गिफ्टच्या नादात लिंक उघडली आणि 51 लाख रुपये गमावले; ऑफरला भुललेल्या महिलेसोबत नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बिस्मा फारूक
- Role, बीबीसी उर्दू डॉट कॉम, दिल्ली
डिजिटल युगात सर्व कामं ऑनलाइन होत असताना ऑनलाइन फ्रॉड हे एक मोठं चिंतेचं कारण ठरतं आहे. सायबर गुन्हेगार ऑनलाइन फ्रॉडचे वेगवेगळे मार्ग अवलंबत अनेकांची फसवणूक करत आहेत.
मोफत गिफ्ट व्हाउचर आणि गुंतवणुकीतून झटपट मोठा नफा कमावण्याचं आमिष दाखवून एका महिलेची मोठी आर्थिक फसवणूक करण्याचं प्रकरण घडलं आहे.
हे प्रकरण नेमकं काय आहे, कोणकोणत्या प्रकारे सायबर गुन्हेगार गंडा घालत आहेत आणि त्यापासून कसा बचाव करावा, हे जाणून घेऊया.
दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडामध्ये अॅमेझॉनच्या गिफ्ट व्हाउचरच्या नावानं सायबर फ्रॉडचं प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेची फसवणूक करून तिला 51 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.
ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या मीनू रानी यांना काही अज्ञात लोकांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केलं. त्यानंतर या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये महिलांना एक व्हाउचर शेअर करण्यात आलं.


याच ग्रुपमध्ये अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटचं मोफत व्हाउचर देण्याचं सांगून ग्रुपमधील लोकांचा विश्वास जिंकण्यात आला. त्यानंतर 51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या ऑनलाइन फ्रॉडला बळी पडल्यानंतर 8 मार्च 2025 ला मीनू रानी यांनी सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
कशी झाली फसवणूक?
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पीडित मीनू रानी यांना आधी हरि सिंह नावाच्या एका व्यक्तीनं सोशल मीडियावर संपर्क केला.
त्यावेळी हरी सिंहनं स्वत:ची ओळख 15 वर्षांचा अनुभव असलेला गुंतवणूक सल्लागार म्हणून करून दिली. यानंतर मीनू रानी यांच्याशी बोलून त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी तयार करण्यात आलं.
मीनू रानी यांनी सांगितलं की, या ग्रुपमध्ये लोक शेअर बाजारात यशस्वी गुंतवणूक करण्याच्या पद्धतींबद्दल चर्चा करतात. शेअर बाजारातून भरघोस परतावा मिळवण्याच्या मोहामुळे मीनू रानी हरि सिंहच्या सापळ्यात अडकल्या आणि या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी झाल्या.
मीनू रानी यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, काही काळानंतर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये त्यांचा संपर्क आरती सिंह यांच्याशी झाला.

फोटो स्रोत, Getty Images
आरती सिंहनं त्यांना सांगितलं की, गुंतवणुकीसंदर्भात ग्रुपमधील प्रत्येक महिलेला मदत करण्यासाठी हरी सिंहनं एक हजार रुपयांचे अॅमेझॉनचे गिफ्ट व्हाउचर विकत घेतले आहे.
यानंतर आरतीनं मीनू यांना हे गिफ्ट व्हाउचर मिळवण्यासाठी त्यांच्या अॅमेझॉन अकाउंटमध्ये लॉग इन करायला सांगितलं.
त्याप्रमाणे मीनू यांनी लॉग इन केलं. त्यानंतर त्यांना त्यांच्या अॅमेझॉन अकाउंटमध्ये एक हजार रुपये जमा झाल्याचं दिसलं.
यामुळे हरि सिंह आणि त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मीनू रानी यांचा विश्वास वाढला. यानंतर या ठगांनी शेअर बाजारात पैसे गुंतवून एका महिन्यात तीन ते पाच पट नफा मिळवण्याचं आमिष दाखवलं.
बनावट अॅपवर परतावा दाखवून केली फसवणूक
पोलीस उपायुक्त (सायबर क्राइम) प्रीती यादव यांनी पीटीआयला सांगितलं की, हरी सिंहनं मीनू रानी यांना सुरुवातीला शेअर बाजारात 50 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितलं.
मीनू रानी यांनी त्यांना देण्यात आलेल्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यानंतर, त्यांना एका अॅपमध्ये त्यांच्या गुंतवणुकीवर मिळालेला 'परतावा' दाखवण्यात आला. त्यानंतर हरी सिंहनं मीनू यांना ते अॅप डाउनलोड करण्यास सांगितलं.
अॅपवर परतावा दाखवण्यात आल्यानंतर मीनू यांच्या मनात आणखी पैशांची गुंतवणूक करण्याचा आणि घरातील इतर लोकांचे पैसे यात गुंतवण्याचा विचार आला.

