जग जिंकायला निघालेला सिकंदर पोरसचा पराभव करूनही गंगा नदीपर्यंत पोहोचू शकला नाही

फोटो स्रोत, RISCHGITZ/GETTY IMAGES
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ग्रीक तत्ववेत्ता आणि इतिहासकार प्लुटार्कने सिकंदराचं (अलेक्झांडर) वर्णन करताना लिहिलंय की, तो रंगाने जरी गोरा असला तरी त्यांची कांती लाल होती.
एखाद्या सामान्य मॅसेडोनियनपेक्षा उंचीने लहान असणाऱ्या सिकंदराने युद्धभूमीवर मात्र मोठा पराक्रम गाजवला. सिकंदराने त्याच्या चेहऱ्यावर कधी दाढी मिशा राखल्या नाहीत, त्याचा चेहरा चौकोनी भासायचा आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक अजबच दृढनिश्चय दिसून यायचा.
मार्कस कर्टिअसने सिकंदराच्या चरित्रात 'हिस्ट्री ऑफ अलेक्झांडर'मध्ये लिहिलंय की, "त्याचे केस सोनेरी आणि कुरळे होते. त्याच्या दोन्ही डोळ्यांची बुबुळं वेगवेगळ्या रंगाची होती. त्याचा डावा डोळा राखाडी आणि उजवा डोळा काळा होता. त्याच्या डोळ्यात इतकं तेज होतं की, समोरचा त्याला बघूनच घाबरायचा.
सिकंदर नेहमीच होमरचं 'इलियड ऑफ द कास्केट' नावाचं पुस्तक आपल्या सोबत घेऊन वावरायचा. एवढंच नाही तर रात्री झोपताना देखील तो हे पुस्तक आपल्या उशाखाली ठेवायचा."
प्लुटार्कने सिकंदराच्या 'द लाइफ ऑफ अलेक्झांडर द ग्रेट' या चरित्रात लिहिलंय की, "सिकंदराने कधीच देहसुखात रस दाखवला नाही. पण इतर बाबतीत ती अतिधाडसी आणि निर्भय होता. त्याच्या मनात लहानपणापासूनच स्त्रियांविषयी आदर होता.
हा तो काळ होता जेव्हा गुलाम स्त्रिया, वेश्या किंबहुना पत्नीला देखील पुरुषांची संपत्ती मानलं जायचं."
प्लुटार्कने लिहिलंय, "सिकंदरला मुलींमध्ये काडीमात्र रस नव्हता. त्याच्या या वागण्यामुळे त्याची आई, ऑलिंपिया इतकी व्यथित झाली होती की तिने सिकंदरकडे एक सुंदर गणिका कॅलिक्सेनेला पाठवून दिलं. पण सिकंदरवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
पुढे त्यानेच कबूल केलं की, संभोग आणि झोप या दोन्ही गोष्टी त्याला शरीर नश्वर असल्याची जाणीव करून द्यायच्या."
23 व्या वर्षी जग जिंकण्याची मोहीम हाती घेतली
23 वर्षीय राजकुमार सिकंदर यांनी इसवी सन पूर्व 334 मध्ये जग जिंकण्याची मोहीम हाती घेतली होती. त्याची सुरुवात ग्रीसच्या मॅसेडोनियापासून केली.
त्याच्या सैन्यात एक लाख सैनिक होते, ज्यांनी 10,000 मैलांचा प्रवास करून इराणमार्गे सिंधू नदी गाठली.

