प्रियंका गांधी आणि इस्रायली राजदूत यांच्यात काय वाद झाला? राजदूतांच्या 'कार्यशैली'वर काय आल्या प्रतिक्रिया?

प्रियंका गांधी आणि इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझार

फोटो स्रोत, BBC, ReuvenAzar/X

फोटो कॅप्शन, प्रियंका गांधी आणि इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझार

काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी गाझामध्ये इस्रायलच्या सैन्यानं केलेल्या हल्ल्यांमध्ये झालेल्या मृत्यूंवर आणि उपासमारीवर भारत सरकारनं मौन धारण करण्याला 'लाजीरवाणं' म्हटलं आहे.

मंगळवारी (12 ऑगस्ट) प्रियंका गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यावर भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की 'लाजीरवाणी तर तुम्ही केलेली फसवणूक आहे.'

प्रियंका गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये गाझामध्ये आतापर्यंत जे मृत्यू झाले आहेत, त्याची काही आकडेवारीदेखील दिली आहे.

इस्रायलच्या राजदूतांनी ही आकडेवारी फेटाळली आहे.

भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अजार यांनी ज्या पद्धतीनं उत्तर दिलं आहे, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा भारताच्या 'अंतर्गत बाबींमध्ये केलेला हस्तक्षेप' नाही का?' असंही विचारलं जातं आहे.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेनं (उद्धव ठाकरे गट) इस्रायलच्या राजदूतानं केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. काही पत्रकारांनी देखील यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

याशिवाय प्रियंका गांधी यांनी अलीकडेच इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेल्या पत्रकारांवर देखील पोस्ट टाकली होती. त्यांनी याला इस्रायलचा 'घृणास्पद गुन्हा' म्हटलं आहे.

प्रियंका गांधी यांचं वक्तव्य आणि इस्रायलच्या राजदूतांचे भाष्य

मंगळवारी (12 ऑगस्ट) प्रियंका गांधी यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, "इस्रायल नरसंहार करतो आहे. इस्रायलनं 60 हजारांहून अधिक लोकांची हत्या केली आहे. यात 18,430 मुलांचा समावेश आहे."

"इस्रायलनं अनेक मुलांसह शेकडो जणांना उपासमारीनं मारलं आहे. आता तिथे उपासमारीनं लाखो लोक मरण्याचा धोका निर्माण झाला आहे."

त्यांनी सांगितलं की, "या गुन्ह्यांबद्दल गप्प राहणं आणि कोणतीही कारवाई न करणं हा देखील एकप्रकारचा गुन्हाच आहे. इस्रायल पॅलेस्टाइनच्या जनतेचा विनाश करत असताना यावर भारत सरकार गप्प आहे, हे लाजीरवाणं आहे."

यावर रुवेन यांनी ट्विट केले, "लाजीरवाणी तर तुम्ही केलेली फसवणूक आहे. इस्रायलनं हमासचे 25 हजार दहशतवादी मारले आहेत...इस्रायलनं गाझामध्ये 20 लाख टन अन्नधान्य पोहोचवलं. तर हमासनं ती मदत जप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथे उपासमारीची स्थिती निर्माण झाली. गेल्या 50 वर्षांमध्ये गाझामधील लोकसंख्या 450 टक्के वाढली आहे. तिथे कोणत्याही प्रकारचा नरसंहार झालेला नाही. हमासच्या आकडेवारीवर विश्वास ठेवू नये."

इस्रायलच्या राजदूतानं केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसनं काय प्रतिक्रिया दिली?

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की भारतातील इस्रायलच्या राजदूतानं केलेल्या वक्तव्याचा, त्यांचा पक्ष निषेध करतो.

ते म्हणाले, "गेल्या 18-20 महिन्यांपासून गाझा उद्ध्वस्त करणाऱ्या इस्रायलच्या विरोधात बोलण्यास मोदी सरकार घाबरतं आहे."

त्यामुळेच, "इस्रायलच्या राजदूतानं केलेल्या वक्तव्यावर त्यांच्याकडून गंभीर आक्षेप घेतला जाईल अशी अपेक्षा करणं खूप जास्त होईल. आम्हाला हे वक्तव्य अजिबात मान्य नाही."

काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी यासंदर्भात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना प्रश्न विचारला आहे.

