म्हैसूर सँडल सोप : शुद्ध चंदनाचं तेल असलेला हा साबण कसा बनतो? त्याचा रंजक इतिहास

फोटो स्रोत, KSDL
- Author, व्ही. रामकृष्ण
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातल्या गावात आम्ही राहत होतो.
जेव्हा कधी मी साबणाची कल्पना करतो, तेव्हा मला ‘लाइफबॉय’ साबण दिसतो – लाल, जाड आणि सुंदर.
माझ्या घरातले सगळेच ‘लाईफबॉय’चा वापर करत असत. हा साबण कितीही घासला तरी ते लवकर संपायचा नाही. किंमतही कमी होती. त्यामुळे नव्वदच्या दशकात ‘लाईफबॉय’ साबण आमच्या गावात सर्रास वापरला जात असे आणि लोकप्रियही होता.
कालांतराने नवीन साबण येऊ लागले. याच दरम्यान म्हैसूर सँडल सोपचं आगमन झालं. खरंतर म्हैसूर चंदन साबण एका नातेवाईकांच्या घरी माझ्या वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी पहिल्यांदा पाहिला होता.
साबणाच्या पाकिटावर प्राण्याचे चित्र होते आणि साबणाच्या गोड सुगंधाने मला मोहित केलं होतं. 25 वर्षांनंतरही आजही तो सुगंध ताजा वाटतो.
पहिल्या महायुद्धानंतर...
पहिल्या महायुद्धानंतर म्हैसूर राज्यात चंदनाची अनेक झाडे होती. राज्याला चंदनाची निर्यात करून महसूल मिळत असे. इथून टिपू सुलतानच्या काळापासून चंदनाचं लाकूड चीनसारख्या देशात निर्यात होत असे.
विसाव्या शतकापर्यंत म्हैसूर राज्यातील चंदनासाठी युरोप ही एक महत्त्वाची बाजारपेठ बनली. म्हैसूर राज्यातून जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन यांसारख्या देशांमध्येही चंदनाची निर्यात होत असे.
1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झाल्याने सागरी मार्गातील अडचणींमुळे त्याचा पुरवठा थांबवावा लागला. म्हैसूरच्या चंदनाची मागणी अनेक देशांमध्ये पुरवठा खंडित झाल्यामुळे कमी झाली होती.
कृष्णराजा वाडियार-चौथा हा म्हैसूर राज्यावर राज्य करत होता. विख्यात अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरैया हे नाडू दिवाण होते. राजाने विश्वेश्वरैयाला गोळा केलेल्या चंदनातून तेल काढण्याच्या पद्धतीचा विचार करण्यास सांगितलं.
बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या मदतीने विश्वेश्वरैया यांनी चंदनापासून तेल काढण्यासाठी एक यंत्र तयार केले. म्हणून 1916 मध्ये म्हैसूरमध्ये चंदनाच्या तेलाचा पहिला कारखाना सुरू झाला.
राजाचा आवडता साबण
एकदा काही परदेशी लोक कृष्णराज वाडियार-चौथा यांना भेटायला आले. त्यावेळी त्यांनी चंदनाच्या तेलापासून बनवलेला साबण भेट म्हणून दिल्याचे सांगितले जाते.
जेव्हा राजाने तो साबण पाहिला, तेव्हा त्याला चंदनाच्या तेलापासून साबण बनवण्याची कल्पना आली. अशाप्रकारे म्हैसूर साबण कारखाना 1918 मध्ये बंगळुरूमधील कब्बन पार्क येथे स्थापन झाला आणि म्हैसूर चंदन साबणाचे उत्पादन सुरू झाले.