फोटो स्रोत, MODERN LIBRARY NEW YORK
इसवी सन पूर्व 326 च्या सुरुवातीस सिकंदर इराणमध्ये होता. त्याने भारताजवळील शहरांमध्ये आपले दूत पाठवून आपलं नियंत्रण मान्य करण्यास सांगितलं.
सिकंदर काबूलच्या खोऱ्यात पोहोचताच या राजांनी त्याची भेट घ्यायला सुरुवात केली. यात भारताच्या तक्षशिला राज्याचा राजपुत्र अभि देखील होता.
त्याने सिकंदरावर आपली निष्ठा दर्शविण्यासाठी 65 हत्तींची भेट दिली, जेणेकरून पुढच्या मोहिमेत सिकंदराला त्यांचा वापर करता येईल.
तक्षशिलेचा अभी सिकंदराचं इतकं आदरातिथ्य करत होता, कारण त्याला त्याचा शत्रू पोरसविरुद्धच्या लढाईत साथ हवी होती. आणि सिकंदराने ती द्यावी अशी त्याची इच्छा होती.
सर्व राजांचा पराभव करून सिंधू नदीकडे कूच
मार्कस कर्टिअस लिहितात, "तक्षशीला राज्याने मुद्दामहून सिकंदरला भारताचे दरवाजे उघडे केले. त्यांनी सिकंदराच्या सैन्याला 5,000 भारतीय सैनिक 65 हत्ती आणि धान्य दिलं. त्यांचा तरुण सेनापती संद्रोकुप्तोस त्याच्यासोबत सामील झाला."
सिकंदरने तक्षशिलेत दोन महिने घालवले आणि राजाच्या पाहुणचाराचा आनंद घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
सिकंदराचे चरित्रकार फिलिप फ्रीमन आपल्या 'अलेक्झांडर द ग्रेट' या पुस्तकात लिहितात, "यावेळी, सिकंदराने आपल्या सैन्याचे दोन भाग केले.
त्याने हेफेस्टियनच्या नेतृत्वाखाली एक मोठ सैन्य खैबर खिंडीकडे पाठवलं, जेणेकरून तिथल्या बंडखोरांचा बंदोबस्त करता येईल आणि शक्य तितक्या लवकर सिंधू नदीपर्यंत पोहोचून नदीवर पूल बांधता येईल. म्हणजे सिकंदराच्या सैन्याला नदी पार करता येईल."
ते लिहितात, "हेफेस्टियनच्या दिमतीला अनेक भारतीय राजे आणि मोठ्या संख्येने अभियंते देण्यात आले होते. सिकंदर प्रदक्षिणा घालून हिंदुकुशच्या पूर्वेकडे गेला जेणेकरून तो त्या बाजूला असणाऱ्या जमातींवर नियंत्रण ठेवू शकेल."
जेव्हा अलेक्झांडरच्या हातावर बाण लागला
वाटेत असेही काही राजे भेटले ज्यांनी सिकंदराचं वर्चस्व मान्य केलं नाही. मग सिकंदराने त्यांचे किल्ले ताब्यात घेतले.
याच मोहिमेदरम्यान सिकंदराच्या हाताला बाण लागला. एके ठिकाणी सिकंदराचं सैन्य विश्रांतीसाठी तंबू ठोकत होतं. तिथे काही बंडखोरांनी सिकंदराच्या सैन्यावर हल्ला केला. सिकंदराच्या सैनिकांनी जवळच्या टेकडीवर चढून आपला जीव वाचवला.