त्यांनी लिहिलं, "इस्रायलच्या राजदूतानं प्रियंका गांधी यांना उघडपणे घाबरवण्याचा प्रयत्न करणारं वक्तव्य दिलं आहे, त्यावर तुम्ही बोलणार का? आता भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य इस्रायलमधून ठरवलं जाऊ लागलं आहे?"

इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझार यांनी प्रियंका गांधी यांना दिलेले उत्तर

फोटो स्रोत, @ReuvenAzar

फोटो कॅप्शन, इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझार यांनी प्रियंका गांधी यांना दिलेले उत्तर

काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई म्हणाले की काँग्रेसला इस्रायलच्या राजदूताच्या लेक्चरची आवश्यकता नाही.

ते म्हणाले की "भारताचा नेहमीच द्विपक्षीय वाटाघाटीवर विश्वास ठेवला आहे. गांधी आणि नेहरू यांच्या देशानं नेहमीच अहिंसा आणि शांततेवर विश्वास ठेवला आहे. काँग्रेस पक्षाला इस्रायलच्या राजदूताच्या लेक्चरची आवश्यकता नाही."

तर काँग्रेसचे खासदार शशिकांत सेंथिल म्हणाले की प्रियंका गांधी यांच्या विरोधात इस्रायलच्या राजदूतानं केलेलं वक्तव्य खूपच अपमानास्पद आहे. मुत्सद्द्यानं करायला हवी तशी ही वर्तणूक नाही.

सेंथिल म्हणाले की "गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहारावर प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलेल्या भावना नाकारण्याचा आणि त्याची चेष्टा करण्याचा हा अपमानास्पद प्रयत्न आहे. हा फक्त वैयक्तिक स्वरुपाचा हल्ला नाही, तर भारताच्या जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर आणि संसदेच्या अस्मितेवर केलेला हा हल्ला आहे."

इस्रायलच्या राजदूतानं केलेल्या वक्तव्यावर आणखी काय प्रतिक्रिया उमटत आहेत?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इस्रायलच्या राजदूतानं दिलेल्या वक्तव्यावर शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की त्यांना आशा आहे की भारताचं परराष्ट्र खातं इस्रायलच्या राजदूतांची कानउघडणी करेल.

त्या म्हणाल्या, "याआधी देखील माझ्याविरोधात ट्विट केल्यामुळे मी पोलंडच्या राजदूतांविरोधात (माजी) हक्कभंग प्रस्ताव आणू पाहत होती. मात्र परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर तसं केलं नाही."

"अर्थात, या भूमिकेमुळे त्यांना आमच्या देशातील खासदारांनी अशा स्वरात आणि पद्धतीनं बोलण्यास प्रोत्साहन देते आहे. हे अजिबात मान्य होणारं नाही."

तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांनी आरोप केला आहे की विरोधी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी मोदी सरकार इस्रायलच्या राजदूताचा वापर करते आहे.

साकेत गोखले म्हणाले, "इस्रायलचे राजदूत याप्रकारची भाषा वापरण्याची हिंमत करत आहेत, कारण त्यांना माहीत आहे की त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही."

त्यांनी प्रश्न विचारला की, "आपलं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलं आहे का की आपलं सरकार आपल्याच देशातील खासदाराच्या प्रतिष्ठेचं देखील रक्षण करणार नाही? आपण आपलं सार्वभौमत्व गमावलं आहे का? परराष्ट्र खात्यानं याचं उत्तर द्यावं."

पत्रकारांनी देखील उपस्थित केले प्रश्न

राजकीय नेत्यांव्यतिरिक्त पत्रकारांनी देखील या प्रकरणाबाबत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी प्रश्न केला आहे की 'इस्रायलच्या राजदूतानं केलेल्या वक्तव्याला (भारताच्या) अंतर्गत बाबींमध्ये केलेला हस्तक्षेप मानलं जाणार की नाही?'

द हिंदू या वृत्तपत्राचे पत्रकार स्टॅनली जॉनी म्हणाले की मुत्सद्यांनी मुत्सद्दीच राहिलं पाहिजे.

त्यांनी विचारलं की, "विचार करा, जर वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय राजदूतानं एखाद्या डेमोक्रॅटिक खासदारावर वक्तव्य केलं आणि खासदारांच्या विचारांना 'लज्जास्पद' आणि 'दिशाभूल करणारे' म्हटलं, तर अमेरिकेचं परराष्ट्र खातं त्यावर काय प्रतिक्रिया देईल?"

