इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाचा जवळपास 100 वर्षांचा इतिहास काय आहे?

इस्रायल आणि हमासमध्ये पेेटलेेल्या संघर्षात गाझातले सामान्य नागरीक होरपळत आहेत.

7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासनं केलेल्या हल्ल्यानंतर या युद्धाची सुरुवात झाली होती. सात महिन्यांनंतरही युद्ध थांबलेलं नाही. शांततेच्या वाटाघाटीही मध्येच अडकल्या आहेत.

आता 14 मे आणि 15 मे हेे या प्रदेशातल्या इतिहासातले दोन महत्त्वाचे दिवस आहेत. कारण याच सुमारास 76 वर्षांपूर्वी इस्रायलचीी स्थापना झाली होती आणि त्याबरोबरच लाखो पॅलेस्टिनींवर बेघर होण्याची वेळही ओढवली होती.

14 मे 1948 रोजी हा देश अस्तित्वात आला. पण इस्रायल आणि पॅलेेस्टिनींमधला संघर्ष त्याआधीपासूनचा आहे.

1948 पूर्वी इस्रायल कुठे होतं? बाल्फोर घोषणा काय होती?

पहिल्या महायुद्धात मध्यपूर्वेतील ऑटोमन साम्राज्याचा पराभव झाल्यानंतर ब्रिटनने पॅलेस्टाईन म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्षेत्राचा ताबा घेतला.

या भूमीवर अल्पसंख्याक ज्यू, बहुसंख्य अरब आणि इतर लहान वांशिक गटांचे वास्तव्य होतं.

आंतरराष्ट्रीय समुदायाने पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांचा देश स्थापण्याची जबाबदारी ब्रिटनला दिली होती. यामुळे या दोन्ही गटांमधील संघर्ष वाढला.

ऑटोमन शासकांचा पहिल्या महायुद्धात पराभव होता होता ब्रिटनने ‘बाल्फोर जाहीरनामा’ आणला.

1917 साली ब्रिटनचे तत्कालीन परराष्ट्र सचिव आर्थर बाल्फोर यांनी ब्रिटनच्या ज्यू समुदायाला उद्देशून एक जाहीरनामा आणला.

1922 मध्ये नवीन निर्मित लीग ऑफ नेशन्सने या जाहीरनाम्याचं समर्थन केलं होतं.

ज्यूंसाठी पॅलेस्टाईन हे त्यांचं वडिलोपार्जित घर होतं. पण पॅलेस्टिनी अरबांनीही या जमिनीवर हक्क सांगितला आणि या निर्णयाला विरोध केला.

1920 आणि 1940 च्या दरम्यान, या भागात राहणाऱ्या ज्यूंची संख्या वाढली. कारण नाझी होलोकॉस्टमुळे युरोपमधले ज्यू पळून जात होते, पण अनेक देशांची दार त्यांना बंद होती. त्यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनचा आसरा घेतला.

या सगळ्यामुळे ज्यू आणि अरब यांच्यातील हिंसाचार वाढू लागला. शिवाय ब्रिटिश राजवटी विरोधातही असंतोष वाढू लागला.

इस्रायलची निर्मिती कशी आणि का झाली?

1947 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाईनचं स्वतंत्र ज्यू आणि अरब राष्ट्रांमध्ये विभाजन करण्याच्या बाजूनेेे मतदान केलं. तर जेरुसलेम हे आंतरराष्ट्रीय शहर असेल, असा ठराव आणला.

ज्यू लोकांनी या करारास मान्यता दिली होती. मात्र अरबांनी या फाळणीला मान्यता दिली नाही आणि त्यामुळे याची अंमलबजावणी झालीच नाही. ज्यू आणि अरब यांच्यातील लढाई तीव्र होऊ लागली.

1948 मध्ये या समस्येचं निराकरण करण्यात ब्रिटनला अपयश आल्याने त्यांनी यातून माघार घेतली. आणि ज्यू नेत्यांनी इस्रायल देशाच्या निर्मितीची घोषणा केली.

छळातून पळून येणाऱ्या ज्यूंसाठी सुरक्षित आश्रयस्थान निर्माण करणं तसंच ज्यूंसाठी राष्ट्रीय भूमी तयार करण्याचा हेतू यामागे होता. तर पॅलेस्टिनींना हे त्यांच्या हक्कावरचं अतिक्रमण वाटलं.

नकबा काय होतं?

इस्रायलने स्वतंत्र देश घोषित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाच अरब देशांनी त्यांच्यावर हल्ला केला.

इस्रायलची निर्मिती आणि हे युद्ध यांमुळे लाखो पॅलेस्टिनींना घरं सोडून पळून जावं लागलं.

इस्रायलच्या वाटच्या प्रदेशात राहणारे सुमारे 7,50,000 पॅलेेस्टिनी रातोरात निर्वासित झाले. अनेकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आलं.

