लिओनार्डो दा विंची : गायब झालेलं हे जगातलं सर्वांत महागडं पेंटिंग तुम्हाला माहिती आहे का?

    • Author, केरीन जेम्स
    • Role, चित्रपट समीक्षक

सगळीकडे प्राचीन कलाकृतींबाबतच्या गुन्ह्यांच्या गूढ कथांचा बोलबाला असताना, लिओनार्डो दा विंची यांच्या साल्व्हेटर मंडी चित्राची कहाणी सांगणारे दोन नवे माहितीपट आले आहेत. केरीन जेम्स यांनी त्याबद्दल वर्णन केलं आहे.

लिओनार्डो दा विंची यांचं जगातील सर्वात महागडं साल्व्हेटर मंडी हे पेंटिंग (चित्र) सौदी अरेबियामध्ये कुठं तरी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशानं लपवून ठेवण्यात आलं आहे किंवा जगात कुणालाही हे चित्र नेमकं कुठं आहे याबाबत माहितीच नाही? बहुतांश लोकांच्या मते ते चित्र आखाती देशांतच आहे.

तर काहींच्या मते, जिनिव्हातील करमुक्त भागामध्ये ते लपवून ठेवण्यात आलं आहे किंवा येथील राजकुमाराच्या कोट्यवधींच्या यॉटमध्ये ते असेल असं काही जणांना वाटतं. पण ते खरंच लिओनार्डो यांचंच आहे का? येशू ख्रिस्तांचं ''जगाचा रक्षणकर्ता'' (द सेव्हियर ऑफ द वर्ल्ड) नावाचं हे चित्र 2017 मध्ये क्रिस्टीच्या लिलावात लिओनार्डो दा विंची यांचं अखेरचं पेंटिंग म्हणून सादर करण्यात आलं होतं. त्याठिकाणी त्याचा विक्रमी 45 कोटी डॉलरमध्ये लिलाव झाला.

बिन सलमान यांच्या प्रतिनिधीनं त्याची खरेदी केली होती. (याच बिन सलमान यांना CIA नं पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्या हत्येचे आदेश देण्यासाठी दोषी ठरवल होतं.) ही विक्री झाली तेव्हापासूनच लिओनार्डो यांच्या चित्रांसंबंधी अभ्यास करणाऱ्यांना हे चित्र म्हणजे केवळ काही ब्रश स्ट्रोक्स नाहीत, तर यात काहीतरी खास आहे अशी शंका होती आणि या शंका तेव्हापासून अधिकच वाढत गेल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय षडयंत्र आणि कथांच्या अनेक टप्प्यांमधून समोर आलेली साल्व्हेटर मंडी चित्राची कथा ही इतिहासातील रंजक अशी गाथा आहे.

'द लॉस्ट लिओनार्डो' आणि 'सेव्हियर फॉर सेल : दा विंचिज लॉस्ट मास्टरपीस?' या दोन नव्या माहितीपटांमधून आता ही गाथा सर्वांसमोर आणली जात आहे. त्यात अत्यंत गूढपणे हेरगिरीच्या कथांप्रमाणं नाट्यमयरित्या ही कहाणी मांडण्यात आली आहे. बेन लुईस यांचं 2019 चं हाय प्रोफाईल पुस्तक 'द लास्ट लिओनार्डो' आणि अनेक लेखांमधील माहितीचा वापर करून या कथा समोर आलेल्या आहेत.

इसवी सन 1500 च्या काळातील हे प्राचीन आणि ऐतिहासिक चित्र सुमारे 200 वर्षं गायब होतं. यादरम्यान चित्राचं खूप नुकसानही झालं आणि ते नंतर दुरुस्तही करण्यात आलं. तसंच त्याचा वारंवार लिलाव किंवा विक्रीही करण्यात आली. लिओनार्डो ऑकोलिट यांनी त्याची विक्री केली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण आता साल्व्हेटर मंडी हे पैसा, शक्ती, हक्काचं राजकारण या सर्वांचं केंद्र बनलं आहे.

