गाझा हॉस्पिटल हल्ला : ‘लोक अजूनही मृतदेहांचे तुकडे गोळा करतायेत’

    • Author, पॉल ब्राउन, जोशुआ चीथम, सीन सेडॉन आणि डानिएल पालुम्बो
    • Role, बीबीसी व्हेरिफाय

बीबीसीचे प्रतिनिधी रुश्दी अबू अलूफ यांनी गाझाच्या अल-अहली अरब बाप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी भेट दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, येथील लोक अजूनही मृतदेहांचे तुकडे गोळा करत आहेत.

गाझा शहरातील गजबजलेल्या अल-अहली रुग्णालयात झालेल्या भीषण स्फोटात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हमास-नियंत्रित गाझाच्या पॅलेस्टिनी प्रशासनाने तात्काळ या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरलं आणि याला जाणीवपूर्वक केलेला हल्ला म्हटलं.

मात्र, इस्रायलने या हल्ल्यात आपला सहभाग असल्याचे वृत्त फेटाळलं.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना, सत्य काय आहे, हे कळणे कठीण झालं आहे.

बीबीसी व्हेरिफाय या हल्ल्याशी संबंधित व्हीडिओ, छायाचित्रं आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांसह इतर पुराव्यांच्या मदतीने घटनेचे सर्व पैलू उजेडात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

याशिवाय घटनास्थळी भेट देणाऱ्या बीबीसीच्या वार्ताहराचीही मदत घेण्यात आली, जिथे लोकांना पोहोचणं खूप अवघड आहे.

या घटनेबाबत सतत काही ना काही नवीन माहिती समोर येत आहे. म्हणून जितक्या लवकर आम्हाला अधिक माहिती मिळेल किंवा आम्ही पुराव्यांबद्दल तज्ज्ञांशी बोलू. यासोबतच, वाचकांना माहिती देण्यासाठी आम्ही ही बातमी अपडेट करत राहू.

प्रत्यक्षात सुरू असलेल्या युद्धाव्यतिरिक्त माहितीच्या बाबतीत इंटरनेटवर एक वेगळेच युद्ध सुरू आहे, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.

स्फोटाबाबत इस्रायल किंवा गाझा प्रशासनाने वेगवेगळे दावे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्या दावे आणि विधानांवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत.

जेव्हा हल्ला झाला...

मंगळवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हॉस्पिटलमध्ये स्फोट झाला. सोशल मीडियावर 20 सेकंदाचा व्हीडिओ शेअर केला जात आहे, जो पाहिल्यावर लक्षात येतं की, स्फोटाच्या वेळचा हा पहिल्या व्हीडिओ पुराव्यांपैकी एक आहे.

यामध्ये तुम्हाला आकाशातून येणार्‍या एखाद्या प्रॉजेक्टाइल (हवेतून प्रक्षेपित केलेले शस्त्र) चा शीळ वाजवणारा आवाज ऐकू येतो. यानंतर स्फोट होतो आणि मोठी आग दिसते.

स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून59 मिनिटांनी अल-जझिरा मीडिया नेटवर्कवर प्रसारित केलेल्या थेट फुटेजमध्ये गाझाच्या आकाशात चमकणारा प्रकाश वरच्या दिशेने जाताना दिसत आहे. दिशा बदलण्यापूर्वी हा प्रकाश दोनदा वेगाने चमकतो आणि नंतर त्याचा स्फोट होतो.

त्यानंतर जमिनीवर एक स्फोट होताना दिसतो. त्यानंतर लगेच दुसरा मोठा स्फोट होतो, जो कॅमेरा ऑपरेटरजवळ होतो. कॅमेऱ्याचं नेमकं ठिकाण शोधण्यात आम्हाला यश आलं.

काही विश्लेषक मानतात की, हे कदाचित एक रॉकेट असावं, जे फुटताना दिसून येतोय.

सोशल मीडिया चॅनेलवरील इतर व्हीडिओंमध्ये तोच स्फोट वेगवेगळ्या कोनातून आणि दूरवरून दिसत आहे.

