गौतम अदानी कोण आहेत? 10 वर्षांमध्ये त्यांनी उद्योगाचं साम्राज्य कसं उभं केलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी
एलॉन मस्क अजुनही पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अदानी, तिसऱ्या क्रमांकावर अर्नोल्ट, चौथ्या क्रमांकावर जेफ बेझोस आमि पाचव्या क्रमांकावर बिल गेट्स आहेत.
त्यांचं उत्पन्न 154.6 बिलियन डॉल आहे. तर मस्क यांची मालमत्ता 273.5 बिलियन डॉलर आहे. मुकेश अंबानी यांची मालमत्ता 92.1 बिलियन डॉलर इतकी आहे.
किराणा माल, खाणी, रेल्वे विमानतळ, बंदरं आणि वीज कंपन्या असा अनेक क्षेत्रात त्यांचे उद्योगधंदे आहेत. भारतीय उद्योगपती गौतम अदानी फ्रांसच्या एलवीएमएच च्या बर्नॉल्ड अनोर्ल्ट यांना मागे ठेवून जगात दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.
गेल्या पाच वर्षांत अदानी समुहाने विमानतळं, सिमेंट, तांबे उद्योग, रिफायनरी, डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल्स, रस्ते निर्माण आणि सौर उर्जा अशा क्षेत्रांमध्ये भरपूर गुंतवणूक केली आहे.
गौतम अदानी यांची मागच्या दहा वर्षांतली प्रगती अधोरेखित करणारा हा लेख पुन्हा एकदा प्रसिद्ध करत आहोत.

गुजराती कुटुंबांमध्ये आताच्या 21व्या शतकात तसे पहिल्या पिढीचे उद्योगपती फारसे सापडत नाहीत. सगळे दुसऱ्या नाहीतर तिसऱ्या पिढीतले उद्योजक असतात.
कारण, उद्योगाची मुहुर्तमेढ वडील किंवा आजोबांनी 1970-80च्या दशकांत केलेली असते. आणि 1990च्या दशकांत अर्थव्यवस्था खुली झाल्यावर पुढच्या पिढीने छोटेखानी व्यापार वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेला असतो.
गुजराती कुटुंबातली अशी शंभर तरी उदाहरणं सापडतील. पण, यापैकी अंबानी कुटुंबीय आणि त्यानंतर 2000 पासून अदानी कुटुंबाने आपला डंका आधी देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि पुढे जागतिक पातळीवरही पिटला.
रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना अंबानी उद्योगसमुह धीरुभाई अंबानी यांच्याकडून वारसा हक्काने मिळाला. पण, गौतम अदानी यांचं वैशिष्ट्य हे की, ते वारशावर थांबले असते तर आता कापडाच्या दुकानात गल्ल्यावर किंवा फार तर कापडाच्या घाऊक व्यापारात असते. पण, त्यांनी विसाव्या वर्षीच दोन महत्त्वाचे निर्णय घेतले.

फोटो स्रोत, Getty Images
पाठ्यक्रमातलं शिक्षण आपल्यासाठी नाही असं स्वत:चं स्वत: ठरवून त्यांनी गुजरात विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर अभ्यासक्रमाला दुसऱ्याच वर्षी सोडचिठ्ठी दिली. (म्हणजे सोप्या भाषेत ते बी कॉम दुसऱ्या वर्षाचे ड्रॉप आऊट आहेत.) दुसरं म्हणजे वडिलांचा कापडाचा व्यापार नाकारून हिरे व्यापारात उतरण्यासाठी ते थेट मुंबईला आले.
वडील शांतीलाल अदानी यांच्या सात अपत्यांपैकी गौतम एक होते. व्यवसाय ठिकठाक चालत असला तरी मुलाचं स्वप्न त्याहून मोठं होतं. त्याला मदत करण्याचं बळ शांतीलाल यांच्यात नव्हतं. त्यांनी मुलाला आशीर्वाद, शंभर रुपये आणि मुंबईतल्या काही नातेवाईकांचे पत्ते दिले.
अहमदाबादहून वीस वर्षांचे गौतम अदानी मुंबईत आले. वेळ न दवडता त्यांनी हिरे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेला झवेरी बाजार गाठला.
पहिली 2-3 वर्षं हिरे वेचण्याचं काम करत असतानाच त्यांनी स्वत:ची हिरे ब्रोकरेज कंपनी थाटली. आणि विशेष म्हणजे पहिल्या तीन वर्षांतच त्यांची गणना या व्यापारातल्या लक्षाधीशांमध्ये व्हायला लागली. विशीतच अदानी 'मिलियनेअर' झाले.
1) डीलमेकर अदानी
कुठल्याही धंद्यात मध्यस्थ म्हणून काम करताना माणसाला तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवावा लागतो असं म्हणतात. तरंच तुम्ही माणसांचे स्वभाव हाताळू शकता आणि 'डील' घडवून आणू शकता.
गौतम अदानींसाठी ते कधीच कठीण गेलं नाही. किंबहुना त्यांच्या पुढच्या आयुष्यातही 'डीलमेकर' म्हणून ते पुढे आले. उद्योगधंद्याबाबत वाटाघाटी करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकणार नाही. आणि त्याचीच चुणूक मुंबईतल्या त्यांच्या तीन वर्षांच्या वाटचालीत दिसली.

