज्याबाहेर जातायत. कंपन्या इथे टिकल्या असत्या तर त्यांना 10 – 15 हजारांची नोकरी मिळाली असती. आता नोकरीसाठी बाहेर जावं लागल्यावर इतक्या पैशात काय भागणार?”
‘कामाचं बोला’ या बीबीसी मराठीच्या मालिकेसाठी पुणे आणि नाशिकनंतर मी पोहोचलो छत्रपती संभाजीनगरमध्ये. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील तरुण मतदार कोणत्या गोष्टींवर लक्ष देतील? त्यांचं प्राधान्य, त्यांच्या अपेक्षा काय आहेत? तरुण वर्गासाठी कामाच्या गोष्टी कोणत्या आणि बिनकामाच्या कुठल्या हे जाणून घेतलं. त्याचा हा तिसरा भाग.

खडकी, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या शहराच्या नावांप्रमाणेच इथलं रूपही बदलत गेलंय. इतर कोणत्याही टियर टू शहरासारखंच चित्र इथेही दिसतं. शहराच्या भोवती तीन MIDC, मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी देणारा एअरपोर्ट, अनेक महामार्ग, उंची ब्रँड्सची दुकानं हे सगळं एकीकडे आणि नोकरी – रोजगारासाठी आजही काहीसा भ्रांतीत सापडलेला तरुण दुसरीकडे.
गेला काही काळ मराठवाड्यात एक अभूतपूर्व घुसळण होतेय. मराठा आरक्षणाचं आंदोलन इथेच सुरू झालं, उग्र झालं आणि त्यानंतर त्याचे राजकीय पडसादही सर्वाधिक इथेच पाहायला मिळाले.
शेकडो मराठा तरुण – तरुणी या आंदोलनात सहभागी झाले. जातीय अस्मिता टोकदार झाल्या आणि मराठा – ओबीसी दरीही वाढताना दिसली.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्याचा विचार करताना प्रामुख्याने याच घटकाचा विचार केला जातोय. पण इथल्या तरुणाईला यापलिकडे काय हवंय? आरक्षणाने सर्व प्रश्न सुटतील असं त्यांना वाटतं का? वर्षानुवर्षांचा अनुशेष हा मुद्दा अजूनही त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे का?



शहरात काही प्रमाणात IT Sector आलंय, पण आजही त्यात प्रगती करायची म्हटलं तर पुणे – हैदराबाद – बंगळुरू अशीच शहरं गाठावी लागतात ही इथल्या तरुणांची खंत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उच्चशिक्षण घेणारे तरुण आम्हाला भेटले. शिक्षण आहे, पण पुढे रोजगाराचं चित्र नेमकं कसं असेल याबद्दल त्यांच्या मनात अनेक गोष्टी होत्या.

