नखचिवन : जगातला सर्वाधिक 'आत्मनिर्भर' देश

नखचिवन

फोटो स्रोत, ANAR ALIYEV/GETTY IMAGES

    • Author, डेव्हिड मॅकआर्गल
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

तुम्ही कदाचित नखचिवन हे नाव कधी ऐकलं ही नसेल. अझरबैजानचं हे स्वायत्त गणराज्य ट्रान्स कॉकेशियन पठारावर स्थित आहे. या देशाच्या आजूबाजूला आर्मेनिया, इराण आणि तुर्कस्थान हे देश आहेत.

जुन्या सोव्हियत संघराज्यातला हा सगळ्यांत लांबचा प्रदेश आहे. या भागात पर्यटक अगदी क्वचितच दिसतात. अझरबैजान देश आणि त्याचं हे नखचिवन राज्य या दोन्हीच्या मध्ये 80-130 किलोमीटरचा आर्मेनियाचा पट्टा आहे जो या राज्याला आपल्या देशापासून अलग करतो.

हा जगातला सगळ्यांत मोठा भूवेष्टीत प्रदेश आहे आणि इथली लोकसंख्या आहे अंदाजे साडेचार लाख.

नखचिवन

फोटो स्रोत, TOGHRUL RAHIMLI

या प्रदेशाचं क्षेत्रफळ बालीइतकं आहे. इथे जुन्या सोव्हिएत काळातल्या इमारती आहेत. सोन्याने मढवलेल्या घुमटांच्या मशिदी आहेत आणि लोखंडाचा गंज असतो ना, तशा लालसर रंगाचे डोंगर आहेत. डोंगरावर बनवलेल्या एका मध्ययुगीन किल्ल्याला लोनली प्लॅनेटने 'युरेशियाचं माचूपिचू' असं म्हटलं होतं. नखचिवनमध्ये प्रेषित नोहा यांना दफन केलेलं आहे.

स्वच्छ राजधानी

नखचिवनची राजधानी अतिशय स्वच्छ आहे. इथे दर आठवड्याला सरकारी कर्मचारी झाडं लावतात आणि सफाई करतात.

नखचिवन

फोटो स्रोत, HEMIS/ALAMY

सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले तेव्हा सगळ्यात आधी इथे स्वातंत्र्याची घोषणा केली होती. पंधरा दिवसांनी या देश अझरबैजानमध्ये समाविष्ट झाला. अझरबैजानची राजधानी बाकूइथून विमानाने नखचिवन सिटीमध्ये पोहोचेपर्यंत मला याविषयी काहीही माहिती नव्हतं.

बाहेरील जगासाठी अनोळखी दुनिया

नखचिवनची सीमा नाटोचा सदस्य देश तुर्कस्थानला लागून आहे. हा देश इराणलाही लागून आहे त्यामुळे हा प्रदेश सोव्हिएत संघाचा भाग असूनही सोव्हिएत संघाच्या नागरिकांना इथे पोहचणं सहजासहजी शक्य नव्हतं.

सोव्हिएत संघातून बाहेर पडून 30 वर्षांनीही रशियन भाषा बोलणारे काय किंवा इतर देशांमधले नागरिक काय, सगळ्यांसाठी ही एक अनोळखी जागा आहे.

नखचिवन

फोटो स्रोत, MICROSTOCKHUB/GETTY IMAGES

अझरबैजानचा व्हीसा असेल तर कोणीही व्यक्ती इथे पोहचू शकते. तशी पर्यटकांसाठी ही जागा सुरक्षित आहे पण तरीही परदेशी व्यक्ती दिसल्या की इथले अधिकारी सतर्क होतात. मी आलो तेव्हा विमानतळावर अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून सांगितलं, "ते कदाचित तुझ्याचविषयी बोलत आहेत."

