श्रीलंका: महागाईनं मारलं पण आयपीएलनं तारलं, श्रीलंकेच्या खेळाडूंना असा मिळाला आधार

फोटो स्रोत, Mark Kolbe
आर्थिक संकटाने श्रीलंकेला वेढलं आहे. महागाईचा आगडोंब उसळल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि रनिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान झाले आहेत. देशात सर्वत्र अनागोंदीचं वातावरण आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये श्रीलंकेचे 5 खेळाडू खेळत आहेत. त्यांनी स्पर्धेतून माघार घ्यावी असं आवाहन श्रीलंकेतून करण्यात येत आहे. मात्र पण हे खेळाडू खेळत आहेत. मायदेशात दैनंदिन गोष्टींसाठी अतोनात संघर्ष सुरू असताना श्रीलंकेच्या काही खेळाडूंना आयपीएलने तारलं आहे.
वानिंदू हासारंगा डिसिल्व्हा (10.75 कोटी)
वानिंदू हासारंगा डिसिल्व्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासाठी खेळत आहे. लिलावात हासारंगासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळाली. बंगळुरूने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजला रिटेन केलं होतं. हासारंगाला पुन्हा ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी बंगळुरूने तब्बल 10.75 कोटी रुपये खर्च केले. फिरकीच्या बरोबरीने उपयुक्त फटकेबाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षण करत असलेला हासारंगा बंगळुरूच्या संघाला संतुलन मिळवून देतो.
अव्वल फिरकीपटू असलेला वानारंगा बेंगळुरू संघाचा अविभाज्य घटक आहे. हंगामात सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या खेळाडूला परपल कॅपने सन्मानित करण्यात येतं. हासारंगा सातत्याने विकेट्स घेत बंगळुरूच्या विजयात निर्णायक भूमिका बजावत आहे. परपल कॅप पटकावणाऱ्यांच्या संभाव्य खेळाडूंमध्ये हासारंगाचं नाव अग्रणी आहे.
दुश्मंत चमीरा (2 कोटी)
यंदाच्या हंगामापासून आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला. नव्या संघांपैकी लखनौ सुपरजायंट्स संघाचा दुश्मंत चमीरा भाग आहे. वेगवान आणि त्याचवेळी अचूक टप्प्यावर गोलंदाजीसाठी चमीरा प्रसिद्ध आहे.
चमीराने आतापर्यंत 10 मॅचमध्ये 9 विकेट्स घेतल्या आहेत. लखनौच्या गोलंदाजी विभागाचं नेतृत्व चमीराकडेच आहे. मोहसीन खान, यश दयाळ, प्रदीप संगवान, अल्झारी जोसेफ या युवा गोलंदाजांना चमीराही मार्गदर्शनही करतो. चमीराची उपयुक्तता लक्षात घेऊन लखनौने 2 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट केलं.
चामिका करुणारत्ने (50 लाख)
कोलकाता नाईट रायडर्स संघाने .. रुपये खर्चून अष्टपैलू चामिका करुणारत्नेला संघात समाविष्ट केलं. सहकाऱ्यांसह सराव करताना, डगआऊटमध्ये वावरताना करुणारत्ने दिसला. अंतिम अकरात चारच विदेशी खेळाडू शकत असल्याने करुणारत्नेला संधी मिळाली आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी करुणारत्नेला अद्याप मिळालेली नाही.
श्रीलंकेचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशला रवाना झाला आहे. चामिकाची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. चामिकाला रिलीज करावं अशी विनंती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कोलकाता नाईट रायडर्सला संघाला केली. राष्ट्रीय कर्तव्याचं महत्त्वाचं लक्षात घेऊन कोलकाताने चामिकाला रिलीज केलं आहे.
महेश ठिकसाना (70 लाख)
चेन्नईने शिताफीने महेश ठिकसानाला लिलावात संघात घेतलं. महेशचं नाव येताक्षणी चेन्नईने स्वारस्य दाखवलं. 70 लाख रुपये खर्चून चेन्नईने महेशला आपल्याकडे वळवलं. आयपीएल पदार्पण आणि तेही चेन्नईसारख्या मातब्बर संघाकडून त्यामुळे खूश असल्याचं काही दिवसांपूर्वी महेशने चेन्नई सुपर किंग्सच्या एका व्हीडिओदरम्यान सांगितलं होतं.

