रुख्साना सुलताना : संजय गांधींची मैत्रीण जिने 13 हजार पुरुषांची केली नसबंदी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसीसाठी
'ये, ये, दिल्लीचे माजी राज्यकर्ते आल्यावर मला माझ्या खुर्चीवरून उठावं लागेलच.'
आणीबाणी हटवल्यानंतरचा दिल्लीतील हा एक प्रसंग आहे. रुख्साना सुलताना दिल्लीचे तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर दिलीप राय कोहली यांना भेटायला गेल्या. तेव्हा कोहली आपल्या खुर्चीवरून उठून असं बोलले होते.
लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या बोलण्यात काही प्रमाणात उपहास आणि खरेपणाही होता.
25 जून 1977 रोजी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने देशावर आणीबाणी लागू केली होती. याच दरम्यान संजय गांधींच्या पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली.
त्यातील एक मुद्दा सर्वात वादग्रस्त राहिला. तो म्हणजे लोकसंख्या नियंत्रणासाठी नसबंदी.
त्यावेळी रुख्साना सुलताना या दिल्लीतील मुस्लीम भागात नसबंदी मोहिमेचा चेहरा बनल्या होत्या. त्यांनी त्यावेळी 13 हजार पुरुषांची नसबंदी ऑपरेशन केल्याचं सांगितलं जातं.
रुख्साना एका श्रीमंत कुटुंबातल्या होत्या.
तसंच त्या संजय गांधींची एक जवळची मैत्रीण म्हणून राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा होती.
दिल्लीतील सनदी अधिकारी आणि काँग्रेस नेते रुख्साना सुलताना यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचे.
दिल्लीतील एकेकाळच्या ग्लॅमरस आणि प्रभावशाली महिलेचं कुटुंब आजही चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे.
श्रीमंत आणि प्रभावशाली घरातल्या रुख्साना
आणीबाणीच्या काळात रुख्साना सुलताना या त्यांच्या तिशीत होत्या. त्या एखाद्या अभिनेत्रीसमोरही त्या उठून दिसतील इतक्या त्या सुंदर होत्या, असं सांगितलं जातं.
गळ्यात मोठे दागिने घालायच्या. त्यांच्या अंगावर नेहमी शिफॉन किंवा सिल्कची साडी असायची. अर्धा चेहरा झाकलेला गॉगल ही त्यांची एक खास स्टाईल होती.
रुख्साना सार्वजनिक जीवनात आल्या तेव्हा राहणीमानावरून त्यांच्यावर टीका झाली.
तेव्हा त्या म्हणायच्या, 'हे सर्व माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे, मी ते माझ्यापासून वेगळं कसं करू?'
पत्रकार जनार्दन ठाकूर यांनी त्यांच्या 'All The Prime Minister's Men' या पुस्तकाचं सातवं प्रकरण रुख्साना सुलताना यांच्याबद्दल लिहिलं आहे.
ते लिहितात, 'रुख्सानाची मावशी बेगम पारा 1950 च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री होत्या. बेगम पाराची मोठी बहीण जरीनाने पॅडी बिम्बेट नावाच्या भारतीय वायुसेनेतील अधिकाऱ्याशी लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगी झाली. तिचं होतं मिनू म्हणजेच रुख्साना.
पॅडी यांनी अनेक वर्षं भारतीय परराष्ट्र सेवेत काम केलं.
फ्रान्समध्ये सेवा करत असताना त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलगी मिनू (रुख्साना) यांना सोबत पॅरीसला घेऊन गेले.
इथूनच मिनूला फ्रेंच परफ्यूम्स आणि फॅशनेबल वस्तूंचं आकर्षण निर्माण झालं.

फोटो स्रोत, PENGUIN BOOKS
रुख्साना यांचा हवाला देत ठाकूर लिहितात, “दिल्लीच्या प्रसिद्ध मिरिंडा कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला, पण मध्येच मी कॉलेज सोडून दिले. कारण मी 12 व्या वर्षी बायरन आणि 16 व्या वर्षी शेक्सपियर वाचले. त्यापुढे मिरांडाचा मार्ग 'ट्विंकल, ट्विंकल लिटिल स्टार...' असा होता. तिथं शिकण्यासारखे काही उरलं नव्हतं.”
