हमासचं नेतृत्व करणाऱ्या 'या' सहा मोठ्या नेत्यांसोबत नेमकं काय घडलं?

हमासनं 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यात 1,200 जणांचा मृत्यू झाला होता.
या हल्ल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केली होती. तेव्हापासून हे युद्ध अजूनही सुरू आहे.
युद्धाच्या एका वर्षानंतर गाझामधील अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत. यामध्ये 40 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे; तर लाखो लोक निर्वासित झाले आहेत.
या एका वर्षामध्ये हमासचे काही प्रमुख नेतेही मारले गेले आहेत.
नुकत्याच एका हल्ल्यात मारल्या गेलेल्या याह्या सिनवार यांचा समावेश आहे. तर याआधी मारले गेलेल्या इस्माईल हानिये यांसारख्या हमासच्या प्रमुख नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे.
पण यापूर्वी हमासचे प्रमुख नेते कोण होते आणि त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला होता, याची माहिती घेऊयात.
याह्या सिनवार
हमासनं 7 ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यामागचे प्रमुख सूत्रधार याह्या सिनवार होते.
या हल्ल्यात जवळपास 1200 जण मारले गेले होते; तर 200 हून अधिक जणांना बंदी बनवून गाझाला नेलं होतं. हल्ल्यापासूनच सिनवार इस्रायलच्या निशाण्यावर होते.
सिनवार हे हमासचे गाझातील नेते होते. पण याचवर्षी जुलैमध्ये इस्माईल हानिये यांच्या मृत्यूनंतर ते हमासचे प्रमुख बनले होते.
गाझामध्ये 1962 मध्ये जन्मलेले याह्या सिनवार हे कमी वयातच गाझामध्ये युद्धात सहभागी झाले होते.
सिनवार हे हमासची संरक्षण संस्था असलेल्या 'मज्द'चे संस्थापक होते. ते अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सांभाळायचे. त्याचबरोबर ही संस्था इस्रायलच्या संशयास्पद हेरांची चौकशीही करायची. इस्रायलच्या गुप्तचर अधिकाऱ्यावंर नजर ठेवण्याची जबाबदारीही या संस्थेवर होती.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलनं सिनवार यांना तीन वेळा अटक केली होती. सिनवार यांना 1988 मध्ये तिसऱ्यांदा अटक झाली. त्यानंतर त्यांना चार जन्मठेपांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मात्र, हमासकडून पाच वर्षांहून अधिक काळापर्यंत बंदी करण्यात आलेल्या इस्रायली सैनिकांच्या बदल्यात इस्रायलने 1,027 पॅलेस्टिनी आणि इस्रायली अरब कैद्यांना सोडलं होतं. यामधीलच एक कैदी होते ते याह्या सिनवार.
यानंतर सिनवार हमासमध्ये एका प्रमुख नेत्याच्या स्वरूपात पुन्हा आपल्या पदावर आले. त्यांना 2017 मध्ये गाझामध्ये हमासच्या राजकीय शाखेचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं.
अमेरिकेने 2015 मध्ये सिनवार यांना 'आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यां'च्या यादीमध्ये टाकलं होतं.
इस्रायलच्या लष्कराने 16 ऑक्टोबर 2024 रोजी रफाहमध्ये याह्या सिनवार यांची हत्या केली.


इस्माईल हानिये
31 जुलै 2024 रोजी इराणमध्ये त्यांच्या मृत्यूची खात्री होईपर्यंत इस्माईल हानिये हमासचे सर्वांत मोठे नेते होते.
त्यांचा जन्म पॅलेस्टीनी निर्वासितांच्या छावण्यांमध्ये झाला होता.
इस्रायलने त्यांना 1989 मध्ये तीन वर्षांसाठी कैद केलं होतं. त्यानंतर त्यांना हमासच्या अनेक नेत्यांसमवेत मार्ज-अल-जुहूरला निर्वासित करण्यात आलं होतं. हा परिसर म्हणजे इस्रायल आणि लेबनॉनच्या दरम्यानचा 'नो-मॅन्स लँड' प्रदेश आहे. हानिये तिथे एका वर्षापर्यंत राहिले होते.