"आम्ही जेव्हा नावाची निवड केली तेव्हा पेंटिंग सध्या हरवलेलं आहे आणि त्याबाबतचं सत्यही हरवलेलंच आहे, हे यामागचं एक कारण होतं. पण त्याचबरोबर इंडियाना जोन्सच्या खजिना शोधण्याच्या चित्रपटांमझधूनही, त्यासाठी प्रेरणा मिळाली," असं द लॉस्ट लिओनार्डो या माहितीपटाचे निर्माते आणि लेखक अँड्रेस डाल्सगार्ड यांनी बीबीसी कल्चरशी बोलताना सांगितलं.

2005 मध्ये जेव्हा न्यू ऑर्लेअन्स ऑक्शन हाऊसमध्ये झालेल्या लिलावात ते सादर करण्यात आलं त्यावेळी लिओनार्डोच्या या खजिन्याच्या उत्पत्तीच्या शोधाचा मार्ग तयार होऊ लागला. त्यावेळी न्यू यॉर्कच्या दोन व्यापाऱ्यांनी अवघ्या 1175 डॉलरमध्ये ते खरेदी केलं होते. त्या दोघांनी हे पेंटिंग डियाने मॉडेस्टीनी यांच्याकडं आणलं.

डियाने या त्या काळातील चित्रांना स्वच्छ करून नवं रुप देण्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी या पेंटिंगला नव्यासारखं रुप दिलं. ते लिओनार्डोचं असावं असा अंदाज सर्वप्रथम त्यांनाच आला होता.

अत्यंत सुंदर असं वर्णन आणि सोबतच व्यापारी, इतिहासकार, शोध पत्रकार या सर्वांच्या अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजांच्या सादरीकरणामुळं द लॉस्ट लिओनार्डो हा दोन माहितीपटांमध्ये सरस ठरतो. मॉडेस्टिनी यांचा मुख्य पात्राप्रमाणं वापर केल्यानं माहितीपटाला फायदा झाला आहे. स्क्रीनवरचा त्यांचा वावर आकर्षक आहे. सोबतच सुंदर आवाज आणि काळ्या किंवा लाल फ्रेमच्या चष्म्यामागील मोठे डोळे ही जणू त्यांची ओळख आहे.

त्यांनी जुन्या खराब झालेल्या चित्रांना मूळ रुप नव्यानं मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे प्रचंड उत्साहानं त्यांनी हे काम केलं आहे. त्या माध्यमातून अगदी बारीक तपशील समोर आणत सत्यता टिकवण्याचा आणि समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या चित्रात येशूचा अंगठा किंवा चेहऱ्यावर असलेला स्ट्रोक हा केवळ लिओनार्डो यांचाच असू शकतो, याकडं त्यांनी लक्ष वेधलं आहे. पण चित्राला मूळ रुप देताना त्यांनी त्यात खूप बदल केल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

साल्व्हेटर मंडी हे चित्र म्हणजे डियाने मॉडेस्टिनी यांच्या कलेचा उत्तम नमुना आहे. लिओनार्डो यांनी स्वतः जसं चित्रं साकारलं असतं, त्यापेक्षा अधिक मॉडेस्टिनी यांनी या चित्रात त्यांची शैली प्रदान करताना केलं आहे असं इतिहासकार फ्रँक झोलनर यांनी या माहितीपटामध्ये उपहासानं म्हटलं आहे.

झोलनर यांनी लिओनार्डो यांची चित्र संकलित करून त्याचं कॅटलॉग (पुस्तक) तयार केलं आहे. तर, मॉडेस्टिनी यांच्या मते, त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून पेंटिंगला नवं रुप दिलं आहे आणि त्याची माहिती प्रकाशितही केली आहे.

हे चित्र लिओनार्डोच्या सहाय्यकांनी तयार केलं असावं आणि त्यावर अंतिम काम लिओनार्डोनं केलं असेल. यावर आज बहुतांश तज्ज्ञांचं एकमत झालं आहे. कारण त्याकाळी साधारणपणे असंच केलं जात होतं. पण या चित्राच्या कथेमध्ये प्रत्येकवेळी अनिश्चितता पाहायला मिळाली आहे. त्यामुळं लुईस यांनी बीबीसी कल्चरबरोबर बोलताना म्हटलं की, चित्रं लिओनार्डोचंच आहे का हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळं तुम्हीही या खेळात सहभागी होऊ शकता. साल्व्हेटर मंडीवर तुम्ही तुमचा वेगळा दा विंची कोड तयार करू शकता.