मिनू 16 वर्षांची असताना ती शिवेंद्र सिंग नावाच्या शीख तरुणाच्या प्रेमात पडली. पुढे त्या दोघांचं लग्नही झालं. शिवेंद्र हे दिल्लीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सर शोभा सिंग यांचे नातू होते. शिवेंद्र हा शोभा सिंग यांची मुलगी मोहिंदर हिचा मुलगा.
मोहिंदर आणि प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग हे सख्खे बहीण-भाऊ होते.
मिनूची आई जरीना मुस्लीम होती. त्यामुळे आईकडची संपत्ती मिळवण्यासाठी मिनूने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांनी रुख्साना सिंग हे नाव धारण केलं. पण त्या रुख्साना सुलताना नावानेच प्रसिद्ध झाल्या.
शिवेंद्र आणि रुख्साना यांचा दोन वर्षांतच घटस्फोट झाला. पण तोपर्यंत त्यांना एक मुलगी झाली. जी चित्रपट अभिनेत्री अमृता सिंग म्हणून प्रसिद्ध झाली.
अमृता सिंगसुद्धा त्यांच्या फॅशन स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. त्या त्याचं श्रेय त्यांची आई रुख्साना यांना देतात.
अमृता सिंग यांनी तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानशी लग्न केलं. पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्या दोघांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले झाली. ती आता एक चित्रपट अभिनेत्री आहे.
स्मगलर, रुख्साना आणि साबण
बालपणापासून परदेशात वाढलेल्या रुख्साना सुलतानाला 'केम' नावाचा साबण वापरायची सवय होती. पण तेव्हा हा साबण भारतात उपलब्ध नसल्याने तो स्मगलरकडून विकत घ्यावा लागायचा.
एकदा रुख्साना केम साबण घेण्यासाठी मुंबईतल्या अनेक दुकांनामध्ये फिरल्या. पण त्यांना तो काही मिळेना. कारण केम साबण गेल्या काही दिवसांपासून बाजारात उपलब्धच नव्हता.
रुख्साना बाजारातून बाहेर आल्या तेव्हा त्यांना त्यांच्या कारभोवती लोकांची गर्दी दिसली. काय झालं, हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने त्या गाडीकडे धावल्या. तिथे गेल्यावर गाडीच्या मागच्या बाजूला आणि ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर शेकडो केम साबण पडलेले होते.
तेव्हा पांढऱ्या पोशाखात एक माणूस गाडीजवळ उभा होता. त्याच्याभोवती अनेक लोक उभे होते. त्याने रुख्सानाला स्वतःची ओळख करून दिली आणि हात पुढे करत म्हणाला, 'माझं नाव हाजी मस्तान.'
रुख्साना यांच्या म्हणण्यानुसार, 'त्या अनेक दुकानात जाऊन केम साबण घेण्याचा प्रयत्न करत होत्या तेव्हा हाजी त्यांच्याकडे पाहात होते.' पत्रकार वीर संघवी यांना रुख्साना सुलतानाने हा किस्सा सांगितला होता. ज्याचा उल्लेख संघवी यांनी त्यांच्या ‘A Rude Life: The Memoir’ या पुस्तकात केला आहे.
संजयच्या स्वयंसेविका सुलताना
कालांतराने रुख्साना सिंगला आता रुख्साना सुलताना किंवा रुख्साना बेगम म्हणून ओळखले जाऊ लागलं. त्यांनी दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस येथे 'दार-ए-सहवार' नावाचे दुकान उघडले. तिथे वेगवेगळे दागिने विकले जायचे. दिल्लीशिवाय त्यांनी गोव्यातही एक दुकान उघडलं.
कॅनॉट प्लेस येथील त्यांचं दुकान लोकप्रिय होतं.
श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांची त्या दुकानात वर्दळ असायची.
पत्रकार रशीद किडवई त्यांच्या '24 Akbar Road: A Short History Behind the Rise and Fall' या पुस्तकात लिहितात, एकदा आपल्या दुकानात पंतप्रधानांच्या मुलाला पाहून रुख्साना यांना खूप आनंद झाला होता.
दुसर्या एका मुलाखतीत त्यांनी संजय गांधींसोबत झालेल्या चर्चेविषयी सांगितलं. त्या संजय गांधींना म्हणाल्या होत्या की, “मी तुमच्या नेतृत्वाने प्रभावित झाले आहे आणि मला तुमच्या कार्यात वाहून घ्यायचं आहे.”
