दिनेश कार्तिक: घटस्फोट, नैराश्य, फेक न्यूज- दिनेश कार्तिकच्या आयुष्यात खरंच हे घडलंय?

दिनेश कार्तिक, क्रिकेट, तामिळनाडू, आरसीबी, आयपीएल, भारतीय क्रिकेट संघ

फोटो स्रोत, Ian Walton-ICC

फोटो कॅप्शन, दिनेश कार्तिक
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

दिनेश कार्तिक कालातीत माणूस आहे. तो 'प्रेझेंट कंटिन्यूअस' सदरात मोडतो. दिवस-महिने-वर्ष पुढे सरकतात. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो. पावसाळ्याकडून मशाल घेऊन हिवाळा येतो. हिवाळ्याकडून ऊर्जा घेऊन पुन्हा उन्हाळा येतो. कोरोनाची पहिली लाट येते, दुसरी लाट येते. स्पर्धा होत राहतात. विजयाचे गोडवे गायले जातात, पराभवाची मीमांसा केली जाते. दिनेश कार्तिक नांगर टाकून उभा असतोच.

त्याचं जहाजही डचमळतं. थपड्या देणाऱ्या लाट्या त्यालाही लागतात. खवळलेल्या दर्यासमोर गडप होण्याची भीती त्यालाही वाटते. पण त्याचं जहाज टिकून राहतं. निसर्गचक्रानुसार भरती ओहोटी येत राहतात. दिनेश कार्तिकरुपी नावाची गाज गुंजत राहते. गाज आवाज करते, पण ती कधीही कर्कश होत नाही.

37व्या वर्षी दिनेश कार्तिकने भारतीय संघात स्थान पटकावलं आहे. ज्या वयात क्रिकेटपटू निवृत्तीची भाषणं करू लागतात त्या वयात कार्तिक, तरण्याबांड कार्यकर्त्यांना पुरून उरत भारतीय संघात दाखल झाला आहे. 18 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असलेल्या कार्तिकचं पुनरागमन अनेकर्थी महत्त्वाचं. मिळालेल्या संधीचं सोनं करता न आल्याने बाजूला पडलेल्या मंडळींसाठी कार्तिक प्रेरणास्थान आहे.

कामगिरी मनासारखी होत नसेल तर अथक मेहनत घेऊन परतता येतं याचं कार्तिकची कारकीर्द मूर्तीमंत उदाहरण आहे. वय वाढलं की संधी कमी होत जातात या त्रैराशिकाला कार्तिक छेद देतो. आपण जे करतो त्यात सर्वोत्तमाचा ध्यास कसा जपायचा हे कार्तिककडून शिकावं. तुमचं काम बोलायला हवं हे कार्तिक वारंवार सिद्ध करतो. अनुभवी आहे, वय बरंच आहे म्हणून फुकाचा पोक्तपणा कार्तिक बाळगत नाही. उठून कामाला लागण्यासाठी लोकांना टेडटॉक, मोटिव्हेशनल स्पीच वगैरे उपाय करावे लागतात.

सतत नाकारलं जाऊन, बाहेर फेकलं जाऊनही कार्तिक खेळण्यासाठी कशातून प्रेरणा शोधतो कळत नाही. वैयक्तिक आयुष्यात वादळं येत असताना कार्तिकने त्याचं भांडवल केलं नाही. दु:खाचे कढ काढत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. संघर्ष, झगडणं, धडपडणं, पडणं, पुन्हा उठून उभं राहणं ही सगळी प्रक्रिया कार्तिकने कारकीर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यातही शेकडो वेळा अंगीकारली आहे.

'तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवलात, तर सगळं मनासारखं होऊ शकतं. प्रेम आणि पाठिंब्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद. मेहनत करत राहीन'. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी निवड झाल्यानंतर कार्तिकने केलेल्या ट्वीटचे हे शब्द.