चित्राच्या दर्जावरून लोकांचं मतविभाजन झालं आहे. हे तर फार उत्कृष्ट असंही चित्र नाही. महान लिओनार्डो यांच्या चित्रांशी तुलना करता, ते तर अगदीच मागं पडतं. तर यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या मते, प्रत्यक्षात हे पेंटिंग पाहणं हा अविस्मरणीय अनुभव होता. (कदाचित त्यामुळंच असेल, पण माहितीपटात आणि इतर फोटोंमध्येही चित्र अधिक खुललेलं दिसतं.)

दोन्ही माहितीपटांमध्ये देण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या माहितीचा विचार करता त्यात चित्र किंवा कलेबद्दल फार काही सांगण्यात आलेलं नाही. द लॉस्ट लिओनार्डो या माहितीपटामध्ये बँक ऑफ अमेरिकाचे अधिकारी आणि अशा ऐतिहासिक कलाकृतींच्या गुंतवणुकीशी संबंधित असलेले इव्हान बीअर्ड यांनी सर्वसामान्य ग्राहकांच्या कलाकृती वापरण्याचा उद्देश किंवा त्यांचा गहाण ठेवण्यासाठीचा वापर याबाबत बोलताना दिसून आले.

या माहितीपटात चित्रांच्या वैशिष्ट्याबाबत ठाम अशी भूमिकाही मांडलेली नाही. त्याउलट हे चित्र लिओनार्डोचंच आहे हे स्वीकारायला भाग पाडून त्यातून चित्रं खरेदी करणारे ग्राहक, संग्रहालये, व्यापारी यांची लाखोंची कमाई करण्याची वृत्ती आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न याबाबत भाष्य करण्यात आलं आहे.

'रंगीबेरंगी पात्रे'

लंडनच्या नॅशनल गॅलरीमध्ये 2011 मध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनात हे चित्र लिओनार्डो दा विंची यांचंच असल्याचं सांगत सादर करण्यात आलं होतं. त्यामुळं मोठा वाद ओढावला. दोन्ही माहितीपटांमध्ये प्रदर्शनाचे आयोजक ल्युक सिसन त्यांच्या या मताशी ठाम असल्याचं स्पष्ट करतात. पण अनेक तज्ज्ञ कॅमेरासमोर आणि इतरही माध्यमांमध्ये हा फार लवकर काढलेला निष्कर्ष असल्याचं म्हणतात.

द आर्ट या वृत्तपत्राच्या संपादिका अॅलिसन कोल यांनी या चित्राबद्दल सविस्तरपणे लिहिलं आहे. तसंच त्यांनी नॅशनल गॅलरीमध्ये ते चित्र पाहिलंही होतं.

''दियाने मॉडेस्टिनी या आधीपासून यावर काम करत आहेत. पण मी जेव्हा ते पाहिलं तेव्हा मला तो लिओनार्डो यांचा ऑटोग्राफ वाटलाच नाही,'' असं त्यांनी बीबीसी कल्चरबरोबर बोलताना सांगितलं. पण तसं असलं तरी या प्रदर्शनातून त्याला मान्यता मिळायला मोठा हातभार लागला.

दोन वर्षांनी या सर्व खेळामध्ये आणखी काही रंगीबेरंगी पात्रांचा प्रवेश झाला. स्वित्झर्लंडचे प्राचीन कलात्मक वस्तुंचे व्यापारी येस बोवियर यांनी न्यूयार्कच्या व्यापाऱ्यांकडून दिमित्री रायबोलोव्हलेव्ह या रशियन ग्राहकासाठी म्हणून हे चित्र खरेदी केलं. 8 कोटी 30 लाख डॉलरमध्ये त्यांनी चित्र खरेदी केलं. त्यानंतर दोन दिवसांत त्यांनी ते चित्र रायबोलोव्हलेव्ह यांना 12 कोटी 75 लाख डॉलरमध्ये विकलं. हा सर्व व्यवसायाचा भाग होता, असं द लॉस्ट लिओनार्डोमध्ये बोवियर यांनी म्हटलं.

