स्पर्म काऊंट का कमी होतो? तो कसा वाढवावा?

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी
    • Reporting from, नवी दिल्ली

2012 मध्ये 'विकी डोनर' नावाचा एक चित्रपट आला होता. त्यातला विकी हा 'स्पर्म डोनर' असतो. त्याच्या स्पर्ममुळे अनेक निपुत्रिक जोडप्यांना मुलं होतात.

ती व्हावी म्हणून त्याचा मार्गदर्शक डॉ.चड्ढा त्याला सारखं स्पर्म चांगले रहावे यासाठी सल्ला देत राहतो. तणाव घेऊ नको, दारू पिऊ नको... एक ना अनेक.

स्पर्म काऊंट हा पुरुषांच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. वंश वाढवायचा असल्यास स्त्रियांच्या आरोग्याबरोबर पुरुषांचं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यांना संतती हवी त्या जोडप्यातील पुरुषाचे स्पर्म काऊंट अतिशय महत्त्वाचे असतात.

सध्याची धकाधकीची जीवनशैली, बैठं काम, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांनी स्पर्म काऊंट कमी होत असल्याचं आपण वाचतो. पण स्पर्म काऊंट इतका महत्त्वाचा का असतो? तो कसा मोजतात? स्पर्म कमी असल्यास काय उपाययोजना करता येतात अशा अनेक प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत.

स्पर्म किंवा शुक्राणू किंवा शुक्रजंतू म्हणजे काय?

पुरुषांच्या वीर्यातील सर्वांत लहान कण म्हणजे स्पर्म किंवा शुक्राणू किंवा शुक्रजंतू.

एका निरोगी पुरुषाच्या 1 मीलिलीटर वीर्यात लाखोंच्या संख्येत स्पर्म असतात. त्यातला एक शुक्रजंतुचे स्त्रीबीजाबरोबर मिलन होतं आणि स्त्री गरोदर होते.

मूल होत नसल्यास जोडप्याच्या काही चाचण्या केल्या जातात. त्यात पुरुषांच्या वीर्याची चाचणी केली जाते. त्यात स्पर्मची संख्या, त्यांचा दर्जा, मोटिलिटी म्हणजे वेगाने हालचालीची क्षमता अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.

एका मिलीलीटरमध्ये 15 लाखापेक्षा कमी स्पर्म असतील तर पुरुषांवर औषधोपचार केले जातात.

पुरुष 80 वर्षांपर्यंत प्रजननक्षम असला तरी वाढत्या वयाबरोबर त्याचा स्पर्म काऊंट कमी होत जातो. उशीरा लग्न आणि लाईफ स्टाईलशी त्याचा थेट संबंध आहे.

“वयाच्या 35 वर्षांनंतर पुरुषांचं स्पर्म काउंट कमी व्हायला लागतो, पुरुष वयाच्या 80 वर्षांपर्यंत प्रजननक्षम राहू शकतो असं म्हणतात. पण तरीही वाढत्या वयानुसार शुक्राणू म्हणजेच स्पर्मच्या संख्येत घट होत रहाते.

त्यामुळे उशीरा लग्न झाल्यानंतर स्पर्म काउंट आधीच कमी झालेला असू शकतो,” असं मुंबईतल्या जेजे रुग्णालयाच्या प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.

त्यातच जे पुरूष नगण्य व्यायाम करतात आणि जास्त वेळ टीव्ही पाहातात त्यांचा स्पर्म काउंट एखाद्या अॅक्टिव्ह पुरुषाच्या तुलनेत अत्यंत कमी असतो असंही एका संशोधनातून समोर आलं आहे.

त्यामुळे काय खाल्लं, काय केलं आणि काय टाळलं म्हणजे स्पर्म काउंट वाढतो? या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. शिवाय याबाबत असणाऱ्या इतरही मिथकांवर आपण चर्चा करणार आहोत.

चांगला स्पर्म काउंट का महत्त्वाचा आहे?

या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आम्ही चाळीसगावमधले प्रसूती तज्ज्ञ डॉ. संजय चव्हाण यांच्याशी आम्ही संवाद साधला. या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी एका पेशंटचं उदाहरण दिलं.

जळगावमध्ये राहाणाऱ्या अजय आणि पूजानं (नाव बदललं आहे) पस्तीशी ओलांडल्यानंतर लग्न केलं होतं. लग्नाला 3 वर्षं झाली होती. त्यांचं वैवाहिक जीवन सुखी सुरू होतं. कुठलही समस्या नव्हती. पण लग्नाच्या तीन वर्षांनंतरही मूल होत नव्हतं. मग दोघांनी चर्चा करून डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं ठरवलं.

