इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंच्या घरावरील ड्रोन हल्ल्यानंतर इस्रायलचे लेबनॉनवर हवाई हल्ले सुरू
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंच्या घरावरील ड्रोन हल्ल्यानंतर इस्रायलचे लेबनॉनवर हवाई हल्ले सुरू

फोटो स्रोत, Getty Images
लेबनॉनकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या खासगी घराला लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यानंतर इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बैरुतवर किमान 12 हवाई हल्ले केले आहेत.
यासोबतच लेबनॉनमधील इतर भागांवरही आपले हल्ले चालूच ठेवले आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर म्हटलं आहे, "आम्हाला कोणत्याही परिस्थिती रोखलं जाऊ शकत नाही. जोवर इस्रायलला विजय प्राप्त होत नाही, तोवर हमासविरोधातील आपला लढा सुरुच राहील."
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडिओमध्ये नेतन्याहू यांनी म्हटलं आहे की, "आम्ही हमासचे नेते याह्या सिनवार यांची हत्या केली आहे."
नेतन्याहू म्हणाले की, "मी म्हणालो होतो की, आम्ही पुन्हा उभे राहण्यासाठी हे युद्ध करत आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत लढत राहू."
या दरम्यानच इस्रायलच्या सैन्याने पुढील कारवाईसाठी दक्षिण लेबनॉनच्या काही भागातील लोकांना आपली घरे रिकामी करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आता इस्रायलने लेबनॉनवर हल्ले करण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.
बैरुतमधील गेले तीन दिवस तशी शांतता होती; मात्र, आता पुन्हा एकदा हल्ल्यांच्या आवाजांनी हे शहर दणाणलं आहे. दाट, काळसर ढगांनी बैरुतचं आकाश व्यापलं आहे.
इस्रायलने बैरुतवर केलेल्या हल्ल्यांपैकी दोन हल्ले बैरुतच्या विमानतळानजीक करण्यात आले आहेत. हे विमानतळ सध्याही उड्डाणांसाठी वापरलं जात आहे. इस्रायली सैन्याने रहिवाशांना बाहेर पडण्याचा इशारा दिला असला तरीही अनेक वेळा रहिवाशांना त्या परिसरातून बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही.
या हल्ल्यात झालेलं नुकसान आणि जीवितहानी यांचं मूल्यांकन केलं जात आहे. परंतु किमान एक बहुमजली इमारत पूर्णपणे नष्ट झाली असल्याची माहिती आहे.
बेंजामिन नेतन्याहूंच्या घरावर हल्ला

