आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर भारताचे वर्चस्व असणे ही गोष्ट क्रिकेटसाठी चिंतादायक ठरेल का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मॅथ्यू हेन्री
- Role, बीबीसी क्रीडा पत्रकार, दुबई
जिथून या स्पर्धेची सुरुवात झाली तिथून तब्बल 1000 किलोमीटर लांब तिची सांगता झाली. अंतिम सामना जिथे खेळवला जाणं अपेक्षित होतं प्रत्यक्षात तो सामना 2000 किलोमीटर लांब असलेल्या मैदानात झाला.
रविवारी दुबईत पार पडलेला अंतिम सामना जिंकत भारताच्या पुरुष क्रिकेट संघानं 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. चिवट झुंज देणाऱ्या न्यूझीलंडला हरवत भारताने हा सामना 4 विकेट्स राखून दिमाखात जिंकला.
या विजयानंतर भारतानं किमान एकदिवसीय (50 व 20 षटकांच्या) क्रिकेटमध्ये एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. मागच्याच वर्षी जून महिन्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघानं टी - 20 विश्वचषकावर कब्जा केला. त्याआधी 2023 ला भारतात भरलेल्या 50 षटकांच्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत भारताने धडक मारली होती.
मात्र, अहमदाबादमध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं मात दिल्यानंतर सबंध भारतावर जणूकाही शोककळा पसरली होती. रविवारच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील विजयानं सरतेशेवटी का होईना अहमदाबादमधील पराभवाची भरपाई करण्यात भारतीय संघ यशस्वी झाला.
मागच्या 3 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील खेळलेल्या एकूण 24 सामन्यांपैकी भारतानं फक्त एक सामना (2023 विश्वचषकाचा अंतिम सामना) गमावलाय. यावरूनच मागच्या काही काळातील भारतीय क्रिकेटचा दबदबा लक्षात येतो.
भारतीय संघाचा हा ऐतिहासिक विजय दुबईतील हजारो भारतीय क्रिकेट चाहत्यांनी वाजतगाजत साजरा केला असला तरी ज्या पद्धतीनं ही स्पर्धा पार पडली त्यावरून भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील लोकांचा रस कमी होत जाईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट चालवणाऱ्या सगळ्याच भागधारकांना याविषयी गांभिर्यानं विचार करावा लागेल. कारण क्रिकेटविषयी लोकांची उत्सुकता व क्रिकेट या खेळावर असणारी त्यांची निष्ठा कमी होत जाण्याचा हा धोका खचितच दुर्लक्ष करण्यासारखा नाही.
या स्पर्धेचं यजमानपद यावेळी पाकिस्तानकडे होतं. स्पर्धेतील बहुतांश सामने पाकिस्तानमध्ये पार पडले असले तरी क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय अशा भारतीय संघानं आपला एकही सामना पाकिस्तानमध्ये खेळला नाही. किंबहुना अंतिम सामनाही भारताच्या इतर सामन्यांप्रमाणे दुबईतच पार पडला.
त्यामुळे यजमानपद पाकिस्तानकडे असलं तरी या स्पर्धेचं मुख्य आकर्षण व उलाढाल दुबईत झाली, ही गोष्ट तशी पाहता भलतीच विचित्र म्हणावी लागेल.
जगभरातील सगळे संघ यजमान असलेल्या पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्याऐवजी प्रत्येक संघाला भारताच्या सोयीसाठी दुबईत पाचारण करण्यात आलंय, असंच काहीचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.
यजमानपदाचा मान मिळालेल्या पाकिस्तान ऐवजी दुबईच या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण केंद्र बनून गेलं होतं. ही स्पर्धा आधी ठरल्याप्रमाणे संपूर्णपणे पाकिस्तानमध्ये पार पडली असती तर ज्या पद्धतीने दुबईत भारताच्या सुपरस्टार क्रिकेटपटूंच्या नावाचा गजर झालेला पाहायला मिळाला तसाच तो लाहोर व कराचीतील मैदानात घोंघावला असता का?
