गाझा : ‘माझा मुलगा खेळण्याच्या आवाजापेक्षा, बॉम्बचे आवाज लवकर ओळखतो’

हॅलोम (डावीकडे) आणि हमौद (उजवीकडे) उत्तर गाझा येथील जबलिया येथे युद्धात अडकले आहेत
फोटो कॅप्शन, हॅलोम (डावीकडे) आणि हमौद (उजवीकडे) उत्तर गाझा येथील जबलिया येथे युद्धात अडकले आहेत
    • Author, लारा एल गिबाली आणि हाया अल बद्रेंच
    • Role, बीबीसी आय इन्व्हेस्टिगेशन्स

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायलने गाझाविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर दोन पॅलेस्टिनी नागरिकांनी त्यांच्या रोजच्या आयुष्याचं चित्रण बीबीसी वर्ल्डसाठी करायचं ठरवलं.

त्यातली एक आहे असील. 24 वर्षांची ही तरुणी दोन मुलांची आई आहे. युद्ध सुरू असतानाच दुसऱ्या बाळाला तिने जन्म दिला आहे. ती दक्षिण भागात राहते.

तर उत्तर भागात खालिद राहतात. त्यांना दोन मुलं आहे.

या दोघांनी बीबीसी वर्ल्डला आपल्या चित्रणाच्या माध्यमातून रोजचे अनुभव सांगितले. या काळात त्यांनी वेगवेगळे स्फोट, बचाव मोहिमा, आजूबाजूला झालेले मृत्यू, या सर्व गोष्टींचा लहान मुलांवर झालेला परिणाम या गोष्टी अनुभवल्या. आणि त्याचं चित्रण त्यांनी केलं.

'माझ्या मुलांनी हे खेळ खेळू नये असं मला वाटतं' - खालिद

उत्तर गाझामध्ये बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या एका घराच्या हॉलमध्ये सहा वर्षीय हमोद आणि चार वर्षीय हलूम हे डॉक्टर-डॉक्टर खेळत आहे. ते एक छोटी बाहुली आणतात. आणि तिच्या कापडी शरीरात टाके घालण्याचा अभिनय करतात.

“ती जखमी झाली आहे, तिच्यावर खूप मलबा पडलाय,” हमोद सांगतो.

गेल्या वर्षांत तो आणि त्याचा भाऊ अनेकदा हा खेळ गाझामध्ये खेळले आहेत.

तिथे ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या तीन मृत्यूंमध्ये एक मृत्यू बालकाचा असतो अशी माहिती हमासच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हमासने 7 ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात 1200 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्रायलने युद्ध पुकारलं आहे.

या मुलांच्या वडिलांचं नाव खालिद आहे. मुलं जेव्हा हा खेळ खेळत असतात तेव्हा ते त्यांना दुरून पाहत असतात.

“या मुलांनी असं काही खेळायला नको. मी त्यांना जेव्हा असं पाहतो तेव्हा माझ्या काळजाला चरे पडतात,” ते सांगतात.

लाल रेष
लाल रेष
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गाझामधील सर्व रुग्णालयं डिसेंबरमध्ये म्हणजे युद्ध सुरू झाल्यावर अगदी काही महिन्यात बंद पडली होती. दक्षिणेचा भाग रिकामा करावा असा आदेश इस्रायलने दिला होता. खालिद यांनी तो मानला नाही आणि ते उत्तर गाझामध्ये जबालियाच्या शेजारी त्यांच्या समाजातील लोकांसाठी वैद्यकीय सोयीसुविधा पुरवण्यासाठी थांबले.

खालिद डॉक्टर नाहीत, ते फिजिओथेरपिस्ट आहेत आणि वैद्यकीय साहित्य पुरवणाऱ्या एका कंपनीत वितरक म्हणून ते काम करत होते.

