अभिनेत्री रान्या राव कोण आहे, जिने शरीरात चलाखीनं लपवून आणलं 14 किलो सोनं?

फोटो स्रोत, ranyarao/X
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी प्रतिनिधी, बंगळुरूहून
कन्नड आणि तामिळ चित्रपटांमधील अभिनेत्री रान्या राव दुबईहून परतत असताना बंगळुरू विमानतळावर महसूल गुप्तचर विभागानं त्यांना 14.8 किलो सोन्यासह अटक केली आहे.
या सोन्याची किंमत जवळपास 12 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे.
विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, अभिनेत्री रान्या राव कर्नाटकचे पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी आहे.
रान्या राव मंगळवारी (4 मार्च) बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती, तेव्हा तिच्याकडे सोनं होतं, असं सांगितलं जातं आहे.
महसूल गुप्तचर विभागानं काय माहिती दिली?
महसूल गुप्तचर विभागानं (डीआरआय) बुधवारी (5 मार्च) दिलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे, "अतिशय चलाखीनं त्यांच्या शरीरात गोल्ड बार लपवण्यात आले होते."
एका विशेष प्रकारच्या बेल्टमध्ये सोन्याचे बार किंवा पट्ट्या लपवण्यात आल्या होत्या. हा बेल्ट अभिनेत्री रान्या रावच्या शरीरावर बांधण्यात आलेला होता. त्याशिवाय रान्या राव यांच्याकडून 800 ग्रॅम सोन्याचे दागिने देखील हस्तगत करण्यात आले आहेत.
विमानतळावर अटक करण्यात आल्यानंतर, महसूल गुप्तचर विभागाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची देखील झडती घेतली.


या झडती दरम्यान रान्या राव यांच्या घरातून 2.06 कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 2.67 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
महसूल गुप्तचर विभागानं सांगितलं की, "महिला प्रवाशाला कस्टम अॅक्ट 1962 अंतर्गत अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे."

या प्रकरणात एकूण 17.29 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सोन्याची तस्करी करणाऱ्यांना हा खूप मोठा दणका आहे.
महसूल गुप्तचर विभागानं दावा केला आहे की, 14.8 किलो सोनं जप्त करणं हे बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या जप्तींपैकी एक आहे.
रान्या राव कोण आहे?
32 वर्षांच्या अभिनेत्री रान्या राव यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी 'माणिक्य' या प्रसिद्ध कन्नड चित्रपटात अभिनेता सुदीपबरोबर अभिनय केला होता. याच चित्रपटातून रान्या राव यांनी चित्रपट क्षेत्रात त्यांची ओळख निर्माण केली होती.
त्यानंतर दोन वर्षांनी, रान्या राव यांनी 'वागह' या तामिळ चित्रपटात अभिनय केला होता. त्यात विक्रम प्रभू या अभिनेत्यानं देखील अभिनय केला होता. 2017 मध्ये रान्या राव यांनी 'पटकी' या कन्नड चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते गणेशबरोबर मुख्य भूमिका रंगवली होती.
पत्रकारितेतून फिल्म मेकर झालेल्या सुनैना सुरेश यांनी बीबीसीला सांगितलं की, "गेल्या काही वर्षांपासून त्या चित्रपट सृष्टीत सक्रिय नाहीत. मात्र त्यांनी ज्या चित्रपटात काम केलं आहे, त्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत."

फोटो स्रोत, ranyarao/X
कन्नड चित्रपटसृष्टीतील आणखी एका सदस्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की इंजीनीअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर रान्या यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता.
रान्या राव मूळच्या कर्नाटकातील चिक्कमंगळूरू येथील रहिवासी आहेत. त्यांची आई एका कॉफी उत्पादक शेतकरी कुटुंबातील आहेत. तर त्यांचे वडील रामचंद्र राव कर्नाटक पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनचे प्रमुख आहेत.
रामचंद्र राव यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला सांगितलं की रान्या यांच्या कामाशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांना त्यांची मुलगी आणि जावई यांच्या व्यवसायाबद्दल काहीही माहिती नाही.
असं सांगितलं जातं आहे की चार महिन्यांपूर्वी रान्या राव यांचा विवाह झाला होता.
रान्या रावचे वडिल रामचंद्र राव हे कर्नाटक स्टेट पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनचे डीजीपी आहेत.
त्यांनी या प्रकरणावर 'एएनआय' या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, "माध्यमांच्या माध्यमातूनच मला ही माहिती समजली तेव्हा मलादेखील धक्का बसला. मला या प्रकरणाबाबत आधी काहीही माहिती नव्हतं. इतर कोणत्याही वडिलांना धक्का बसला असता, तसाच धक्का मलाही बसला."
"ती आमच्यासोबत राहत नाही. ती तिच्या नवऱ्यासोबत स्वतंत्र राहते. काही कौटुंबिक कारणास्तव त्यांच्यात कदाचित अडचणी निर्माण झालेल्या असतील. असो, कायदा त्याचं काम करेल. या प्रकरणामुळे माझ्या कारकिर्दीवर कोणताही काळा डाग लागणार नाहीये. याहून अधिक मी याबाबत काहीही बोलू इच्छित नाही."
कथितरित्या अवलंबण्यात आलेली पद्धत
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्या राव वारंवार दुबईला जात होत्या. त्यामुळे महसूल गुप्तचर विभागानं त्यांच्यावर लक्ष ठेवलं होतं.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये त्या चार वेळा दुबईला गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावरील संशय आणखी वाढला होता.

फोटो स्रोत, PIB
विमानातील इतर प्रवाशांना इमिग्रेशन प्रक्रियेतून जावं लागतं. तर रान्या राव मात्र कथितरित्या
विना तपासणी विमानतळाबाहेर पडल्या होत्या.
विमानतळावर त्या सांगायच्या की त्या डीजीपीच्या कन्या आहेत. त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्याबरोबर नेहमी एक प्रोटोकॉल कॉन्स्टेबल असायचा.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की प्रोटोकॉल कॉन्स्टेबल किंवा अधिकाऱ्यांवर आरोप करणं चुकीचं ठरेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











