You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीनने तैवानवर हल्ला केला तर कसं प्रत्युत्तर देणार? तैवाननं दिलं 'हे' उत्तर
- Author, रुपर्ट विंगफिल्ड-हेयस
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जमिनीच्या अगदी जवळून उडणाऱ्या अटॅक हेलिकॉप्टर्समुळे हल्ल्याचे पहिले संकेत मिळतात. त्यांच्या मागोमाग येणाऱ्या गडद हिरव्या रंगाच्या हेलिकॉप्टरमध्ये सैनिक बसलेले असतात.
आणि पाठीमागून समुद्राच्या मध्यभागी पाणी आणि जमिनीवर चालणाऱ्या गाड्या अचानक प्रकट होतात आणि प्रचंड वेगाने पुढे जमिनीवर जाऊ लागतात.
या गाड्या त्यांच्या पाठीमागे प्रचंड मोठा धुळीचा लोट सोडत जात आहेत आणि काही वेळातच आता त्यांच्यातून सैनिक जमिनीवर उतरू लागतील.
क्षणभर असंही वाटतं की, तैवानच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे सैनिक अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चपापले आहेत.
त्यानंतर एका सायरनचा आवाज होतो आणि समुद्रकिनारी असणाऱ्या मोर्चांमधून मोठ्या संख्येने सशस्त्र सैनिक धावताना दिसतात आणि मग मशिनगनद्वारे जोरदार गोळीबार सुरु होतो.
तैवानचा युद्ध सराव
शेजारी असणाऱ्या झाडाझुडपातून सशस्त्र गाड्या आणि रणगाडे बाहेर पडू लागतात.
गोळीबाराचा आवाज मोठा होत जातो आणि मागे डोंगरामधून अटॅक हेलिकॉप्टरचे आवाज घोंगावू लागतात. हल्ला करायला आलेल्या सैनिकांवर गोळ्यांचा वर्षाव केला जातो.
समुद्रकिनाऱ्यावर जबरदस्त विस्फोट होतात आणि हल्लेखोर सैनिक चहुबाजूंनी वेढले जातात त्यांच्याकडे परतण्याशिवाय इतर कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नसतो.
तैवान आता सुरक्षित असतो. हा सगळा घटनाक्रम केवळ 20 मिनिटांमध्ये घडलेला असतो.
एका गच्चीवर बसलेले सैन्याचे अधिकारी पत्रकारांना सांगतात की, "आमचा देश सुरक्षित रहावा म्हणून या देशाचे सैनिक काय काय करू शकतात हे आज आम्ही तुम्हाला दाखवून दिलंय. आम्हाला खात्री आहे की या सरावांद्वारे आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला सुसज्ज बनू.”
जिंकल्याची घोषणा
मात्र हा सराव तैवानला चीनच्या संभाव्य हल्ल्यापासून खरोखर वाचवू शकेल का?
तैवानच्या सैन्याचा हा लष्करी सराव बघून कुणीही म्हणेल की, वास्तवापासून हा सराव थोडासा दूर होता.
हल्ला करणाऱ्या सैन्याची संख्या कमी होती आणि विशेष म्हणजे तैवानच्या सैन्याला हे माहित होतं की त्यांच्यावर हल्ला होणार आहे.
सगळं काही आधीच ठरलेलं होतं. एखाद्या चित्रपटाच्या संहितेप्रमाणे घटनाक्रम घडत होते. एवढंच काय तर थोड्या चकमकीनंतर लगेचच विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.
पण हल्ला कसा होईल याचा अंदाज किंवा हा सराव कधीच परिपूर्ण असणार नाही.
हान कुआंग लष्करी सराव
"मला आठवतंय 25 वर्षांपूर्वी वार्षिक हान कुआंग लष्करी सरावासाठी मला तैवानला नेलं होतं. त्यावेळी सर्व काही फक्त कॅमेऱ्यापुरतंच घडत होतं."
किंग्ज कॉलेज लंडनमधील युद्ध अभ्यासाचे प्राध्यापक ॲलेसिओ पलाटानो म्हणतात, "मला वाटतं की आता वेळ आली आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर असा एक समज होता की तैवानने त्यांच्या सैन्यात सुधारणा करण्यासाठी प्रचंड उदासीनता दाखवली होती.
परंतु या आठवड्यात तुम्हाला असे वाटते की, आता या समस्येबद्दल ते गंभीर आहेत आणि त्यांच्या कार्यपद्धतीत लक्षणीय बदल करत आहेत."
सध्या युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धातून तैवान शिकत आहे हेही तितकंच स्पष्ट आहे.
रशियाच्या युक्रेनवर आक्रमणाच्या पहिल्याच दिवशी रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवजवळील विमानतळावर ताबा मिळवला आणि कीववर हल्ला करण्यासाठी त्या विमानतळाचा वापर करण्यात आला.
मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.
हल्ला करण्याचे धाडस चीन करेल का?
त्यामुळे आता तैवानचे लक्ष चीनच्या संभाव्य हल्ल्यात त्यांना सुरुवातीला कोणकोणत्या ठिकाणांवर कब्जा करायला आवडेल यावर आहे.
त्यांना असे वाटते की उत्तर तैवानच्या समुद्र किनाऱ्यांव्यतिरिक्त, चीनला तैवानचे प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुख्य बंदरे ताब्यात घ्यायची आहेत.
पण प्रोफेसर पलाटानो म्हणतात की, युक्रेनने तैवानला आणखी एका मार्गाने धडा शिकवलं आहे.
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे तैवानवर चीन हल्ला करण्याचं धाडसच करणार नाही या तैवानच्या दृढ विश्वासाला तडा गेला आहे.
ते म्हणतात की, "युक्रेन युद्धामुळे आमच्यावर चीन हल्ला करणारच नाही हा दृढ विश्वास नाहीसा झालाय आणि एकदा का तुमच्या या विश्वासाला तडा गेला की तुम्हाला तुमची प्रत्येक तयारी पुन्हा तपासून बघावी लागते."
गेल्या अनेक वर्षांपासून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सांगत आहेत की, तैवानवर हल्ला करून त्याचा चीनमध्ये समावेश करण्याचा पर्याय नेहमीच त्यांच्यासमोर खुला आहे.
आणि हे शक्य करण्यासाठी चीन आपली हवाई आणि नौदल शक्ती देखील सतत वाढवत आहे.
राष्ट्राध्यक्ष शी यांच्याकडे या कामाचे वेळापत्रक आहे. 2027 पर्यंत या प्रदेशात युद्ध जिंकण्याची ताकद चीनकडे असेल. सन 2035 पर्यंत चीनकडे जागतिक दर्जाचे सैन्य असेल.
आणि सन 2049 पर्यंत चीनचे पुनर्जागरण पूर्ण होईल.
पण तैवानकडे फारसा वेळ नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)