“मी फिजिओथेरपिस्ट आहे, डॉक्टर नाही हे माझ्या शेजारी असलेल्या सगळ्यांना माहिती आहे. पण परिस्थिती विपरीत असल्यामुळे मी विशेषत: लहान मुलांना मलमपट्टी करू शकतो आणि टाके घालू शकतो असं मी त्यांना सांगितलं. मी जर इथून निघून गेलो तर ज्यांची मी काळजी घेतोय, त्यांचा जीव जाऊ शकतो कारण इथे कोणतेच हॉस्पिटल किंवा क्लिनिक नाही,” खालिद सांगत होते.

सर्जरीसाठी असणारी साधारण कौशल्यं आणि काही औषधं यांच्या सहाय्याने त्यांनी एक दवाखाना उघडला. त्यांच्याकडे असलेली काही औषधं 'एक्सपायर्ड' झाली आहेत.

त्यांनी लहान मुलांवर उपचार करण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या मुलांनी जे पाहिलं त्याची नक्कल करायला सुरुवात केली.

“ॲम्ब्युलन्स, त्याला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जा,” हमोद ओरडत होता. तो आणि त्याची बहीण पॅरामेडिक्स-डॉक्टर असल्याचा खेळ खेळत होते.

युद्धाच्या काळात ते दोघं हा खेळ शिकले आहेत.

प्रत्यक्षात जसा एखादा डॉक्टर युद्धग्रस्त भागात जसं वागू शकतो. त्याचीच नक्कल ही मुलं करतात. जणू खराच रुग्ण आपल्या समोर आलाय असं त्या बाहुलीला ते तपासतात आणि ते करत असताना त्यांचा सवाद चालतो.

'की जखम कशामुळे झाली असेल. मला वाटतं की मिसाईलमुळे ही जखम झालीये. बॉम्ब पडल्यामुळे इमारती अंगावर कोसळून जखम झालीये वाटतं.'

या प्रकारचे संवाद ही मुलं बोलत असतात. थोडेच दूर उभे असलेले त्यांचे वडील खालिद हे ऐकत असतात.

“हमोदला त्याच्या खेळण्याच्या आवाजापेक्षा बॉम्बचे आवाज जास्त कळतात. तर हलूमला त्याच्या वयाच्या मानाने जास्त सोसावं लागलं आहे,” खालिद सांगतात.

“या युद्धाचा त्यांच्या मनावर दीर्घकालीन परिणाम होईल अशी मला भीती वाटते,” खालिद सांगतात.

आंतरराष्ट्रीय बचाव समितीच्या मते, स्थलांतर, मानसिक धक्का आणि शाळा बुडाल्यामुळे गाझामधील लहान मुलांवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे.

उत्तर भागात खालिद आणि त्यांची मुलं अडकली आहेत. त्यांना फक्त मानसिक त्रासच झालेला नाही तर त्यांना भुकेचा त्रासही मोठ्या प्रमाणात सहन केला आहे.

जून महिन्यात संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार गाझामधील 96 टक्के लोकांना प्रचंड प्रमाणात अन्न सुरक्षेचा प्रश्न भेडसावत आहे.

लाल रेष

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

लाल रेष

हमोदने त्याच्या गच्चीवर एक झेंडा तयार केला आहे. आपल्या घरावर जीवनावश्यक वस्तू टाकाव्यात असा इशारा मदत पुरवणाऱ्या विमानांना या झेंड्यातून मिळतो.

एकेदिवशी असंच तो अन्न आणि इतर सामुग्री पुरवणाऱ्या विमानाची वाट पाहत गच्चीवर होता तेव्हा जमिनीवर एक प्रचंड मोठा आवाज झाला. जवळच्या एका इमारतीवर इस्रायली जेटने एक बॉम्ब टाकला होता. त्यामुळे तिथून निघत असलेला धूर काही अंतरावरून दिसत होता.

“मला विमानातून बॉम्ब टाकलेले अजिबात आवडत नाही, त्याऐवजी त्यांनी आमच्यासाठी काहीतरी खायचे पदार्थ टाकावेत,” असं हमोद रागाने म्हणतो.