याला ते 'नकबा' म्हणजेच ‘मोठा अनर्थ’ किंवा 'मोठी आपत्ती' म्हणतात.

पुढच्या वर्षी युद्धविराम झाला. यात इस्रायलने बहुतेक भूभाग काबीज केला होता.

ओल्ड जॉर्डनने वेस्ट बँक म्हणून ओळखली जाणारी जमीन ताब्यात घेतली आणि इजिप्तने गाझा ताब्यात घेतला.

जेरुसलेम हे शहर पश्चिमेकडील इस्रायली सैन्यात आणि पूर्वेकडील जॉर्डन सैन्यांमध्ये विभागले गेले.

युद्धानंतर शांतता करार झाला नव्हता, त्यामुळे पुढच्या काही दशकांमध्ये अनेक युद्धं झाली.

1967 मध्ये झालेल्या युद्धात, इस्रायलने पूर्व जेरुसलेम, वेस्ट बँक, सीरियातल्या गोलन हाइट्स, गाझा आणि इजिप्तच्या सिनाई द्वीपकल्पातील बहुतांश भाग ताब्यात घेतला.

यामुळे बहुतेक पॅलेस्टिनी पुन्हा निर्वासित झाले. आज त्यांचे वंशज गाझा, वेस्ट बँक तसेच शेजारच्या जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनमध्ये आश्रित म्हणून राहतात.

त्यांना किंवा त्यांच्या वंशजांना इस्रायलने त्यांच्या घरी परतण्याची परवानगी दिलेली नाही. इस्रायलचं म्हणणं आहे की यामुळे ज्यू राज्य म्हणून त्यांचं अस्तित्व धोक्यात येईल.

इस्रायलने अजूनही वेस्ट बँक व्यापला आहे आणि संपूर्ण जेरुसलेमवर आपला दावा केला आहे. तर पॅलेस्टिनी लोक पूर्व जेरुसलेम ही भविष्यातील पॅलेस्टिन राज्याची राजधानी असेल असा दावा करतात. या शहराला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देणाऱ्या मूठभर देशांमध्ये अमेरिका देखील आहे.

गेल्या 50 वर्षांत इस्रायलने वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममध्ये वसाहती तयार केल्या आहेत. इथे आता 700,000 हून अधिक ज्यू राहतात.

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ही वसाहत बेकायदेशीर आहे, असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि ब्रिटनचं म्हणणं आहे. मात्र इस्रायलने हे नाकारलं आहे.

गाझा पट्टी म्हणजे काय?

गाझा हा इस्रायल आणि भूमध्य समुद्राच्या दरम्यान असलेला जमिनीचा एक अरुंद पट्टा आहे. तर दक्षिणेेला गाझाचा छोटा भाग इजिप्तसोबत सीमेलगत आहे.

गाझाचा आकार मुंबईपेक्षा साधारण निम्मा आहे. फक्त 41 किलोमीटर (25 मैल) लांब आणि 10 किलोमीटर रुंद असलेल्या या गाझा पट्टीत वीस लाखांहून अधिक लोक राहतात. हे ठिकाण जगातील सर्वात दाट लोकवस्तीच्या ठिकाणांपैकी एक आहे.

1948-49 च्या युद्धानंतर गाझा पट्टी 19 वर्षं इजिप्तच्या ताब्यात होती.

इस्रायलने 1967 च्या युद्धात गाझा पट्टी आपल्या ताब्यात घेतली आणि 2005 पर्यंत ती त्यांच्या ताब्यात होती. याच काळात इथे ज्यूंच्या वसाहती उभारल्या.

इस्रायलने 2005 मध्ये आपलं सैन्य आणि वसाहती माघारी घेतल्या. तिथे पॅलेेस्टिनी संघटना सत्तेेत आल्या. मात्र हवाई क्षेत्र, सीमा आणि किनारपट्टीवर आपलं नियंत्रण ठेवलं. हा भूभाग इस्रायलने व्यापलाय, असं संयुक्त राष्ट्र अजूनही मानतं.

सध्या गाझावर हमासचं नियंत्रण आहे तर वेेस्ट बँकमध्ये पॅलेेस्टिनी प्राधिकरण (पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचं सरकार) आहे.

इस्रायली आणि पॅलेस्टिनी यांच्यातील मुख्य समस्या काय आहेत?

असे अनेक मुद्दे आहेत ज्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होऊ शकत नाही.

  • पॅलेस्टिनी निर्वासितांचे काय करायचं?
  • इस्रायने व्यापलेल्या वेस्ट बँकमधील ज्यू वस्त्या राहाव्यात की काढून टाकाव्यात?
  • दोन्ही बाजूंनी जेरुसलेम शहराची वाटणी करावी का?

पण यात सर्वांत अवघड आहे ते इस्रायलच्या बाजूने पॅलेस्टिनी राज्य निर्माण करावं की नाही?

या समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न झाले आहेत?