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam
Ph. D झालेला डॉ. लोकेश कांबळे सांगतो, “मी 2014 चा SET-NET पास आहे, महाराष्ट्रात 2018 साली 17,000 पेक्षा जास्त जागा रिक्त होत्या. आज हजारो प्राध्यापक तासाला 600 ते 800 रुपये दराने CHB पद्धतीवर काम करतायत. राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे यामागचं कारण पदभरतीच काढली जात नाही.”
अर्थशास्त्रात Ph. D करणारा सचिन खंदारे म्हणतो, “उत्पन्नाची विषमता याबद्दल वर्ल्ड बँक आणि ऑक्सफॅमचा रिपोर्ट पाहा. देशातल्या 50% लोकसंख्येकडे 13% संपत्ती आहे आणि 1% लोकांकडे 22% साधनसंपत्ती आहे. वेल्थ टॅक्स त्या 1 टक्के लोकांवर लावला पाहिजे.”
(पुणे येथे झालेल्या 'कामाचं बोला'चा व्हीडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात.)
संध्याकाळ झाली तसं विद्यापीठातल्या मोकळ्या मैदानात आम्हाला कवायत करणारी मुलं मुली दिसली. अगदी आत्ताच 18-19 वय पूर्ण केलेली ही मुलं पोलीस भरतीची तयारी करत होती. मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ही मुलं संभाजीनगरमध्ये येऊन तयारी का करत होती? प्रत्येकाचं कारण वेगळं होतं, एक मुलगी म्हणाली गावात राहिले असते तर लग्न करून देण्याचं प्रेशर वाढलं असतं.
खाकी वर्दी हे कुणासाठी स्वतःचं स्वप्न होतं तर कुणासाठी आईचं, कुणासाठी भावाचं. मी जेव्हा विचारलं की ग्रॅज्युएशन वगैरेचं शिक्षण का घेत नाही तेव्हा सगळ्यांचं समान उत्तर होतं की लोक वर्दीला मान देतात. खासगी नोकरी करून जास्त पैसे कमवले तरी तितका मान मिळत नाही.
पण दर वर्षी पोलीस भरतीत निघणारी पदं आणि त्यासाठी तयारी करणाऱ्या तरुणांची संख्या यातल्या तफावतीचं काय? सरकारने अधिक पदं काढावी अशी यांची मागणी. एकाने अगदी मोकळेपणे आपली तक्रार सांगितली.
म्हणाला, “भरतीची वेळ येते तेव्हा MPSC देणारे पण ज्यांची कुठेच सिलेक्शन झालं नाहीय असे पोरं पण भरतीला येतात. त्यांचा आमच्यापेक्षा अभ्यास जास्त असतो. ते इथे पण येतात, तिथे पण येतात. आमच्यासाठी जागाच राहात नाही.”

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam
स्थलांतर, सरकारी नोकरीची आस, पारंपरिक शेतीमध्ये सातत्याने होणारं नुकसान आणि अलिकडेच आरक्षणाचा धगधगता प्रश्न. या सगळ्या घटकांचा मराठवाड्याच्या तरुणाईवर आणि इथल्या निवडणुकीवर कसा परिणाम होतोय याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांच्याशी मी बोललो. ते म्हणतात, “संभाजीनगरमध्ये आता पूर्वीसारखी परिस्थिती नाहीय. इन्फ्रास्ट्रक्चरचे विषय बऱ्यापैकी सुटलेले आहेत त्यामुळे इथे गुंतवणूक यायला हरकत नाहीय.”
(नाशिक या ठिकाणी झालेल्या 'कामाचं बोला'चा भाग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता)
“मराठवाड्यातले विद्यार्थी आजही पारंपरिक अभ्यासक्रमात अडकून पडलेत, त्यातून रोजगार फारसा उपलब्ध होत नाही. शिक्षित असूनही रोजगार न मिळणं याचं प्रमाण मराठवाड्यात खूप जास्त आहे. शेतीत माणूस टिकत नाही आणि अल्पभूधारक असल्याने गाव सोडावं लागतं. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातला तरुण संभाजीनगरकडे येतो आणि इथेही काही जमलं नाही तर नगर, पुणे, मुंबई असं स्थलांतर सुरू होतं.”
“फक्त नोकऱ्या मिळवण्यासाठी आरक्षणाची मागणी आहे हा समज चुकीचा आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना जमिनी विकाव्या लागतात मुलांच्या शिक्षणासाठी. आपण इथे घाम गाळत राहिलो पण मुलांवर ही वेळ येऊ नये या भावनेतून आरक्षणाला धार आली आहे. इथे असलेल्या उद्योगांमध्ये लागणारं कौशल्य इथल्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित होताना दिसत नाही.”
मराठवाडा विकास आंदोलनानंतरही मराठवाड्याचा अनुशेषाचा मुद्दा चर्चेत राहतोच. इथलं राजकारण, समाजकारण सध्या सातत्याने ढवळून निघतंय. इथलं अर्थकारण स्थिरावेल का?
कामाचं बोला मालिकेत मराठवाड्याकडून बीबीसी मराठी निघालं विदर्भाकडे. पुढच्या भागात जाणून घेऊया संत्रानगरी नागपूरच्या तरुणांच्या मनातली गोष्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)