फोटो स्रोत, Getty Images
पुढे 2015मध्ये, त्यांच्या अदानी पॉवर कंपनीने उडुपी औष्णिक उर्जा प्रकल्प 6,300 कोटी रुपयांना विकत घेतला त्या वाटाघाटी फक्त 100 तासांत संपवण्याचा रेकॉर्ड अदानींनी केला. विचार करा असे निर्णय होण्यासाठी आणि ते पार पडण्यासाठी काही वर्षं लागू शकतात.
जल मार्गाने व्यापार करण्यासाठी देशातील बंदरांचा विकास करणं हे शालेय जीवनापासून त्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. कारण, शाळेत असताना कांडला बंदरावर सहलीसाठी गेले असताना तिथे चालणारा व्यापार त्यांनी बघितला होता.
पुढे अदानी एक्सपोर्ट्स आणि अदानी पोर्ट्स च्या माध्यमातून या क्षेत्रात उतरल्यावर रेल्वेमंत्री नितिश कुमार यांनी देशातली प्रमुख बंदरं रेल्वेमार्गाने जोडण्याचं महत्त्व पटवून दिलं होतं. तसं झालं तर व्यापाराला कशी चालना मिळेल हे प्रात्यक्षिकासह दाखवल्यावर पुढच्याच अर्थसंकल्पात नितिश कुमार यांनी देशातल्या सहा बंदरांना एकमेकांशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाची घोषणा केली होती. हे अदानी यांनी केलेलं आणखी एक डील. ते ही अगदी कमी वेळात.
थोडक्यात आपला मुद्दा महत्त्वाच्या लोकांना पटवून देण्याची हातोटी गौतम अदानींकडे होती आणि त्याच्या जोरावरच त्यांनी काही राजकीय धोरणं आणि निर्णय आपल्या बाजूने वळवून त्याचा औद्योगिक फायदा करून घेतला. बिझिनेस क्षेत्रात यालाच 'व्हिजन' किंवा 'दूरदृष्टी' म्हणतात.
2) अदानी एंटरप्रायझेसचं साम्राज्य
पुन्हा एकदा अदानींच्या सुरुवातीच्या दिवसांकडे जाऊया. मुंबईत हिरे व्यापारात त्यांचा जम बसत असतानाच त्यांचा मोठा भाऊ मनसुखलाल यांनी अहमदाबादमध्ये प्लास्टिक व्यवसाय सुरू केला. त्यांनी गौतम यांना मदतीसाठी बोलावलं.
गौतम यांनी अधिकृतपणे एका संघटित उद्योग क्षेत्रात 1981 मध्ये हे असं पाऊल ठेवलं.

