IPL 2025: यंदाच्या मोसमात 'या' 5 खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, @andresiddarthc and @vaibhav_sooryavanshi09

फोटो कॅप्शन, आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्चपासून होते आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील अनेक तरुण खेळाडू त्यांच्या खेळातून ठसा उमवटण्यासाठी सज्ज आहेत.
    • Author, साजिद हुसैन
    • Role, बीबीसी

इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएलमध्ये अनुभवी खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे तर सर्वांचं लक्ष असतंच.

मात्र त्याचबरोबर तरुण आणि उदयोन्मुख खेळाडूंना देखील आयपीएलद्वारे त्यांची क्षमता, गुणवत्ता दाखवण्याची चांगली संधी मिळते.

आयपीएल ही एक अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. त्यामुळे साहजिकच नव्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी हे नेहमीच एक मोठं व्यासपीठ ठरलं आहे.

ज्या खेळाडूंना त्यांची क्षमता दाखवण्यासाठी कोणतंही मोठं व्यासपीठ मिळत नाही, असे खेळाडू आयपीएलच्या माध्यमातून त्यांची प्रतिभा दाखवण्याचा प्रयत्न करतात.

या व्यासपीठावर चांगली कामगिरी केल्यानंतर अशा खेळाडूंना प्रसिद्धी मिळते आणि मग त्यांच्या प्रतिभेला संधी मिळू लागते आणि खेळाडूंची ओळख निर्माण होऊ लागते.

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळालेले अनेक क्रिकेटपटू आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या माध्यमातून हे खेळाडू त्यांची कारकीर्द घडवतात.

आयपीएलच्या प्रत्येक मोसमात काही नवीन गुणवान आणि प्रतिभावान खेळाडू पाहायला मिळतात. चांगला खेळ करून दाखवण्यासाठी हे खेळाडू अतिशय उत्साही असतात.

आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्चपासून होते आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील अनेक तरुण खेळाडू त्यांच्या खेळातून ठसा उमवटण्यासाठी सज्ज आहेत.

या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या यंदाच्या मोसमात जे खेळाडू त्यांच्या खेळानं प्रेक्षकांची मनं जिंकू शकतात, अशा 5 अनकॅप्ड खेळाडूंवर एक नजर टाकूया आणि त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दलही जाणून घेऊया.

(अनकॅप्ड खेळाडू म्हणजे जो गेल्या पाच वर्षात एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला नसेल असा खेळाडू.)

ग्राफिक्स
ग्राफिक्स

वैभव सूर्यवंशी

13 वर्षांचा वैभव हा बिहारमधील एका छोट्या गावातील आहे. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात तो खूप चर्चेत होता. आयपीएलमध्ये करारबद्ध होणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे.

त्यामुळेच यंदाच्या मोसमात त्याच्यावर सर्वाचं लक्ष असणार आहे.

वैभव राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघानं 1.10 कोटी रुपयांची बोली लावत त्याचा संघात समावेश केला आहे.

आयपीएल 2025 च्या लिलावाआधी राजस्थान रॉयल्सनं वैभवला नागपूरमध्ये ट्रायलसाठी बोलावलं होतं. तिथे वैभवनं चांगली फलंदाजी केली होती.

वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, @vaibhav_sooryavanshi09

फोटो कॅप्शन, वैभवच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेटच्या करियरसाठी त्यांची शेतजमीन विकली होती.

वैभवचे वडील संजीव यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "राजस्थान रॉयल्सनं वैभवला नागपूरमध्ये ट्रायल्ससाठी बोलावलं होतं. विक्रम राठोड सरांनी (फलंदाजीचे प्रशिक्षक) त्याला एक सामन्याची स्थिती सांगितली. त्यात त्याला एका षटकात 17 धावा काढायच्या होत्या. वैभवने 3 षटकार मारले. ट्रायलमध्ये त्यानं आठ षटकार आणि चार चौकार लगावले."

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्यांच्या मुलाच्या क्रिकेटसंबंधीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची शेतजमीन विकली होती.