फोटो स्रोत, Getty Images
स्वातंत्र्यानंतर कर्नाटक राज्य सरकारने दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण केले आणि 1980 मध्ये त्याचे नाव बदलून 'कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड' केलं.
2006 मध्ये म्हैसूर चंदन तेल आणि साबण यांना भौगोलिक ओळख दर्शवणारा टॅग देखील देण्यात आला.
साबण कसा बनवला जातो?
साधारणपणे चंदनाच्या तेलासाठी किमान 15 वर्षे जुन्या झाडांची कापणी केली जाते. 15 ते 25 वर्षे जुनी झाडे चांगल्या प्रतीचे तेल तयार करतात.
- झाडांच्या वयानुसार तेलाची गुणवत्ता वाढते. म्हैसूर साबणाच्या निर्मितीसाठी सुमारे 40 वर्षे वयाची झाडे निवडली जातात.
- हार्टवूड आणि सॅपवूड वाळलेल्या चंदनापासून वेगळे केले जातात.
- हार्टवूड : लाकडाच्या मध्यभागी असलेल्या गडद तपकिरी रंगाच्या भागाला हार्टवूड म्हणतात. त्यातून उच्च दर्जाचे तेल मिळते.
- सॅपवूड – गडद तपकिरी भागाच्या भोवतीच्या पांढऱ्या भागाला सॅपवूड म्हणतात. या भागातून मिळणार तेल थोडं कमी दर्जाचं असतं.
- हार्टवूड आणि सॅपवूड वेगळे करण्यासाठी चंदनाचे लाकूड मशीनद्वारे किंवा हाताने विभाजित केले जाते.

फोटो स्रोत, Getty Images
- गोळा केलेले हार्टवूड दुसर्या मशीनमध्ये टाकले जाते आणि त्याचे लहान तुकडे केले जातात.
- त्याचे तुकडे केल्यानंतर त्याची पावडर केली जाते.
- चंदन पावडर बॉयलरमध्ये गरम केली जाते. पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर चंदन पावडर तेल बॉयलरच्या वरच्या नळ्यांमधून सोडले जाते.
- वाफ एका टाकीत थंड केली जाते. त्यानंतर वाफेचे पाण्यात रूपांतर होते. वाफेबरोबर येणारे चंदनाचे तेल पाण्यावर तरंगते.
- पाण्यावर तरंगणारे तेल वेगळे होते. त्याला कच्चे चंदन तेल म्हणतात. म्हणजे त्यात अजूनही काही पाणी आणि अशुद्ध भाग आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
- कॉस्टिक सोडा, पाम तेल आणि पाणी एका मोठ्या लोखंडी कढईत ठेवून चांगले गरम केले जाते. याला 'सॅपोनिफिकेशन' म्हणतात. ते गरम करून, एक ढेकूळ पदार्थ तयार केला जातो.
- व्हॅक्युम सिस्टमद्वारे अशुद्ध भाग काढून टाकला जातो. या अवस्थेत ते मेणासारखे दिसते.
- मग त्याचे लहान तुकडे केले जाते. त्याला 'सोप नूडल्स' म्हणतात.
- ग्लिसरीन, चंदन तेल, रंग, परफ्यूम, टॅल्कम पावडर इत्यादी घटक लहान तुकडे करून नीट मिसळले जातात.
- नंतर ते सोपबारमध्ये टाकले जाते.
- कटरच्या मदतीने साबणाच्या पट्ट्या वेगवेगळ्या आकारात कापल्या जातात.
- त्यानंतर त्यावर म्हैसूर सँडलचा लोगो आणि नाव छापलेले असते.
- मात्र, सॅपोनिफिकेशनमुळे प्रदूषण होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे कंपनी सध्या थेट साबण नूडल्स खरेदी करते आणि त्यापासून साबण बनवते.
म्हैसूर चंदन साबणाचे नाव ऐकताच तो लोगो आठवतो.
सिंहाचे शरीर आणि हत्तीचे डोके असलेल्या प्राण्याला 'शरभ' म्हणतात. हिंदू पौराणिक कथांमध्ये याचे वर्णन ज्ञान, साहस आणि शक्तीचे प्रतीक म्हणून केले जाते. त्यामुळे लोगो म्हणून त्याची निवड केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
गरुड हे कर्नाटक सरकारचेही प्रतिक आहे.
म्हैसूरच्या चंदनाच्या साबणाचा बॉक्सही सुंदर आहे. एखाद्या दागिन्याच्या बॉक्ससारखं ते डिझाइन केलेलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