दुर्दैवानं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं नाही. आणि भविष्यातही मिळण्याची शक्यता नाही. कारण भारतीय संघानं पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळणं गेल्या अनेक वर्षांपासून बंदच केलेलं आहे.
भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळला तर क्रिकेटच्या लोकप्रियतेसाठी ती अतिशय चांगली बाब ठरेल. पण दुर्दैवाने याची आशाच आता जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.


'चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आमचा संघ यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तानमध्ये जाणार नाही', अशी आपली भूमिका भारतीय क्रिकेट बोर्डानं मागच्या डिसेंबर महिन्यातच जाहीर केली होती. याचं कारण म्हणजे मागच्या काही काळात भारत - पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेला तणाव.
दोन देशांमधील या राजकीय बेबनावाचं प्रतिबिंब क्रिकेटवरही पडलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे मागच्या अनेक वर्षांपासून भारतीय संघ क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानात गेलेलाच नाही आणि भारतात क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानच्या संघालाही आमंत्रण दिलं जात नाही. एका अर्थानं भारताच्या क्रिकेट संघानं पाकिस्तानवर बहिष्कार टाकलेला आहे. भारताच्या या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघाची (आयसीसी) देखील मोठी अडचण झाली आहे.
भारताने यजमानपद असलेल्या पाकिस्तानमध्ये जायला नकार दिल्यानंतर भारताशिवाय ही स्पर्धा भरवण्याचा एक पर्याय आयसीसीकडे होता. पण भारताशिवाय कुठली जागतिक क्रिकेट स्पर्धा भरवणं आयसीसीला परवडणारं नाही. कारण आयसीसीच्या एकूण आर्थिक उलाढाल आणि उत्पन्नात एकट्या भारतीय क्रिकेट बोर्डाचा वाटा तब्बल 80 टक्के आहे. त्यामुळे भारताशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं अस्तित्वच जवळपास नसल्यात जमा आहे.
यातून तोडगा काढण्याचा आणखी एक पर्याय आयसीसीकडे होता तो म्हणजे पाकिस्तानकडून या चॅम्पियन्स ट्रॉफीचं याजमानपद काढून घेणं. पण तब्बल 29 वर्षानंतर एखाद्या जागतिक क्रिकेट स्पर्धेचं यजमानपद हाती लागलेल्या पाकिस्तानकडून त्यांची कुठलीही चूक नसताना ऐनवेळी यजमानपद हिसकावून घेणं हे अन्यायकारक झालं असतं. त्यामुळे हा पर्यायही निकालात निघाला.

फोटो स्रोत, Getty Images
शेवटी मग आयसीसीकडे एकच उपाय उरला. स्पर्धेतील भारताचे सगळे सामने पाकिस्तान बाहेर दुबई या एकाच शहरात भरवून उर्वरित चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये पार पाडणे. आयसीसीने हाच पर्याय अवलंबला. पण यामुळे भारताला मोठा फायदा झाला. संपूर्ण स्पर्धेत भारताला आपले सगळे सामने एकाच मैदानात खेळता आले.
इतकंच नव्हे तर कुठल्याही प्रवासाची दगदग न करता एकाच ठिकाणी, एकाच हॉटेलमध्ये राहून भारतीय क्रिकेट संघ आरामात संपूर्ण स्पर्धा खेळू शकला. अशी सूट इतर कुठल्याच संघाला नव्हती. उलट भारताच्या सोयीप्रमाणे इतर संघांना पाकिस्तान - दुबई - पाकिस्तान अशा वाऱ्या कराव्या लागल्या. त्यामुळे अर्थात इतर संघ भारतावर नाराज झाले.