फोटो स्रोत, EPA
बेंजामिन नेतन्याहू यांचं हे घर किनारपट्टीच्या परिसरातील सिझेरिया शहरात आहे. या हल्ल्याबाबतची माहिती नेतन्याहू यांच्या अधिकृत कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
इस्रायल सरकारच्या एका प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, या हल्ल्यादरम्यान पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांची पत्नी दोघेही घरी नव्हते. तसेच या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचं घर सिझेरिया भागामध्ये आहे. याआधी इस्रायलच्या सैन्याचं असं म्हटलं होतं की, शनिवारी सकाळी इस्रायलच्या दिशेने ड्रोनचे तीन हल्ले करण्यात आले होते.
यातील एका ड्रोनने एका इमारतीला लक्ष्य केलं होतं तर इतर दोन ड्रोन्सना इस्रायलने रोखण्यात यश मिळवलं होतं. एका सोशल मीडिया पोस्ट्सच्या हवाल्याने असं म्हटलं जात होतं की, ड्रोनच्या निशाण्यावर असलेली इमारत ही बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराचाच एक भाग होती.
याआधी इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) अशी माहिती दिली होती की, शुक्रवारी रात्री उशीरा लेबनॉनकडून 20 मिसाईल्स डागण्यात आल्या होत्या, ज्या इस्रायलच्या दिशेने आल्या होत्या.
आयडीएफचं असं म्हणणं आहे की, यातील काही मिसाईल्सना रोखण्यात यश आलं तर काही मिसाईल्स मोकळ्या परिसरात कोसळल्या.
हमासने म्हटलं की, इस्रायलने उत्तर गाझाच्या जबालिया येथील निर्वासितांच्या शिबिरावर हल्ला केला. यात 33 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये 21 महिलांचा समावेश असल्याचंही गाझातील हमासच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दुसरीकडे इस्रायलने जबालियाच्या निर्वासितांच्या शिबिरावर झालेल्या हल्ल्याच्या आरोपावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इस्रायलचे सैन्य मागील अनेक आठवड्यांपासून घनदाट लोकवस्ती असलेल्या गाझातील भागाची घेरेबंदी करत आहेत. याच आठवड्यात इस्रायलच्या एका कारवाईत हमासचे प्रमुख नेते याहया सिनवार यांचा मृत्यू झाला.
सिनवार यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युद्ध संपवण्याबाबत वक्तव्य केलं.
बायडेन म्हणाले, “लेबनानमध्ये युद्धविराम होण्याची शक्यता तयार झाली आहे. इस्रायल लेबनानमध्ये हिजबुल्लाहसोबत युद्ध करत आहे. मात्र, गाझात युद्धविराम होणं कठीण आहे.”
गाझातील हमास संचलित माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी (18 ऑक्टोबर) इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 85 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच या हल्ल्यामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 50 पर्यंत जाऊ शकते.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या हल्ल्यात कमीत कमी 39 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असं गाझातील हमास संचलित आरोग्य मंत्रालयाने म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलने शाळेवर केलेल्या हल्ल्यात 14 ऑक्टोबररोजी 15 जणांचा मृत्यू झाला असल्याचे गाझामधील हमास संचलित गटाने सांगितले होते. या शाळेत सामान्य नागरिकांनी आश्रय घेतला होता त्या ठिकाणी शेलिंग झाली आणि त्यात या नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गाझामधील हमास संचालित नागरी संरक्षण गटाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (13 ऑक्टोबर) नुसेरात कॅम्पमधील या शाळेवार तोफांचा मारा झाला. यात काही कुटुंबातील सगळ्या सदस्यांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.
या घटनेवर इस्रायल सैन्याने या वृत्तांमधील गोष्टी तपासत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली.
तर, हमासने केलेल्या ड्रोन हल्ल्यात 4 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर यात 7 सैनिक आणि 60 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उत्तर गाझातील ड्रोन हल्ल्यात रस्त्यावर खेळणाऱ्या 5 मुलांचा मृत्यू
याआधीही उत्तर गाझातील एका ड्रोन हल्ल्यात रस्त्यावर खेळणाऱ्या 5 मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते.
गाझातील नागरी संरक्षण गटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अल-मुफ्ती शाळेत गाझातील शेकडो विस्थापित लोक आश्रयासाठी थांबले होते. तेथे झालेल्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे, 50 लोक जखमी झाले.
मागील काही दिवसांमध्ये गाझातील संघर्षाचं केंद्र उत्तर गाझा आहे. या भागात इस्रायली सैन्याने आठवडाभरापेक्षा अधिक काळ तीव्र हल्ले केले. त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गाझातील प्रशासनाने दिली.
बीट हानौन, जबलिया आणि बीट लाहियाचा शहराशी संपर्क तुटला
बीट हानौन, जबलिया आणि बीट लाहियामधील रहिवाशांनी त्यांचा जवळच्या गाझा शहरांशी संपर्क तोडण्यात आल्याची माहिती दिली आहे. गाझातील या सर्वांत मोठ्या शहराच्या सीमेवर इस्रायलचे रणगाडे दिसले आहेत.
या भागातील रुग्णालयासाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीचा पुरवठा खंडित झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, रेड क्रॉससह केलेल्या संयुक्त मोहिमेत 9 दिवसांच्या प्रयत्नांनंतर या रुग्णालयांपैकी दोन रुग्णालयांना पुरवठा करता आला आहे.

उत्तर गाझातील अल-शती भागात इस्रायलच्या ड्रोन हल्ल्यात रस्त्यावर खेळणाऱ्या 5 मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आहे.
त्यानंतर समोर आलेल्या फोटो-व्हिडीओंमध्ये किशोरवयीन मुलांचे रक्ताने माखलेले मृतदेह दिसत आहेत.
या मृत मुलांपैकी एका मुलाने त्याच्या हातात काचेच्या गोट्या पकडलेल्या दिसल्या.
बीबीसीच्या प्रतिनिधीला घटनास्थळावरून मिळालेल्या वृत्तानुसार, हा ड्रोन हल्ला रस्त्यावरून चालत असलेल्या एका व्यक्तीवर झाला. त्यातच मुलांचाही मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले.
नंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये पाच मुलांचे मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले आणि जमिनीवर शेजारी-शेजारी ठेवलेले दिसले.
मृत मुलाच्या नातेवाईकाची सोशल मीडियावर प्रतिक्रिया
मृत मुलांपैकी एका मुलाची नातेवाईक असलेल्या रामी नावाच्या महिलेने सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यात तिने म्हटलं, "युद्धामुळे या कुटुंबाला जबलियामधील आपलं घर सोडून 'सुरक्षित भागात' जाण्यास भाग पाडलं गेलं. त्यानंतर हे कुटुंब अल-शाती भागात आले होते."
इस्रायल सैन्याने या घटनेवरील प्रश्नांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हमास संचलित आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युद्ध सुरू झाल्यानंतर मागील वर्षभरात 42 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
गाझाच्या 24 लाख लोकसंख्येपैकी जवळपास 19 लाख लोक युद्धामुळे विस्थापित झाले आहेत. यातील अनेकांना युद्धापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेकदा स्थलांतरीत होण्यास भाग पाडण्यात आलं.


हमासच्या ड्रोन हल्ल्यात 4 इस्रायली सैनिकांचा मृत्यू
इस्रायल सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हमासने उत्तर इस्रायलमधील लष्करी तळावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 4 सैनिकांचा मृत्यू झाला. तसेच 7 सैनिक आणि 60 हून अधिक लोक जखमी झाले.
हिजबुल्लाहने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. इस्रायलने लेबनॉन आणि बैरूतवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा ड्रोन हल्ला केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासने उत्तर इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात इस्रायलमधील 1 हजार 200 लोकांचा मृत्यू झाला, तर 200 हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











