चीनच्या अखेरच्या सम्राटाची गोष्ट, जो भिक्कू बनून पळाला आणि माळी म्हणून जगला

काहीही झालं तरी त्यांची गोष्ट असामान्य ठरणार होती. जगाच्या एक चतुर्थांश लोकसंख्या असलेल्या साम्राज्याचा सम्राट होणं त्यांच्या नशीबातच लिहिलं होतं, पण त्यांच्या आयुष्याची अखेर त्यांच्या पूर्वजांसारखी नव्हती.

एइसिन गिओरो पुयी यांची गोष्ट 20व्या शतकासोबत सुरू होते. त्यांचा जन्म 1906 साली फेब्रुवारी महिन्यात झाला होता. त्यावेळी पुयीचे काका गुआंग्शु चीनचे सम्राट होते. खरंतर सम्राट गुआंग्शु कमकुवत होते आणि पुयी यांची काकू राणी त्सुशीने त्यांना घरातच नजरकैदेत ठेवलं होतं.

त्यानंतर राणी त्सुशीने पुयीला गादीवर बसवलं आणि त्याच्या नावानं स्वतःच राज्यकारभार करायला सुरुवात केली.

अगदी लहानपणापासूनच राणी त्सुशीचा भीतीदायक चेहरा पुयी यांच्या डोक्यात ठसला होता. खूप वर्षांनी त्यांनी लिहिलं होतं, "मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं, तेव्हा भीतीने किंचाळलो होतो. माझे पाय लटलटत होते. राणी त्सुशीने कोणाला तरी मिठाई आणायला सांगितली. मी ती जमिनीवर फेकली आणि माझी दाई कुठे आहे? असं विचारायला लागलो."

14 नोव्हेंबरला सम्राट गुआंग्शुचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राणी त्सुशीने पण जगाचा निरोप घेतला. 2 डिसेंबरला त्यांच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या दोन महिने आधी पुयी यांना चीनचा सम्राट घोषित करण्यात आलं. अनेक वर्षांनंतर पुयी यांनी आपल्या आत्मकथेत लिहिलं, "राज्याभिषेकाच्या दिवशी मी खूप रडत होतो."

ते चिंग राजघराण्याचे 12 वे आणि चीनच्या राजेशाहीच्या प्रदीर्घ इतिहासातील सर्वांत कमी वयाचे सम्राट बनले.

पुयी यांचं राजघराणं

पुयी मांचु या जमातीतून आले होते. मांचु जमातीनं मिंग राजघराण्याचा पराभव करून चिंग राजघराण्याची स्थापना 1644 मध्ये केली होती. या राजघराण्याच्या शासन काळात चीनचा विस्तार जवळपास दुप्पट झाला होता. त्याकाळी चीनचा विस्तार पश्चिमेकडे शिनजियांग आणि मंगोलियापर्यंत आणि तिबेटपर्यंत पसरलेला होता.

या नवीन राजवटीत वेगवेगळे धार्मिक समुदाय तसंच जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते. 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंत चीनकडे जगातील मोठी अर्थव्यवस्था म्हणून पाहिलं जात होतं. त्यांची समृद्ध संस्कृती त्यांच्या संपन्नतेचं निदर्शक होती.

चिंग राजघराण्यातील सम्राट राजधानी बीजिंगमधील आलिशान महालांमध्ये राहायचे. त्यांच्या दरबारात मांचु समाजातील कुलीन परिवारांचं प्रतिनिधित्व पाहायला मिळत होतं.

मात्र, 19 व्या शतकात चिंग राजवटीचा जोर कमी होऊ लागला. ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आणि जपानच्या आक्रमणांपुढे चिंग राजघराण्याची ताकद तोकडी पडताना दिसू लागली.

तैपिंगचं बंड

1850 साली ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणाऱ्या चिनी हॉन्ग शिकुआन याने स्वतःला एका नवीन राजघराण्याचा राजा म्हणून घोषित केलं. त्याच्या समर्थकांनी चिंग राजांच्या विरोधात मोर्चे काढले. या मोर्चांना लोकांचं मोठ्या प्रमाणावर समर्थनही मिळालं.

त्यानंतर चीनमध्ये यादवी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. हे युद्ध 14 वर्षं चाललं, ज्यामध्ये जवळपास 2 कोटी लोकांनी प्राण गमावले. शेवटी शेवटी या लढाईत चिनी सैनिकांना युरोपियन देशांचा सामनाही करावा लागला.

तैपिंगचं बंड हे 19व्या शतकातील चीनच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना मानली जाते. या बंडात चीनमधल्या उत्तरेकडील प्रांतातले लोक सहभागी झाले होते. त्यांच्या मते, चीनच्या समस्यांसाठी परकीय लोक जबाबदार होते आणि त्यांनी त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला.

आपल्याला गोळ्या-बंदुकांनी हरवता येणार नाही, असा त्यांचा दावा होता. 1898मध्ये त्यांनी पुन्हा बंड केलं आणि 1900 साली उन्हाळा सुरु होताच त्यांनी बीजिंगला घेराव घातला. मात्र 1901 मध्ये त्यांचं हे आंदोलन मोडून काढण्यात आलं.