किडवई आपल्या पुस्तकात पुढे लिहितात, 'रुख्साना नेहमी आपली ओळख ही संजय गांधी यांची ‘आईस्क्रीम फ्रेंड’ अशी करून द्यायच्या.' असं लिहून किडवई यांनी 'याचा जो काही अर्थ असेल तो' अशी पुस्तीही जोडली आहे.
दुसऱ्या एका चर्चेनुसार, दिल्लीचे तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर यांचे सचिव नवीन चावला यांनी रुख्साना आणि संजय गांधी यांची भेट घडवून आणली, असं सांगितलं जातं. पण रुख्साना यांनी तसं घडल्याचा इन्कार केल्याचं जनार्दन ठाकूर त्यांच्या पुस्तकात लिहितात.
तेव्हा इंदिरा गांधींचे राजकीय वारसदार म्हणून संजय गांधी यांच्याकडे पाहिलं जायचं. आणीबाणीच्या काळात पडद्याआडून संजय गांधींनी सत्तेची धुरा सांभाळली, असं म्हटले जातं.

फोटो स्रोत, Getty Images
त्याकाळात जगदीश टायटलर, अंबिका सोनी, कमलनाथ यांसारख्या तरुण नेत्यांची राजकीय ताकद अचानक वाढली.
संजय गांधी यांनी 21 महिन्यांत पाच सुत्री कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला.
ज्यामध्ये साक्षरता अभियान, स्वच्छता आणि वनीकरण, हुंडाविरोधी अभियान, जातिवाद निर्मूलन आणि कुटुंब नियोजन हे विषय केंद्रस्थानी होते.
यात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'टार्गेट' देण्यात आले. त्यांना प्रोत्साहन म्हणून रोख रक्कमही देण्यात आली.
संजय गांधी यांनी रुख्साना सुलताना यांना 'जुनी दिल्ली' परिसरात कुटुंब नियोजनासाठी काम करण्यास सांगितले.
त्या जुन्या दिल्लीच्या 'बेगम साहिबा' म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांना पोलीस संरक्षण होतं आणि त्यांच्यासोबत सरकारी अधिकारी पण असायचे.
आणीबाणीच्या काळात सरकारी नियंत्रणाखाली काम करणारा मीडिया रुख्साना यांना जास्त कव्हरेज द्यायचा.
युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या अवतीभोवती असायचे. त्यांच्या नावाने घोषणा द्यायचे. रुख्साना जेव्हा दौऱ्यावर जायच्या तेव्हा त्यांच्यावर पुष्पवर्षाव व्हायचा.
संजय गांधी यांच्या काळात रुख्साना यांचं राजकीय प्रस्थ झपाट्याने वाढलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते त्यांना भेटण्यासाठी रांगेत उभे राहायचे.
संजय गांधी यांची प्रतिनिधी म्हणून रुख्साना दौरे करायच्या. राजकीय सभेत भाषण करायच्या. पुढे त्यांनी नसबंदीची शिबिरेही आयोजित केली.
आणबाणीच्या काळात रुख्साना यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.
पण नंतर आणीबाणीतल्या कामामुळेच त्या बदनामही झाल्या.
निबंध, नसबंदी आणि संताप
परदेशात वाढलेल्या रुख्साना यांना जुन्या दिल्लीतील अरुंद आणि गलिच्छ गल्ल्यांतून ये-जा करणं कठीण जायचं. म्हणून त्या स्वतःसोबत कायम परफ्यूम ठेवायच्या.
नेहमी शिफॉन किंवा सिल्कची साडी घालायच्या.
एका मुस्लीम महिलेला असं टापटीप पाहून रुढीवादी विचारांच्या मुस्लीम पुरुषांची पोटदुखी व्हायची. ते रुख्साना यांच्यासमोर ‘ब्र’सुद्धा काढत नसायचे. पण अप्रत्यक्षपणे ते त्यांची नाराजी दाखवायचे.
ठाकूर त्यांच्या पुस्तकात लिहितात, 'वयाच्या 13व्या वर्षी मसुरी येथील एका प्रसिद्ध शाळेत शिकत असताना मिनूने (रुख्साना), 'देशात कुटुंब नियोजनाची नितांत गरज' या विषयावरील निबंधासाठी बक्षीस मिळवले होते.
