महिलांना पुरुषांपेक्षा जास्त राग येतो का? संशोधनातून काय समोर आलं?

    • Author, स्टेफानी हेगार्टी, बीबीसी प्रतिनिधी
    • Role, जान्हवी मुळे, बीबीसी मराठी

अलीकडे तुम्हाला जरा जास्तच राग येतो का? घरात, कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान तुमच्या आसपासचे लोक विशेषतः बायका जरा जास्तच चिडचिड करू लागल्या आहेत असं तुम्हाला वाटतं का?

कोव्हिडनंतरच्या काळात हे बदल जास्त ठळकपणे दिसून येत आहेत. रागासोबतच वेदना, ताणतणाव, काळजी अशा नकारात्मक भावनांचं प्रमाण वाढलं आहे आणि त्याचा त्रास होणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे, असं बीबीसीनं केलेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे.

हा अभ्यास कशाच्या आधारे करण्यात आला, जगात आणि भारतात काय स्थिती आहे? महिलांमध्ये वाढत्या रागाची कारणं काय आहेत आणि ती समजून घेणं महिलांच नाही तर पुरुषांसाठीही का महत्त्वाचे आहे, जाणून घेऊयात.

महिलांमध्ये रागाचं प्रमाण वाढलं

गॅलप ही अमेरिकेतली संस्था वेगवेगळ्या विषयांवर जागतिक सर्वेक्षणांचं काम करते. दरवर्षी गॅलपनं मानसिक स्वास्थ्य आणि भावनांसंदर्भातही सर्वेक्षणं केली आहेत.

बीबीसीनं गेल्या दहा वर्षांतल्या या सर्व्हेंचा अभ्यास केला आणि त्यातून महिलांमध्ये राग येण्याचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे.

दरवर्षी गॅलप ग्लोबल इमोशन्स पोलमध्ये 150 देशांतल्या 1 लाख 20 हजारांहून अधिक व्यक्तींची पाहणी केली जाते. त्यांना आदल्या दिवसभरात राग, दुःख, ताणतणाव आणि काळजी यापैकी कुठल्या नकारात्मक भावना जाणवल्या याविषयी विचारलं जातं.

बीबीसीनं केलेल्या अभ्यासानुसार, गेल्या दहा वर्षांत म्हणजे 2012 साली पुरुष आणि महिलांमध्ये नकारात्मक भावनांची पातळी जवळपास समान होती.

नऊ वर्षांनी पुरुष आणि महिला दोघांमध्येही नकारात्मक भावना वाढल्या आहेत, पण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये राग येण्याचं प्रमाण सहा टक्के अधिक झालं आहे.

विशेषतः कोव्हिडच्या जागतिक साथीच्या काळात हा फरक आणखी प्रकर्षानं दिसून आला. तसंच काही देशांमध्ये महिलांना राग येण्याचं प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा अधिक आहे.

कंबोडियामध्ये पुरुषांपेक्षा सतरा टक्के अधिक महिलांनी त्यांना राग येत असल्याचं मान्य केलंय. तर भारत आणि पाकिस्तानात पुरुषांपेक्षा सुमारे 12 टक्के अधिक महिलांनी राग आल्याचं मान्य केलंय.

भारतात राग येण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये 27.8 टक्के इतकं तर महिलांमध्ये 40.6 टक्के इतकं आहे. थोडक्यात, भारतात पुरुषांपेक्षा महिलांना जास्त राग येतो आहे. असं का होतंय?

महिलांना इतका राग का येतो आहे?

मनोविकारतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी विजयकुमार यांच्यामते, "भारतासारख्या देशात महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, त्या नोकरी करतायत आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत. पण आजही त्यांना सनातनी, पुरुषप्रधान संस्कृतीचा सामना करावा लागतो आहे. घरात अशी दुय्यम वागणूक आणि बाहेर स्वातंत्र्य अशा विसंगतीमुळे खूप राग येऊ शकतो."

डॉ. लक्ष्मी मुंबई, चेन्नई अशा शहरांतल्या नोकरी करणाऱ्या महिलांचं उदाहरण देतात. त्या सांगतात,

"संध्याकाळच्या वेळी एकीकडे पुरुष थोडे आरामात असलेले दिसतात, ते चहाच्या ठेल्यावर जातात किंवा सिगारेट ओढताना दिसतात. तर दुसरीकडे बायका घाईघआईनं बस किंवा ट्रेन पकडतात, काय स्वयंपाक करायचा याचा विचार करत असतात. काहीजणी गाडीतच भाजी वगैरे चिरू लागतात."

महिलेनं न थकता हसत इतरांची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा सर्रास केली जाते, ज्याचं ओझं त्या महिलेवर पडतं. मग राग येणंही स्वाभाविक आहेच.

"आधी महिलांनी राग वगैरे व्यक्त करणं योग्य मानलं जात नसे, पण आता परिस्थिती बदलते आहे. त्या आपल्या भावना व्यक्त करू शकत आहेत आणि म्हणून राग वाढलेला दिसतो आहे."

महिलांमध्ये रागाचं प्रमाण कमी करायचं असेल, तर त्यांना सहन करावे लागणारे त्रास दूर करावे लागतील. त्यांना समजून घ्यावं लागेल.

कोव्हिड काळात रागामध्येही वाढ

कोव्हिडची जागतिक साथ आणि लॉकडाऊनचे परिणाम खरंतर सगळ्यांनाच अजूनही जाणवतायत. अनेकांना आर्थिक आणि मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागतो आहे. भारतात काही महिलांना त्याविषयी सोशल मीडियावर लिहिलं होतं. 'द ग्रेट इंडियन किचन'सारखे चित्रपटही या काळात बरेच गाजले.

