अदानी, जीएमआर समूहांचं आता लक्ष्य रेल्वे स्टेशन

फोटो स्रोत, Ian Hitchcock
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
येत्या काही वर्षात नवी दिल्ली रेल्वे स्थानक रुपं असं बदलणार आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला जागतिक पातळीवरील मल्टी मॉडल ट्रांझिट हब म्हणून विकसित करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस आहे.
म्हणजेच हॉटेल, दुकानं, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि रेल्वे सगळं एकाच छताखाली असेल. काहीसं एअरपोर्ट सारखंच.
वरून बघितल्यावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचा आकार गणितातल्या इन्फिनिटीसारखा दिसेल. यात 70 आणि 40 मीटर उंच घुमटासारख्या दोन इमारती असतील.
या इन्फिनिटी आकारावरूनच या रेल्वे स्थानकाचा नाव इन्फिनिटी टॉवर ठेवण्यात आलं आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचं नवं रुप कसं असेल?
प्रवाशांना स्थानकात येण्यात अडचण होऊ नये, यासाठी स्थानकाबाहेर मोठे रस्ते असतील. स्थानकाच्या आत प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी प्रत्येकी 6-6 एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट्स असतील.
अजमेरी गेट आणि पहाडगंज दोन्ही बाजूला मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येईल. बसने येऊन ट्रेन पकडता यावी, यासाठी ग्राउंड फ्लोअरला बस स्थानक असेल. यात जवळपास 50 बस थांबू शकतील, अशी व्यवस्था असेल.
अशाप्रकारे रेल्वे स्थानक पुनर्विकासासाठी खाजगी कंपन्या उत्सुक आहेत का, हे जाणून घेण्यासाठी नुकतंच रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन (RFQ) मागवण्यात आल्या.
यात जीएमआर, ओमॅक्स आणि अदानी रेल्वेसारख्या एकूण 9 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांनी भाग घेतला.
यानंतर या कंपन्यांचं तांत्रिक मूल्यांकन होईल. तांत्रिक मूल्यांकनानंतर प्रकल्पासाठी आर्थिक निविदा मागवण्यात येतील. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर एका कंपनीला नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या रिडेव्हलपमेंटचं काम देण्यात येईल. जुलै-ऑगस्टपर्यंत हा निर्णय होईल.
रिडेव्हलपमेंट योजनेची वैशिष्ट्यं
आतापर्यंत आपण बघितलं नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचं नवं रूप कसं असणार आहे. आता पाहाणार आहोत, यासाठी येणारा खर्च
रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या बघितल्यास नवी दिल्ली रेल्वे स्थानक भारतातलं दुसऱ्या क्रमांकांचं सर्वात मोठं स्थानक आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकात रोज जवळपास साडेचार लाख प्रवासी येतात. जवळपास 400 ट्रेन रोज इथून धावतात.

फोटो स्रोत, Hindustan Times
तब्बल 12 लाख चौरस मीटर जागेवर नवं रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे.
रेल भूमी विकास प्राधिकरणाचे व्हॉईस चेअरमन वेदप्रकाश दुदेजा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "या 12 लाख चौरस मीटर जागेत स्थानक रिडेव्हलप करणाऱ्या कंपनीला (सुरुवातीच्या अंदाजानुसार) 2.5 लाख चौरस मीटर जागा देण्यात येईल. यात कंपनी दुकानं, हॉटेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बिजनेस सेंटर सारख्या इमारती उभारेल. या कंपन्यांना रेल्वे ही जागा 60 वर्षांच्या लीजवर देईल."
हा असेल रेल्वे स्थानक रिडेव्हलप करणाऱ्या कंपन्यांची कमाईचा मार्ग.
प्रकल्पावरील खर्च आणि उत्पन्न
नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या रिडेव्हलपमेंटसाठी जवळपास 6500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं डुडेजा सांगतात.
रेल्वे स्थानक डेव्हलप करणाऱ्या कंपनीला यातले 5 हजार कोटी रुपये प्लॅटफॉर्म, कॉनकोर्स, वेटिंग एरिया, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीची कार्यालयं, घर, मल्टिलेव्हल ट्रान्सपोर्ट हब यासारख्या रेल्वेच्या कामावर खर्च करावा लागेल.
कंपनी उर्वरित 1500 कोटी रुपये परिसरात उभारण्यात येणाऱ्या रिअल इस्टेट प्रोजेक्टवर खर्च करेल.