रुख्साना सांगतात, ‘मला जे 13 व्या वर्षी समजलं. तेच काम संजय गांधी 30 व्या वर्षी करत होते, त्यामुळे त्यांच्या कार्यात मी सहभागी होणं स्वाभाविक होतं.’
लेखक डॉम मॉरिस यांनी इंदिरा गांधींच्या जीवनावर 'Mrs. Gandhi' नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये ते लिहितात, "रुख्साना जेव्हा जुन्या दिल्लीत फिरायच्या तेव्हा त्या मुस्लीम महिलांना बुरखा काढून स्वत:ला मुक्त करण्यास सांगायच्या. इतकंच नाही तर त्या कार्यक्रमांमध्ये मुस्लीम महिलाचे बुरखे स्वत: उघडायच्या. त्यावेळी तिथे इतर पुरुषही उभे असायचे. मुस्लीम महिलांनी त्यांच्या पतींना नसबंदी करण्यासाठी प्रोत्साहित करायला पाहिजे, असं त्या सांगायच्या.”
एका मुस्लीम महिलेने इतर स्त्रियांचा बुरखा उचलणे आणि पुरुष नसबंदीबद्दल बोलणे हे जुन्या दिल्लीतील रुढीवादी मुस्लिमांना मात्र आवडलं नाही.'
Indira: The Life of Indira Nehru Gandhi मध्ये कॅथरीन फ्रँक लिहितात, 'रुख्साना सुलतानाने दोन इमामांना नसबंदी ऑपरेशन करण्यासाठी राजी केले होते. ही त्यांची सर्वात मोठी उपलब्धी होती. त्यासाठी स्वत: संजय गांधी यांनी मीडियाच्या उपस्थित त्यांना एक प्रशस्तीपत्र दिलं होतं.
त्याच कार्यक्रमात संजय गांधी यांच्याशिवाय अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पत्नी जया बच्चनही उपस्थित असल्याचं सांगितलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुख्साना सुलताना यांच्या प्रयत्नांमुळे आणीबाणीच्या काळात 13,000 पुरुषांची नसबंदी करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. पण किडवई यांनी त्यांच्या पुस्तकात रुख्साना यांच्यामुळे 8 हजार पुरुषांची नसबंदी झाल्याचं लिहितात.
त्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून त्यांना 84 हजार रुपये देण्यात आली होती. त्याकाळी ही मोठी रक्कम होती.
संजय गांधींच्या प्रचारादरम्यान वयात आलेली मुले आणि वृद्ध पुरुषांची पण नसबंदी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला.
फसलेल्या काही ऑपरेशनमुळे लोकांचे मृत्यू झाल्याचं समोर आलं.
नसबंदीच्यावेळी गरीब आणि भिकारी सर्वात जास्त बळी पडले. मस्लिम आणि दलितांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला, असंही एका अभ्यासात समोर आलं.
नसबंदीमुळे पुरुषांची 'सेक्स पॉवर' कमी होते अशी अफवाही हरियाणा, उत्तर प्रदेशमधील खेड्यांमध्ये पसरली होती.
त्यावेळी नसबंदी ऑपरेशन दरम्यान मृत्यू होतो पण झाले होते. म्हणून पुरुष नसबंदी टाळण्यासाठी घरातून पळून जायचे.
देशभरात अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमकी झाल्या. डझनभर लोक मारले गेले.
पण आणीबाणीच्या काळात संजय गांधींच्या प्रचारामुळेच लोकांना 'छोटे कुटुंब, सुखी कुटुंब' या मुद्द्याची जाणीव झाल्याचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक पुष्पेश पंत यांना वाटतं.
त्याकाळी राजधानी नवी दिल्लीतील तुर्कमान घाटावर एक घटना घडली. त्यातून रुख्साना यांच्या नसबंदी कार्यक्रमातील अत्याचार समोर आला.