त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते गाझाला परत आले. त्यांना 1997 मध्ये हमास आंदोलनाचे अध्यात्मिक नेते शेख अहमद यासीन यांच्या कार्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यामुळे तिथे त्यांची पत आणखी वाढली.

फोटो स्रोत, Getty Images
हमासने त्यांना 16 फेब्रुवारी 2006 रोजी पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या पंतप्रधानपदासाठी नामांकित केलं. त्यांना त्याच वर्षी 20 फेब्रुवारी रोजी नियुक्तही करण्यात आलं. मात्र, त्यानंतर एका वर्षातच पॅलेस्टिनी नॅशनल ऑथोरिटीचे प्रमुख महमूद अब्बास यांनी त्यांना त्यांच्या पदावरुन बडतर्फ केलं.
हानिये यांनी या बडतर्फीच्या निर्णयाला घटनाबाह्य ठरवत झिडकारलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की, त्यांचं सरकार आपलं कर्तव्य बजावत राहील आणि पॅलेस्टीनच्या नागरिकांप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत राहील.
त्यांना 2017 साली हमासच्या राजकीय शाखेच्या प्रमुखपदी निवडलं गेलं होतं. 2018 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने हानिये यांना दहशतवादी घोषित केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून इस्माईल हनिया कतारमध्ये राहत होते.
मोहम्मद दिएफ
मोहम्मद दिएफ हमासची लष्करी संघटना असलेल्या इजे-अल-दीन अल-कासिम ब्रिगेडचे प्रमुख होते. त्यांचा जन्म 1965 साली गाझामध्ये झाला होता.
पॅलेस्टाईनमध्ये त्यांना मास्टरमाईंड म्हणून ओळखलं जातं तर इस्रायलमध्ये त्यांना 'द मॅन ऑफ डेथ' अथवा 'द फायटर विद नाईन लाईव्ह्स' अशा बिरुदांनी पुकारलं जातं.
हमासच्या सशस्त्र सदस्यांना गाझातून इस्रायलमध्ये जाता येईल अशा भुयारांना तयार करण्याची योजना मोहम्मद दिएफ यांनी आखली. त्यांचं खरं नाव मोहम्मद दीब अल-मसरी आहे. मात्र, त्यांना अबू खालिद आणि अल दीएफ या नावांनीही ओळखलं जातं.
मोहम्मद दिएफ यांनी इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ गाझामधून जैवशास्त्र विषयामध्ये पदवी प्राप्त केली आहे. ते अभिनय आणि थिएटरबद्दल असलेल्या प्रेमाबद्दल युनिव्हर्सिटीमध्ये ओखळले जायचे. त्यांनी कलाकारांचा एक ग्रुपही तयार केला होता.
जेव्हा हमासच्या स्थापनेची घोषणा झाली तेव्हा ते कोणतेही आढेवेढे न घेता त्यामध्ये सामील झाले होते. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना 1989 मध्ये अटक केली होती. ते 16 महिने अटकेत होते.
तुरुंगात असताना दिएफ यांनी इस्रायलच्या सैनिकांना पकडण्याच्या उद्देशाने हमासहून वेगळे एक आंदोलन प्रस्थापित करण्यासाठी जकारिया अल-शोरबागी आणि सलाह शेहादेह यांच्यासोबत सहमती प्रस्थापित केली होती. नंतरच्या काळात हीच संघटना अल-कासिम ब्रिगेड म्हणून ओळखली जाऊ लागली.

फोटो स्रोत, MEDIA SOURCES
तुरुंगातून सुटल्यानंतर दिएफ हे इजे-अल-दीन अल-कासम ब्रिगेडचे प्रमुख नेता म्हणून पुढे आले. ते या संघटनेच्या संस्थापकांपैकी एक होते.
दिएफ हेच त्या भुयारांच्या निर्मितीसाठीचे इंजिनिअर होते. या भुयारांमधून हमासचे सदस्य गाझातून इस्रायलमध्ये दाखल झाले होते. यासोबतच ते अशाही लोकांमध्ये सामील होते ज्यांनी खूपच जास्त संख्येंने रॉकेट सोडण्याच्या रणनीतीला प्रोत्साहन दिलं.
