मुंबई इंडियन्सच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर रोहित शर्मावर प्रश्नांचा भडिमार

रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रोहित शर्माला फक्त 8 धावा करता आल्या.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) नवव्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला. या सामन्यात गुजरातने मुंबईसमोर 20 ओव्हर्समध्ये 197 धावांचा आव्हान ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाला 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 160 धावाच करता आल्या.

तब्बल पाचवेळा आयपीएलचा विजेता ठरलेला मुंबईचा संघ यंदाच्या सिझनमध्ये सलग दोन सामने गमावून बसला आहे.

सलग दुसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर मुंबईचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माच्या फॉर्मवर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.

पहिल्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या रोहित शर्माला दुसऱ्या सामन्यात देखील फक्त 8 धावाच करता आल्या.

दुसऱ्या बाजूला गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनने 63 धावा करून त्याच्या संघाला 196 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

साई सुदर्शनच्या व्यतिरिक्त गुजराच्या गोलंदाजांनी देखील चमकदार कामगिरी केली. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजने दोन-दोन विकेट्स मिळवल्या.

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा या सामन्यात सामनावीर ठरला. गुजरातने मुंबईला हरवून यावर्षीच्या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळवला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

रोहित शर्माचा खराब फॉर्म

197 धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सला रोहित शर्माकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती. रोहित शर्माने देखील पहिल्याच ओव्हरमध्ये सलग दोन चौकार खेचून जुन्या रोहितचा आक्रमक बाणा दाखवण्याचा प्रयत्न केला.

पण मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर एक बॉल अचानक मध्ये आला आणि रोहित आठ धावांवर असताना क्लीन बोल्ड झाला. रोहित शर्मा आउट झाला तेव्हा मुंबईने 4 बॉल्समध्ये 8 धावा केल्या होत्या.

सुरुवातीला झालेल्या पडझडीनंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव आणि मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिलक वर्मा अतिशय संथ खेळला त्याला 36 बॉल्समध्ये फक्त 39 धावाच करता आल्या. गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

सूर्यकुमार यादव चांगली फलंदाजी करत होता त्याने 48 धावा करून मुंबईला सामन्यात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूने त्याला कुणाचीही सोबत मिळू शकली नाही. त्यामुळेच मुंबई इंडियन्सला 20 ओव्हर्समध्ये 160 धावा करता आल्या.

रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पहिल्या सामन्यात रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही.

रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसारखा आक्रमक फलंदाजी करण्यात सतत अयशस्वी ठरताना दिसत आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत 258 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 29 च्या सरासरीने 6 हजार 628 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नावावर आयपीएलमध्ये दोन शतकं आणि 43 अर्धशतकं आहेत.

मागच्या काही वर्षांपासून मात्र रोहित शर्माची आयपीएलमधली कामगिरी सातत्याने खालावत आहे. 2016 नंतरच्या एकाही आयपीएलमध्ये रोहित शर्मा 32पेक्षा जास्त सरासरीने धावा करू शकलेला नाही.

2016 नंतर रोहितने 2019 आणि 2024मध्ये एकाच सिझनमध्ये 400 धावांचा टप्पा ओलांडला होता. 2022 आणि 2023मध्ये रोहितने अतिशय सुमार फलंदाजी केली.

2022 मध्ये रोहित शर्माला 14 सामन्यांमध्ये 19.14च्या सरासरीने 268 धावा करता आल्या. 2023 मध्ये रोहित शर्माने 16 सामन्यांमध्ये 20.75 सरासरीने 332 धावा केल्या.

गुजरातची चमकदार कामगिरी

पहिल्याच सामन्यात झालेल्या पराभवानंतर शुबमन गिलच्या संघाने जोरदार पुनरागमन केलं आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात साई सुदर्शनने अर्धशतक केलं तर शुबमन गिलने 38 धावा केल्या.

सलामीला उतरलेल्या शुबमन आणि साईने 8.3 ओव्हरमध्ये 78 धावा केल्या. त्यांनी केलेल्या फलंदाजीमुळे गुजरातच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली.

गिल आणि सुदर्शन यांच्यानंतर इंग्लंडच्या जॉस बटलरने 39 धावा केल्या. मिडल ऑर्डरमध्ये गुजरातचा एकही फलंदाज 18 धावांच्या वर धावा करू शकला नाही. गुजरातने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावत 196 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने चार ओव्हर्समध्ये 29 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या.

सिराज आणि कृष्णा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिराज आणि कृष्णाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

रोहित शर्मावरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण

रोहित शर्माच्या कामगिरीवरून सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली आहे. अनेकांनी तर रोहित शर्माने आता निवृत्ती घ्यावी अशी मागणी देखील केलीय.

प्रसून जैन यांनी लिहिलं, "रोहित शर्मा त्याच्या जुन्या आकड्यांच्या जोरावरच सध्या संघात खेळत आहे हे स्पष्ट आहे. मुंबई इंडियन्सला आता पुढचा विचार करण्याची गरज आहे."

रजत नावाच्या वापरकर्त्याने लिहिलं, "रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा महान खेळाडू राहिलेला आहे. मात्र मागच्या काही वर्षांमध्ये त्याचा खेळ कमालीचा खालावला आहे. मुंबई इंडियन्सला एका आक्रमक फलंदाजाची गरज आहे. मात्र रोहित शर्मा आता तेवढा आक्रमक राहिलेला नाही. मुंबई इंडियन्सला कदाचित रोहित शर्माच्या पुढचा विचार केला तरच चांगले निकाल मिळू शकतील."

रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

राजीव नावाच्या व्यक्तीने रोहितची तुलना महेंद्रसिंग धोनीशी केली.

त्यांनी लिहिलं, "धोनीच्या निवृत्तीवरून बऱ्याच चर्चा केल्या जातात. मात्र रोहित शर्माबाबत अशा चर्चा होत नाहीत. धोनी विकेटकिपिंग करूनही खेळात योगदान देत असतो. पण रोहित शर्मा तेही करत नाही. तरीही त्याच्या निवृत्तीबाबत कुणीही काहीही बोलत नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)