2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 विश्वचषकावर नाव कोरलं. दिनेश कार्तिक त्या संघाचा भाग होता. 2019 मध्ये भारतीय संघाचं विश्वचषक जेतेपदाचं स्वप्न उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं. त्या संघातही कार्तिक होता. 2022 मध्ये सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही कार्तिक भारतीय संघात असणार आहे.

विकेटकीपर बॅट्समन ही कार्तिकची ओळख. भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनी नावाचा तारा मिळण्याआधी दिनेश कार्तिक होता. धोनी मोठा होत गेला. कार्तिकला धोनीच्या छायेत राहावं लागलं. धोनी असतानाही कार्तिक संघात असायचा. धोनी नसला की कार्तिकला विकेटकीपिंगचीही संधी मिळत असे. विशेषज्ञ फलंदाज म्हणून कार्तिकने ओळख प्रस्थापित केली. पण कधी कामगिरीत सातत्य नसल्यामुळे तर संघात फलंदाज-गोलंदाजांची गर्दी झाल्याने कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येई.

कार्तिकचं संघाबाहेर जाणं आणि परतणं त्याला आणि संघालाही सरावाचं झालं होतं. कार्तिक चिवटपणे खेळत राहिला. धोनीने निवृत्ती स्वीकारली. आता ऋषभ पंत पटलावर आला होता. कार्तिक या नव्या मुलालाही टक्कर देऊ लागला. संघात संधी मिळाली, स्थिरावला असं कार्तिकचं कधीही झालं नाही. त्याच्या असण्यावर सतत टांगती तलवार असे. दिनेश कार्तिक अन्य कुठल्या देशात असता तर त्याला संघातून वगळण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता.

दिनेश कार्तिक, क्रिकेट, तामिळनाडू, आरसीबी, आयपीएल, भारतीय क्रिकेट संघ

फोटो स्रोत, NurPhoto

फोटो कॅप्शन, दिनेश कार्तिक डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तामिळनाडूचं प्रतिनिधित्व करतो.

कार्तिकने कसोटी प्रकारात म्हणजेच सगळ्यात आव्हानात्मक परिस्थितीत सलामीला येण्याचं धाडस दाखवलं आहे. कार्तिक वनडे आणि ट्वे्न्टी20 मध्ये मधल्या फळीत खेळला आहे. फिनिशरची जबाबदारीही शिताफीने पार पाडली आहे.

बचावाची सगळी तंत्रं त्याला उपजत आहेत आणि सर्व प्रकारचे फटके त्याच्या भात्यात आहेत. वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांसमोर विकेटकीपिंग केलं आहे. कार्तिकचं रनिंग बिटवीन द विकेट्स अफलातून आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तसंच आयपीएलमध्ये कार्तिकने नेतृत्वाची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे. वेगळ्या अर्थी कार्तिक अष्टपैलू आहे.

2004 ते 2019 या कालावधीत कार्तिकच्या नावावर 26 कसोटी, 94 वनडे आणि 32 ट्वेन्टी20 सामने आहेत. तामिळनाडूसाठी क्रिकेट खेळताना खोऱ्याने धावा करणारा, उत्कृष्ट दर्जाचं विकेटकीपिंग करणाऱ्या कार्तिकच्या नावावर भारतासाठी एवढेच सामने कसे असा प्रश्न चाहत्यांनाही पडतो. पण तुम्ही कोणत्या कालखंडात जन्म घेता, तुमच्या बहराच्या काळात बाकी समकालीन मंडळींचं काय चाललं आहे हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं. धोनीकाळात ऐन उमेदीचा काळ आल्याने कार्तिकची कारकीर्द झाकोळली गेली.