न्यूझीलंड संघाची तर यामुळे प्रचंड गैरसोय झाली. या स्पर्धेतील आपले सामने खेळण्याकरिता न्यूझीलंड संघाला तब्बल 7000 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. दुसऱ्या बाजूला संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाचे खेळाडू एकाच हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून होते. जी काही धावपळ भारतीय खेळाडूंनी केली ती फक्त मैदानात खेळण्याकरिताच.
भारताला होणारा हा फायदा सगळ्यांच्या नजरेत भरणारा होता. तरीही भारतीय क्रिकेट व्यवस्थापनानं हे मान्य करण्यास सातत्यानं नकार दिला.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर तर भारतीय संघाला मिळणारी ही सूट अधोरेखित करणाऱ्या लोकांनाच 'उगाच आगपाखड करत बसण्याऐवजी समजूतदारपणा दाखवत खेळावर लक्ष्य केंद्रित करा,' असा सल्ला देऊन मोकळे झाले. नाही म्हणायला फक्त मोहम्मद शमीने उपांत्य फेरी झाल्यानंतर आम्हाला याचा फायदा झाल्याचं मान्य करण्याचा प्रांजळपणा दाखवला.

फोटो स्रोत, Getty Images
विरोधी संघांनी याबाबत भारतावर उघड टीका करायचं टाळलं असलं तरी दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलरनं जाता जाता हा मुद्दा अधोरेखित केलाच. उपांत्य फेरीत हार पत्करावी लागल्यानंतर अधिकचा प्रवास आणि तयारीसाठी कमी वेळ मिळाल्याची खंत त्याने भारताचं नाव न घेता बोलून दाखवली. सोबतच अंतिम सामन्यात माझं समर्थन न्यूझीलंडला असेल, असं सांगत अप्रत्यक्षपणे भारतीय संघांवर तिरका कटाक्ष टाकला.
इतर देशातील खेळाडू उघडपणे या विषयावर बोलायला कचरत असले तरी खासगीत चर्चा करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताची वाढती ताकद आणि त्यातून भारतीय क्रिकेट संघाचा चालणारा मनमर्जी कारभार हा त्यांना खुपत असल्याचं मला प्रकर्षानं जाणवलं. हा सगळा प्रकार बघता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एकतर्फी झुकलेला तराजू क्रिकेटला नेमकं कुठे घेऊन जातोय, असा चिंतातूर प्रश्न पडणं दर्दी क्रिकेट रसिकांना पडणं सहाजिकच आहे.
भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये जास्तीचं प्राधान्य दिलं जाण्याची ही काही एकमेव घटना अथवा स्पर्धा नाही. 2023 साली भारतात भरलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठीची खेळपट्टी भारताच्या सोईसाठी ऐनवेळी बदलण्यात आली, अशी कुजबूज दबक्या आवाजात तेव्हाही झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2024 साली वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी 20 विश्वचषक भरवण्यात आला. ही स्पर्धा देखील भारताला प्राधान्य देऊन आखली गेल्याचे आरोप त्यावेळी झाले. आणि हे आरोप अगदीच निराधार होते, असं म्हणता येणार नाही.
उदाहरणादाखल या स्पर्धेत आपले सगळे सामने नेमके कुठे होणार आहेत हे स्पर्धेसाठी त्या देशात पोहचण्याआधीच माहिती असणारा एकमेव संघ भारताचा होता. त्या अर्थाने कर्णधार रोहीत शर्माला आधीच संघाची निवड करणं आणि योजना बनवणं सोप्पं गेलं.
या स्पर्धेत भारतीय संघाचे सगळे सामने देखील विचित्र वेळेत खेळवले गेले. भारताचे सामने तिथल्या वेळेनुसार सकाळी 10 : 30 लाच सुरू व्हायचे. जेणेकरून भारतीय वेळेनुसार ते संध्याकाळी (जेव्हा भारतात लोक जास्तीत जास्त संख्येनं सोयीने पाहू शकतील) चालतील.