वैभवच्या वडिलांनी त्यांच्या कठीण काळाची आठवण करत पीटीआयला सांगितलं की, "माझ्या मुलानं कठोर परिश्रम केले आहेत. 8 वर्षांच्या वयात त्यानं अंडर 16 डिस्ट्रिक्ट ट्रायलमध्ये चांगली कामगिरी केली होती. क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी मी त्याला समस्तीपूरला घेऊन जायचो आणि मग त्याला परत घेऊन यायचो."

मिि

टाइम्स ऑफ इंडियानुसार, वैभवचं वय फक्त 4 वर्षे असताना त्याच्या वडिलांनी म्हणजे संजीव सूर्यवंशी यांनी त्याला प्लास्टिकच्या चेंडूनं खेळताना पाहिलं.

मुलाचं क्रिकेटवेड पाहून संजीव सूर्यवंशी यांनी त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला एक छोटं खेळाचं मैदान बनवलं. तिथे त्यांचा मुलगा सराव करायचा.

सप्टेंबर 2024 मध्ये वैभवनं ऑस्ट्रेलियाचा अंडर-19 संघ विरुद्ध भारताचा अंडर-19 संघ यांच्यात झालेल्या सामन्यातून कसोटी सामन्यात पदार्पण केलं.

या पहिल्याच सामन्यात त्यानं 58 चेंडूंमध्ये शतक ठोकलं होतं. अंडर-19 टेस्टमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूनं केलेलं ते आतापर्यंतचं सर्वात वेगवान शतक आहे.

याशिवाय, वैभवनं 2024 एसीसी अंडर-19 एशिया कपमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानं युएई अंडर-19 विरुद्ध 46 चेंडूंमध्ये 76 धावा केल्या होत्या. तर उपांत्य सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 36 चेंडूंमध्ये 67 धावा केल्या होत्या.

आयपीएलमध्ये पदार्पण करताना राजस्थान रॉयल्सकडून खेळतानादेखील असाच फॉर्म कायम राहावा अशीच वैभवची इच्छा असेल.

अंशुल कंबोज

यंदाच्या आयपीएलच्या मोसमात, हरियाणाच्या 24 वर्षांच्या अंशुल कंबोजचा समावेश चेन्नई सुपर किंग्सच्या संघात झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सनं 3.40 कोटी रुपयांची बोली लावत अंशुलचा संघात घेतलं आहे.

याआधी 2024 च्या हंगामात अंशुल मुंबई इंडियन्सच्या संघात होता. तिथे 3 सामन्यांमधून खेळताना त्यानं 2 गडीदेखील बाद केले होते. आता तो चेन्नई सुपर किंग्सच्या संघात आहेत.

अशा परिस्थितीत आयपीएलच्या गेल्या हंगामापेक्षा आणखी चांगली कामगिरी करून दाखवण्याचा अंशुलचा प्रयत्न असेल.

हरियाणातून येणाऱ्या या खेळाडूची कहाणी देखील दोन वेळा ऑलिंपिक पदक जिंकलेल्या

हरियाणाच्याच नीरज चोपडासारखीच आहे. नीरजचं वजनदेखील लहानपणी जास्त असायचं.

इंडियन एक्सप्रेसनुसार, अंशुल कंबोजनं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली कारण त्याचे वडील उधम सिंह यांना अंशुलचं वजन कमी करायचं होतं.

अंशुल कंबोज

फोटो स्रोत, anshulkambojak47

फोटो कॅप्शन, चेन्नई सुपर किंग्सनं 3.40 कोटी रुपयांची बोली लावत अंशुल कंबोजला संघात घेतलं आहे.

अंशुल कंबोज लहानपणीचं प्रशिक्षक सतीश राणा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की अंशुल 10 वर्षांचा होता तेव्हा त्याचं वजन खूप जास्त होतं.