अफलातून स्टंपिंगने गाजवलं पदार्पण

क्रिकेटरसिकांमध्ये दिनेश कार्तिकची पहिली आठवण म्हणजे त्याने मायकेल वॉनचं केलेलं स्टंपिंग. वर्ष होतं 2004. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. तीन सामन्यांच्या मालिकेत तिसऱ्या सामन्यात कार्तिकला पदार्पणाची संधी देण्यात आली. हरभजन सिंगने टाकलेला चेंडू टप्पा पडून लेगस्टंपच्या दिशेने जात होता.

युवा ऊर्जेने सळसळणाऱ्या कार्तिकने डोळ्याचं पातं लवत न लवतो तोच चेंडू ग्लोव्ह्जमध्ये पकडला आणि क्षणार्धात बेल्स उडवल्या. कार्तिकच्या त्या अदाकारीने वॉन चकित झाला. कार्तिकने बेल्स उडवल्या तेव्हा वॉर्न क्रीझबाहेर असल्याचं स्पष्ट झालं आणि भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला.

वर्षभरानंतर कार्तिकने मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाने दबदबा राखलेल्या त्या मालिकेत मुंबई कसोटी वादळी ठरली. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर अवघ्या अडीच दिवसात कसोटीचा निकाल लागला. कार्तिकला फलंदाजीत विशेष काही करता आलं नाही पण हातभर वळणाऱ्या खेळपट्टीवर चोख विकेटकीपिंग करत गोलंदाजांना तोलामोलाची साथ दिली.

निधास ट्रॉफी आणि शेवटच्या चेंडूवरचा षटकार

यानंतर कार्तिक खेळत राहिला, संघात आतबाहेर होत राहिला. कार्तिकला हिरोपदी नेलं ते निधास ट्रॉफीच्या फायनलमधल्या अविश्वसनीय खेळीनं. दिवस होता 18 मार्च 2018. ठिकाण होतं श्रीलंकेतलं आर.प्रेमदासा स्टेडियम. बांगलादेशने पहिल्यांदा बॅटिंग करताना 166 धावांची मजल मारली. उत्तम फॉर्मात असलेल्या कार्तिकला, कर्णधार रोहित शर्माने फिनिशर म्हणून मागे ठेवलं.

या निर्णयावर कार्तिक नाराज होता. 18व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मनीष पांडे बाद झाला आणि कार्तिक मैदानात उतरला. भारतीय संघाला 12 चेंडूत 34 धावांची आवश्यकता होती.

दिनेश कार्तिक, क्रिकेट, तामिळनाडू, आरसीबी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, निधास ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिनेश कार्तिकने खेळी संस्मरणीय ठरली

समीकरण आव्हानात्मक होतं पण कार्तिकने आल्या आल्या षटकार, चौकार आणि षटकार अशी लयलूट केली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत सामना जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. सगळं शेवटच्या चेंडूपर्यंत गेलं. एक चेंडू आणि पाच धावा असं अवघड झालं. षटकार लगावला नाही तर सामना गमावण्याची भीती होती.

अनेक वर्षांपूर्वी जावेद मियाँदादने भारताच्याच चेतन शर्माच्या गोलंदाजीवर षटकार खेचून पाकिस्तानला थरारक विजय मिळवून दिला होता. त्यादिवशी तशी संधी कार्तिकसमोर होती. सौम्या सरकारच्या शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचत कार्तिकने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

कार्तिकने षटकार खेचला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात धाव घेतली. निधास ट्रॉफी आणि शेवटच्या चेंडूवर षटकार खेचणारा कार्तिक एकदम दंतकथा झालं.

अभ्यासपूर्ण समालोचन

भारतीय संघ गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर असताना मालिकेचं प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीने कार्तिकला समालोचन म्हणून ताफ्यात समाविष्ट केलं. सर्वसाधारणपणे निवृत्त खेळाडू समालोचन करतात. पण कार्तिक खेळत असूनही त्याची निवड करण्यात आली. भारतीय संघातील अनेकांचा मित्र असलेल्या कार्तिकने समालोचनाची अनोखी शैली सादर केली.