फोटो स्रोत, Getty Images
या मॉडेलला डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्सफर (DBFOT) नाव देण्यात आलंय.
काम सुरू झाल्यानंतर चार वर्षात संपूर्ण रेल्वे स्थानक रिडेव्हलप करण्याचा विचार आहे आणि म्हणूनच एअरपोर्ट उभारण्याचा अनुभव असणाऱ्या जीएमआर आणि अडाणी सारख्या कंपन्या आता रेल्वे स्थानक रिडेव्हलपमेंटच्या कामी इच्छुक आहेत.
दिल्लीचं हृदय मानल्या जाणाऱ्या कॅनॉट प्लेस परिसरात 60 वर्षांसाठी 2.5 लाख चौरस मीटर भूखंडावर काहीतरी उभारून कमाईचं साधन मिळत असेल तर हा सौदा सर्वांसाठीच फायद्याचा आहे.
कंपन्यांना रेल्वे स्थानक डेव्हलपमेंटचा अनुभव आहे का?
वेद प्रकाश दुदेजा सांगतात, "आम्ही काढलेल्या आरएफक्यूमध्ये 9 कंपन्या इच्छुक आहेत. यात अरेबियन कंस्ट्रक्शन कंपनी, अदानी रेल्वे ट्रान्सपोर्ट लिमिटेड, अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज लिमिटेड, जीएमआर हायवेज लिमिटेड, ओमॅक्स लिमिटेड यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे."

फोटो स्रोत, Yawar Nazir
"बहुतेक कंपन्या बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत. याचं कारण असं की रेल्वे स्थानक रिडेव्हलपमेंटचा बराचशा भाग हा बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहे. हे खरंतर गुंतवणूकदार असतील."
"आम्ही आपल्या प्रस्तावात जी कंपनी आपल्यासोबत रेल्वे स्थानक रिडेव्हपलमेंटचा अनुभव असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरसोबत येईल, त्याच कंपनीला काम मिळेल, अशी अट ठेवली आहे. यासाठी त्यांना सुरुवातीला एक लिखित शपथपत्र सादर करावं लागेल. भारतात रेल्वे स्थानक रिडेव्हलपमेंटचं काम नवीन आहे. त्यामुळे या क्षेत्राचा अनुभव असणाऱ्या कंपन्या इथे नाहीत. याची तुलना आपण एअरपोर्टशी तुलना करू शकतो. मेट्रोचा अनुभव असणारी कंपनीही रेल्वे स्थानक रिडेव्हलपमेंटचं काम करू शकेल."
मात्र, या दोन्ही क्षेत्रात अडाणी किंवा जीएमआरसारख्या कंपन्यांना अनुभव आहे का?
अदानी रेल्वे ट्रान्सपोर्ट लिमिटेड या कंपनीकडे रस्ते, रेल्वे, मेट्रो बनवण्याचा अनुभव आहे. अडाणीकडे देशातली सर्वात मोठी खाजगी रेल्वे लाईन आहे. (जवळपास 300 किमी.)
त्यांच्या मालाची पोर्ट, खाण आणि इतर बिजनेस हबपर्यंत ने-आण करण्यासाठी या रेल्वे मार्गाचा उपयोग होतो. इतकंच नाही तर नुकतंच देशातले 6 मोठे विमानतळ उभारण्याचं कामही त्यांना मिळालं आहे.
त्याचप्रमाणे जीएमआर जगातली चौथी मोठी एअरपोर्ट डेव्हलपर कंपनी मानली जाते. जीएमआरने दिल्ली, हैदराबादसह जगातल्या अनेक शहरात विमानतळ उभारले आहेत. इतकंच नाही तर इतरही अर्बन इन्फ्रास्ट्रक्टर बनवण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
रेल्वे स्थानक रिडेव्हलपमेंट योजना
वाढती लोकसंख्या आणि आधुनिक तंत्रज्ञान बघता केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने जवळपास 400 रेल्वे स्थानक रिडेव्हलप करण्याची योजना आखली आहे.

फोटो स्रोत, Hindustan Times
याअंतर्गत पहिल्या टप्प्यात स्थानकांचं काम तातडीने सुरू करण्याची गरज असणाऱ्या 123 रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याची योजना रेल भूमी विकास प्राधिकरण (RLDA) आणि इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडे देण्यात आली आहे. या संस्था रेल्वे मंत्रालया अंतर्गत येतात.
तर इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडे 61 स्टेशन डेव्हलप करण्याचं काम आहे. यात हबीबगंज, गांधीनगर, आनंद विहार आणि चंदिगड रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