फोटो स्रोत, Ian Hitchcock
पण, ही फॅक्टरी सांभाळतानाही त्यांना या धंद्यातलं भवितव्य दिसू लागलं. त्यांनी प्लास्टिक व्यवसायाला पॉलीमर आणि पीव्हीसी आयात करणाऱ्या कंपनीमध्ये बदललं.
कंपनीच्या माध्यमातून छोट्या उद्योगांसाठी लागणारं पीव्हीसी आयात करायला त्यांनी सुरुवात केली. आणि अदानी एक्सपोर्ट्स या अदानी साम्राज्याच्या पहिल्या आणि होल्डिंग कंपनीचा श्रीगणेशा झाला. याच कंपनीला आता अडाणी एंटरप्रायझेस असं म्हणतात. ही समुहाची मुख्य कंपनी आहे.
1991मध्ये अर्थव्यवस्था खुली झाल्यावर आणि खाजगीकरण शक्य झाल्यावर अडाणी यांना विस्ताराची नवीन स्वप्नं दिसू लागली. किंवा असं म्हणूया त्यांची स्वप्न पूर्ण व्हायला लागली.
कारण, एक्स्पोर्ट बरोबरीने खाजगी जेट्टी स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न गुजरात सरकारने पूर्ण केलं. मुंद्रा बंदराची व्यवस्था सांभाळण्याचं खाजगी कंत्राट गुजरात सरकारने 1995मध्ये काढलं. आणि ते गौतम अदानी यांनाच मिळालं. बंदर व्यवस्थापनाच्या व्यवसायावर त्यांची नजर पहिल्यापासून होती.
आताच्या घडीला अदानी पोर्ट्स ही देशातली सगळ्यात मोठी खाजगी बंदर व्यवस्थापन कंपनी आहे. मुंद्रा हे खाजगीरित्या सांभाळलं जाणाऱ्या बंदरातून वर्षाला 21 कोटी टनाइतक्या वस्तू आणि मालाचा व्यापार होतो. तर 1996मध्ये स्थापन झालेली अडाणी पॉवर ही कंपनी देशातली सगळ्यात मोठी खाजगी उर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
म्हणता म्हणता 1991 पासून गौतम अदानी यांनी 78 बिलियन अमेरिकन डॉलरचं साम्राज्य उभं केलं आहे. हा आकडा 14 जूनला कंपनीचे शेअर पडण्यापूर्वीचा आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, ते आशियातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. आणि जगातले तेराव्या क्रमांकाचे.
पण, या सगळ्यात एक मेख आहे. ही सगळी संपत्ती आणि उद्योग जगतात त्यांची भरभराट मागच्या दहा वर्षांत झाली आहे. पहिल्या फळीचे उद्योजक ते होते. पण, 2012 पासून त्यांच्या कंपन्यांचे शेअर अगदी सरळ रेषेत वर चढले आहेत. त्यांमध्ये 400% ची वाढ झाली आहे. आणि देश पातळीवर महत्त्वाचे असे प्रकल्प मिळवण्यामध्ये अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेली जवळीक कारणीभूत ठरल्याचा आरोप वारंवार होत आला आहे.
3) गौतम अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळीक
या मैत्रीची मूळं 2001मध्ये आहेत. गुजरात दंगलीनंतर राज्यात काय देशातही नरेंद्र मोदी यांच्यासाठी अनुकूल वातावरण नव्हतं. अशावेळी मोदींनी उद्योगधंद्यांना राज्यात आकर्षित करण्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन 2002 मध्ये केलं तेव्हा फिक्की या उद्योजकांच्या संघटनेनंही त्याकडे पाठ फिरवण्याचाच निर्णय घेतला होता.
एक प्रकारेमोदी राजवटीला निषेध करण्याचा तो प्रकार होता. शिवाय नुकतीच दंगल उसळलेल्या भागात गुंतवणूक करणं किफायतशीर कसं ठरेल हा विचारही उद्योजकांच्या मनात असावा.

फोटो स्रोत, Hindustan Times
पण, अशा प्रतिकूल परिस्थितीत गौतम अदानी तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी उद्योजकांच्या गटाला गुजरातमध्येच गुंतवणूक करण्यासाठी पटवलं. इथंही त्यांच्या वाटाघाटींचं वकुब कामी आलं. आणि अदानी उद्योग समुहाच्या वतीने स्वत:ही राज्यात भरीव गुंतवणूक केली.
नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाच मुंद्रा बंदर चालवण्याचं कंत्राट त्यांना मिळालं. आणि उर्जा क्षेत्रातही त्यांचा जम बसला. एक प्रकारे नरेंद्र मोदींच्या औद्योगिक रणनितीवर अडाणी यांनी दाखवलेल्या विश्वासाचीच ही परतफेड होती.
पुढे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून नवी दिल्लीत गेल्यावर हे संबंध आणखी दृढ झाले हे वेगळं सांगायला नको. 2014 नंतर म्हणजे मोदी सत्तेत आल्यानंतर अडाणी यांची संपत्ती अक्षरश: शतपटीने वाढली.
2008मध्ये त्यांचं औद्योगिक साम्राज्य 8 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं होतं, ते 2021 मध्ये 78 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचलंय. केवळ दहा वर्षांत आणि त्यातही शेवटच्या सहा वर्षांत गौतम अदानी यांनी मारलेली ही मोठी मजल म्हणूनच टीकेचं लक्ष्य ठरते आहे.
4) गौतम अदानी आणि वाद
सरकारशी असलेल्या जवळीकीचा उद्योगधंद्यांमध्ये वापर - 2018मध्ये केंद्रसरकारने 6 आंतरराष्ट्रीय विमानतळांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठी निविदा सुद्धा काढल्या. पण, त्या काढताना पूर्वी असलेली अशा कामांचा पूर्वानुभव असण्याची अट यावेळी काढून टाकण्यात आली.
जेव्हा कंत्राटाची घोषणा झाली तेव्हा अशा कामाचा कुठलाही अनुभव नसलेल्या अदानी उद्योग समुहाला त्रिवेंद्रम विमानतळाच्या देखभालीचं कंत्राट मिळालं. जी वर दिलेली अट शिथिल करण्यात आली होती, ती अदानींना फायदा मिळावा यासाठीच शिथिल झाली असा आरोप मीडियामध्ये झाला. त्रिवेंद्रममध्ये यावरून डाव्या पक्षांनी मोर्चेही काढले होते. फक्त त्रिवेंद्रमच नाही तर इतर पाच विमानतळांची कंत्राटही अदानी यांनाच मिळाली.