बॉम्बस्फोटाची योजना तयार करण्याचा आणि त्यावर लक्ष ठेवण्याचा आरोप असलेल्या मोस्ट वॉन्टेड लोकांपैकी ते एक होते. 1996 मध्ये झालेल्या या स्फोटामध्ये इस्रायलचे अनेक नागरिक मारले गेले होते. त्यांच्यावर 1990 च्या दशकात तीन इस्रायली सैनिकांना पकडण्याचा आणि त्यांच्या हत्येमध्ये सामील असल्याचा आरोप होता.
इस्रायलने 2000 मध्ये त्यांना कैद केलं. मात्र, दुसऱ्या पॅलेस्टिनी विद्रोहामध्ये वा इंतेफादाच्या सुरुवातीला ते पळून जाण्यात यशस्वी ठरले.
2002 मध्ये त्यांच्या हत्येच्या प्रयत्न झाला. त्यातून दिएफ वाचले खरे पण त्यांना आपला एक डोळा गमवावा लागला. तेव्हा इस्रायलने म्हटलं की, त्यांनी एक पाय आणि एक हातदेखील गमावला आहे आणि त्यांना बोलण्यामध्येही अडचण येत आहे.
गाझामध्ये 2014 च्या एका हल्ल्यादरम्यान इस्रायलच्या संरक्षण दलाला पुन्हा एकदा दिएफ यांची हत्या करण्यामध्ये अपयश आलं. मात्र, इस्रायलने त्यांच्या पत्नीसह दोन मुलांची हत्या केली.
इस्रायलचा असा दावा आहे की, त्यांनी यावर्षीच्या जुलै महिन्यामध्ये खान युनिसमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये दिएफ यांना मारलं आहे.
मारवान इस्सा
मारवान इस्सा अल-कासम ब्रिगेडचे डेप्युटी कमांडर होते. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यामध्ये त्यांचाच प्रमुख हात होता, असंही म्हटलं जातं.
ते गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायलच्या मोस्ट-वॉन्टेड लिस्टमध्ये होते. 2006 मध्ये त्यांचा हत्येचा प्रयत्न झाला. त्यामध्ये ते जखमीही झाले होते.
त्यांचं हमाससोबत काम सुरु असताना इस्रायल डिफेन्स फोर्सने त्यांना पहिल्या इंतेफादादरम्यान पाच वर्षे आपल्या ताब्यात ठेवलं होतं.
त्यांना पॅलेस्टिनी प्रशासनने 1997 मध्ये अटक केली होती. मात्र, 2000 साली दुसऱ्या इंतेफादाच्या सुरुवातीला त्यांना मुक्त करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Media sources
2014 आणि 2021 मध्ये, गाझावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये दोनवेळा इस्सा यांचं घर उद्ध्वस्त झालं होतं. त्यामध्ये त्यांच्या भावाचाही मृत्यू झाला होता.
2011 पर्यंत त्यांचा चेहरा कुणीही पाहिलेला नव्हता. त्याच वर्षी एक ग्रुप फोटोही प्रसिद्ध झाला होता. इस्रायलचे सैनिक ग्लॅड शालितच्या सुटकेच्या बदल्यात मुक्त करण्यात आलेल्या पॅलेस्टीनी कैद्यांच्या स्वागत समारंभाचा हा फोटो होता.
मार्च 2024 मध्ये गाझामधील एका निर्वासितांच्या छावणीखाली असलेल्या भुयारावर हवाई हल्ला करुन आम्ही इस्साची हत्या केली आहे, असा इस्रायलचा दावा आहे.
खालिद मशाल
1965 मध्ये वेस्ट बँकमध्ये जन्मलेल्या खालिद मशाल यांना हमासच्या संस्थापकांपैकी एक मानलं जातं.
1997 मध्ये इस्रायलच्या पंतप्रधानांच्या आदेशान्वये इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने तेव्हा जॉर्डनमध्ये राहत असलेल्या मशाल यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता.
मोसादचे एजंट कॅनडाच्या बनावट पासपोर्टचा वापर करुन जॉर्डनमध्ये दाखल झाले होते. त्यांनी रस्त्यावरुन चालता चालताच मशाल यांना विषारी पदार्थाचं इंजेक्शन दिलं होतं.