असीलला करावा लागला आठव्या महिन्यात प्रवास

असीलला आठवा महिना सुरू होता. तेव्हा सुरक्षित ठिकाणी आसरा मिळण्यासाठी एका विशिष्ट रस्त्यावरून तिला कितीतरी अंतर चालत जावं लागलं, “आमच्याकडे पुरेसं पाणी नव्हतं आणि मला ॲनिमियाचा त्रास होता. सगळीकडे मृतदेह दिसत होते. मी फक्त माझी मुलगी रोझ आणि पोटात असलेल्या बाळाचा विचार करत होते.”

असील आणि तिच्या नवऱ्याने एक निर्णय घेतला. ती म्हणाली, “जर त्याला काही झालं तर मी एकटी चालत राहीन आणि पोटातल्या बाळाची आणि रोझची काळजी घेईन. थकव्यामुळे मला काही झालं तर मला तिथेच सोडून तो मुलीला घेऊन समोर जायचं आहे हे त्याला माहिती होतं.”

जेव्हा ते दिर-अल-बलाहला त्यांच्या नातेवाईकांकडे सुरक्षित पोहोचले तेव्हा एक नवीन समस्या समोर आली. बाळाला जन्म देऊ शकेल असं अगदी एखाद दुसरं रुग्णालय तिथे सुरू होतं, नुसरियत येथील अल अवदा हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म देण्यासाठी आवश्यक सुविधा होत्या.

असीलची मुलगी हयातचा 13 डिसेंबरला जन्म झाला. हयात नावाचा अरेबिक भाषेत 'आयुष्य' असा अर्थ होतो.

हयातचा जन्म डिसेंबर 2023 मध्ये गाझा येथे झाला होता
फोटो कॅप्शन, हयातचा जन्म डिसेंबर 2023 मध्ये गाझा येथे झाला होता

एकदा युद्ध संपलं की आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याची आठवण करून देणारं असं तिचं नाव आहे.

“इतक्या विपरीत परिस्थितीत तिने मला नवसंजीवनी दिली. अतिशय कठीण परिस्थितीतही आयुष्य सुरू राहू शकतं याची आठवण तिने मला करून दिली,” असील सांगते.

इब्राहिम हा फोटोग्राफर आहे. त्याला बायको, रोझ आणि नवजात बाळाला सोडून काम करायला जीव धोक्यात घालून जावं लागलं. एकदा एका गोळीबारात तो अडकला आणि थोडक्यात बचावला.

“आयुष्यात अगदी साध्या गोष्टी म्हणजे डायपर्स, फॉर्म्युला मिल्क आणि कपडे तरी मिळावं यासाठी मी हे सगळं करत आहे,” इब्राहिम सांगतो.

“संपूर्ण गाझाचं वजन माझ्या खांद्यावर आहे असं मला वाटतं. मला माझ्या मुलींची खूप काळजी वाटते. नवीन बाळाला मी पुरेशा सुविधा देऊ शकणार नाही असं मला वाटतं,” इब्राहिम सांगतो.

मे महिन्यात इब्राहिम आणि असील दिर-अल-बलाहमध्ये पुन्हा एकत्र आले. ते त्यांच्या मुलांना फिरायला घेऊन गेले.

“हयातने तर युद्धाशिवाय एकही दिवस पाहिलेला नाही. जेव्हा सगळीकडे विद्ध्वंस सुरू होता, बॉम्बचे आवाज आणि त्याच बातम्या येत होत्या अशा वातावरणात तिचा जन्म झाला आहे,” इब्राहिम पुढे सांगतो.

सहा महिन्याची हयात तिच्या आईच्या मांडीवर समोरच्या सीटवर बसली आहे. त्यांची कार कोसळलेल्या इमारतींच्या समोरून, वाळू आणि मलब्यात दबलेल्या रस्त्यावरून पुढे जात आहे.

“मात्र असं असूनसुद्धा तिचा चेहरा कायम हसरा असतो,” इब्राहिम सांगतो.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या युट्युब चॅनलवर बीबीसीने स्टोरीव्हिल फिल्म साठी बनवलेला 'लाइफ अँड डेथ इन गाझा' हा माहितीपट पाहता येईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)