दिनेश कार्तिक, क्रिकेट, तामिळनाडू, आरसीबी, आयपीएल, भारतीय क्रिकेट संघ

फोटो स्रोत, Visionhaus

फोटो कॅप्शन, दिनेश कार्तिक समालोचनही करतो.

खेळाचा आणि खेळाडूंचा सखोल अभ्यास कार्तिकच्या बोलण्यातून दिसून आला मात्र त्याचवेळी कोटया, उपहास आणि हसतखेळत बोलण्याची त्याची पद्धत जगभरातल्या क्रिकेटरसिकांना भावला. सोशल मीडियावर कॉमेंटेटर कार्तिकचे चाहते निर्माण झाले. कार्तिकच्या कपड्यांची विशेषत: टायची जोरदार चर्चा पाहायला मिळाली.

मित्र झाला मेन्टॉर

भारतीय संघासाठी खेळू शकतो का? अशी साशंकता दिनेश कार्तिकच्या मनात घर करून राहिली होती. त्यावेळी त्याचं मुंबईकर क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अभिषेक नायरशी बोलणं झालं. कार्तिकच्या खेळापेक्षा त्याच्या मानसिकतेवर काम करण्याची गरज अभिषेकला जाणवली. अभिषेकने कार्तिकला मुंबईत यायला सांगितलं. पवईत अभिषेकच्या घरीच कार्तिक राहिला. अभिषेकने प्रशिक्षणात अनोखी पद्धत अवलंबली.

विशिष्ट दिवशी नेमकं काय करायचं आहे हे अभिषेकने कार्तिकला कधीच सांगितलं नाही. त्याने कधी पळायला लावलं, कधी पोहायला लावलं. एका दिवशी अभिषेकने दिनेशला डोंगर चढायला लावला. अचानक व्यायाम करायला लावला. दिनेश ते करत असताना अभिषेक बसून निरीक्षण करत असे. अभिषेक सांगत असे ते ते दिनेशनं केलं. अभिषेकने कार्तिकला कंफर्ट झोनमधून बाहेर काढलं. त्याच्या मनातली जळमटं दूर करण्यासाठी त्याने ही पद्धती वापरली.

घटस्फोट, अफेअर आणि सोशल मीडियावर फेक कहाण्या

दिनेश कार्तिक आणि निकिता यांचं 2007 मध्ये लग्न झालं. 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. निकिताने त्यानंतर निकिताने क्रिकेटपटू मुरली विजयशी लग्न केलं. घटस्फोट आणि अफेअर यासंदर्भात सोशल मीडियावर अफवांचा महापूर लोटला. लोकप्रिय खेळाडूंबद्दल काय काय लिहिलं गेलं ते एकदा वाचा-

निकिता आणि मुरली विजयचं अफेअर सुरू होतं. पण याची दिनेशला कल्पना नव्हती. त्या दोघांच्या संबंधातून बाळ जन्माला आलं. यामुळेच घटस्फोट झाला. घटस्फोटामुळे दिनेशच्या मनावर खूप परिणाम झाला. तो नैराश्याच्या गर्तेत सापडला. त्याला दारू प्यायची सवय लागली. या सगळ्यामुळे दिनेशला भारतीय संघातून डच्चू मिळाला. तामिळनाडू संघानेही त्याला वगळलं. दिनेशने आत्महत्येचाही विचार केला.

यंदाच्या आयपीएल हंगामात कार्तिकची कामगिरी चांगली होऊ लागल्यानंतर अनेक माध्यमांनी कार्तिकच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. लिखाण चटपटीत करण्यासाठी अनेक कथित घटना रचण्यात आल्या. या घटनांच्या सत्यासत्येबद्दल काहीही माहिती देण्यात आली नाही.