सतीश राणा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं, "सर्वात गंमतीची गोष्ट अशी होती की उधम सिंह यांना वाटत होतं की अंशुलनं गोलंदाज व्हावं. त्यांना वाटत होतं की अंशुलनं अधिक गोलंदाजी करावी जेणेकरून त्याला भरपूर पळावं लागेल आणि त्याचा फायदा त्याला फीट होण्यासाठी होईल."

नोव्हेंबर 2024 मध्ये अंशुल कंबोज चर्चेत आला. त्यावेळेस रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका डावात सर्व 10 गडी बाद करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला होता.

हरियाणाच्या संघाकडून खेळताना त्यानं ही कामगिरी केरळच्या विरुद्ध केली होती. चेन्नई सुपर किंग्सनं यंदाच्या मोसमात त्याचा समावेश संघात करण्यामागे हेदेखील कारण आहे.

याशिवाय, अंशुलनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये 10 सामन्यांमधून 17 गडी बाद करत 2023 मध्ये हरियाणाच्या संघाला विजय हजारे ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हादेखील तो चर्चेत आला होता.

रॉबिन मिंज

22 वर्षांचा रॉबिन झारखंडचा आहे. तो यष्टीरक्षक फलंदाज आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात त्याचा समावेश मुंबई इंडियन्सच्या संघात झाला आहे. मुंबई इंडियन्सनं त्याच्यावर 65 लाख रुपयांची बोली लावली होती.

याआधी 2024 च्या मोसमात गुजरात टायटन्सनं रॉबिनवर 3.6 कोटी रुपयांची बोली लावत त्याचा समावेश संघात केला होता. रॉबिन गुजरात टायटन्सच्या संघातून त्याचं पदार्पण करणार होता. मात्र रस्त्यावरील एका अपघातामुळे त्याचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नव्हतं.

टाइम्स ऑफ इंडियानुसार, रॉबिनला सुपरबाइकची आवड आहे. राबिन त्याची कावासाकी मोटरसायकल चालवत होता. तो घराजवळ आला असतानाच दुसऱ्या एका मोटरसायकलशी त्याची टक्कर झाली आणि त्याचा अपघात झाला.

या अपघातानंतर रॉबिन पूर्ण हंगामात खेळू शकला नव्हता. यामुळे त्याचं कुटुंब खूपच निराश झालं होतं. मात्र आता पुन्हा त्याचा समावेश संघात झाल्यामुळे रॉबिनच्या आई एलिस मिंज अतिशय आनंदी आहेत.

रॉबिन मिंज

फोटो स्रोत, rob_in_13_

फोटो कॅप्शन, रॉबिन मिंजला क्रिकेटबरोबरच सुपरबाइकची देखील आवड आहे.

टाइम्स ऑफ इंडियानुसार, रॉबिनची आई एलिस मिंज यांनी सांगितलं, "सर्वांच्याच सहकार्यामुळे रॉबिन संघात परतला आहे. आयपीएलच्या लिलावानंतर त्यानं मला फोन केला आणि तो खूप खूश होता. आधी जेव्हा त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं तेव्हा खूप कठीण काळ होता. मात्र सर्वांच्याच सहकार्यानं त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे."

रॉबिन मिंजचे प्रशिक्षक आसिफ हक त्याची तुलना वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल याच्याशी करतात.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ते म्हणाले, "आम्ही त्याला रांचीचा गेल म्हणतो. तो डावखुरा फलंदाज आहे. त्याची शरीरयष्टी चांगली आहे आणि तो मोठे षटकार ठोकतो. तो नव्या काळातील क्रिकेटपटू सारखा आहे. पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजावर दबाव टाकायला त्याला आवडतं. त्याला 200 च्या धावगतीनं फलंदाजी करायची असते."

मम

फेब्रुवारी 2021 मध्ये त्यानं गुमला प्रीमियर लीगमध्ये लिस्ट ए क्रिकेटमधून पदार्पण केलं होतं. पदापर्णाच्या सामन्यात त्यानं चांगली कामगिरी केली.

त्यावेळेस फक्त चार धावांनी त्याचं पहिलं शतक हुकलं होतं. त्या सामन्यात सर्वाधिक धावा त्यानंच केल्या होत्या.

