IPL 2022: मध्ये 'या' नवीन छाव्यांनी आणलीय रंगत

फोटो स्रोत, ANI
वेगवान गोलंदाजी असो की तडाखेबंद फटकेबाजी- युवा भारतीय खेळाडूंनी यंदाच्या आयपीएल हंगामात जगभरातल्या क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं.
यंदाचं आयपीएलमध्ये नेहमीसारखी मजा नाही, आयपीएलचे रेटिंग्ज पडलेत, आयपीएलचे स्टार लौकिकाला साजेशी कामगिरी करत नाहीत या चर्चांमध्ये एक आशेचा किरण आहे.
तो म्हणजे संधीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या युवा भारतीय खेळाडूंची खणखणीत कामगिरी.
15व्या हंगामाच्या निमित्ताने आयपीएल स्पर्धेला लोकप्रियता, चाहत्यांची संख्या आणि दर्जा अशा सगळ्या आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध करावे लागत आहेत. अशा काळात परिस्थितीशी संघर्ष करत नव्या दमाचे भारतीय खेळाडू दमदार प्रदर्शन करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
1.मुकेश चौधरी (चेन्नई सुपर किंग्स)
डावखुऱ्या मुकेश चौधरीचा जन्म राजस्थानमधल्या भिलवाडा इथला. वडील कामानिमित्ताने महाराष्ट्रातल्या यवतमाळ इथे स्थिरावले. मुकेश शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात आला. शिक्षण आणि क्रिकेट दोन्हीची आवड जोपासली. पुण्यात मुकेशच्या क्रिकेटमधल्या गुणकौशल्यांना पैलू पाडणारे प्रशिक्षक, गुरू मंडळी भेटली. विविध स्पर्धांची आव्हानं पार करत मुकेश महाराष्ट्रातर्फे खेळू लागला.
आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघांसाठी नेट बॉलर म्हणून काम केलं. त्यानंतर चेन्नई इथल्या एमआरएफ पेस अकादमीत प्रशिक्षक एम.सेंथील नॅथन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कौशल्यं घोटून घेतली.
चेन्नईसाठी मुकेश नेट बॉलर होता. भारतीय संघाचा माजी कर्णधार, जगातल्या अव्वल फिनिशर्सपैकी एक असलेल्या महेंद्रसिंद धोनीला गोलंदाजी करण्याची मुकेशला संधी मिळाली. आयपीएलसारख्या दडपणाच्या आणि अतिशय वेगवान फॉरमॅटसाठी खेळात काय बदल करावेत यासंदर्भात चेन्नई संघाच्या प्रशिक्षकांकडून मुकेशला मार्गदर्शनला मिळालं.
दस्तुरखुद्द महेंद्रसिंग धोनीला मुकेशच्या गोलंदाजीविषयी विश्वास व्यक्त केला होता. यामुळेच लिलावात चेन्नईने मुकेशला ताफ्यात दाखल केलं. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांनी मुकेशच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. चुकातून शिकत मुकेशने दमदार पुनरागमन केलं. विरुद्ध 3 विकेट्स घेत मुकेशने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला. गोलंदाजीच्या बरोबरीने मुकेशने क्षेत्ररक्षणातही ठसा उमटवला. मुकेशने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ज्या पद्धतीने इशान किशनला त्रिफळाचीत केलं ते दृश्य आश्वासक होते.
2.मोहसीन खान (लखनौ सुपरजायंट्स)
उंचपुरा, धट्टाकट्टा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान लखनौ सुपरजायंट्स संघाचं ट्रंप कार्ड ठरला आहे. लिलावात लखनौनं मोहसीनला 20 लाख रुपये देऊन बेस प्राईसलाच विकत घेतलं. पण आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्याची मोहसीनची ही पहिली वेळ नाही. मोहसीन याआधी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. पण मुंबईने त्याला अंतिम अकरात समाविष्ट केलं नाही. मुंबईने जे गमावलं ते लखनौनं लिलावात कमावलं.

फोटो स्रोत, Getty Images
भारताचे माजी यष्टीरक्षक विजय दहिया लखनौ संघाचे असिस्संट कोच आहेत. देशांतर्गत क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असणारे दहिया हे उत्तम टॅलेंट स्काऊट म्हणूनही ओळखले जातात. उत्तर प्रदेश संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. हे काम पाहत असताना त्यांनी मोहसीनची उपयुक्तता जाणली. म्हणूनच संघनिवडीवेळी अनुभवी अंकित राजपूतऐवजी मोहसीन खानला पसंती देण्यात आली.