डॉक्टरांनी अजय आणि पूजा यांचं समुपदेशन केलं आणि त्यांना काही टेस्ट करून घेण्याचा सल्ला दिला. पूजाचे सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. पण, अजयच्या सिमेनचं मात्र डॉक्टरांनी अनॅलिसिस करण्याचा सल्ला दिला. त्यात अजयचं स्पर्म का कमी असल्याचं लक्षात आलं.

डॉक्टरांनी अजयला 3 महिन्यांची औषधं लिहून दिली आणि काही पथ्यं पाळायला सांगितली.

उदाहरणार्थ- स्मोकिंग आणि दारूचं सेवन न करणं, वेळेत झोपणं, पुरेसा आहार घेणं आणि रोज थोडा व्यायाम करणं. तसंच या काळात कोणत्याही प्रकारचा तणाव घेऊ नये असाही सल्ला अजयला दिला.

तीन महिन्यांनंतर त्याच्या स्पर्म काऊंटमध्ये चांगलीच सुधारणा झाली.

डॉ. संजय सांगतात, "अजयचा स्पर्म काऊंट फार वाईट नव्हता. पण त्याचे स्पर्म प्रोग्रेसिव्हली ॲक्टिव्ह नव्हते. गर्भधारणा होण्यासाठी पुरुषाचे स्पर्म किमान 70 टक्के प्रोग्रेसिव्हली ॲक्टिव्ह पाहिजेत. खरंतर पुरुषाच्या वीर्यातल्या लाखो स्पर्मपैकी एकच स्पर्म फलित करतो.

पण त्या स्त्रीबीजावर झोना पेल्युसिडा नावाचं अवरण असतं. ते जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत स्त्रीबीजात जाऊन स्पर्म त्याला फलित करू शकत नाही. स्त्रीच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर स्पर्म्समध्ये स्पर्धा लागते."

"हे स्पर्म स्त्रीबीजावरील या झोना पेल्युसिडाला धडक देतात. त्यांच्या धडकांमुळेत ते फुटतं आणि त्यातून मग एक स्पर्म आत जाऊन ते बीज फलित करतो.

स्त्रीबीजावरील या अवरणाला फोडण्यासाठी पुरुषाच्या स्टाँग प्रोग्रेसिव्ह ॲक्टिव्ह स्पर्म्सची गरज असते आणि त्यासाठीच चांगला स्पर्म काउंट गरजेचा असतो."

स्पर्म काऊंट चांगला राहण्यासाठी काय करावं?

व्यायाम आरोग्यासाठी चांगलाच असतो. पण काही व्यायाम आणि खेळ प्रकार मात्र स्पर्म काउंटसाठी हानिकारक ठरू शकता.

उदाहरणार्थ – खूप वेळ सायकल चालवणे, तंग कपडे घालून जास्त अंतर धावणे. तंग अंडरवेअरपेक्षा बॉक्सर सारख्या अंडरवेअर वापरल्या तर स्पर्म काऊंट चांगला राहतो. शिवाय सिगारेट, दारू सारखी व्यसनं टाळण्याचा सल्लासुद्धा डॉ. आनंद देतात.

तणाव हे सुद्धा स्पर्मची संख्या घटण्याचं कारण ठरू शकतं. त्यामुळे जास्त ताण-तणाव न घेण्याचा सल्ला डॉ. संजय देतात.

चांगल्या स्पर्म काऊंटसाठी आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. चांगल्या स्पर्म काऊंटसाठी चौरस आहार घ्यावा. मांसाहार, डाळी, मोड आलेले कडधान्यं यांचा जेवणात समावेश करावा.सर्व प्रकारची फळं खावीत. कांदा, लसूण, मध, शेंगदाणे आणि गायीचं तूप यांचाही आहारात समावेश करावा.

शक्यतो थंड पाण्याने अंघोळ करावी. जननेंद्रियाजवळील भाग हवेशीर राहील अशा प्रकारे सैलसर कपडे घालावेत.

नियमित व्यायाम करावा. आठवड्यातून काही तास व्यायाम केल्यास वीर्याचा दर्जा सुधारतो असं संशोधनात सिद्ध झालं आहे.