लिहिणाऱ्यांनी कार्तिकच्या आकडेवारीचे संदर्भ तपासले नाहीत. असंख्य कथित रचित कहाण्या समोर आल्यानंतर काही अभ्यासू पत्रकारांनी हे दावे खोटे असल्याचं सांगत बातम्या लिहिल्या. दरम्यान या कशाहीसंदर्भात कार्तिक, निकिता किंवा मुरली विजय यांनी यासंदर्भात कोणतंही भाष्य केलं नाही. याआधीही या तिघांनी वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही जाहीरपणे काहीही सांगितलेलं नाही.

दीपिकाची लाभली साथ

जिमच्या माध्यमातून कार्तिकची अव्वल स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि नंतर प्रेमात. काही वर्षांनंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्वत: आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू असल्याने दीपिकाने मला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतलं असं दिनेशने सांगितलं.

आंतरराष्ट्रीय स्क्वॉश क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावणारी दीपिका पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. 2014 कॉमनवेल्थ स्पर्धेत दीपिकाने दुहेरी प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. त्याची वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दीपिकाने चार पदकांची कमाई केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील 11 स्पर्धांची जेतेपदं दीपिकाच्या नावावर आहेत. दीपिकाला प्रतिष्ठेच्या अर्जुन आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

दिनेश कार्तिक, क्रिकेट, तामिळनाडू, आरसीबी, आयपीएल, भारतीय क्रिकेट संघ

फोटो स्रोत, Twitter/Dipika Pallikal

फोटो कॅप्शन, दिनेश कार्तिक, पत्नी दीपिका पल्लीकल आणि दोन जुळी मुलं

गेल्या वर्षी या दांपत्याला जुळी मुलं झाली. सोशल मीडियावर बाळांबरोबरच्या दोघांच्या फोटोची प्रचंड चर्चा झाली होती. दोघंही आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्याने एकमेकांच्या सामन्यांना ते उपस्थित असतातच असं नाही. पण जेव्हा स्पर्धा नसेल तेव्हा दोघे एकमेकांच्या सामन्यांना आवर्जून उपस्थित असत.

लग्नानंतर माझ्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल झाले आहेत, ते दीपिकामुळेच असं दिनेशने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं.

आयपीएलचे सगळे हंगाम खेळणारा शिलेदार

2008 ते 2022 या कालावधीत आयपीएलचे पंधरा हंगाम झाले. या सगळ्या हंगामात खेळणारे फारच मोजके खेळाडू आहेत. कामगिरीत सातत्य आणि फिटनेस या दोन्ही आघाड्यांवर सक्षम खेळाडूच इतकी वर्ष सलग खेळू शकतात. त्या मोजक्या खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिकचा समावेश होतो.

दिनेशने आयपीएल स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स अशा संघांकडून खेळला आहे.

दिनेश कार्तिक, क्रिकेट, तामिळनाडू, आरसीबी, आयपीएल, भारतीय क्रिकेट संघ

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन, दिनेश कार्तिक

कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्वही त्याने केलं आहे. तामिळनाडूच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला संघात घ्यावं यासाठी दिनेशने पुढाकार घेतला. कोलकाताने वरुणला संधी दिली. वरुण गोलंदाजी करत असताना तामीळ भाषेत दिनेश त्याला मार्गदर्शन करत असे. एकप्रकारे वरुणच्या यशात दिनेशचा महत्त्वाचा वाटा आहे.

सध्या सुरू असलेल्या हंगामात कार्तिक आरसीबीकडून खेळतो आहे. विराट कोहलीचा समावेश असलेल्या आरसीबीने कार्तिकसाठी लिलावात 5.5कोटी रुपयांची बोली लावली होती. संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत कार्तिकने यंदाच्या हंगामात लीग फेरीत 14 सामन्यात 191.33च्या स्ट्राईकरेटने 287 धावा केल्या. आरसीबीला बाद फेरीत नेण्यात कार्तिकची मोलाची भूमिका आहे. याच कामगिरीची दखल घेत निवडसमितीने त्याची भारतीय संघात निवड केली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)