नखचिवन

फोटो स्रोत, KEREN SU/GETTY IMAGES

नखचिवनच्या स्वच्छ विमानतळावरून बाहेर आल्यानंतर मी टॅक्सी पकडली आणि इथलं दुसरं मोठं शहर असणाऱ्या ऑडुबर्डच्या दिशेने निघालो.

चकचकीत मर्सिडीज चालवणारे मिर्झा इब्राहिमोव गाईडचं कामही करतात. शहरातल्या आरशासारख्या लख्ख रस्त्यांवरून जाताना त्यांनी म्हटलं की, "तुम्हाला इथे कचऱ्याचा लवलेशही दिसणार नाही."

रस्त्यातल्या एका अष्टकोनी मिनाराने माझं लक्ष वेधलं. इस्लामिक शैलीत बनलेल्या या मिनारावर संगमरवरी टाईल्स लावल्या आहेत. इब्राहिमोवने सांगितलं की स्थानिक लोकांच्या मनात या जागेचं विशेष स्थान आहे. याला नोहाचा मकबरा म्हणतात आणि स्थानिक लोकांची श्रद्धा आहे की प्रेषित नोहा यांना या जागी दफन केलं आहे. ही जागा त्या पाच जागांपैकी एक आहे जिथे प्रेषित नोहा यांचं दफन झालंय असं समजतात.

काही तज्ज्ञांच्या मते नखचिवन हा शब्द दोन अर्मेनियन शब्दांपासून तयार झाला आहे, ज्यांचा अर्थ होतो 'वंशजांची जागा'.

स्थानिक कथा

काहींच्या मते नखचिवन हा शब्द जुन्या फारसीच्या दोन शब्दांपासून बनला आहे, नख (नोहा) आणि चिवन (स्थान) ज्याचा अर्थ होतो 'नोहा यांचं ठिकाण'.

नखचिवन

फोटो स्रोत, HEMIS/ALAMY

इथल्या लोककथांनुसार जेव्हा जग बुडवणाऱ्या प्रलयाचं पाणी ओसरलं तेव्हा नोहा यांनी आपली नाव इथल्या इलेंडाग पर्वतावर थांबवली. त्यांच्या खूणा अजूनही पर्वताच्या शिखरावर दिसतात. नखचिवनचे अनेक लोक तुम्हाला सांगतील की नोहा आणि त्यांच्या अनुयायांनी आपलं नंतरचं जीवन तिथेच व्यतीत केलं आणि नखचिवनचे लोक त्यांचेच वंशज आहेत.

गेल्या 7500 वर्षांत इथल्या लोकांवर पर्शियन, ऑटोमन आणि रशियन साम्राज्यांनी राज्य केलेलं आहे.

आर्मेनियाशी युद्ध

1988 मध्ये सोव्हिएत संघाची ताकद कमी होत होती तेव्हा दक्षिण-पश्चिम अझरबैजानमध्ये नखचिवनच्या जवळ नागोर्नो-कारबाखमध्ये आर्मेनियातल्या वांशिक समुहांनी अझरबैजानशी युद्ध पुकारलं. 1994 मध्ये हे युद्ध थांबेपर्यंत जवळपास 30,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

नखचिवन

फोटो स्रोत, ANAR ALIYEV/GETTY IMAGES

1988 मध्ये या युद्धाचा परिणाम म्हणून आर्मेनियाने नखचिवनचे अझरबैजानकडे जाणारे रस्ते, रेल्वेमार्ग सगळं बंद केलं आणि पुरेपूर नाकाबंदी केली. इराण आणि तुर्कस्तानकडे जाणाऱ्या आरस नदीवर बनवलेल्या दोन पुलांनी नखचिवनला भूकेकंगाल होण्यापासून वाचवलं.

या नाकाबंदीमुळे नखचिवनमध्ये राहाणाऱ्या लोकांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना तयार झाली. आर्थिकदृष्ट्या आपल्या शेजाऱ्यांच्या मदतीवर अवलंबून राहाण्यापेक्षा त्यांनी अन्नधान्यात स्वयंपूर्ण व्हायचं ठरवलं.

आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांनी आपल्याच देशात बनवायचं ठरवलं. 2005 मध्ये कच्च्या तेलामुळे अझरबैजानचं उत्पन्न आणि जीडीपी वाढला तेव्हा नखचिवनमध्ये अजून गुंतवणूक झाली. यामुळे आत्मनिर्भरतेची राष्ट्रभावना आणखीनच विकसीत झाली.

नखचिवन

फोटो स्रोत, DAVID MCARDLE

उत्तर कोरियाप्रमाणेच अझरबैजानचं हे भूवेष्टीत स्वायत्त गणराज्य जगातल्या काही मोजक्या उदाहरणांपैकी एक आहे जे आर्थिकदृष्ट्या कोणत्याही बाहेरच्या देशावर, कोणाच्या मदतीवर किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारावर अवलंबून नाही.

आरोग्यदायक अन्न

इथे जेवणाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. इराणच्या सीमेजवळ दुपारचं जेवण करत असताना इब्राहिमोवचे मित्र एलशाद हसानोव मला म्हणाले की, "आम्ही या संपूर्णपणे नैसर्गिक, पोषणतत्त्वांनी भरलेलं अन्न खातो, कारण तसं करणं आम्हाला शक्य आहे. आता आम्ही पूर्वीसारखे आजारांनी ग्रस्त नाही."

1981 सुमारास नाकाबंदीमुळे झालेली अन्नाची टंचाई त्यांच्या स्मरणात अजूनही ताजी आहे. पण त्यानंतर नखचिवनने आपलं स्वतःचं अन्नधोरण ठरवलं. शेतीत कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घातली आणि संपूर्णपणे ऑरगॅनिक खाणं स्वीकारलं.

नखचिवन

फोटो स्रोत, DAVID MCARDLE

लोकांना आरोग्याविषयी जागरूक केलं गेलं. तिथल्या लोकांनी स्थानिक जातीच्या जनावरांचं मासं, स्थानिक नदीतले ताजे मासे खावे यासाठी प्रोत्साहन दिलं. आता नखचिवनचे लोक जे खातात ते सगळं स्थानिकच असतं.

पर्वतांच्या जवळ असणाऱ्या जंगलांमधून हिरव्या भाज्या आणि मसाले येतात. देशातला समुद्रकिनारा नाही, मग मीठाचं काय? तर इथलं मीठही इथल्या स्थानिक भूमिगत गुहांमधून येतं.

आम्ही जेवायला बसलो तेव्हा मांस, चीझ, भाज्या, ताजी मासळी, बीयर आणि व्होडका असं सगळं वाढलं होतं. व्होडकामध्ये स्थानिक जंगलांमध्ये सापडणाऱ्या जवळपास 300 प्रकारच्या औषधी वनस्पती घातल्या होत्या ज्याने कुठल्या ना कुठल्या आजारावर इलाज होतो.

केव्ह थेरेपी

मी एक मोठा टमाटा खायला घेतला. त्याची चव फारच अप्रतिम होती. नखचिवनचे लोक संकरित वाणं खात नाहीत, जे आहे ते सगळं नैसर्गिक. इतकंच नाही, राजधानीपासून 14 किलोमीटर अंतरावर डजडाग नावाची एक गुहा आहे, तिथल्या एका मीठाच्या खाणीत उपचारकेंद्र आहे.

नखचिवन

फोटो स्रोत, HEMIS/ALAMY

इथलं नैसर्गिक खनिज मीठ दम्यापासून ब्राँकायटिसपर्यंत अनेक श्वसनाचे विकार दूर करतं असा दावा केला जातो. इब्राहिमोव आणि मी त्या अंधाऱ्या गुहेत उतरलो तर बाहेरची 30 डिग्री तापमानाची उष्णता जणू काही पळून गेली. इब्राहिमोव यांनी मोठ्ठा श्वास घेतला. खूप धुम्रपान करणाऱ्या इब्राहिमोव यांना या गुहेचा फायदा झाला होता.