फोटो स्रोत, AFP
वादग्रस्त 'नेशन बिल्डिंग' प्रकल्प - नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहमदाबादहून नवी दिल्लीला गेले ते एका खाजगी विमानाने. आणि या जेटवर अडाणी हा शब्द मोठ्या अक्षरात होता. अर्थात, नरेंद्र मोदी अदानी यांच्या विमानातून दिल्लीला गेले होते. दोघांमधली मैत्री जगजाहीर करण्याचा हा प्रकार होता, असा आरोप तेव्हा विरोधकांनी केला होता.
एका अर्थाने दोघांमधल्या भविष्यातल्या संबंधांची ती नांदी होती. कारण, पुढे अदानी समुहाने आपली कॅचलाईन बदलून 'बिल्डिंग नेशन' अशी केली. आणि बांधकाम क्षेत्रात उतरून आपल्या समुहाचा विस्तारही केला.
कर्जात बुडलेला अदानी समूह - उद्योगाला राजकीय मदत किंवा वरदहस्त मिळाला तरी पैसा तुम्हालाच उभारावा लागतो. त्यासाठी अडाणी समुहाने वारेमाप कर्जं घेतल्याचं एका अहवालातून स्पष्ट होतंय.
मागच्या दहा वर्षांत उभारलेल्या मोठ-मोठ्या प्रकल्पांसाठी त्यांनी बाँड्स आणि कर्जाच्या स्वरुपात तब्बल 30 अब्ज अमेरिकन डॉलरचं कर्ज उचलल्याचं स्पष्ट होतंय. कर्जाच्या आधारावर उभी राहिलेली औद्योगिक व्यवस्था हा फुगवटा असू शकतो. यात जोखीम मोठी आहे.
शिवाय कर्जं देणाऱ्या बँकांकडे मध्यमवर्गीयांनी विश्वासाने दिलेले पैसे असतात. आणि त्यांचा वापर मात्र उद्योजक स्वत:च्या भल्यासाठी करतात असा एक सूर भारतात उमटू लागला आहे. नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि इतर असा बँकांना फसवल्याच्या प्रकरणांमुळे बँकांकडून वारेमाप कर्जं उचलण्याबद्दल नैतिकतेचा मुद्दाही उपस्थित होतो.
5) पर्यावरणविरोधाचा ठपका
पर्यावरण विरोधी अदानी- उर्जा क्षेत्रात मोठी मजल मारताना गौतम अदानी यांनी अपारंपरिक उर्जा आणि अक्षय्य उर्जा प्रकल्पांवरही लक्ष दिलंय. असं करताना उर्जा निर्मितीत होणारी पर्यावरणाची हानी टाळण्याचं उद्दिष्ट्ं त्यांच्या कंपनीने ठेवलंय. पण, असं ते कागदोपत्री म्हणत असले तरी अदानी खाण उद्योग आणि उर्जा उद्योगावरही पर्यावरण विरोधी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
खासकरून ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड प्रांतात खाणकामासाठी अदानी यांनी कंत्राट कसं मिळवलं यावरून बराच गदारोळ झाला. तिथल्या पर्यावरण नियामक मंडळातल्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी जमीन खाणकामासाठी योग्य असल्याचा चुकीचा परवाना त्यांनी मिळवला असं सिद्ध झाल्यावर त्यांना 20,000 डॉलरचा दंडही भरावा लागला होता.

युवा पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग यांनी तर #StopAdani असा हॅशटॅगही तेव्हा प्रसिद्ध केला होता.
भारतातही अदानी यांच्याविरोधात पर्यावरणवादी संस्थांनी निदर्शनं केली आहेत. ऑस्ट्रेलियातील प्रकल्प अजून सुरूच आहे. पण, अडाणींवर पर्यावरण विरोधी असल्याचे आरोप मात्र झाले.
झारखंडमध्ये अदानी यांनी उभारलेल्या कोळसा प्रकल्पाचा वादही न्यायालयात गेला आहे.
गौतम अदानी सध्या देशातले क्रमांक दोनचे उद्योगपती आहेत हे तर खरं. पण, त्याचबरोबर त्यांच्याविषयी लिहिताना त्यांची भरभराट मागच्या सहाच वर्षांत झाली आहे हे कायम अधोरेखित होतं. त्यामुळे आताची राजकीय मैत्री टिकली नाही किंवा नरेंद्र मोदी आगामी 2024 ची निवडणूक हरले तर अदानींचं नेमकं भवितव्य काय उरले असा प्रश्नही राजकीय तसंच आर्थिक विश्लेषकांना पडतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