"आपण स्वस्तात विकत घ्यायचं आणि अधिक किमतीत विक्री करायची." (स्वित्झर्लंडमधील प्रशासनानं अनेक कलाकृतींची विक्री करताना रायबोलोव्हलेव्ह यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांची चौकशी केली, पण यावर्षी त्यांना शिक्षा न करता या केस बंद करण्यात आल्या.)

आपल्याकडून 4 कोटी 40 लाख डॉलर जास्तीचे उकळल्याचं त्यांच्या लक्षात येईपर्यंत या चित्राचा प्रवास क्रिस्टीच्या लिलावाच्या दिशेनं सुरू झाला होता.

क्रिस्टीच्या माध्यमातून झालेली विक्री हाच प्रत्यक्षात एक मोठा नाट्यमय अशा इव्हेंट होता. त्याची सुरुवात प्रसिद्धीच्या एका व्हीडिओनं झालं होती. त्या व्हीडिओत पेंटिंग दाखवलेलं नव्हतं तर केवळ काही चेहरे होते. त्यापैकी बहुतांश चेहरे सामान्य होते. पण त्यांच्यापैकी एक होते अभिनेते लिओनार्डो डिकॅप्रिओ. ते चित्राकडे अशाप्रकारे पाहत होते, जणू ते प्रत्यक्षात येशूला पाहत असावेत.

खरेदी करणारा निनावी होता. पण न्यू यॉर्क टाईम्सनं लवकरच खरेदी करणारा बिन सलमानसाठी बोली लावत होता, असं जाहीर केलं. त्यामुळं चित्र एका नव्या भौगोलिक परिसरात असल्याचं समोर आलं. बिन सलमान त्यावेळी काही निर्बंध शिथिल करून सौदी अरेबियाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत होते.

साल्व्हेटर मंडी हे चित्र कदाचित देशातील प्रमुख संग्रहालयातील मुख्य आकर्षण म्हणून सादर केले जाईल, असं या कलाकृतींवर लक्ष ठेवून असणाऱ्यांना वाटलं होतं. पण तेव्हापासून आतापर्यंत हे चित्र जनतेसमोर आलेलं नाही.

खरं तर हे चित्र जनतेसमोर येण्याची शक्यता होती. लिओनार्डो दा विंची यांच्या 500 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने फ्रान्समधील प्रसिद्ध लुवरे संग्रहालयाला प्रदर्शनात हे चित्र मांडण्याची इच्छा होती. बिन सलमान स्वतः पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना भेटले होते. प्रदर्शनाच्या प्रेस प्रिव्ह्यूतही साल्व्हेटर मंडीची जागा रिकामी ठेवण्यात आली होती. पण अखेरपर्यंत ते चिज्ञ प्रदर्शनात पोहोचलंच नाही.

लुवरे संग्रहालयाला बिन सलमान यांची मागणी पूर्ण करण्यात अपयश आल्यानं चित्र प्रदर्शनात आणण्यात आलं नसल्याच्या वृत्तावर न्यू यॉर्क टाईम्सनं शिक्कामोर्तब केलं. ज्या रूममध्ये मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र ठेवलं आहे, त्याच रूममध्ये तोच दर्जा या चित्राला देण्याची मागणी त्यांनी केली होती.

"लुवरे संग्रहालयाला फ्रान्स सरकार, सांस्कृतिक मंत्रालय आणि मॅक्रॉन यांचा पाठिंबा आहे. त्यामुळं ते राजकारण आणि संस्कृती यातही सहभागी आहे. त्यामुळं जर सौदी अरेबियानं सांस्कृतिक दारं उघडण्याचा निर्णय घेतला तर साल्व्हेटर मंडी या चित्राची भूमिका यात सर्वांत महत्त्वाची राहिली असती. त्यात लुवरेनं ते प्रदर्शनात मांडण्याचा निर्णय घेतल्यानं सर्व काही जुळून येऊ शकलं असतं," असं कोल यांनी बीबीसी कल्चरशी बोलताना सांगितलं.

