'अदानी समूहाची 2016 पासून चौकशी नाही,' सेबीने दावा फेटाळला

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविधं वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. अदानी समूहाची 2016 पासून चौकशी करत असल्याचा दावा सेबीने फेटाळला
अदानी समूहाची 2016 साली चौकशी करण्यात आली होती, हा दावा निराधार असल्याचं सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड अर्थात ‘सेबी’ने सोमवारी (16 मे) सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.
अदानी समूहाच्या चौकशीसाठी सेबीने सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली असून त्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे.
सेबीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, आम्ही 51 कंपन्यांच्या ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट्सची चौकशी करत आहोत आणि त्यामध्ये अदानी समूहाच्या कोणत्याही नोंदणीकृत कंपनीचा समावेश नाहीये.
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.
अदानी समूहाची सेबीकडून 2016 पासून चौकशी सुरू आहे आणि या चौकशीला सहा महिन्यांची मुदतवाढ द्यायला सेबीचा विरोध असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर सेबीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेता या प्रकरणात अकाली आणि चुकीचे निष्कर्ष न्यायाच्या विरोधात होतील’ अशी भूमिकाही सेबीने मांडली आहे.
NDTV ने ही बातमी दिली आहे.
2. 'लैंगिक छळाच्या आरोपाचे समितीने ऑडिओ-व्हीडिओ पुरावे मागितले'

फोटो स्रोत, ANI
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी समितीमार्फत सुरू आहे. या समितीसमोर उपस्थित झालेल्या तीन कुस्तीपटूंनी समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की, आम्हाला छळाचे ऑडिओ आणि व्हीडिओ पुरावे सादर करण्यात सांगण्यात आलं आहे.
एका कुस्तीपटूनं सांगितलं की, समितीच्या एका सदस्यांनी तिला बृजभूषण सिंह हे वडीलधारे व्यक्ती आहेत आणि तिने त्यांच्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावला आहे, त्यांनी ‘निष्पापणे’ केलेल्या कृतीला ‘चुकीच्या पद्धतीने स्पर्श’ केल्याचं म्हटलं आहे.
दुसऱ्या एका कुस्तीपटूने सांगितलं की, सिंह यांच्या जवळचे मानले जाणारे कुस्ती महासंघातील पदाधिकारी तसंच प्रशिक्षक चौकशीच्या वेळेस स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडियाच्या वेटिंग एरिआमध्ये गर्दी करून होते. ही कृती आम्हाला भीती दाखवणारी होती.
3. महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास- देवेंद्र फडणवीस
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पहिल्या लढाईत भाजप-शिवसेनेचा भगवा झेंडा पुणे महापालिकेवर फडकेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास महापालिका निवडणूक होण्याचे संकेतही दिले.
भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, दिलीप कांबळे, राजेश पांडे आदी या वेळी उपस्थित होते.

फोटो स्रोत, Getty Images
फडणवीस यांनी म्हटलं, “महावसुली सरकार, स्थगिती सरकार घालवून आता राज्यात गतिशील सरकार आहे. कोट्यवधीच्या योजना पुन्हा पुण्यात सुरू झाल्या आहेत. पुणे भाजपचा गड आहे. गिरीश बापट, मुक्ता टिळक यांची पोकळी जाणवेल. पण गिरीश बापट यांनी संघर्ष करून कार्यकर्त्यांची फळी उभी केली. आजचा संघर्ष वेगळा आहे. संघटना ही भाजपची ताकद आहे. कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची गरज आहे.
आता पहिली लढाई महापालिकेची येईल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये किंवा न्यायालय सांगेल तेव्हा येईल. पहिली लढाई भाजप-शिवसेना जिंकणार, पुणे महापालिकेवर भगवा फडकणार.”
लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
4. राज्यातून गेल्या महिन्यात 3 हजार 594 तरुणी बेपत्ता- रुपाली चाकणकर
महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात 16 ते 25 वयोगटातील 3 हजार 594 तरुणी राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत. राज्य सरकारच्या वेबसाईटवर असलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक आहे, असं म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.
महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि शोध मोहीम राबवावी, दर 15 दिवसांनी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्यात यावा, अशी सूचना राज्य महिला आयोगाने गृह विभागाला केली.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
राज्य सरकारने हरवलेल्या मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी शक्य तितकी तत्परता दाखवावी, अशी विनंती चाकणकर यांनी केली आहे. पाहिजे तशी तत्परता राज्य सरकारकडून दाखवली जात नसल्याचंही त्या म्हणाल्या.
या प्रकरणात ज्या तत्परतेने काम व्हायला हवं होतं ते होताना दिसत नाही, असंही चाकणकरांनी म्हटलं आहे.
एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.
5. ममता बॅनर्जी : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा देऊ, पण...
गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप विरोधात विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेची चाचपणी करत असतानाचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्यास नकार दिला होता.
पण कर्नाटकातील विजयानंतर ममता यांनी आपल्या भूमिकेत बदल करताना म्हटलं आहे की, काँग्रेस जिथे मजबूत आहे, तिथे तृणमूल काँग्रेस त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. पण त्याबदल्याने काँग्रेसने बंगालमध्ये टीएमसीला मदत करावी.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नबन्ना इथे एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटलं की, देशात लोकशाहीचे हक्क बुलडोझरने चिरडले जात आहेत. अशा स्थितीत त्या त्या प्रदेशात जो कोणी ताकदवान असेल, त्यांनी एकत्र येऊन लढा द्यायला हावा. आपण समजा बंगालमध्ये बलवान आहोत, तर बंगालमध्ये लढू. काँग्रेसने दिल्लीत लढावं, नितीशजी-तेजस्वीने बिहारमध्ये.
ज्या जागांवर काँग्रेस मजबूत असेल तिथे आमचा त्यांना पाठिंबा आहे, मात्र त्यासाठी काँग्रेसलाही इतर पक्षांना साथ द्यावी लागेल, असं ममता यांनी म्हटलं.
लोकमतने ही बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