इस्रायल-पॅलेस्टाईन मध्ये समेट घडवून आणण्यासाठी 1990 आणि 2010 च्या दरम्यान प्रयत्न झाले होते. पण पुढे हिंसाचार उफाळून आल्यानंतर ते प्रयत्न बंदही झाले.

सुरुवातीच्या काळात वाटाघाटीद्वारे शांतता शक्य वाटत होती. 1993 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या अध्यक्षतेखाली व्हाईट हाऊसमध्ये याविषयी चर्चा करण्यात आली होती.

याच ऐतिहासिक क्षणी, पॅलेस्टिनींनी इस्रायल देशाला मान्यता दिली आणि इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांचा एकमेव प्रतिनिधी म्हणून पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) या त्यांच्या शत्रूला मान्यता दिली. त्यानंतर पॅलेस्टिनी प्राधिकरण स्थापन करण्यात आलं.

मात्र, इस्रायलचे तत्कालीन विरोधी पक्षनेते बेंजामिन नेतन्याहू यांनी ओस्लो करार इस्रायलसाठी प्राणघातक असल्याचं म्हटलं. यामुळे इस्रायलने व्यापलेल्या पॅलेस्टिनी प्रदेशात ज्यूंना वसवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना गती मिळाली.

अलीकडेच उदयास आलेल्या पॅलेस्टिनी कट्टरतावादी गट हमासने इस्रायलमधील लोकांना मारण्यासाठी आत्मघाती बॉम्बर्स पाठवले आणि करारावर पाणी फेरलं.

4 नोव्हेंबर 1995 रोजी इस्रायलचे पंतप्रधान यित्झाक राबिन यांची ज्यू कट्टरतावाद्यांनी हत्या केल्याने इस्रायलमधील वातावरण तणावपूर्ण बनलं.

2000 च्या दशकात पुन्हा एकदा शांतता प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी 2003 मध्ये अंतिम उद्दिष्टासह एक रोडमॅप तयार केला होता, परंतु त्याची अंमलबजावणी कधीच झाली नाही.

2014 साली वॉशिंग्टनमध्ये इस्रायली आणि पॅलेस्टिनी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आणि त्यामुळे शांततेचे प्रयत्न शेवटी थांबले.

सर्वांत अलीकडील शांतता चर्चा ही डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना झाली होती. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी याला "द डील ऑफ द सेंच्युरी" म्हणून संबोधलं होतं. पण ही योजना एकतर्फी असल्याचं पॅलेस्टिनींचं म्हणणं होतं, त्यामुळे त्यांनी ही योजना फेटाळून लावली.

इस्रायल आणि गाझा यांच्यात युद्ध का सुरू आहे?

आज घडीला गाझा पट्टी ही इस्रायलच्या नाशासाठी कटिबद्ध असलेल्या इस्लामी कट्टरतावादी गट हमासच्या ताब्यात आहे.

हमासने 2006 साली पॅलेस्टाईनमध्ये निवडणुका जिंकल्या आणि गाझावर ताबा मिळवला.

तेव्हापासून, गाझामधील कट्टरतावाद्यांनी इस्रायलशी अनेक युद्धं केली आहेत. त्यामुळे इस्रायलने हमासला इजिप्तपासून वेगळं करण्यासाठी गाझा पट्टीवर आंशिक नाकेबंदी कायम ठेवली आहे आणि हल्ले थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यांमध्ये इस्रायली शहरांवर रॉकेटचा अंदाधुंद मारा केला गेला.

गाझामधील पॅलेस्टिनींचं म्हणणं आहे की इस्रायलचे निर्बंध आणि मोठ्या लोकसंख्येच्या भागांवर त्यांचे हवाई हल्ले सामूहिक शिक्षेसारखे आहेत.

वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधील पॅलेस्टिनींसाठी मागचं वर्ष (2022-23) सर्वांत घातक वर्ष ठरलं आहे. इस्रायलींवरील प्राणघातक हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून इथे निर्बंध लादले गेलेत. शिवाय लष्करी कारवाया केल्या जात असल्याचीही त्यांची तक्रार आहे.

पॅलेस्टिनी कट्टरतावादी गट हमासने गेल्या शनिवारी (7 ऑक्टोबर) इस्रायलवर अनपेक्षित असा हल्ला केला. शेकडो बंदूकधारी गाझा पट्टीजवळ घुसखोरी करत होते.

या हल्ल्यात शेकडो इस्रायली ठार झाले, गाझामध्ये महिला आणि मुलांसह, सैनिक आणि नागरिकांना ओलिस ठेवण्यात आलंय.

यावर प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हजारो पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायलने अन्न, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळू नयेत म्हणून या भागात संपूर्ण नाकाबंदी केली .

तेव्हापासून गाझामध्ये अभूतपूर्व संघर्ष पेटला आहे.

हेही वाचलंत का?