'या' बंदराला म्हणतात 'सोन्याची खाण', इथून सगळ्या युरोपात कशी होते कोकेनची तस्करी?

रॉटर डॅम

फोटो स्रोत, KRAMER GROUP

    • Author, लिंडा प्रेस्ली आणि मायकल गॅलहर
    • Role, बीबीसी न्यूज

रॉटरडॅमच्या या बंदरावर काही लोक सैनिकांसारखे पळत असल्याचं सीसीटीव्ही स्क्रीनवर दिसत आहे.

त्यांचं लक्ष एका शिपिंग कंटेवरवर आहे जे कोलंबियाहून नेदरलँडच्या रॉटरडॅमला पोहोचलं आहे. कागदोपत्री या कंटेनरमधून फळं आणण्यात आली आहेत. पण या तरुणांना कंटेनरमधून काढण्यात आलेल्या त्या फळांमध्ये प्रत्यक्षात काहीही रस नाही.

12 मीटर लांबीच्या एका कंटेनरच्या रेफ्रिजरेटर युनिटमध्ये 80 किलो कोकेन लपवलं जातं. बाजारात त्याचं मूल्य 40 लाख युरो म्हणजे 34 कोटी रुपये आहे. हे कोकेन मिळवणं हेच तरुणांचं लक्ष्य आहे.

त्यामुळं त्यांना कोकेन कलेक्टर म्हटलं जातं. त्यांचं काम शिपिंग कंटेनरमधून या बंदरावर आणलेल्या कोकेनची सुरक्षितरणे तस्करी करणं हे आहे. या माध्यमातून हे कोकेन अॅम्स्टर्डम, बर्लिन आणि लंडनपर्यंत पोहोचवलं जातं.

कोकेनची तस्करी करणाऱ्यांना साधारणपणे कंटेनरमधून काढण्यात आलेल्या कोकेनसाठी 2,000 युरो म्हणजे जवळपास एक लाख 70 हजार रुपये प्रति किलोग्रामपर्यंत मिळतात.

बीबीसीलाही कोकेनच्या या तस्करीमध्ये सहभागी असलल्या टोळीच्या धोकादायक कामाची झलक पाहण्याची संधी मिळाली.

'बंदर म्हणजे सोन्याची खाण'

"रॉटरडॅमचं बंदर सोन्याची खाण आहे. मी घराजवळ चांगले पैसे कमावू शकतो. याठिकाणी कायम काम मिळतं," असं एका चेहरा लपवलेल्या व्यक्तीनं डच टिव्ही नेटवर्क व्हीपीआरओचे एक पत्रकार डॅनी गॉसिन यांना सांगितलं.

एका शक्तिशाली तस्करी नेटवर्कसाठी कोकेन कलेक्टर म्हणून काम करणाऱ्या तरुणांपैकी ते एक आहेत. त्यांच्या मते या कामाचं स्वरुप वारंवार बदलत असतं. कधी त्यांना कामाच्या मोबदल्यात पैसे मिळतात, तर कधी अंमली पदार्थामध्ये वाटा मिळतो.

अंमली पदार्थांचा हा व्यवसाय वेगानं पसरत आहे.

"सर्वप्रथम दोन वर्षांपूर्वी या लोकांना पाहिलं होतं. पूर्वी वर्षातून एक दोन वेळा असे कंटेनर येत होते. तसंच हे काम करणारे एक दोनच लोक होते. पण गेल्या सहा महिन्यांत आठवड्यातून तीन ते चार वेळा असं होतं असून, कोकेन कलेक्टरची संख्यादेखील दहा ते बारावर पोहोचली आहे," असं बंदरावर कंटेनर प्रोसेस कंपनी चालवणारे आंद्रे क्रेमर म्हणाले.

तस्करांचं 'हॉटेल' कंटेनर

नेदरलँडला पोहोचणाऱ्या कोकेनचं प्रमाण जस-जसं वाढत जातं, तस-तसे तस्करांकडून अधिकाधिक अत्याधुनिक पद्धतींचा वापरही होत आहे.