चिंग राजघराण्याची अखेर

पुयी यांनी राज्यकारभार हाती घेईपर्यंत त्यांचे वडील प्रिन्स चुन आणि सम्राट गुआंग्शुची पत्नी सम्राज्ञी डोवागेर लोंग्यु त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते.

एकीकडे पुयी यांचं संगोपन राजेशाही पद्धतीनं होत होतं, तर दुसरीकडे त्यांच्या राजघराण्याविरुद्ध क्रांतीचा एक कट शिजत होता. चिंग राजघराण्यानं ईश्वरकडून मिळालेला राज्यकारभार करण्याचा अधिकार गमावला आहे, असं अनेक चिनी नागरिकांना वाटत होतं. 1911 मध्ये शिन्हाई क्रांतीला सुरुवात झाली.

पुयी आपल्या आत्मकथेमध्ये लिहितात, "खोलीच्या एका कोपऱ्यात बसून राणी डोवागेर लोंग्यु रुमालानं डोळे पुसत होती. त्यांच्या शेजारी एक जाडगेला म्हातारा माणूस गुडघे टेकून बसला होता. मी तिथेच खिडकीपाशी बसलो होतो. हे मोठे लोक का रडत आहेत, असा प्रश्न मला पडला होता."

267 वर्षं जुन्या असलेल्या चिंग राजघराण्याची सत्ता संपुष्टात येत असल्यामुळे ते दोघं रडत होतं. मात्र सहा वर्षांच्या पुयीला त्याची जाणीव नव्हती.

चिनी प्रजासत्ताकाची स्थापना

चिनी प्रजासत्ताकाची स्थापना होईपर्यंत परिस्थिती अशीच होती. सर्वांसाठी सगळं नवीन होतं. चीनमध्ये दोन हजार वर्षं जुनी असलेली राजेशाही संपुष्टात आली होती. सत्तेतून पायउतार झालेल्या चिंग राजघराण्याच्या लोकांसोबत नेमकं काय करायचं याचीही कोणाला कल्पना नव्हती.

त्यांना बीजिंगमध्येच ठेवायचं की मंचुरियाला पाठवायचं असा प्रश्न उपस्थित होत होता.

नंतर असं निश्चित करण्यात आलं की, चिंग राजघराण्यातील लोकांसोबत परकीय शासकांप्रमाणे वर्तन केलं जाईल. बीजिंगमध्ये राजघराण्याचं वास्तव्य असलेल्या 'फॉरबिडन सिटी' या ठिकाणीच त्यांना ठेवलं गेलं. महाल, बागबगीचे आणि सर्व सुखसोयी पहिल्याप्रमाणेच होत्या.

कदाचित त्यामुळेच पुयी यांच्यासाठी फार काही नाही बिघडलं. ते आता सम्राट नाहीत, हे सांगण्याचीही तसदी कोणी घेतली नाही. बरीच वर्षं ते शाही सुखसोयींचा उपभोग घेत होते.

पुयी यांनी लिहिलं, "जेव्हा चीनला प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आलं आणि जग विसाव्या शतकाकडे वाटचाल करत होतं, तेव्हा मी 19व्या शतकाच्याच मानसिकतेत मग्न राहून सम्राटाचं जीवन जगत होतो."

1917 साली नेमकं काय घडलं?

पण एक वेळ अशीही आली जेव्हा 1917 मध्ये पुयी यांना दुसऱ्यांदा चीनचा सम्राट बनविण्यात आलं. राजेशाहीचे समर्थक असलेल्या जनरल झांग शुन यांनी एका यशस्वी बंडानंतर स्वतःला 'सम्राटनियुक्त शासक' घोषित केलं होतं.

मात्र जनरल झांग शुन यांचं हे यश दोनच आठवडे टिकलं. मात्र, पुयी आणि त्यांच्या जवळच्या लोकांना या बंडासाठी जबाबदार ठरवलं गेलं नाही.

पुयी या अस्थिरतेच्या वातावरणातच वाढत होते. बाहेरच्या जगात काय सुरु आहे, याची त्यांना कल्पनाही नव्हती. ते आपल्या कुटुंबापासून दूर होते. त्यांची दाई वांग याच त्यांच्यासोबत होत्या.

तरीही पुयी कोणीतरी दैवी व्यक्ती असल्यासारखं त्यांना वागवलं जायचं. त्यांना कोणीही नाराज करायचं नाही. ते जेव्हा काही खोड्या करायचे, तेव्हाही लोक त्यांच्याशी अदबीनेच वागायचे.

"माझ्या सेवकांमध्ये जे किन्नर होते, त्यांना चाबकाचे फटके मारणं हे माझं रोजचंच काम झालं होतं. मला सत्तेची इतकी नशा होती की, कोणी काहीही सांगितलं तरी मला फरक पडणार नव्हता. "

1919 साली ब्रिटीश स्कॉलर रेजिनाल्ड जॉन्स्टन यांनी पुयी यांचे ट्यूटर म्हणून काही काळ काम केलं होतं.