बीबीसीने शस्त्रास्त्रांबाबत काम करणाऱ्या 20 थिंक टँक, विद्यापीठं आणि कंपन्यांशी संवाद साधला. त्यापैकी नऊ जणांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, तर पाच जणांनी प्रतिसाद देण्यास नकार दिला आहे. मात्र, सहा तज्ज्ञांशी बोलण्यात आम्हाला यश आले.

आम्ही तज्ज्ञांना विचारलं की, हे पुरावे, जसे की स्फोटाचा आकार आणि त्यापूर्वीचा आवाज, यांच्या कारणाचा शोध लागू शकतो का?

या संदर्भात आतापर्यंत आम्ही कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलो नाही. तीन तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, इस्रायल साधारणपणे जास्त शस्त्रं वापरतो आणि असं काहीही इथं दिसलं नाही.

अमेरिकेच्या वँडरबिल्ट युनिव्हर्सिटीचे सहाय्यक प्राध्यापक आंद्रे गॅनन म्हणतात की, "असं दिसतं की हा स्फोट लहान होता, म्हणजेच स्फोटानंतर निर्माण होणारी उष्णता ही रॉकेटमधील उरलेले इंधन जाळल्यामुळे होती आणि स्फोटामुळे नाही. एखाद्या शस्त्राच्या स्फोटानंतर जसं होतं, तसं हे नाही."

ब्रिटनच्या रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटचे (आरयूएसआय) वरिष्ठ संशोधक जस्टिन ब्रँकही याच्याशी सहमत आहेत. एवढ्या लवकर निश्चितपणे काहीही सांगणे कठीण असल्याचे ते म्हणतात. परंतु ते असंही म्हणतात की, निकामी रॉकेटचा भाग कार पार्किंगवर पडल्यानंतर इंधनाला आग लागल्यानं हा स्फोट झाला.

गॅनन म्हणतात की, व्हीडिओ पाहून हे निश्चित केलं जाऊ शकत नाही की, हे ठिकाण आकाशातून पडलेल्या शस्त्राचं लक्ष्य होतं. ते म्हणतात की, आकाशात चमकलेल्या गोष्टीवरून वाटतं की, हे एखादं प्रक्षेपण रॉकेट होते, ज्याचं इंजिन जास्त गरम झाल्यानंतर काम करणं बंद केलं होतं.

रिस्क मॅनेजमेंट कंपनी सिबिलिनमधील मध्य पूर्व विश्लेषक व्हॅलेरी स्कूटो म्हणतात की, इस्रायल ड्रोन वापरुन हवेतून हल्ला करू शकतो आणि हेलफायर क्षेपणास्त्रं देखील वापरू शकतो.

हे क्षेपणास्त्र खूप उष्णता निर्माण करतं, पण ते जमिनीवर मोठे खड्डेही पाडतात. व्हॅलेरी म्हणतात की, उपलब्ध व्हीडिओ फुटेज हॉस्पिटलजवळ दिसलेल्या आगीच्या पॅटर्नशी जुळत नाही.

स्फोटाच्या ठिकाणाहून मिळाले पुरावे

सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या उपग्रह प्रतिमांसह अल अहली हॉस्पिटलमधील इमारतींच्या डिझाइनशी जुळवून, बीबीसीला पुष्टी करता आली की, हॉस्पिटलच्या जागेवरच हा स्फोट झाला.

उपलब्ध पुराव्यांवरून हा स्फोट रुग्णालयाच्या आवारात झाल्याचं समजतं. स्फोटानंतर घटनास्थळावरून काढलेल्या छायाचित्रांमध्ये रुग्णालयाच्या जवळील इमारतींना मोठं नुकसान झाल्याचं दिसत नाही. मात्र, फोटोंमध्ये जळलेल्या गाड्या दिसत आहेत.

हे रुग्णालय अँग्लिकन चर्चद्वारे चालवलं जातं. जेरुसलेममधील सेंट जॉर्ज कॉलेजचे डीन कॅनन रिचर्ड सेवेल यांनी बीबीसीला सांगितले की, सुमारे 1,000 विस्थापित लोकांनी हॉस्पिटलच्या आवारात आश्रय घेतला होता आणि स्फोट झाला, तेव्हा हॉस्पिटलमध्ये 600 रुग्ण आणि कर्मचारी उपस्थित होते.