कधी-कधी ते कोकेन बंदराच्या बाहेरही नेत नाहीत, तर बंदरावरील एखाद्या कर्मचाऱ्याच्या मदतीनं कोकेन दुसऱ्या कंटेनरमध्ये नेणं हे त्यांचं काम असतं. त्यानंतर ट्रकद्वारे ते बंदराबाहेर नेलं जातं. कधी-कधी टोळीतील सदस्य बंदरामध्ये रिकाम्या कंटेनरमध्ये बसतात आणि ड्रग्ज येण्याची वाट पाहत असतात.

रॉटरडॅम

फोटो स्रोत, KRAMER GROUP

"आम्हाला नुकतेच तीन 'हॉटेल' कंटेनर मिळाले आहेत, त्याठिकाणी कलेक्टर अनेक दिवस खाण्या पिण्याच्या गरजा पूर्ण करून राहू शकतात. या कंटेनरमध्ये आम्हाला गाद्या, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आणि खाण्याचे रॅपरही आढळले आहेत," असंही क्रेमर म्हणाले.

पण अशा 'हॉटेल' कंटेनरमध्ये वेळ घालवणं अनेकदा जीवघेणं ठरू शकतं. सप्टेंबरच्या सुरुवातीला अशा प्रकारच्या एका कंटेनरमध्ये नऊ कोकेन कलेक्टर अडचणीत सापडले होते. कंटेनरचं दार जाम झाल्यानं ते उघडत नव्हतं, त्यामुळं ते आत अडकले होते.

"तुम्ही फळं किंवा लाकडं भरलेल्या कंटेनरमध्ये असाल तर या गोष्टीही ऑक्सिजनचा वापर करत असतात. म्हणजे आत असलेल्यांसाठी कमी प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असतो," असं रॉटरडॅम पोलिस प्रमुख जेन जेन्स म्हणतात.

जेन यांच्या मते, कोकेन कलेक्टर साधारणपणे कंटेनर आतून उघडतात. पण या प्रकरणात असं काही घडलं की, त्यांना ते उघडताच आलं नाही.

कोकेन तस्करांनी मागितली मदत

अखेर डचमधील आपत्कालीन सेवांची मदत घेऊन कंटेनरमध्ये अडकलेल्या कोकेन कलेक्टरना बाहेर काढण्यात आलं.

"कंटेनरमध्ये नऊ लोक अडकलेले आहेत, हे आम्हाला माहिती होतं, पण बंदरावर जवळपास एक लाख इतर कंटेनर होते आणि कोकेन घेणाऱ्यांना ते नेमके कोणत्या कंटेनरमध्ये लपले आहेत, हे माहिती नव्हतं," असं रॉटरडॅमचे पोलिस प्रमुख जेन जेन्स म्हणाले.

अंमली पदार्थ

फोटो स्रोत, EPA

"संपूर्ण बंदराचा शोध घेण्यात आला. आम्ही हेलिकॉप्टर आणि सीमा शुल्क अधिकाऱ्यांची मदतही घेतली. वेळीच मदत मिळाल्यानं हे लोक सुदैवी ठरले," असं जेन जेन्स म्हणाले.

शोध घेण्यात जवळपास चार तास लागले. पण जेव्हा कोकेन कलेक्टर भेटले तेव्हा त्यांना श्वास गुदमरायचा त्रास व्हायला लागला होता. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

रॉटरडॅमचे पोलिस प्रमुख जेन जेन्स यांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्या कोकेन कलेक्टरला कसं शोधलं हे गेल्या सात वर्षांपासून कुणालाही सांगितलं नाही. "आम्ही हुशारीनं काम करत काही पावलं उचलली," केवळ असंच ते म्हणाले.

'दरवर्षी नवा विक्रम'

2014 मध्ये रॉटरडॅमच्या अधिकाऱ्यांनी बंदरावरून 5,000 किलोपेक्षा अधिक कोकेन जप्त केलं होतं, तर 2020 मध्ये हे प्रमाण 41,000 किलो आहे.

"या वर्षी 60,000 किलोपर्यंतचे कोकेन जप्त केले जाण्याची शक्यता आहे. आम्ही दरवर्षी नवीन विक्रम करत आहोत. पण आम्हाला त्याचा अभिमान वगैरे नाही. कोकेन जप्त केलं आहे, ही चांगली बाब आहे. पण दरवर्षी याचं प्रमाण वाढतंच आहे," असं पोलिस प्रमुख जेन जेन्स म्हणाले.