"विचार करा, जर भारताच्या राजदूतानं लंडनमध्ये एखाद्या खासदारावर उघडपणे वक्तव्य केलं, तर ब्रिटनचं परराष्ट्र खातं काय करेल?"

टीव्ही पत्रकार वीर संघवी यांनीदेखील इस्रायलच्या राजदूतानं केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला की, "एखाद्या दुसऱ्या देशाचा राजदूत आपलं सरकार गप्प बसल्याशिवाय किंवा सरकारनं विशेष सहमती दाखवल्याशिवाय विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याबद्दल असं ट्विट करेल, हे कोणालाही पटेल का?"

ऑर्गनायझरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (आरएसएस) मुखपत्र मानलं जातं. त्यांनी ट्विट केलंय की प्रियंका गांधींनी केलेलं वक्तव्य इस्रायलच्या राजदूतांना फेटाळलं आहे.

ऑर्गनायझरनं लिहिलं आहे, "काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टला उत्तर देताना भारतातील इस्रायलचे राजदूत रूवेन अजार यांनी त्यांची भूमिका भ्रामक असल्याचं म्हटलं आणि इस्रायलचा 'बचाव' केला."

याआधीदेखील प्रियंका गांधींनी केला आहे इस्रायलचा निषेध

याच्या आधीदेखील प्रियंका गांधी गाझामध्ये इस्रायल करत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात बोलल्या आहेत.

अनेकवेळा त्यांनी सोशल मीडियावरील पोस्ट आणि तोंडी वक्तव्यांद्वारे पॅलेस्टाइनला पाठिंबा दिला आहे.

गेल्या वर्षी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्या एक हँडबॅग घेऊन आल्या होत्या. त्या हँडबॅगवर इंग्रजीत 'पॅलेस्टिन' लिहिलं होतं.

सोशल मीडियावर त्यांच्या या हँडबॅगची खूप चर्चा झाली होती. हँडबॅग घेतलेला प्रियंका गांधीचा फोटोदेखील व्हायरल झाला होता.

मंगळवारीच (12 ऑगस्ट) प्रियंका गांधी यांनी गाझामध्ये इस्रायलच्या सैन्यानं केलेल्या हल्ल्यात पत्रकारांचा मृत्यू झाल्याबाबत इस्रायलवर टीका केली होती.

प्रियंका गांधी यांनी एक्सवर लिहिलं होतं, "अल जझीराच्या पाच पत्रकारांची निर्घुण हत्या ही पॅलेस्टिनच्या भूमीवर करण्यात आलेला आणखी एक घृणास्पद गुन्हा आहे. इस्रायलच्या हिंसाचारामुळे आणि द्वेषामुळे सत्यासाठी लढणाऱ्यांची हिंमत कधीही कमी होणार नाही."

त्या म्हणाल्या, "जगभरातील मीडियाचा मोठा भाग सत्ता आणि व्यापाराच्या प्रभावाखाली असण्याच्या युगात, या शूरवीरांनी आपल्याला खऱ्या पत्रकारितेची आठवण करून दिली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो."

पॅलेस्टाइन आणि इस्रायलवर भारतीय नेत्यांचं काय मत आहे?

इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या मुद्द्यावर भारत सरकार द्विपक्षीय वाटाघाटांना महत्त्व देत आला आहे. तर गाझामधील युद्धामुळे तिथे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भारतानं चिंता व्यक्त केली आहे. मात्र इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांचा थेटपणे निषेध केलेला नाही.

इस्रायल-पॅलेस्टाइन मुद्द्याबाबत भारतातील राजकीय पक्षांची वेगवेगळी मतं आहेत.

सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नेते अनेक प्रसंगांमध्ये इस्रायलला पाठिंबा देणारी वक्तव्यं करत आले आहेत. तर काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यांमुळे झालेल्या मृत्यूंवर मोठी टीका केली आहे.

गेल्या वर्षी प्रियंका गांधी 'पॅलेस्टाइन' लिहिलेली हँडबॅग घेऊन संसदेत आल्या होत्या. त्यावेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते, "काँग्रेसच्या नेत्या संसदेत पॅलेस्टिनचा बॅग घेऊन फिरत होत्या आणि आम्ही उत्तर प्रदेशातील तरुणांना इस्रायलला पाठवत आहोत."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.