फोटो स्रोत, Getty Images
हल्लेखोरांना वाटलं की सिकंदर पळून गेला. पण त्याच्या सैन्याने टेकडीवरून उतरून अचानक प्रत्युत्तर दिलं. सरतेशेवटी बंडखोरांना शस्त्र खाली ठेवावी लागली.
सिकंदराच्या सैन्यात भरती होण्याच्या एकाच अटीवर त्यांना जीवनदान मिळालं होतं. सुरुवातीला त्यांनी यासाठी होकार दिला, परंतु काही लोकांनी तेथून पळून जाण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा सिकंदराने त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले.
सिकंदर जेव्हा बजीरा नगरीत पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की सर्व सैनिक आणि नागरिक नगर सोडून ओरनस नावाच्या टेकडीकडे जात होते.
या टेकडीच्या चहूबाजूंनी खोल खंदक होता आणि माथ्यावर जाण्यासाठी एकच रस्ता होता. माथ्यावर एक सपाट मैदान होतं जिथे मोठ्या प्रमाणावर धान्य पिकवता येणं शक्य होतं. पाण्याचीही पुरेशी व्यवस्था होती.
सिकंदराच्या स्थानिक हेराने त्याला सांगितलं की हर्क्युलिससुद्धा त्या टेकडीवर चढू शकला नव्हता. सिकंदराने याकडे आव्हान म्हणून पाहिलं.
विरोधक आधीच टेकडीवर होते. त्यांना या उंचीचा फायदा मिळत असताना देखील सिकंदराचे सैनिक लढत लढत डोंगराच्या माथ्यावर पोहोचले.
या हल्ल्याने हैराण झालेल्या बजीरा नगरीच्या सैनिकांनी दुसऱ्या दिवशी आत्मसमर्पण करण्याची तयारी दर्शवली.
रात्री त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण सिकंदर आधीच तयार होता. त्याने त्यांच्यावर हल्ला केला. अनेकांचा खंदकात पडून मृत्यू झाला.
पोरसने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला
सिकंदराच्या सैन्याला सिंधू नदीपर्यंत कूच करण्यासाठी 20 दिवस लागले. त्या ठिकाणी त्यांना तक्षशिलाच्या राजाने सिंधू नदीवर पूल बांधण्यास मदत केली.
नदीच्या प्रवाहाला समांतर लाकडी होड्या जोडून नदीवर पूल बनवण्याचं कसब, सिंधू नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना माहीत होतं.

फोटो स्रोत, Getty Images
सिकंदरच्या हेरांनी त्याला माहिती दिली की, पोरसचं सैन्य मोठं असून ज्यात भीमकाय हत्ती देखील आहेत.
सिकंदरला मनोमन विश्वास होता की तो पोरसच्या सैन्याचा पराभव करू शकेल. पण ऐन मोक्यावर पावसाळा सुरू झाल्यामुळे हे अवघड होतं.
सिकंदराच्या सैन्याला पावसात लढण्याचा अनुभव नक्कीच होता, पण त्यांना प्रचंड उष्णतेचाही सामना करावा लागत होता.
त्यामुळे त्यांनी तिथूनच पोरसला निरोप पाठवला की, इथल्या सीमेवर येऊन आमची भेट घे आणि सिकंदराची अधीनता स्वीकार कर.
यावर पोरसने उत्तर दिलं की, तो सिकंदराची अधीनता स्वीकार करणार नाही, पण तो त्याला त्याच्या राज्याच्या सीमेवर भेटायला नक्की येईल.
सिकंदराच्या सैन्याने वादळात झेलम नदी पार केली
सिकंदर आणि त्याच्या सैनिकांनी अनेक दिवस चालून झेलम नदी गाठली. पोरसचे सैन्य झेलमच्या पलीकडे होतं. सिकंदराने नदीच्या उत्तरेला तळ ठोकला. तो अशा जागेच्या शोधात होता जिथून त्याच्या सैन्याने नदी पार केली तरी पोरसला दिसनार नाही.
पोरसला फसवण्यासाठी सिकंदराने आपलं सैन्य नदीच्या काठापासून बरंच लांब ठेवलं.