फोटो स्रोत, Getty Images
मीनू यांनी या गुंतवणूक योजनेवर विश्वास ठेवत त्यात गुंतवण्यासाठी त्यांचे पती, सासू आणि इतर नातेवाईकांकडून पैसे उसणे घेतले.
हा फ्रॉड करणाऱ्यांनी खूपच चलाखीनं मीनू रानी यांचा विश्वास संपादन केला. तसंच मीनू यांच्या आणखी नफा किंवा परतावा मिळवण्याच्या इच्छेचा गैरवापर केला. अधिक परतावा मिळवण्याच्या मोहापायी मीनू यांनी यात आणखी पैसे गुंतवण्याच्या धोक्याकडे दुर्लक्ष केलं.
नातेवाईकांकडे उसनवार पैसे मागितल्यावर उघड झाली फसवणूक
पोलीस अधिकारी प्रीती यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी गुंतवणुकीतून फायदा दाखवण्यासाठी एका बनावट अॅपचा वापर केला आणि पीडित महिलेला आणखी पैसे गुंतवण्याचं आमिष दिलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनू रानी यांनी आणखी गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडे उसनवार पैसे मागितले, तेव्हा हा ऑनलाइन फ्रॉड उघड झाला.
मीनू रानी यांनी जेव्हा त्यांच्या एका परिचिताकडे उसनवार पैसे मागितले, तेव्हा त्या व्यक्तीनं अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या स्कीमबद्दल मीनू यांना संपूर्ण माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर मीनू रानी यांनी त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी त्या ठगांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
त्यानंतर मीनू यांना त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. मात्र जास्त पैसे मिळवण्याच्या मोहात तोपर्यंत त्यांनी या स्कीममध्ये 51 लाख रुपये लावले होते.
सायबर क्राइम पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत पीडित महिलेनं गमावलेल्या रकमेपैकी चार लाख ऐंशी हजार रुपये गोठवले आहेत. तर उर्वरित रक्कम परत मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
भारतात ऑनलाइन आर्थिक फ्रॉडची वाढती प्रकरणं
भारतात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचं हे काही पहिलंच प्रकरण नाही. मात्र लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन सापळे तयार करत आहेत.
या प्रकरणात या गुन्हेगारांनी पीडित महिलेचा विश्वास जिंकण्यासाठी अॅमेझॉनच्या मोफत व्हाउचरचा वापर केला. तसंच बनावट अॅपचा वापर करून त्या महिलेची फसवणूक केली. ते एक फिशिंग अॅप होतं.
सायबर गुन्हेगार अनेकदा सोशल मीडिया किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करतात. या प्रकारचे फ्रॉड दिल्लीसह देशातील इतर भागातदेखील झाले आहेत.

फोटो स्रोत, cybercrime.gov.in
भारत सरकारनं सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये तत्काळ कारवाई करण्यासाठी एक पोर्टल देखील तयार केलं आहे.
https://cybercrime.gov.in/Hindi/Accepthn.aspx या पोर्टलवर या प्रकरणाच्या फ्रॉडची तक्रार दाखल करता येते.
सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत 1930 हा हेल्पलाइन क्रमांक आहे. याशिवाय 112 हा राष्ट्रीय पोलीस हेल्पलाइन क्रमांक आहे आणि 181 या राष्ट्रीय महिला हेल्पलाइन क्रमांकावर देखील मदत मागता येते.
अनेक प्रकारे होतात सायबर फ्रॉड
दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम युनिटनं त्यांच्या वेबसाईटवर फेक शॉपिंग वेबसाईटचा उल्लेख करत लिहिलं आहे की ही एक नवी पद्धत आहे. सायबर फ्रॉड करणारे ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी या प्रकारच्या वेबसाईटचा वापर करत आहेत.
1. ऑनलाइन फ्रॉड करणारे एखाद्या मोठ्या ब्रॅंड किंवा इतकंच काय, एखाद्या मोबाईल फोन कंपनीच्या खऱ्या वेबसाईटसारखी दिसणारी वेबसाईट बनवतात आणि स्वस्तात वस्तू विकतात.
ते ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगतात. एकदा का पेमेंट झालं की मग त्या ग्राहकाला ऑर्डर दिलेली वस्तू कधीच मिळत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
2. दुसरी पद्धत अशी असते की यामध्ये फ्रॉड करणारे दुसरी कंपनी किंवा वेबसाईटची नक्कल करत नाहीत. तर एक नवीनच वेबसाईट बनवतात.
या वेबसाईटवर अतिशय स्वस्त किंमतीत वस्तू विकल्या जातात. मात्र यामध्ये देखील ऑर्डर केलेल्या वस्तू ग्राहकांना कधीच मिळत नाहीत.
अॅमेझॉननं दिला सावधगिरीचा इशारा
अॅमेझॉनसह इतर मोठ्या ऑनलाइन कंपन्यांनी ग्राहकांना ऑनलाइन फ्रॉडपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
अॅमेझॉननं त्यांच्या वेबसाईटवर गिफ्ट व्हाउचरच्या माध्यमातून होणाऱ्या फ्रॉडबद्दल सावध करणारे संदेश आधीच दिलेले आहेत. त्यात म्हटलं आहे की वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन स्कीम अस्तित्वात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
"या स्कीमकडून ईमेल, फोन किंवा टेक्स्टद्वारे पेमेंट करण्यास सांगितलं जातं किंवा अकाउंटची माहिती किंवा ओटीपी मागितला जातो. यामध्ये गुंतवणूक करून पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवलं जातं."
"फ्रॉड करणारे फसवणूक करण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर करतात. यात प्रसिद्ध ब्रॅंडच्या गिफ्ट कार्डचा देखील समावेश आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