पुढच्याच सामन्यात त्यानं 73 चेंडूंमध्ये 154 धावा केल्या होत्या. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अर्थात आतापर्यंत तो फक्त सहा टी20 सामने खेळला आहे. मात्र या सामन्यांमध्ये त्यानं 181 च्या आश्चर्यकारक धावगतीनं धावा केल्या आहेत. यातून तो एक उत्तम खेळाडू असल्याचं दिसून येतं.

सूर्यांश शेडगे

22 वर्षांचा सूर्यांश शेडगे मुंबईचा आहे. यंदाच्या मोसमात पंजाब किंग्सनं 30 लाख रुपयांची बोली लावत सूर्यांशचा समावेश संघात केला आहे.

यावेळेस पंजाब किंग्सच्या संघाचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे आहे.

सूर्यांशला वाटतं की श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा खेळल्यामुळे आयपीएलमध्ये जुळवून घेणं त्याच्यासाठी सोपं होईल.

2024-25 मध्ये झालेल्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येदेखील तो श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळला होता.

एएनआय या वृत्तसंस्थेनं पंजाब किंग्सकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या आधारे सांगितलं की सूर्यांश शेडगे म्हणतो की, "जर तुम्ही गेल्या काही वर्षांच्या पंजाब किंग्सच्या रेकॉर्डकडे पाहिलं तर लक्षात येईल की ते नेहमी नव्या गुणी, प्रतिभावान खेळाडूंमध्ये गुंतवणूक करतात. ते खेळाडूच्या देशांतर्गंत कामगिरीची बारकाईनं तपासणी करतात."

"पंजाब किंग्सच्या संघात समावेश झाल्यामुळे मी खूप उत्साहात आहे. श्रेयस भैय्या कर्णधार असल्यामुळे आयपीएलमध्ये जुळवून घेणं मला सोपं होईल. कारण ते एक ओळखीचा चेहरा आहेत."

्््

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, सूर्यांशनं गेल्या वर्षी त्याला झालेल्या पाठीच्या दुखापतीचीही आठवण काढली. या दुखापतीमुळे त्याच्या करियरची गाडी रुळावरून घसरली होती. त्यावेळेस तो मुंबईच्या सीनियर टीमच्या स्पर्धेत होता.

मात्र त्याच्या फिजियोनं त्याला आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळेस सूर्यांशला वाटलं होतं की यामुळे त्याचं करियर संपू शकतं.

पंजाब किंग्सच्या वेबसाईटवर असलेल्या त्याच्या प्रोफाईलनुसार, 2022 मध्ये त्यानं बीसीसीआयच्या अंडर-25 स्टेट ए ट्रॉफीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. यात त्यानं आठ सामन्यांमध्ये 184 धावा केल्या होत्या आणि 12 गडी बाद केले होते.

त्याच्या या कामगिरीमुळे त्याला 2022-23 च्या मोसमात मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघात आणि सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये स्थान मिळालं होतं.

सूर्यांश शेडगे

फोटो स्रोत, @suryanshshedge

फोटो कॅप्शन, सूर्यांश शेडगेचा समावेश पंजाब किंग्सच्या संघात झाला आहे.

2024-25 मध्ये झालेल्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईला विजय मिळवून देण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो चर्चेत आला होता.

मध्य प्रदेशच्या संघाविरुद्ध अंतिम सामन्यात, त्यानं 15 चेंडूंमध्ये 36 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे 174 धावांचं उद्दिष्टं मुंबईनं सहज गाठलं होतं.

या संपूर्ण स्पर्धेत त्यानं 251.92 च्या धावगतीनं धावा काढल्या होत्या. यातून दबावाखाली असताना चांगला खेळ करून दाखवण्याची त्याची क्षमता सर्वांसमोर आली.

तसंच एक चांगला फिनिशर म्हणून त्याची प्रतिमा मजबूत झाली.