या गैरसोयीच्या वेळेमुळे प्रत्यक्षात मैदानातील प्रेक्षकांची संख्या कमी झालेली पाहायला मिळाली. शिवाय या सगळ्या स्पर्धांमधील भारताचे बहुतांश सामने हे रविवारच्या दिवशी आयोजित केलेले होते. जेणेकरून त्यावेळी भारतातील टीव्ही आणि डिजीटल प्रक्षेपणाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल.
जिथे सामने भरवले जात आहेत तिथले लोक आणि परिस्थितीपेक्षा भारतीय प्रेक्षकांना काय हवंय हे आधी विचारात घेऊन बाहेरील देशातील आतंरराष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन केलं जातंय. याचा परिणाम म्हणून दुसऱ्या संघांचं वेळापत्रक बिघडतं.
उदाहरणार्थ या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारताचा सामना रविवारीच व्हावा म्हणून 24 तासांच्या आत पाकिस्तान ते दुबई व पुन्हा परत पाकिस्तान असा उलटा प्रवास सामन्याच्या अगदी एक दिवस आधी करावा लागला. याचा त्यांच्या तयारीवर अर्थातच परिणाम झाला. म्हणूनच डेव्हिड मिलरने उपांत्य फेरीनंतर यावर उघड नाराजी व्यक्त केली.
यजमानपद मिळाल्यानंतर कुठलाही देश आपल्या सोयीने त्या स्पर्धेचं आयोजन करतो. ते साहजिकच म्हणावं लागेल. आणि यावर आक्षेप घेण्याचंही काही कारण नाही. कारण प्रत्येक देश हा फायदा उचलतो. पण यजमानपद आपल्याकडे नसतानाही संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपल्या सोयीनुसार करत भारत जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या वाढलेल्या ताकदीचा गैरवापर तर करत नाहीये ना? असा सवाल उठवला जाणं अगदीच अनाठायी नाही.
अर्थात भारतीय खेळाडूंचा यात काही दोष नाही. कारण या आयोजनात त्यांची कुठलीच भूमिका नसते. पण या सगळ्यात फायदा मात्र भारतीय खेळाडूंना होतोय आणि फटका इतर देशांच्या खेळाडूंना बसतोय, हे स्पष्ट आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय संघात इतक्या गुणी आणि तगड्या खेळाडूंचा भरणा आहे की स्पर्धा कुठेही आणि कशीही भरवली तरी भारतीय संघ ती जिंकू शकतो. त्यामुळे भारताला चषक जिंकण्यासाठी फक्त अनुकूल परिस्थितीच असायला हवी, असं काही नाही.
भारताकडे इतक्या एकाहून एक तगड्या खेळाडूंची फौज तयार आहे की प्रतिकूल परिस्थितीतही हा संघ कुठलीही स्पर्धा जिंकण्याची क्षमता निर्विवादपणे बाळगून आहे. ही चॅम्पियन्स ट्रॉफी देखील भारताने आपला प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जिंकलेली आहे, ही गोष्ट सुद्धा ध्यानात घेतली पाहिजे. त्यामुळे ही चॅम्पियन्स ट्रॉफी भारत फक्त नशिबानं किंवा अनुकूल परिस्थितीमुळे जिंकला, असा दावा कोणीच करू शकत नाही.
पण म्हणून गेल्या काही काळापासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत भारताला जास्तीचं प्राधान्य दिलं जातंय, याकडे नजर अंदाज केलं जाऊ शकत नाही. जास्तीत जास्त लोकप्रियता, प्रेक्षक व त्यातून उत्पन्न होणारा महसूल मिळवण्यासाठी आयसीसी देखील वरचेवर अधिकच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवत चालली आहे. 2023 पासून प्रत्येक वर्षी एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली गेलीये.
मग तो 50 षटकांचा विश्वचषक असो, चॅम्पियन्स ट्रॉफी असो, टी - 20 विश्वचषक असो की गेलाबाजार कसोटीची चॅम्पियनशिप. अधिकचा पैसा छापण्यासाठी आयसीसीनं 2031 पर्यंत दरवर्षी एक या प्रमाणे आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवण्याचा रतीब घातला आहे.