पीडितांची स्थिती

बीबीसीचे प्रतिनिधी रुश्दी अबू अलूफ बुधवारी सकाळी अल अहली रुग्णालयात गेले. प्रत्यक्षदर्शींनी त्यांना विध्वंसाच्या अनेक दृश्यांबद्दल सांगितलं. काहींनी सांगितलं की, मृतदेह गोळा करण्याचं काम सुरू आहे.

एका व्यक्तीने त्यांना सांगितले की, स्फोट झाला तेव्हा महिला, मुलं आणि वृद्ध लोकही रुग्णालयात होते.

आम्ही पीडितांची छायाचित्रं आणि व्हीडिओंचं विश्लेषण करत आहोत. त्यांना कोणत्या प्रकारच्या जखमा झाल्या यावरून स्फोटाबाबत माहिती मिळू शकते.

बीबीसीने पाहिलेली पीडितांची छायाचित्रं हृदय पिळवटून टाकणारी आहेत. अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे.

UK मधील फिजिशियन्स फॉर ह्युमन राइट्स या संस्थेचे संस्थापक पॅथॉलॉजिस्ट डेरिक पाउंडर यांनी पीडितांची काही छायाचित्रं पाहिली आहेत.

स्फोटानंतर सोडलेल्या बॉम्बच्या तुकड्यांमुळे मृतांच्या शरीरावर जखमेच्या खुणा दिसत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

मात्र, पीडितांच्या छायाचित्रांवरून हे स्पष्टपणे सांगता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण पुष्टी करता येणारी फारच कमी छायाचित्रं आहेत.

पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी झालेल्या स्फोटात 471 जणांचा मृत्यू झाला.

त्याचवेळी, इस्रायली लष्कराने सांगितले की, ही संख्या अतिशयोक्तीपूर्ण आहे. मात्र, इस्रायली लष्कराने आपल्या बाजूने मृतांची संख्या जाहीर केलेली नाही.

स्वतंत्र संस्थांना या भागात भेट देणे अद्याप शक्य झालेलं नाही. अशा स्थितीत मृतांचा नेमका आकडा किती याची माहिती निश्चित करणं कठीण आहे.

आपल्याला अजून कोणत्या गोष्टी माहित नाहीत?

स्फोटानंतर पडलेला खड्डा कसा आहे, हा यातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) च्या माहितीनुसार, मोठे खड्डे नसणे आणि स्फोटामुळे शेजारच्या इमारतींचं नुकसान न होणं यामुळे हे सिद्ध होतं की स्फोट त्यांच्या शस्त्रांमुळे झाला नाही.

आपण स्फोटोच्या ठिकाणी एक लहान खडड् पाहू शकतो. तिथले खड्डे इतर कशाचे नाहीत ना, हेही आम्ही तपासत आहोत.

अजून एक पुरावा जो अजून सापडला नाही, तो म्हणजे क्षेपणास्त्राचे तुकडे.

एअर-लाँच केलेली शस्त्रं बहुतेक वेळा त्यांच्या शेलद्वारे ओळखली जातात. यावरून ते कोठून लॉन्च झालं हे कळू शकतं. मात्र, आतापर्यंत यातला कोणताही पुरावा मिळालेला नाही.

इस्रायली लष्कराने एक रेकॉर्डिंग प्रसिद्ध केलं असून त्यात दावा केला आहे की, त्यात हमासचे दोन सैनिक हे कबूल करत आहेत की पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद (पीआयजे) नावाच्या संघटनेने हे शस्त्र डागलं होतं.

पीआयजे हा हमासनंतर गाझामधील दुसरा सर्वांत मोठा पॅलेस्टिनी कट्टरतावादी गट आहे आणि त्याने 7 ऑक्टोबरला इस्रायलवरील हल्ल्याचे समर्थन केलं होतं.

हे रेकॉर्डिंग स्वतंत्रपणे तपासणे शक्य झालेलं नाही.

मात्र, पीआयजेने एक निवेदन जारी करून या स्फोटासाठी इस्रायलला जबाबदार धरलं आहे.

(वृत्तांकनासाठी सहकार्य : व्हिज्युअल जर्नलिझम टीम, टॉम स्पेन्सर, शायन सरदारीजादेह, एम्मा पेंगाली आणि जेमी रायन)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)