आंद्रे सिद्धार्थ

आंद्रे सिद्धार्थ तामिळनाडूचा असून 18 वर्षांचा आहे. यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सच्या संघातून तो आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या संघानं 30 लाख रुपयांची बोली लावत त्याचा समावेश संघात केला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला तामिळनाडूनं अंडर-19 कूच बिहार ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळेस सिद्धार्थ तामिळनाडूच्या संघात होता.

याआधी तामिळनाडूनं शेवटची अंडर-19 ट्रॉफी 1991-92 मध्ये जिंकली होती. त्यावेळेस सिद्धार्थचे मामा श्रीधरन शरथ त्या संघात होते.

देशांतर्गंत क्रिकेटमध्ये शरथ यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीकडे पाहता सिद्धार्थकडून देखील बऱ्याच अपेक्षा आहेत. सिद्धार्थला या अपेक्षांचं ओझं जाणवतंदेखील आहे.

आंद्रे सिद्धार्थ

फोटो स्रोत, @andresiddarthc

फोटो कॅप्शन, आंद्रे सिद्धार्थचे वडील डॉक्टर आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या दडपणाबद्दल बोलताना सिद्धार्थनं ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितलं की, "हो, दबाव तर आहे. मात्र हा दबाव धावा काढण्यासंदर्भात नाही. ते (शरथ) तामिळनाडूच्या इतिहासातील सर्वात महान फलंदाजांपैकी एक आहेत. त्यामुळेच मला त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील."

"माझ्या मामांनी खूप काही केलं आहे. मला त्याच्या किमान निम्मं तरी करून दाखवावंच लागेल. नाहीतर ते माझ्यासाठी आणि माझ्या मामासाठी अपमानास्पद ठरू शकतं. म्हणूनच माझ्यावर तो दबाव आहे."

सिद्धार्थचे वडील चंद्रशेखर, एक डॉक्टर आहेत. सिद्धार्थच्या करियरवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. सिद्धार्थला ताजं तंत्र शिकवण्यासाठी ते अनेक क्रिकेट सामने आणि त्यांचे व्हिडिओ पाहतात.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सिद्धार्थ म्हणाला, "मला अभ्यास करायला अजिबात आवडायचं नाही. क्रिकेट ही माझ्यासाठी त्यातून काढलेली पळवाट होती. मात्र कालांतरानं मला क्रिकेट आवडू लागलं. मात्र माझ्या वडिलांशिवाय हे शक्य झालं नसतं. ते जरी क्रिकेट खेळत नसले तरी त्यांनी मला विवियन रिचर्ड्सचे व्हिडिओ पाहून सर्व काही शिकवलं."

सिद्धार्थनं त्याच्या रणजी करियरची सुरुवात 38 धावा, नाबाद 66 धावा, नाबाद 55 धावा, 41 धावा, 94 धावा आणि 78 धावांनी केली. त्याच्या या कामगिरीमुळे तामिळनाडूला रणजी ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या टप्प्यात एलीड ग्रुपच्या यादीत वरचं स्थान पटकावण्यात यश मिळालं.

ििि

याव्यतिरिक्त, सिद्धार्थनं चंदीगडच्या संघाविरुद्ध त्याचं रणजी ट्रॉफीतील पहिलं शतक देखील झळकावलं. त्यानं 143 चेंडूंमध्ये 106 धावा केल्या.

रणजी ट्रॉफीत सिद्धार्थनं त्याच्या खेळाची छाप पाडल्यानंतर, युएईमध्ये होणाऱ्या 50 षटकांच्या एशिया कपसाठी भारताच्या अंडर-19 संघात त्याची निवड करण्यात आली.

मात्र त्यात त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्याला 4 डावांमध्ये फक्त 92 धावाच करता आल्या.

आता त्याला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघात स्थान मिळालं आहे. तिथे त्याला महेंद्र सिंह धोन आणि आर अश्विनसारख्या दिग्गज खेळाडूंबरोबर खेळता येईल. त्यामुळे यंदाच्या मोसमात तो चांगली कामगिरी करून दाखवू शकतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.