दरवर्षी भरणाऱ्या आयपीएलचं प्रारुप बघून आयसीसीला या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा मोह आवरता आलेला नाही, असंच दिसतंय. आधी चार वर्षांतून एकदाच येणारा विश्वचषक आता मागच्या काही काळापासून दरवर्षी होताना दिसतोय.
पण अधिकचा महसूल कमावण्याच्या नादात अतिक्रिकेट झाल्यामुळे लोकांचा क्रिकेटमधील रस कमी होण्याचाही धोका यामुळे उत्पन्न झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन ट्रॉफी मधून देखील याचा प्रत्यय काही प्रमाणात आपल्याला आला.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे तीन संघ यंदाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते. पण या तिन्ही देशांचा एकही वर्तमानपत्रातून लिखाण-वार्तांकन करणारा माध्यम प्रतिनिधी या स्पर्धेचं वार्तांकन करायला पाकिस्तान अथवा दुबईत आला नव्हता. याला आपला खेळ लोकप्रिय अथवा जागतिक बनला असल्याचं प्रतीक खचितच मानता येणार नाही.
नाही म्हणायला या स्पर्धेत एकामागोमाग एक असे मानहानीकारक पराभव पचवून प्राथमिक फेरीतच स्पर्धेतून गारद झालेल्या इंग्लंड संघाची चर्चा माध्यमांमध्ये झालेली पाहायला मिळाली खरी पण त्याव्यतिरिक्त या स्पर्धेबद्दल फारशी उत्सुकता अभावनेच आढळून आली.
एरवी विश्वचषक अथवा चॅम्पियन्स ट्रॉफी आहे म्हटल्यावर टीव्ही, वर्तमानपत्र, रेडिओ, इंटरनेट इतकंच काय आपल्या फॅमिली व्हॉट्स ॲप ग्रूपवर देखील क्रिकेटच्याच चर्चा तावातावाने रंगलेल्या पाहायला मिळायच्या. पण यावर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान इथे सगळीकडेच तुलनेनं शुकशुकाट असलेला पाहायला मिळाला.
या स्पर्धेचं घाईघाईत करण्यात आलेल्या चुकीच्या आयोजनानं देखील ही आधीच घटत असलेली लोकप्रियता आणखी कमी केली. एरवी अशा प्रकारच्या जागतिक क्रिकेट स्पर्धेतील सगळ्या सामन्यांची तारीख, मैदान अशा बाबी कित्येक महिने आधीच जाहीर झालेल्या असतात. क्रिकेट रसिकही बऱ्याच आधीपासून याकडे डोळे लावून बसलेले असतात.
पण यावेळेस स्पर्धा अगदी दोन महिन्यांवर आलेली असताना देखील स्पर्धेचं वेळापत्रकातून तयार झालेलं नव्हतं. क्रिकेट मधील लोकांची उत्सुकता कमी आणि अनास्था वाढत असल्याचंच हे द्योतक म्हणता येईल. जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या मानानं या चॅम्पियन्स ट्रॉफीला मिळालेला लोक प्रतिसाद अतिशय थंडच राहिला.
त्यात ढिसाळ नियोजनानं क्रिकेट रसिकांचा आणखी हिरमोड झाला. उदाहरणार्थ मागच्या वर्षीच्या टी - 20 विश्वचषकाचा उपांत्य सामना हा वेस्टइंडीज मधील गयाना मध्ये भरवण्यात आला. इथे जायला नीट विमान सेवाच बऱ्याच देशांमधून उपलब्ध नव्हती.