बंदरावरील जप्त करण्यात आलेलं कोकेन हा एकूण तस्करी होणाऱ्या कोकेनचा केवळ छोटासा भाग आहे.

'आम्ही फिरायला जातो'

या संपूर्ण प्रकरणातली विचित्र बाब म्हणजे. या कलेक्टरला पकडलं तरी ते अंमली पदार्थांची तस्करी करणारे आहेत, हे सिद्ध करणं कठीण आहे.

सप्टेंबर महिन्यात केवळ एका आठवड्यात बंदर परिसरातून 110 कलेक्टरना अटक करण्यात आली. पण त्यांना तस्करी करताना पकडलं पकडतं जात नाही, त्यावेळी त्यांच्यावर 100 युरोपेक्षाही कमी दंड लावला जाऊ शकतो. काही कलेक्टर लगेचच दंड भरता यावा म्हणून रोख रक्कमही सोबत बाळगतात.

बंदर

फोटो स्रोत, Getty Images

"आम्ही अधिकाऱ्यांना कंटेनर पाहायला आवडतं म्हणून, याठिकाणी फिरायला येतो असं सांगतो. माझ्याकडे काही आहे का? माझ्याकडे अंमली पदार्थ किंवा काही उपकरणं आहेत का? माझ्याकडे काहीच नाही, असं म्हणतो" अशी माहिती डच टिव्हीशी बोलताना एका कलेक्टरनं दिली.

42 किलोमीटर लांबीचं रॉटरडॅम बंदर युरोपातील सर्वात मोठं बंदर आहे. याठिकाणी रोज 23,000 पेक्षा अधिक मालवाहू कंटेनरमधून सामान चढवलं आणि उतरवलं जातं. कोकेनची तस्करी करणाऱ्या नेटवर्क आणि कोकेन कलेक्टरना याठिकाणच्या भ्रष्टाचाराचा प्रचंड फायदा होतो.

'कधी लाच तर कधी धमकी'

''तुम्ही सकाळी याठिकाणी आले तर तुम्हाला नक्की, सुरक्षा पास मिळेल. कोणताही कर्मचारी तुम्हाला 500 युरो (चाळीस हजार रुपये) च्या मोबदल्यात एका दिवसासाठी पास देईल.

"सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय काम करणं कठिण आहे. त्यांच्याकडे अशा कंटेनरची माहिती असते, ज्याची तपासणी करायला हवी. पण ते तुमच्यासाठी तपासणीच्या यादीतून तेच कंटेनर काढून टाकू शकतात," असं एका कलेक्टरनं सांगितलं.

एखाद्या अधिकाऱ्यानं या तस्करांना सहकार्य करण्यास नकार दिला तर, ते दुसरा मार्ग अवलंबतात.

"एखाद्या अधिकाऱ्यानं आम्हाला मदत करायला नकार दिला, तर आम्ही त्याला कुटुंबीयांबाबत धमकी देतो आणि तो लगेचच आमच्याबरोबर काम करायला तयार होतो," असंही एका कलेक्टरनं सांगितलं.

आंद्रे क्रेमर यांच्या मते कर्मचाऱ्यांवर संघटित गुन्हेगारांची नजर असल्यानं ते घाबरलेले असतात.

"अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन संपर्क केला जातो आणि एका विशिष्ट कंटेरनमध्ये त्यांचं पार्सल ठेवण्यासाठी दबाव आणला जातो. माझ्या अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे, कारण भीतीपोटी ते याठिकाणी काम करू इच्छित नसतात," असं क्रेमर सांगतात.

रॉटरडॅममध्ये तस्करीशी संबंधित गुन्हे

रॉटरडॅममधील मुख्य सरकारी वकिलांसाठीही या गोष्टी नव्या नाहीत.

"शहरातील अनेक गुन्हे हे अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आहेत. आमच्या शहरात जवळपास प्रत्येक दिवशी गोळीबार होतो. दहा वर्षांपूर्वी रस्त्यांवर अशी स्थिती नव्हती. मात्र आता हिंसाचार वाढत आहे," असं ह्यूगो हेलिनार सांगतात.