मोहसीनने दहिया यांचा विश्वास सार्थ ठरवत चोख कामगिरी बजावली. मोहसीनच्या खेळात एकदाही नवखेपणाचं दडपण जाणवलं नाही. दबावाच्या क्षणी त्याचा टप्पा भरकटला नाही. एखाद्या षटकात फलंदाजांनी धावा लुटल्यास तो खचून जात नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत कर्णधार ऋषभ पंतला मोहसीनने सापळा रचून बाद केलं.
3.तिलक वर्मा (मुंबई इंडियन्स)
आयपीएल स्पर्धेची पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम नकोशा स्वरुपाचा होता. मुंबईला संघाचं समीकरण सापडेपर्यंत खूप उशीर झाला होता. यंदा त्यांच्या मोहिमेतला आशेचा किरण म्हणजे तिलक वर्माची आश्वासक फलंदाजी.
फक्त फटकेबाजीच्या मागे न लागता इनिंग्ज बांधणं, एकेरी-दुहेरी धावांचा रतीब घालणं, चांगल्या चेंडूचा सन्मान करणं ही तिलकची खासियत आहे. अनुभवी फलंदाज शरणागती पत्करत असताना तिलकने खणखणीत तंत्राच्या बळावर यंदाच्या हंगामात चांगल्या खेळी केल्या.

फोटो स्रोत, IPL/BCCI
मूळच्या आंध्र प्रदेशच्या तिलकने U19 संघासाठी खेळतानाही चांगली कामगिरी केली होती. त्या कामगिरीची दखल घेत मुंबईने 1.7 कोटी रुपये खर्चून तिलकला ताफ्यात समाविष्ट केलं. प्रशिक्षणासाठी तिलक दररोज 80 किलोमीटर प्रवास करत असे. त्या परिश्रमाचं चीज होताना दिसत आहे. तिलक लवकरच भारतासाठी सर्व प्रकारातला खेळाडू असेल असं वक्तव्य मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने केलं. प्रशिक्षक माहेला जयवर्धनेनेही तिलकच्या कामगिरीचं कौतुक केलं.
4.जितेश शर्मा (पंजाब किंग्ज)
पंजाब किंग्ज संघासाठी आणखी एक हंगाम जेतेपदाविना सरला पण विदर्भवीर जितेश शर्माच्या रुपात त्यांना एक चांगला युवा खेळाडू मिळाला. यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी20 विश्वचषकासाठी राखीव विकेटकीपर बॅट्समन म्हणून जितेशला घ्यावं असा विचार भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी व्यक्त केला. उत्तम स्ट्राईकरेटसह फटकेबाजी करणाऱ्या जितेशने आश्वासक विकेटकीपिंगही केलं आहे.
5.रिंकू सिंग (कोलकाता नाईट रायडर्स)
उत्तर प्रदेशातल्या अलिगढच्या रिंकू सिंग अनेक हंगाम कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. एखाद्या मॅचमध्ये त्याला संधी मिळायची. यंदाच्या हंगामात कोलकाताने रिंकूला नियमितपमे अंतिम अकरात स्थान दिलं आणि त्याचा थेट परिणाम दिसून आला. रिंकूचे बाबा घरोघरी गॅस सिलिंडरचं वितरण करतात. आई गृहिणी आहे. रिंकूला चार भावंडं. रिंकूचा एक भाऊ रिक्षा चालवतो तर दुसरा कोचिंग सेंटरमध्ये काम करतो. रिंकू नववीत नापासही झाला होता. शिक्षण पुरेसं नसल्यामुळे रिंकूला नोकरी लागत नव्हती. रिंकूचा भाऊ जिथे काम करायचा तिथे त्याला झाडू मारण्याचं म्हणजेच साफसफाईचं काम मिळालं होतं.