लुवरे संग्रहालयानं एक 46 पानांचं पुस्तक प्रसिद्ध करण्याची तयारी केली होती. त्यात हे चित्र लिओनार्डो यांचं असल्याचा दावा करण्यात आला होता. पण ते कधीही प्रकाशित होऊ शकलं नाही. याबाबत मार्च 2020 मध्ये सर्वांत आधी कोल यांनीच माहिती दिली होती. खासगी मालकी असलेल्या आणि लोकांसमोर सादर न झालेल्या कलाकृतींवर भाष्य करणं लुवरेला शक्य नव्हतं. त्यामुळं पुस्तक प्रकाशितच झालं नाही आणि संग्रहालयानंही अशा प्रकारचं पुस्तकच नसल्याचं म्हटलं, असं कोल सांगतात.

घोटाळे आणि षडयंत्र

लुवरेच्या प्रकरणात पडद्यामागं आणखी नेमकं काय-काय घडलं याबाबत अँटोनी विट्किनी यांच्या सेव्हियर फॉर सेल या माहितीपटातून आणखी काही स्फोटक माहिती समोर येते. द लॉस्ट लिओनार्डो प्रमाणेच या माहितीपटातही सादरीकरण करण्यात आलं आहे. पण त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं आणि शहराची विविध दृश्य वापरून ते करण्यात आलं आहे. यात मॉडेस्टिनी किंवा तत्सम अभ्यासकांचा समावेश नाही. पण यात दोन अज्ञात सुत्रांचा समावेश आहे. त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

पण फ्रान्स सरकारमधील या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना लुवरेच्या चित्रांबाबतच्या अभ्यास तसंच फ्रान्स आणि सौदीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती असल्याचं समोर आलं आहे. यापैकी एका जणानं दिलेल्या माहितीनुसार, हे चित्र तयार करण्यात लिओनार्डो यांचा वाटा अगदी नसल्यासारखा म्हणजेच नावापुरता होता. पण बिन सलमान हे साल्व्हेटर मंडी चित्राला लिओनार्डो यांचं चित्र असल्याची अधिकृत मान्यता दिली तरच कर्ज मंजूर करणार होते.

सुत्रांच्या मते त्यांनी सरकारला असा सल्ला दिला की, "सौदीच्या वातावरणात याचं प्रदर्शन करणं म्हणजे त्यासाठी मोजलेल्या 45 कोटी डॉलरच्या रकमेवर पाणी फेरण्यासारखं आहे."

दरम्यान या माहितीपटांबाबत लुवरे आणि नॅशनल गॅलरीकडून मात्र काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

चित्रपट, पॉडकास्ट आणि पॉप कल्चर यांना अशा कलाकृतीसंबंधी गुन्हे, गूढकथा आणि बनावट वस्तूंच्या कथा यानं भुरळ घातलेली असतानाच आता, हे दोन माहितीपट आले आहेत. गेल्यावर्षी 'मेड यू लूक' आणि 'ड्रीव्हन टू अॅबस्ट्रॅक्शन' या दोन माहितीपटांच्या माध्यमातून न्यूयॉर्कच्या नॉडलर गॅलरीतील प्रकरण समोर आलं होतं. त्यांनी जवळपास 20 वर्षे बनावट कलाकृतींची विक्री केली.

मार्क रोथको आणि जॅक्सन पोलॉक यांच्या कलाकृती असल्याचा बनाव करून त्या विकण्यात आल्या होत्या. पण त्यांनी हे माहिती असून केलं की नकळत? हा प्रश्न अद्याप कायम आहे. नेटफ्लिक्सवरील 'धिस इज रॉबरी' ही सिरीज 1990 मधील प्रसिद्ध कलाकृतीच्या चोरीच्या प्रकरणावर आधारित आहे. त्यात बॉस्टनमधील इजाबेल स्टिवर्ट गार्डनर संग्रहालयातील रेंब्रांट यांच्या कालकृतीच्या चोरीचा समावेश आहे. कधीही न सुटू शकलेल्या या दरोड्याच्या गुढासह कारस्थानांची माहिती या सिरीजमध्ये मांडली आहे.