कोकेनच्या तस्करीचा परिणाम संपूर्ण देशावर दिसू लागला आहे. गेल्या जुलै महिन्यात नेदरलँडमधील सर्वात प्रसिद्ध गुन्हे पत्रकार पीटर आरडे वारीस यांची अॅमस्टरडॅममध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली होती.

"गुन्हे करणारे नेटवर्क अत्यंत चांगल्या पद्धतीनं संघटित आहेत. या नेटवर्कचे सीईओ, मनुष्य बळ विभाग आणि कर्मचारी आहेत," असं तरुणांना मदत करणारी संघटना 'जॉज'च्या संस्थापिका नादिया बारकियोआ म्हणाल्या.

'जॉज'च्या माध्यमातून रॉटरडॅमच्या दक्षिण किनाऱ्यावरील उपनगरांच्या भागात तरुणांसाठी काही कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. याच परिसरात कोकेनची तस्करी करणारे बहुतांश तरुण राहतात. या परिसरातील एक चतुर्थांशपेक्षा अधिक लोकसंख्येचं वय 23 पेक्षा कमी आहे, तर अर्ध्यापेक्षा अधिक लोक स्थलांतरीत आहेत.

1960 आणि 1970 च्या दशकात बाहेरून आलेले लोक, रॉटरडॅम बंदरावर रोजगाराच्या शोधात स्थायिक झाले. मात्र औद्योगिक क्षेत्र पश्चिमेकडे स्थलांतरित झालं आणि काम बंद पडल्यानं याठिकाणची कुटुंबं स्थलांतराच्या स्थितीत होते. ते सगळे कुटुंबासह याठिकाणाहून निघून गेले. तर मोठ्या संख्येनं केवळ कमी उत्पन्न असलेले कुटुंब इथं राहिले.

या कुटुंबांतील तरुणांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी जॉज येथील शाळा, क्लब आणि सामुदायिक केंद्रांचं काम करते.

"गुन्हेगारीशी संबंधित कामाऐवजी इतर चांगल्या मार्गाने पैसे कमावणं अधिक सुरक्षित असल्याचं या लोकांना सांगावं लागेल. शहरात त्यांच्यासाठी इतरही संधी आहेत, हे त्यांना सांगावं लागेल," असं नादिया बारकियोआ म्हणतात.

"आता 14-15 वर्षांची मुलं अशा गुन्ह्यांमध्ये अडकत आहेत आणि हे वेदनादायी आहे. लोक कमी वयापासूनच गुन्हे करत आहेत," असं नादिया सांगतात.

"रॉटरडॅममध्ये दररोज लोक कोकेनच्या 40,000 लाइनचं नाकाद्वारे सेवन करतात. या प्रत्येक लाईनमध्ये हिंसा, बळजबरी वसुली, आणि मृत्यूचा इतिहास आहे," असा संदेश ह्युगो हेलिनार कोकेनचा वापर करणाऱ्यांना देतात.

आगामी 2022 वर्षात नवीन कायदा आवल्यानंतर कोकेन कलेक्टरवर अंकुश मिळवण्यात मदत होईल. नवीन कायद्यातील प्रस्तावानुसार बंदर परिसरात नको असलेल्या लोकांना पकडल्यास त्यांना मोठा दंड आणि एका वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

मात्र, अनेक लोकांच्या मते नव्या कायद्यानंतरही परिस्थिती फारशी बदलणार नाही.

"प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, रॉटरडॅम बंदरावरील अंमली पदार्थांची तस्करी बंद होईल, असं मला वाटत नाही. दंड आणि शिक्षा वाढवल्यास बंदर परिसरात हिंसाचार आणखी वाढू शकतो," असं कंटेनर प्रोसेस कंपनी चालवणारे आंद्रे क्रेमर सांगतात.

"तुरुंगात जाण्याच्या भीतीनं कदाचित तरुण याकडे वळण्याबाबत दोनदा विचार करू शकतात. पण यातून मिळणाऱ्या पैशाचं आकर्षण त्यांना कामय राहील. कोकेनची तस्करी करणाऱ्या या तरुणांना युरोपातील कोकेनच्या व्यवसायासाठी त्यांचं असलेलं महत्त्वं माहिती आहे. त्यामुळं भविष्यात हा व्यवसाय कमी होण्याची शक्यता दिसत नाही.''

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)