फोटो स्रोत, Getty Images
पण सिकंदराने आपल्या सैन्याला एकाच ठिकाणी ठेवलं नाही. कधी ते सैन्य पश्चिमेकडे जायचं तर कधी पूर्वेकडे. दरम्यान, त्यांनी नदीच्या काठावर शेकोटी पेटवली आणि मोठा आवाज करू लागले. नदीच्या पलीकडे असलेल्या पोरसच्या सैन्याला सिकंदराचं सैन्य इकडे तिकडे जात असताना बघण्याची सवय झाली आणि त्यांनी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणं बंद केलं.
सिकंदराच्या विपरीत, पोरसचं सैन्य मात्र एकाच जागी उभं होतं. सर्वात पुढे हत्ती तैनात असल्याने त्यांना इकडे-तिकडे ये जा करणं कठीण होतं.
जवळच्या शेतातील धान्य आपल्या छावणीत घेऊन या असा आदेश सिकंदराने आपल्या सैन्याला दिला. पोरसच्या हेरांनी जेव्हा ही बातमी त्याला दिली तेव्हा त्याने असा अर्थ काढला की पावसाळा संपेपर्यंत सिकंदराचा इथेच राहण्याचा हेतू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याच दरम्यान जोरदार वादळ सुरु होतं. याचा फायदा घेत सिकंदराने आपल्या सैनिकांना नदी पार करायला सांगितलं. मात्र या प्रयत्नात सिकंदराच्या अनेक सैनिकांचा वीज पडून मृत्यू झाला.
पोरसला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने सिकंदराच्या सैनिकांना नदी ओलांडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पोरस हा शूर आणि कर्तबगार सेनापती असला तरी सिकंदराच्या प्रशिक्षित सैनिकांचा सामना कसा करायचा हा त्याच्यासमोरचा मोठा प्रश्न होता.
पोरसच्या हत्तीच्या डोळ्याला लक्ष्य करण्याची युक्ती
पोरसच्या बाजूने एकच गोष्ट चांगली होती, ती म्हणजे त्याच्या सैन्यात पुष्कळ हत्ती होते.
फिलिप फ्रीमन लिहितात, "पण तोपर्यंत सिकंदराच्या सैन्याला हत्तींशी सामना कसा करायचा ते कळून चुकलं होतं. सिकंदराचे सैनिक हत्तीला घेरून त्यावर भाल्यांनी हल्ला करायचे. आणि याच दरम्यान एक धनुर्धारी हत्तीच्या डोळ्यावर निशाणा साधायचा. नेम जसा हत्तीच्या डोळ्यावर बसायचा तसा हत्ती सैरावैरा पळत सुटून आपल्याच लोकांना तुडवून मारायचा."

फोटो स्रोत, Getty Images
"सिकंदराने आपल्या सैनिकांना पोरसच्या सैन्याच्या डावीकडे आणि उजवीकडे पाठवले आणि त्यांना पुढे जाऊन पोरसच्या सैन्यावर मागून हल्ला करण्याचे आदेश दिले. या भीषण युद्धात दोन्ही बाजूचे अनेक सैनिक मारले गेले."
"ही लढाई झेलम नदीच्या तीरावर पंजाबमधील जलालपूर या ठिकाणी झाली. सिकंदर त्याच्या बुसेफॅलस घोड्यावर स्वार होता. या युद्धात घोड्याला बाण लागला आणि तो पडून मेला. आपल्या घोड्याच्या मृत्यूचा शोक करायला सिकंदराला अजिबातच वेळ मिळाला नाही. तो दुसऱ्या घोड्यावर स्वार झाला आणि त्याने लढाई चालूच ठेवली. पोरसच्या सैनिकांवर दबाव येताच सिकंदराच्या सैनिकांनी मागून येऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा पळून जाण्याचा मार्ग बंद केला."
पोरसला कैद करण्यात आलं
सैन्य हरलं तरी पोरस मात्र त्याच्या अवाढव्य हत्तीवर स्वार होऊन लढतच राहिला. त्याच्या धाडसाचं कौतुक करत सिकंदराने त्याच्याजवळ निरोप पाठवला की, जर त्याने हार मानली तर त्याला सोडून दिलं जाईल. हा संदेश घेऊन जाणाऱ्या दूताचं नाव होतं ओम्फिस.
पोरसने त्याच्या भाल्याने त्या दूताला मारण्याचा प्रयत्न केला. मग सिकंदराने पोरसकडे दुसरा दूत पाठवला. त्याने पोरसला माघार घेण्यास मनवलं.