"इथे जगाच्याा कानाकोपऱ्यातून माणसं इलाजासाठी येतात. मागच्यावर्षी उरूग्वेहून आलेल्या एका माणसाला दम्याचा प्रचंड त्रास होता. तो माणूस इथून बरा होऊन गेला," त्यांनी मला सांगितलं.

साप्ताहिक साफसफाई

इथले रस्ते आणि गल्ल्या लख्ख दिसतात. झाडांची चांगल्याप्रकारे छाटणी केलेली दिसते. रस्त्यांवर इतकासाही पालापाचोळा दिसत नाही. नॉर्वेजियन हेलसिंकी कमिटीच्या विस्तृत रिपोर्टनुसार याचं सगळं श्रेय इथल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जातं. ते सुट्टीच्या दिवशी स्वखुशीने रस्तेसफाईच्या कामात मदत करतात.

नखचिवन

फोटो स्रोत, DENIS DOYLE/GETTY IMAGES

नाकाबंदीच्या काळात लोकांनी इंधन मिळावं म्हणून झाडं तोडली होती. त्याची भरपाई म्हणून आता इथले लोक झाडं लावतात. एका शनिवारच्या सकाळी इब्राहिमोव यांनी एका शेताजवळ गाडी थांबवली आणि तिथे काम करणाऱ्या लोकांकडे इशारा केला.

"ते लोक फळांची झाडं लावत आहेत. हे काम करण्यासाठी त्यांना कोणी पैसै दिलेले नाहीत. इथे प्रत्येक झाडाबरोबर ऑक्सिजनची पातळी वाढते. लोकांची फुप्फुसं मजबूत होतात आणि स्वादिष्ट फळंही आम्हाला मिळतात."

स्वखुशीने काम की मजबूरी?

नॉर्वेजियन हेलसिंकी कमिटीच्या त्या रिपोर्टनुसार ज्या सरकारी कर्मचाऱ्याची हे 'स्वैच्छिक' काम करण्याची इच्छा नसते त्यांना सरकारी नोकरीचा तातडीने राजीनामा द्यावा लागतो.

आर्थिक विकास मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्याने ही गोष्ट मान्य केली. नखचिवन स्टेट विद्यापीठाच्या एका प्राध्यापकांच्यामते नखचिवनचे शासक वासिफ तालिबोब, ज्यांना अनेक लोक हुकूमशाह समजतात, या फुकट श्रमांमुळे भरपूर कमाई करत आहेत.

नखचिवन

फोटो स्रोत, DENIS DOYLE/GETTY IMAGES

माझ्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात मला लक्षात आलं की नखचिवन बरंचसं सिंगापूरसारखं आहे. तिथेही स्वस्त श्रम आणि सरकारची नाराजी यामुळे स्वच्छता केली जाते.

माझ्या दृष्टीने नखचिवन एक न सुटणारं कोडं आहे. - हा प्रदेश खरंच एक प्रगतीशील आणि आत्मनिर्भर आहे की याचं फक्त सोंग आणलं जातंय की सत्य या दोन्हीमध्ये कुठतरी आहे?

हे खरंच की इथली परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. सोव्हिएत काळासारखे इथे लोक दबून बोलत नाहीत, तर मोकळेपणाने बोलतात आणि बाहेरून आलेल्याचं स्वागतही करतात.

सरकारी कर्मचारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी इथे स्वतःहून श्रमदान करतात पण देशाचा जीडीपी गेल्या 15 वर्षांत 300 टक्क्यांनी वाढला आहे. इथले स्थानिक लोक स्वतःची ओळख एका परदेशातून आलेल्या प्रेषितामुळे आहे असं मानतात पण इथलं सरकार मात्र स्वतःला कवचबंद ठेवतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)