समज-गैरसमज

जिममध्ये जास्त व्यायाम केल्यास स्पर्म काऊंट वाढतो असा एक समज आहे. मात्र त्याचा थेट संबंध नाही, असं डॉ. अशोक आनंद सांगतात.

पण रोज पुरेसा व्यायाम केल्यामुळे स्पर्म काउंट नीट राहातो, त्याचबरोबर योग्य आहारसुद्धा गरजेचा आहे, असं डॉ. अशोक सांगतात.

पण स्पर्म काउंट वाढवण्यासाठी जिममध्ये जायलाच पाहिजे असं अजिबात नाही, असं डॉ. अशोक सांगतात.

बैठं काम केल्यामुळे स्पर्म काउंटवर परिणाम होत नाही. पण बैठं काम करताना तुमच्या शरीराचं तापमान वाढणार असेल तर मात्र त्याचा स्पर्म काउंटवर परिणाम होतो, असं डॉ. आनंद सांगतात.

धूम्रपान केल्यामुळे स्पर्म काउंट नक्की कमी होतात, असं डॉ. आनंद सांगतात.

“चेन स्मोकरचा स्पर्म काउंट नक्कीच कमी असतो. सिगारेटमध्ये हानिकारक निकोटीन असतं. तसंच धुम्रपानामुळे शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होते. त्याचा परिणाम स्पर्मच्या संख्येवर होतो. त्यामुळे स्मोकिंग बंद केलं तर स्पर्म काऊंट वाढवता येऊ शकतो,” असं डॉ. आनंद सांगतात.

तरुण वयातच मधुमेह आणि रक्तदाब सारखे आजार झाले तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळेसुद्धा स्पर्म काऊंट कमी होतो, असं डॉक्टरांचं मत आहे.

मानसिक तणाव आणि स्पर्म काऊंटचा तसा थेट संबंध नाही पण अप्रत्यक्ष संबंध मात्र नक्की आहे, असं सेक्सॉलॉजिस्ट आणि मनोविकारतज्ज्ञ सागर मुंदडा बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.

“दीर्घकालीन मानसिक तणावामुळे हार्मोन्समध्ये बदल होत राहतात, त्याचा परिणाम स्पर्म काऊंटवर होऊ शकतो,” असं डॉ. मुंदडा सांगतात.

जास्त गरम पाण्याने अंघोळ करणं किंवा बाथ टबमध्ये जास्त गरम पाण्यात अंघोळ करणं स्पर्मच्या निर्मितीसाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त गरम पाण्यामुळे पुरुषांच्या वृषणाचं (Testicles) तापमान वाढतं.

परिणामी टेस्टिकलला स्पर्म तयार करण्यासाठी जास्त काम करावं लागतं. अशावेळी निर्मिती प्रक्रियेवर ताण आल्यामुळे स्पर्मची क्वालिटी खराब होते. त्यांची संख्यासुद्धा घटते. त्यामुळे गर्भधारणेत बाधा येऊ शकते.

लॅपटॉप मांडीवर ठेवणं हानिकारक आहे असाही एक समज आहे. मात्र कुठलही संशोधन याचं 100 टक्के हो असं उत्तर देत नाही, असं डॉ. मुंदडा सांगतात.

पण सतत लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केलं आणि त्यामुळे जर हिट निर्माण होत असेल आणि परिणामी मांड्या आणि जांघांचा भाग गरम होत असेल तर मात्र काही अंशी त्याचा परिणाम होऊ शकतो.

हस्तमैथुनामुळेही स्पर्म काऊंट कमी होतो असाही एक समज आहे.

“मात्र हे खरं नाही. जास्त हस्तमैथुनामुळे प्रत्यक्षात शरीरसंबंध ठेवताना मात्र लिंगाच्या ताठरतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो,” असं डॉ. मुंदडा सांगतात.

पुरुषांमधला स्पर्म काऊंट सतत कमी होत राहिला तर मानव जमात एकेदिवशी नामशेष होईल, असा धक्कादायक अहवाल ह्युमन रिप्रॉडक्शन अपडेट या जर्नलने काही दिवसांपूर्वी दिला होता. या अहवालावर शंकासुद्धा उपस्थित करण्यात आल्या होत्या.

पण, भविष्यात असं शक्य आहे, असं याबाबत संशोधन करणाऱ्या डॉ. हगाई लेविन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलंय. त्याचवेळी हा काळजीचा विषय आहे आणि भविष्यात हे संभव आहे, असंही त्यांचं मत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)