फोटो स्रोत, Getty Images
फिलिप फ्रीमन लिहितात, "जेव्हा पोरस आणि सिकंदर भेटले तेव्हा पोरसचा हत्ती जखमी झाला होता, पण तरीही त्याने गुडघ्यावर बसून पोरसला उतरण्यास मदत केली. सहा फूट उंचीचा पोरस बघून सिकंदर खूप प्रभावित झाला. कैदी बनवल्यानंतर सिकंदरने पोरसला विचारलं की त्याच्यासोबत काय करायला हवं? यावर पोरसने लगेच उत्तर दिलं, 'एक राजा दुसऱ्या राजासोबत जे करतो ते.'
"सिकंदरने पोरसला मलमपट्टी करण्यासाठी रणांगण सोडण्याची परवानगी दिली. काही दिवसांनंतर, त्याने पोरसला जिंकून घेतलेली जमीनच नव्हे, तर आसपासची अतिरिक्त जमीन सुद्धा दिली. सिकंदराच्या सहाय्यकांना ते आवडलं नाही."
सिकंदराने आपल्या मृत्यू झालेल्या सैनिकांचे अंत्यविधी याच ठिकाणी पार पाडले. सिकंदराच्या मारल्या गेलेल्या घोड्याच्या स्मरणार्थ, युद्धभूमीजवळ एक नवीन शहर वसवलं आणि त्या शहराला नाव दिलं बुसेफेल्स.
सिकंदरचा चरित्रकार प्लुटार्क लिहितो, "जोपर्यंत पोरस लढण्याच्या स्थितीत होता, तोपर्यंत त्याने सिकंदरासोबत निकराची लढाई लढली."
मॅसेडोनियाला परतण्यासाठी सैन्याचा दबाव
आता सिकंदराला पलीकडे गंगेच्या किनारी जायचं होतं पण यासाठी त्याचे सैनिक तयार नव्हते.
संपूर्ण सैन्याच्या वतीने बोलण्यासाठी एक जुना सैनिक पुढे आला आणि म्हणाला, "सर्व संकटांना तोंड देत तुमच्या सोबत एवढ्या पुढे आल्याने आमचा सन्मान वाढला आहे. पण आता आम्ही थकलोय."

फोटो स्रोत, SIMON &SCHUSTER
"या युद्धामध्ये आमचे बरेचसे सैनिक कामी आले. या युद्धाने आमच्या शरीरावर त्याचे व्रण दिलेत. आमच्या कपड्यांच्या कधीच्याच चिंध्या चिंध्या झाल्या आहेत. आता आम्हाला इराणी आणि भारतीय कपडे घालावे लागत आहेत."
"आम्हाला आमच्या आई वडिलांना बघायचं आहे. आमच्या बायका मुलांना जवळ घ्यायचं आहे. आम्ही सर्वांना मॅसेडोनियाला परत जायची इच्छा आहे."
"त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा नव्या पिढीसोबत आणखी एका मोहिमेवर जाऊ शकता. आमचं सांगायचं तर आम्ही यापुढचा प्रवास करू शकत नाही."
सिकंदरचं परतणं
त्या सैनिकाचं बोलून झाल्यावर सर्व सैनिकांनी त्याला टाळ्यांनी दाद दिली. पण सिकंदरला मात्र त्याचं म्हणणं पटलं नाही.

फोटो स्रोत, SIMON & SCHUSTER
सिकंदर रागाने उठला आणि त्याच्या तंबूकडे निघून गेला. तीन दिवस तो त्याच्या जवळच्या कोणाशीही बोलला नाही.
तो वाट पाहत राहिला की त्याचे सैनिक त्याच्याकडे येतील आणि त्याची मनधरणी करतील, स्वतःहून माफी मागतील. पण यावेळी त्याच्याकडे कोणीही आलं नाही.
शेवटी सिकंदरला सैनिकांचं म्हणणं मान्य करावं लागलं. आणि गंगेपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न अर्धवट सोडून द्यावं लागलं.
मग त्याने आपल्या सर्व सैनिकांना एकत्र करून घोषणा केली की तो आपण आपल्या घरी परत जातोय.
उदास मनाने त्याने पूर्वेकडे एक कटाक्ष टाकला आणि त्याचा देश मॅसेडोनियाच्या दिशेने रवाना झाला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