लुईस यांनी 'आर्ट बस्ट' हे आठ नव्या भागांचं पॉडकास्ट आणलं आहे. त्यात प्राचीन कलाकृतींसंदर्भातील गुन्ह्याच्या कथा, कट, कारस्थानं घोटाळे आणि या सर्वांची काळी बाजू मांडण्यात आली आहे. यामध्ये इनिगो फिलब्रिक यांनी ग्राहकांना प्राचीन कलाकृतींचा 100% पेक्षा अधिक शेअर्स विकून केलेल्या गुन्ह्यापासून इजिप्तमधील तस्करी करण्यात आलेल्या प्राचीन सोनेरी शवपेटीपर्यंतच्या विषयांचा समावेश आहे.

अभिनेत्री किम कार्दिशियन हिनं 'मेट्रोपॉलिटन म्युझियमच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट'मध्ये (गाला) या शवपेटीसमोर काढलेल्या फोटोमुळं ही शवपेटी समोर आली होती. त्यानंतर मेटनं ही शवपेटी इजिप्तला परत केली होती. दृश्य दिसत नसलेल्या पॉडकास्टमध्येदेखील केवळ वर्णनं ऐकत अशा प्रकारच्या कथांना पसंती मिळत आहे. यावरूनच आजच्या काळातील या प्राचीन आणि महागड्या कलाकृतींबाबतच्या गूढ कथा किती रंजक आहेत ते लक्षात येतं.

अशा प्राचीन आणि प्रसिद्ध कलाकृतींसंदर्भातील सत्य गुन्हे कथांना पसंती मिळण्यामागंचं कारण म्हणजे अनेक बाबी एकत्र येणं हे आहे. याबाबत सार्वजनिकपणे एवढी माहिती उपलब्ध आहे की, प्रत्येकाला हे सर्व आपल्यासमोरच घडत असल्यासारखं वाटतं. या कथा मांडण्यासाठी आता अनेक व्यासपीठंही उपलब्ध आहेत. ज्या पद्धतीनं बाजारपेठ वाढली आहे, तसा दृष्टीकोनही बदलला असल्याचं लुईस म्हणतात.

या कलाकृतींच्या संदर्भातील गुन्ह्यांचा विचार करता याबाबतचा सर्वसाधारण समज, अब्जांधीशांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सुरू असलेला पैशांचा खेळ असा होता. पण आता तुम्ही एखाद्या देशाचा सांस्कृतिक वारसा अशाप्रकारे लुटू शकत नाही, याचीही आता सर्वांनाच जाणीव झाली आहे.

या सर्व गुंतागुंतीच्या इतिहासामध्ये जोपर्यंत नवे दस्तऐवज आढळत नाही (एवढ्या शतकांनंतर ते शक्य वाटत नाही) किंवा चित्र खरे आहे का? हे शोधण्याची नवी शास्त्रीय पद्धत समोर येत नाही (चित्र खूप खराब झालेलं असल्यानं तेही कठीण आहे), तोपर्यंत तरी साल्व्हेटर मंडीला प्रतिस्पर्धी असल्याचं दिसत नाही. त्यामुळं हे गूढच सत्य असल्याचं समोर येईल. मला खात्री आहे की, आगामी सहा महिने किंवा एका वर्षामध्ये याबाबत काहीतरी नवी माहिती समोर येईल. ती खरी असो वा नसो पण सगळीकडे ती पसरलेली असेल असं डाल्सगार्ड म्हणाले.

"जोपर्यंत हे चित्र जगापासून लपलेले असेल आणि त्याचं भवितव्य कोणाला माहिती नसेल, तोपर्यंत अशा प्रकारच्या गूढ कथा कायम राहतील आणि जगालाही कायम काहीतरी नवीन जाणून घ्यायला आवडेल. कारण सरतेशेवटी ही एक मनोरंजक कथाच तर आहे."

'द लॉस्ट लिओनार्डो' हा माहितीपट अमेरिकेत प्रसिद्ध झाला असून इंग्लंडमध्ये 10 सप्टेंबरला झळकणार आहे, तर 'सेव्हियर फॉर सेल' अमेरिकेत 17 सप्टेंबरला झळकणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)