फोटो स्रोत, BCCI/IPL
रिंकूने उत्तर प्रदेश संघासाठी खेळताना मिळणाऱ्या भत्त्याच्या बळावर कुटुंबाचं कर्ज फेडलं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रिंकू सातत्याने धावा करतो. यंदाच्या लिलावात कोलकाताने 55 लाख रुपये देत रिंकूला पुन्हा संघात घेतलं. प्लेऑफसाठी पात्र होण्याची शक्यता जिवंत असताना रिंकूने लखनौ संघाविरुद्ध 15 चेंडूत 40 धावांची अफलातून खेळी केली. पण रिंकू बाद झाला आणि कोलकाताने शरणागती पत्करली. रिंकूने थरारक खेळी करत कोलकाताला जिंकून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. राजस्थानविरुद्धच्या लढतीतही रिंकूने नाबाद 42 धावांची खेळी केली होती.
6.उम्रान मलिक (सनरायझर्स हैदराबाद)
लिलावापूर्वी प्रत्येक संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंयी यादी सादर केली. सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसन या अनुभवी खेळाडूसह अब्दुल समद आणि उम्रान मलिक यांना रिटेन केलं होतं. दोन नव्या खेळाडूंना रिटेन केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. सनरायझर्स संघाने उम्रानला का रिटेन केलं याचं उत्तर या हंगामातील त्याच्या जबरदस्त कामगिरीतून दिसलं.
उम्रानने यंदाच्या हंगामातला सर्वाधिक वेगाचा (157 ताशी किलोमीटर) टाकून नवा विक्रम रचला. उम्रानच्या वेगवान गोलंदाजीसमोर फलंदाजांची भंबेरी उडाली. वेगाच्या बरोबरीने अचूक टप्प्यासह गोलंदाजी करत उम्रानने क्रिकेटचाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. उम्रानच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत भारतीय संघाच्या निवडसमितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी त्याची संघात निवड केली आहे.
आयपीएलच्या 15व्या हंगामात उम्रानने 14 सामन्यात 22 विकेट्स घेत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकलं. जम्मू काश्मीरमधील फळ विक्रेत्याचा मुलगा असणारा उम्रान
7.यश दयाळ (गुजरात टायटन्स)
यंदाच्या वर्षी दोन नवे संघ आयपीएल कुटुंबात दाखल झाले. यापैकी गुजरात टायटन्स संघाने अतिशय सातत्यपूर्ण कामगिरी करत प्लेऑफ्समध्ये प्रवेश केला. प्रत्येक सामन्यात नवनव्या खेळाडूंनी जबाबदारी घेत संघाची नाव पैलतीरी नेली. यापैकी एक नाव म्हणजे डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाळ.
झहीर खानला आदर्श मानणाऱ्या यशची कारकीर्द घडली अलाहाबादमध्ये. क्रिकेटपटू अली मुर्तझाचे वडील गुलाम मुर्तझाच्या मार्गदर्शनात यशने गोलंदाजीची धुळाक्षरं गिरवली. उत्तर प्रदेशसाठी विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या यशला गुजरात टायटन्सने 3.2 कोटी रुपये खर्चून संघात घेतलं.
वरुण आरोन दुखापतग्रस्त झाल्याने तसंच दर्शन नालकांडेला कामगिरीत सातत्य राखता न आल्याने यशला संधी मिळाली. यशच्या गोलंदाजीवर धावा वसूल केल्या जातात पण तो विकेट पटकावण्यात माहीर आहे. मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ या अव्वल वेगवान गोलंदाजांकडून शिकत यशने प्रतिस्पर्ध्यांच्या डावाला खिंडार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या सात खेळाडूंव्यतिरिक्त ललित यादव (दिल्ली कॅपिटल्स), दर्शन नालकांडे आणि अभिनव मनोहर (गुजरात टायटन्स), डेवाल्ड ब्रेव्हिस (मुंबई इंडियन्स), अर्शदीप सिंग (पंजाब किंग्ज), कुलदीप सेन (राजस्थान रॉयल्स), आकाश दीप आणि अनुज रावत, महिपाल लोमरुर, सुयश प्रभुदेसाई ( (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू), अभिषेक शर्मा, शशांक सिंग यांनी चांगला खेळ करत छाप उमटवली.
गेल्या हंगामात पुरेशी संधी न मिळालेल्या अभिषेक शर्माने सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना 14 मॅचेसमध्ये 426 धावा केल्या. भारतीय U19 संघासाठी खेळताना दमदार कामगिरी केलेल्या अभिषेकला यंदा सनरायझर्सने सलामीला पाठवलं. अभिषेकने अनुभवी फलंदाज आणि कर्णधार केन विल्यमसनच्या बरोबरीने हैदराबादला सातत्याने चांगली सलामी मिळवून दिली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