फोटो स्रोत, ISHARA S. KODIKARA
पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीला करण्याचा धोका पत्करत धावांना ब्रेक आणि विकेट अशी दुहेरी कामगिरी करत असल्याने महेशने कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
भानुका राजपक्षा (50 लाख)
पंजाब किंग्ज संघाने स्फोटक फलंदाज भानुका राजपक्षाला संघात समाविष्ट केलं. आयपीएल स्पर्धेत खेळण्याचं भानुकाचं हे पहिलंच वर्ष. सलामीच्या लढतीतच भानुकाने 22 चेंडूत 43 धावांची आक्रमक खेळी केली होती. सुरुवातीला संधी मिळाल्यानंतर भानुकाला वगळण्यात आलं. यानंतर पंजाबच्या कामगिरीत घसरण झाली. भानुकाची उपयुक्तता लक्षात घेऊन त्याला संघात समाविष्ट करण्यात आलं.

फोटो स्रोत, ISHARA S. KODIKARA
चेन्नईविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत भानुकाने 32 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गुजरात टायटन्सला हरवण्याची किमया पंजाबने केली. या लढतीत भानुकाने 28 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी केली. 30वर्षीय भानुकाने यंदा जानेवारीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आठवडाभरात त्याने त्याची निवृत्ती मागे घेतली.
मी काही हजार किलोमीटर दूर असलो तरी मायदेशी नागरिकांबरोबर जे घडतं आहे ते दुर्देवी आहे असं भानुकाने म्हटलं होतं.
या पाच खेळाडूंच्या बरोबरीने श्रीलंकेचे तीन माजी दिग्गज खेळाडू प्रशिक्षकाच्या भूमिकेत आयपीएल स्पर्धेत आहेत. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचा कोच आहे.
श्रीलंकेचा माजी कर्णधार, शैलीदार फलंदाज कुमार संगकारा राजस्थान रॉयल्स संघाचा डिरेक्टर ऑफ क्रिकेट या भूमिकेत आहे. भेदक यॉर्करसाठी प्रसिद्ध लसिथ मलिंगा राजस्थान रॉयल्सचा फास्ट बॉलिंग कोच आहे.
महेला जयवर्धनने यासंदर्भात ट्वीट केलं होतं. हिंसाचाराने आपलं लक्ष्य साध्य होणार नाही. गेल्या महिन्याभरापासून आपण वाखाणण्याजोगी शिस्त दाखवली आहे. हितसंबंध गुंतले असलेल्या लोकांना सत्तापदी येऊ देऊ नका असं जयवर्धनने म्हटलं होतं. त्याने #GoHomeGota2022 हा हॅशटॅगही वापरला होता.
कुमार संगकाराने तर पायउतार झालेले श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर देताना म्हटलं, गुंड आणि पुंड असलेल्या तुमच्या समर्थकांनी हिंसाचार घडवून आणला. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्यापूर्वी ते तुमच्याच कार्यालयात येतात.
सरकारविरोधी आंदोलनात अनेक माजी खेळाडू सहभागी होत आहेत. शैलीदार फलंदाज आणि निवृत्तीनंतर मॅचरेफरी म्हणून काम पाहिलेले रोशन महानामा हे सरकारविरोधी आंदोलनात उतरलेले पाहायला मिळाले.
विश्वचषकविजेत्या संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगा तसंच सनथ जयसूर्या रस्त्यावर उतरले आहेत. धम्मिका प्रसाद आंदोलनात पाहायला मिळाला होता.
2008 ते 2015 या कालावधीत जयवर्धने, संगकारा, मलिंगा यांच्यासह मुथय्या मुरलीधरन, चामरा कपुडेगरा, चामरा सिल्व्हा, चामिंडा वास, नुवान झोयसा, परवेझ महारुफ, तिलकरत्ने दिलशान, अजंथा मेंडिस, दिलहारा फर्नांडो, थिलान तुषारा, अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा, नुवान कुलसेकरा, सूरज रणदीव, नुवान प्रदीप, दिनेश चंडिमल, अखिल धनंजय, जीवन मेंडिस, सचित्र सेनानायके, कुशल परेरा, रंगना हेराथ, जेफ्री व्हँडरसे, मिलिंद सिरीवर्दने, असेला गुणरत्ने, इसूरू उदाना असे श्रीलंकेचे असंख्य खेळाडू आयपीएल स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