जॉर्डनच्या अधिकाऱ्यांना या हत्येच्या कट समजताच त्यांनी मोसादच्या दोन सदस्यांना अटक केली.

फोटो स्रोत, Getty Images
जॉर्डनचे दिवंगत राजा हुसैन यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मशाल यांना टोचलेल्या विषारी पदार्थाचा एँटीडोट मागितला होता.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या दबावाचा सामना करताना नेतन्याहू यांनी सुरुवातीला हा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र, अखेरिस अँटीडोट देऊ केला.
कतारमध्ये राहणाऱ्या मशाल यांनी 2012 साली पहिल्यांदा गाझाचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. त्यावेळी पॅलेस्टिनी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हमासने 2017 मध्ये आपल्या राजकीय शाखेचे प्रमुख म्हणून मशाल यांच्याऐवजी इस्माईल हानियेची निवड केली. त्यावेळी मशाल हे राजकीय शाखेचे प्रमुख झाले.
महमूद जहार
हमास आंदोलनाच्या स्थापनेच्या सहा महिन्यानंतर महमूद जहार यांना इस्रायलने आपल्या ताब्यात घेतलं होतं.
जहार यांचा जन्म 1945 साली गाझामध्ये झाला होता. त्यांचे वडिल पॅलेस्टीनी होते तर आई इजिप्तची रहिवाशी होती. त्यांचं बालपण इजिप्तच्या इस्मायलिया शहरामध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गाझामध्ये झालं.
त्यांनी काहिरातील ऐन शम्स युनिव्हर्सिटीमधून 1971 साली जनरल मेडिसीनमध्ये पदवी घेतली. त्यानंतर 1976 मध्ये त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं.
त्यांनी गाझा आणि खानमधील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम केलं. त्यांना इस्रायलने त्यांच्या राजकीय चळवळींसाठी बडतर्फ करेपर्यंत ते तिथे काम करत होते.
जहार यांना हमासच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानलं जातं. त्यांना हमास आंदोलनाच्या राजकीय नेतृत्वातील एक महत्त्वाचा सदस्य म्हटलं जातं.
हमासच्या स्थापनेच्या सहा महिन्यानंतर 1988 मध्ये महमूद जहार यांना इस्रायलच्या तुरुंगामध्ये सहा महिन्यापर्यंत ठेवण्यात आलं. इस्रायलने त्यांना 1992 मध्ये इतर नेत्यांसोबत मार्ज-अल जुहूरमध्ये निर्वासित केलं होतं. तिथे ते एका वर्षापर्यंत राहिले होते.

फोटो स्रोत, Getty Images
2005 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये हमासला बहुमत प्राप्त झालं होतं. जहार यांनी पंतप्रधान इस्माईल हानियेंच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी सरकार बरखास्त केलं होतं. यामुळे पॅलेस्टिनींमध्ये विभाजन झालं होतं.
इस्रायलने 2003 मध्ये जहार यांच्या हत्येचा प्रयत्न केला. गाझा शहराजवळील रिमलमध्ये एफ-16 नावाच्या एका विमानाने जहार यांच्या घरावर बॉम्ब टाकला होता. हा बॉम्ब पाच क्विंटलचा होता, असं म्हटलं जातं. या हल्ल्यामध्ये त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. मात्र, त्यांचा मोठा मुलगा खालिदचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता.
गाझाच्या पूर्व भागामध्ये 15 जानेवारी 2008 रोजी इस्रायल सैन्याच्या कारवाईमध्ये त्यांचा दुसरा मुलगा होसामचा मृत्यू झाला होता.
जहार यांनी वैचारिक, राजकीय आणि साहित्यिक लिखाण केलं आहे. यामध्ये 'द प्रॉब्लम ऑफ अवर कंटेम्परेरी सोसायटी : ए कुरानिक स्टडी', 'नो प्लेस अंडर द सन' यांचा समावेश आहे. बेंजामिन नेतन्याहूंच्या एका पुस्तकाला प्रतिक्रिया म्हणून ही पुस्तके लिहिली गेली आहेत. याशिवाय त्यांनी 'ऑन द पेव्हमेंट' नावाची एक कादंबरीही लिहिली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