तुर्कमान गेटचा हाहाकार
संजय गांधी यांच्या निर्देशांनुसार दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरातील सरकारी जमीनीवरील अतिक्रमणातील घरे पाडण्याचं काम सुरू झालं. 13 ते 22 एप्रिल 1976 दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
दिल्लीच्या आसफ अली रोडवर 13 एप्रिल 1976 च्या सकाळी एक जुना गंजलेला बुलडोझर तुर्कमान गेटकडं निघाला होता. त्यापाठोपाठ मजुरांनी भरलेला ट्रक हळूहळू पुढं सरकत होता. मागे जीपमध्ये डीडीएचे तहसीलदार कश्मिरी लाल बसलेले होते. "लोक घाबरून जातील असं काहीही त्यांना कळू देऊ नका. काम दोन टप्प्यांमध्ये विभागून करा," असे आदेश त्यांना देण्यात आले होते.
डीडीएचं पथक तुर्कमान गेट ट्रांझिट कॅम्प (शरणार्थी शिबिर) समोर थांबताच तिथं राहणाऱ्या लोकांनी त्यांना घेरलं. "काही विशेष नाही. आम्ही ट्रांझिट कॅम्पमध्ये राहणाऱ्यांना चांगल्या ठिकाणी रणजित नगरमध्ये नेण्यासाठी आलो आहोत. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, हे माझं आश्वासन आहे," असं म्हणत कश्मिरी लाल यांनी गर्दीला शांत केलं. फुटपाथ तोडण्याचा बहाणा थोड्या वेळानं मजुरांनी ट्रांझिट कॅम्पच्या भिंती तोडायला सुरुवात केली. कॅम्पमध्ये राहणाऱ्यांनीही विरोध केला नाही. ही तोडफोड दोन दिवस चालली. कश्मिरी लाल त्यांच्या टीमसह परत गेले.
पण 15 एप्रिलला सकाळी लवकर तुर्कमान गेटवर परत दोन बुलडोझर पोहोचले. कश्मिरी लाल जीपमधून उतरताच नाराज नागरिकांनी पुन्हा त्यांना घेराव घातला.
कश्मिरी लाल यांनी पुन्हा त्यांची समजूत काढली. "घाबरून जाऊ नका, आम्ही फक्त फुटपाथ (पादचारी रस्ता) तोडायला आलो आहोत. फुटपाथला लागून ज्यांची घरं आहेत, त्यांनी सामान काढून घ्या म्हणजे नुकसान होणार नाही, ही माझी विनंती आहे," असं ते म्हणाले.
"पण फुटपाथ तोडण्यासाठी बुलडोझरची गरज नाही," असं लोकांनी म्हटलं. त्यावर,''एकही घर तोडलं जाणार नाही, केवळ फुटपाथ तोडला जाईल," असं कश्मिरी लाल यांनी पुन्हा समजावलं. पण लोकांना संशय आला होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर सगळे लोक, तुर्कमान गेटपासून दोन किलोमीटर अंतरावर कुटुंब नियोजन शिबीर चालवणाऱ्या रुख्साना सुल्ताना यांच्याकडं गेले.
रुख्साना त्या लोकांबरोबर तुर्कमान गेट परिसरात आल्या, पण तोपर्यंत आणखी वीस घरं पाडली होती आणि बुलडोझर परत गेले होते.
रुख्साना सुल्ताना यांनी सर्व लोकांना सायंकाळी जंतर मंतर रोडवरील घरी बोलावलं. "त्यांनी तुर्कमान गेट परिसरातील नागरिकांची मदत करण्याची तयारी दाखवली. त्यांचं म्हणणं संजय गांधींपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासनही दिलं. पण त्यासाठी एक अट ठेवली. तुर्कमान गेट परिसरात कुटुंब नियोजनाचं केंद्र सुरू करायला सहमती द्या आणि त्याठिकाणी आठवड्याला ऑपरेशनसाठी किमान 300 जण यायला हवे, अशी ती अट होती."
क्रिस्टोफ जॅफरेलॉट आणि प्रतिनव अनिल यांनी 'India's First Dictatorship: The Emergency, 1975–1977' मध्ये हा किस्सा लिहिला आहे.
लोकांनीही तसं करण्याची तयारी दाखवली. पण आम्हाला त्रिलोकपुरी आणि नंद नगरीला पाठवण्याऐवजी जवळच माता सुंदरी रोड किंवा मिन्टो रोडवर पाठवावं अशी विनंती त्यांनी केली. त्यावर रुख्साना यांच्याबरोबर असलेला गुंड राज हा सर्वांवर डाफरत 'तुम्ही सगळे खड्ड्यात जा', असं म्हणाला.