त्यात पुन्हा अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेनंच ही जागा असुरक्षित असून इथे न जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सामना बघण्यासाठी दुसऱ्या देशातून क्रिकेट प्रेक्षक तर सोडाच वार्तांकन करणारे माध्यम प्रतिनिधी देखील उपस्थित नव्हते. उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्याबद्दल इतकी अनास्था दिसून येणं जागतिक क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीनं चिंताजनकच म्हणावं लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
आता पुढच्या काही काळात आणखी दोन स्पर्धा आयसीसी भरवणार आहे. या वर्षाच्या अखेरीस महिलांचा विश्वचषक तर पुढच्या वर्षीच्या पूर्वार्धातच पुरुषांचा टी - 20 विश्वचषक पार पडणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा भारतातच भरवल्या जाणार आहेत.
भारताने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानमध्ये जायला नकार दिल्यानं कदाचित पुढच्या वर्षीच्या विश्वचषकात पाकिस्तान भारतात यायला नकार देईल. त्यामुळे काही सामने श्रीलंकेत खेळवले जाण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने खरंतर क्रिकेट हा धर्म मानल्या जाणाऱ्या भारतीय उपखंडात तरी किमान उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळणं अपेक्षित होणं. पण या क्रिकेटवेड्या देशातील लोकही आपल्याकडे विश्वचषक होणार असल्याबद्दल फारसे उत्सुक असलेले दिसत नाहीत.
एकूणात आंतरराष्ट्रीय क्रिकेटभोवती निराशा आणि निरुत्सुकतेचं मळभ दाटलेलं असलं तरी परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेलीये, अशातलीही काही गोष्ट नाही. या प्रतिकूल परिस्थितीत देखील काही आशेचे किरण नक्कीच पाहायला मिळत आहेत. सच्चे क्रिकेट रसिक आपल्या या खेळावर अजूनही तितकंच निस्सीम प्रेम करतात. अर्थात ही संख्या सध्या रोडावलेली असली तरी अजूनही लक्षणीय म्हणावी इतकी तरी नक्कीच कायम आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अनेक वादविवाद आणि नकारात्मक पैलू समोर आणणाऱ्या याच चॅम्पियन्स ट्रॉफीमधील काही आश्वस्त आणि आशा पल्लवित करणाऱ्या बाबींचा उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण या अंधारातून वाटत काढत प्रकाशाचा आशावाद कायम ठेवणारे नवे किरण याच चॅम्पियन्स ट्रॉफीतून उगवले आहेत. बरेचशे सामने पावसामुळे वाया गेले अथवा एकतर्फी आणि निरस झाले असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दर्जा आणि प्रतिभेची साक्ष देणारा आकर्षक खेळदेखील याच चॅम्पियन्स ट्रॉफीत आपल्याला पाहायला मिळाला.
इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या जॉस एंग्लिसनं झळकावलेलं दमदार शतक, न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने भविष्यातील स्टार फलंदाज बनण्याची दाखवलेली चुणूक, अफगाणिस्तानचा तरूण खेळाडू अझमातुल्लाह ओमरझाईनं केलेलं अष्टपैलू प्रदर्शन व न्यूझीलंडच्याच ग्लेन फिलिप्सनं हवेत भिरकावत घेतलेले चित्तथरारक झेल क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. क्रिकेट रसिकांना क्रिकेट मध्ये गुंतवणूक ठेवतील असे नवे हिरे या चॅम्पियन्स ट्रॉफीनं आपल्याला दिले आहेत.
त्यामुळे क्रिकेटचा दर्जा व खेळाडूंची प्रतिभा याबाबतीत तरी चिंता करण्याचं काही कारण नाही. या निकषांवर क्रिकेटचं भविष्य अगदी सुरक्षित आहे, असं ठामपणे म्हणता येईल. प्रश्न आहे तो फक्त खेळ भावना आणि रसिकतेचा.
समतोल अपेक्षित असणारा हा जागतिक क्रिकेटचा तराजू एकाच संघाकडे झुकवत नेला जात असताना ही खेळ भावना आणि रसिकता टिकवून ठेवणं ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट चालवणाऱ्यांसाठी तारेवरची कसरत असणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