पण जगभरातील महिलांची परिस्थितीही फारसी वेगळी नाही. या काळात सगळे घरात होते, आणि त्यामुळे घरातल्या बाईवर कामाचा बोजा पडला, असं चित्रही बहुतेक ठिकाणी दिसलं.

इंग्लंडमध्ये 2020 साली इन्स्टिट्यूट फॉर फिस्कल स्टडीज या संस्थेनं मुलांचं पालकत्व असणाऱ्या 5000 भिन्नलिंगी जोडप्यांचं सर्वेक्षण केलं होतं.

त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात या घरांमध्ये वडिलांपेक्षा आईनं घरच्या जास्तीत जास्त जबाबदाऱ्या उचलल्या. त्यामुळे वर्क फ्रॉम होम असूनही त्यांना स्वतःकडे, स्वतःच्या कामाकडे फारसं लक्ष देता आलं नाही.

कोव्हिडकाळात 'वर्कफोर्स' म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये महिलांचं प्रमाण कमी झालं. यूएन विमेन या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेसाठी डेटा सायंटिस्ट म्हणून काम करणाऱ्या जिनेट एझकोना त्याविषयी अधिक माहिती देतात.

त्यांच्या मते 2020 सालापूर्वीच्या काही वर्षांमध्ये नोकरी-व्यवसायातील महिलांचा सहभाग हळूहळू का असेना, पण वाढत होता. मात्र 2020 साली त्याला खीळ बसली. यंदा 169 देशांमध्ये नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांचं प्रमाण 2019 सालापेक्षा कमी असेल असा अंदाज आहे.

रागावर उत्तर आणि रागातून बदल

वाढत्या रागावर काही ठिकाणी महिलांनीच उत्तर शोधलं आहे. एकमेकींना भेटून किंवा ऑनलाईन त्या आपले अनुभव शेअर करतात आणि भावनांना मोकळी वाट करून देताना दिसतात.

अमेरिकेतल्या मानसिक आरोग्य तज्ज्ञ सारा हार्मन त्यापैकीच एक आहेत. स्वतः दोन मुलांची आई असलेल्या सारा यांना लॉकडाऊनच्या काळात रोजचा वैताग साठत जाऊन त्याचं राग आणि चिडचिडीत रुपांतर होत असल्याचं जाणवलं.

सारा यांनी मग त्यांच्याकडे समस्या घेऊन आलेल्या काही महिलांना एकत्र आणलं. त्या सगळ्याजणी एका मोकळ्या मैदानात उभ्या राहून जोरजोरानं किंचाळातानाचा एक एक व्हीडिओ व्हायरल झाला. रागाचा असा निचरा केल्यानं बराच फायदा होत असल्याचं त्यातल्या काहीजणी आवर्जून सांगतात.

हा राग कधीकधी चांगला असतो, याकडेही काही तज्ज्ञ लक्ष वेधून घेतात. त्यांच्या मते अन्यायाची चीड येते, तेव्हाच त्याविरोधात एकत्र येण्याची, लढण्याची, चांगला बदल किंवा सुधारणा घडवण्याची क्षमता निर्माण होते.

महिलांची स्थिती काय?

जगभरातल्या 100 प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांची यादी बीबीसीतर्फे दरवर्षी जाहीर केली जाते.

यंदा बीबीसी हंड्रेड विमेन या यादीचं दहावं वर्ष असून, या दहा वर्षांत महिलांची स्थिती कशी बदलली आहे याचा आढावा घेण्यासाठी बीबीसीनं हा विशेष अभ्यास केला होता.

त्यामध्ये सवाँता कॉमरेज या मार्केट रिसर्च करणाऱ्या संस्थेच्या मदतीनं 15 देशांतील महिलांना 2012 च्या तुलनेत आजची त्यांच्या देशातली स्थिती कशी आहे याविषयी विचारण्यात आलं. त्यातून या गोष्टी समोर आल्या आहेत :

  • या पंधरा देशांत सर्वेक्षणात सहभागी महिलांपैकी साधारण निम्म्याजणींच्या मते दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज त्या स्वतःचे आर्थिक निर्णय घेऊ शकत आहेत.
  • अमेरिका आणि पाकिस्तानचा अपवाद वगळता इतर देशांत किमान अर्ध्या महिलांना त्यांच्या प्रियकर/नवरा/पार्टनरसोबत (लैंगिक संबंधासाठी) सहमतीविषयी चर्चा करणं सोपं वाटतं.
  • जवळपास सर्वच देशांत दोन तृतियांश महिलांना सोशल मीडियामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्यासारखं वाटतं. अपवाद अमेरिका आणि यूके यांचा. या दोन्ही देशांत निम्म्याहून कमी महिलांना सोशल मीडियामुळे फायदा झाल्यासारखं वाटतं.
  • 15 पैकी 12 देशांमध्ये 40 टक्के किंवा अधिक महिलांना गेल्या दशकभरात अभिव्यक्ती स्वातंत्र्यात वाढ झाल्यासारखं वाटतं, म्हणजेच त्या अधिक मोकळेपणानं त्या बोलू शकतायत.
  • अमेरिकेत 46% महिलांच्या मते सुरक्षित गर्भपातासाठी उपलब्ध वैद्यकीय सुविधांमध्ये दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज घट झाल्याचं जाणवतंय.

डेटा जर्नलिस्ट - लियाना ब्राव्हो, ख्रिस्टिन येव्हान्स आणि हेलेना रोझिएका

विशेष वार्तांकन -जॉर्जिना पियर्स, रिबेका थॉर्न, व्हॅलेरिया पेरासो आणि लारा ओवेन

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)