यानंतरच्या पोलीस कारवाईत अनेक लोक मारले गेल्याचं सांगण्यात आलं.
बिपिन चंद्रा यांनी मात्र त्यांच्या 'In The Name Of Democracy' पुस्तकात मरणाऱ्यांचा आकडा 20 असल्याचं लिहलं आहे, तर ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी त्यांच्या 'द जजमेंट' पुस्तकात गोळीबारात तब्बल 150 जण ठार झाल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणानंतर लोकांचा रुख्सानाविषयी इतका राग काढला की एकदा पत्रकार तवलीन सिंग मोठा चष्मा घालून तुर्कमान गेट परिसरात गेली असता, गॉगलमुळे लोकांनी त्यांना रुख्साना समजून त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणाचा उल्लेख तवलीन सिंग यांनी त्यांच्या 'दरबार' या पुस्तकात केला आहे.
काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, पण रुख्साना गेल्या
आणीबाणीच्या काळात नागरी हक्कांचे उल्लंघन आणि दडपशाही काँग्रेससला जनेतेने सत्तेबाहेर फेकले. तर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिले बिगर काँग्रेस सरकार स्थापन झाले.
पण जनता सराकरमधील राजकीय पक्षांच्या परस्पर संघर्षामुळे सुमारे साडेतीन वर्षांतच ते सरकार कोसळले. तर इंदिराजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्या.
इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी जुन्या आणि अनुभवी नेत्यांना पदोन्नती दिली. आणीबाणी काळातील वादग्रस्त चेहरे काढून टाकण्यात आले. रुख्साना या त्यापैकी होत्या.
रुख्साना आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्षा अंबिका सोनी यांच्यात सतत मतभेद व्हायचे. किदडई त्यांच्या पुस्तकात लिहितात की, अंबिका यांनी संजय गांधी आणि इंदिरा गांधींना रुख्साना सुलतानाविरुद्ध इशारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
त्यानंतर पुन्हा एकदा अंबिका सोनी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. इंदिरा गांधींनी संजय गांधींशी या विषयावर बोलण्यास सांगितले. अंबिका सोनी या मुद्द्यावर बोलल्या तेव्हा संजय गांधी म्हणाले, 'रुख्साना यांना युवा काँग्रेसची गरज नाही. पण युवा काँग्रेसला रुख्सानाची गरज आहे.'
पण काँग्रेसची संघटनात्मक बांधणी असतानाही संजय गांधींना अतिरिक्त कार्यकर्त्यांची गरज का भासली? असा प्रश्न निर्माण झाला होता.
रुख्साना यांच्यावर भ्रष्टाचार आणि फसवणूकीचे आरोप करण्यात आले. पण जनता सरकारच्या काळात त्यांनी मीडियासमोर संजय गांधींचा जोरदार बचाव केला.
काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यानंतर विमान अपघातात संजय गांधींचा मृत्यू झाला. सहा महिन्यांतच रुख्साना यांचं वलय संपलं. हळूहळू मीडियाने पण दुर्लक्ष करायला सुरुवात केली.
जेव्हा त्यांची मुलगी अमृता सिंग सैफ अली खानसोबत लग्नगाठ बांधली तेव्हा त्या काही काळ प्रकाशझोतात आल्या.
मे 1996 ते मार्च 1998 पर्यंत केंद्रात राजकीय अस्थिरता होती. काँग्रेसशी नाराज होऊन वेगळा पक्ष काढणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
अहमद पटेल आणि रुख्साना सुलताना यांनी हे मिशन हाती घेतले आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या दिल्लीतील जोरबाग येथील निवासस्थानी बैठका घेतल्या.
अमरिंदर सिंग 15 सप्टेंबर 1997 रोजी काँग्रेस सरचिटणीस मीरा कुमार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये परतले.
खुशवंत सिंग यांनी लिहिलेल्या 'कॅप्टन अमरिंदर सिंग: पीपल्स महाराजा'मध्ये हे तपशील सापडतात.
त्यांनतर रुख्साना सुलताना यांचा गोव्यातील एका आश्रमात दोन दिवसांनी मृत्यू झाला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