त्यांनी पुयी यांच्याबद्दल ब्रिटीश सरकारला लिहिलं होतं, की तो एक आनंदी आणि समजूतदार मुलगा आहे. त्याच्यामध्ये अदब आहे आणि सत्तेचा जराही गर्व नाही.

किशोरावस्थेत पदार्पण करत असताना पुयी यांच्यात बदल होत गेला. ते राजघराण्याच्या कोशातून बाहेर येऊ लागले. त्यांनी चष्मा लावायला सुरुवात केली आणि मांचु लोकांमध्ये घातली जाणारी पारंपरिक वेणीही बंद केली.

अर्थात, राजघराण्याच्या परंपरेला अनुसरून त्यांनी भव्य दिव्य विवाह मात्र केले. त्यांनी स्वतःचं लिहिलं आहे, "मी एकूण चार लग्न केली. मात्र त्या खऱ्या अर्थाने माझ्या पत्नी नव्हत्या. ही नाती केवळ दिखाव्याची होती."

मांचुकाओ सम्राटांच्या रुपात पुयी

फॉरबिडन सिटीच्या बाहेरच्या जगात चीन राजेशाही व्यवस्था संपुष्टात आणण्यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरं शोधत होता. मात्र 1924मध्ये वॉरलॉर्ड फेंग युशियांग सत्तेत आले आणि पुयी यांना फॉरबिडन सिटीमधून बाहेर पडावं लागलं.

19 व्या वर्षी पुयी यांनी जपानमध्ये आश्रय घेतला. जपाननं 1931 साली मंचुरियावर ताबा मिळवला होता आणि पुयी यांना 'मंचुकाओचा सम्राट' म्हणून नियुक्तही केलं होतं. इशान्य चीनमधील तीन ऐतिहासिक प्रांतांना एकत्र करून जपाननं या प्रांताची निर्मिती केली होती.

मंचुकाओच्या झेंड्याखाली आशियातील जपानी, चिनी, कोरियन, मांचु आणि मंगोल हे पाच वंश एकत्र येत आहेत, असा प्रचार त्यावेळी जपान करत होता.

एडवर्ड बेहर यांनी आपल्या 'द लास्ट एम्परर' या पुस्तकात लिहिलं आहे की, जपानी या गोष्टीला नवीन संस्कृतीचा जन्म आणि जगाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानतात.

'मंचुकाओचा सम्राट' म्हणून पुयी जपानच्या हातातलं बाहुलं बनून राहिले होते. जपान मंचुकाओचा वापर आशियामध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता.

सैबेरियामध्ये कैद

मंचुकाओमध्ये पुयी यांचं आयुष्य जणू नरक बनून गेलं. मंचुकाओमध्ये त्यावेळी जगातलं सर्वांत क्रूर शासन लागू होतं. पुयीची प्रजा त्यांचा द्वेष करायला लागली होती.

एडवर्ड बेहर यांच्या मते पुयी आपल्याच राजवाड्यात जपानमध्ये कैदी बनून राहत होते.

सम्राट म्हणून त्यांच्याकडे केवळ एकच काम होतं, ते म्हणजे जपान्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर सही करणं.

त्यानंतर पुयी बौद्ध संन्यासी झाले. सोव्हिएत युनियनचं लष्कर त्यांना ओळखू शकलं नाही आणि त्यांना सायबेरियातील चिता शहरात नेण्यात आलं. त्यांना पुन्हा एकदा कैदी बनवून ठेवलं गेलं. पण दुसऱ्या कैद्यांच्या तुलनेत त्यांना अधिक सुविधा मिळत होत्या. तिथे त्यांनी साम्यवादाचा अभ्यास केला.

चाळीस वर्षांच्या संघर्षानंतर 1949 साली माओत्से तुंग यांनी चीनमध्ये नवीन प्रजासत्ताकाची घोषणा केली. पुयी यांचा देशात परतण्याची वेळ आता जवळ आली होती. पण माओ यांच्या शासनकाळात आपल्याला कशी वागणूक दिली जाईल, याची त्यांना भीती होती.

मात्र माओ यांनी पुयी यांना एका एज्युकेशन कँपमध्ये पाठवलं. तिथे पुयी यांनी दहा वर्षं एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे काढले. 1960 मध्ये माओ सरकारने पुयी यांना नागरिकता आणि स्वातंत्र्य दोन्ही दिलं.

त्यानंतर जगातील एका विशाल साम्राज्याचा सम्राट बीजिंगच्या बॉटनिकल गार्डनमध्ये माळी म्हणून काम करू लागला. 1964मध्ये त्यांना चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सलटेटिव्ह कॉन्फरन्सच्या संपादकपदाची जबाबदारी दिली गेली.

त्यांनी 'फ्रॉम एम्परर टू सिटिजन' या शीर्षकानं आपली आत्मकथा लिहिली होती, ज्याचा प्रचार कम्युनिस्ट पक्षाच्या माओ आणि चाओ एन लाय सारख्या नेत्यांनीही केला.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)