महेंद्रसिंग धोनी : आयपीएलमधील आणखी एक विक्रम मोडणार का? काय सांगतात आकडे?

महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अयाज मेमन
    • Role, क्रिकेट समीक्षक

आयपीएल 2025 सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. भारतात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दिवसभर क्रिकेट खेळायचं आणि संध्याकाळी आयपीएलचे सामने असा अनेकांचा बेत असतो.

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ही स्पर्धा गाजवलेल्या अनेक देशी-विदेशी खेळाडूंची चर्चा होत असते. पहिल्या हंगामात खेळलेले अनेक खेळाडू आता निवृत्त झाले आहेत. काही खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचाही शेवट जवळ आला आहे.

पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊनही चर्चेत असणाऱ्या, केवळ चर्चेतच नाही तर ही स्पर्धा स्वतःभोवती केंद्रित करणाऱ्या काही मोजक्या मोठ्या खेळाडूंमधलं एक नाव म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी.

यापूर्वीच्या काही आयपीएल स्पर्धांमध्ये धोनी खेळणार की नाही? याविषयी बरीच चर्चा झाली. अनेकांना दरवर्षी वाटायचं की, धोनी यावर्षी निवृत्त होईल.

पण 43 वर्षांच्या धोनीने कधी पायाला पट्टी बांधून, कधी केस वाढवून, कधी अनावश्यक धावपळ करायचं टाळून आयपीएलमधला त्याचा खेळ सुरू ठेवला. यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीचा चेन्नई सुपरकिंग्स हा संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळतोय.

पहिल्याच सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनी कसा खेळतो याकडे अनेकांचं लक्ष असणार आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

धोनी हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्याच्यासोबत विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे दिग्गज खेळाडू तसेच अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतसारखे उदयोन्मुख खेळाडूही देखील स्पर्धा करत आहेत.

गेल्या नऊ महिन्यांत भारताला दोन आयसीसी स्पर्धा जिंकवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ही नावे समाविष्ट आहेत. जूनमध्ये झालेला टी-20 विश्वचषक आणि गेल्या महिन्यात झालेला चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाने आपल्या नावे केली आहे.

धोनी यंदा कोणते विक्रम मोडणार?

आगामी जुलै महिन्यात धोनी 44 वर्षांचा होईल. सध्या तो आयपीएलच्या 18व्या मोसमात खेळतोय आणि यापैकी 16 स्पर्धांमध्ये त्याने चेन्नई सुपरकिंग्स संघामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

यावर्षीच्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. पण एकूण आयपीएल स्पर्धांचा विचार केल्यास तो अजूनही आयपीएल खेळलेला सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरलेला नाही.

2016 साली कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असलेला ब्रॅड हॉग हा ऑस्ट्रेलियन खेळाडू त्याच्या शेवटच्या आयपीएल सामन्यात 45 वर्ष 92 दिवसांचा होता.

राजस्थान रॉयल्सकडून खेळलेल्या प्रवीण तांबेने पदार्पण केलं तेव्हा त्याचं वय 41 वर्ष 212 एवढं होतं. प्रवीण आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला होता.

प्रवीणने 2019 साली त्याचा शेवटचा सामना खेळला आणि तेव्हा त्याचं वय 44 वर्ष 219 एवढं होतं. लेगस्पिनर असणाऱ्या प्रवीणने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना संस्मरणीय कामगिरी केली होती.

महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Getty Images

आता महेंद्रसिंह धोनी ब्रॅड हॉग आणि प्रवीण तांबेला याबाबत मागे टाकू शकतो का? याचं उत्तर येणारा काळच सांगेल. पण संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत खेळाडू आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रम आपल्या नावे केलेल्या धोनीला हा विक्रम देखील नक्कीच खुणावत असणार.

तीन वर्षांपूर्वी धोनीने चेन्नईचं कर्णधारपद सोडलं तेव्हा तो निवृत्त होईल असं अनेकांना वाटलं होतं. मागच्या वर्षीची त्याची कामगिरी बघून अनेकांना असं वाटलं होतं की, कदाचित हा धोनीचा शेवटचा आयपीएल असेल पण तसं घडलं नाही.

धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्षांपेक्षा अधिकचा काळ झाल्याने 2025च्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून स्वतःकडे राखण्यात यश मिळवलं होतं.

आयपीएलमध्ये धोनीची कामगिरी

आयपीएलमध्ये धोनीने आजवर 5 हजार 243 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा केलेल्या खेळाडूंच्या यादीत धोनी सहाव्या स्थानी आहे. या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.

धोनीची धावांची सरासरी 39.12 आहे. हा आकडा विराट कोहली आणि रोहित शर्मापेक्षा जास्त आहे.

आयपीएलमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त धावा केलेल्या खेळाडूंच्या सरासरीच्या यादीत धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत धोनीच्या पुढे फक्त एबी डिव्हिलियर्स (39.70) आणि डेव्हिड वॉर्नर (40.52) आहेत.

पाच हजारांपेक्षा जास्त धावा केलेल्या खेळाडूंच्या स्ट्राईक रेटचा विचार केला तर त्याही यादीत धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा स्ट्राईक रेट 137.53 एवढा आहे. इथे एबी डिव्हिलियर्स (151.68) आणि डेव्हिड वॉर्नर (139.77) धोनीच्या पुढे आहेत.

धोनीने आयपीएलमध्ये 252 षटकार मारले आहेत. त्याच्या पुढे फक्त तीन खेळाडू आहेत - ख्रिस गेल (357), रोहित शर्मा (280) आणि विराट कोहली (272).

महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

फलंदाजीचे आकडे धोनीच्या खेळातील एकाच अंगाचं विश्लेषण करतात. धोनी हा विकेटकिपर देखील राहिलेला आहे.

धोनीने आयपीएलमध्ये 180 खेळाडूंना विकेटकिपिंगच्या जोरावर तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. तो आयपीएलच्या इतिहासातला सगळ्यात यशस्वी विकेटकिपर आहे.

विकेटमागे त्याची सतर्कता आणि ग्लोव्ह्जच्या उत्कृष्ट वापरामुळे त्याला माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 'पिकपॉकेट' असं टोपणनाव दिलं होतं. मुंबईविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात धोनीने त्याच्या अतिवेगवान विकेटकिपिंगची चुणूक दाखवून दिली.

धोनी त्याच्या हेलिकॉप्टर शॉटमुळे खूप प्रसिद्ध झाला. मजबूत मनगटाच्या लवचिकतेचा वापर करून मिडविकेटला फ्लिक करण्याची त्याची शैली नंतर अनेक नवोदित खेळाडूंनी जशीच्या तशी वापरली.

धोनीच्या फलंदाजीचा दुसरा पैलू म्हणजे मैदानात उतरल्यावर सामना नियंत्रित करण्याची त्याची क्षमता. कोणताही सामना शेवटपर्यंत खेचून निर्णायक क्षणी फटकेबाजी करण्याची क्षमता धोनीमध्ये आहे.

यासोबतच खेळपट्टीवर अतिशय वेगात धावून धावा काढण्यात तो तरबेज आहे. त्याच्या याच वेगाने अनेक सामन्यांमध्ये तो त्याच्या संघाला परत घेऊन आलेला आहे.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार

कर्णधार म्हणून सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याचा (210) आणि सर्वाधिक विजय (123) मिळवण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने चेन्नईला पाच आयपीएल चषक आणि दोन चॅम्पियन्स लीग जेतेपदे जिंकून दिली आहेत.

धोनीने भारताला तीन आयसीसी स्पर्धांचा विजेता बनवलेलं आहे. ज्यामध्ये 2007 चा टी-20 विश्वचषक, एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक (2011) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (2013) अशा महत्त्वाच्या स्पर्धांचा समावेश आहे.

याशिवाय, कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी प्रभावी आहे. त्याने 90 कसोटी सामने खेळले आणि 2014-15 साली कसोटी मालिका मध्यावर असताना अचानक धोनीने निवृत्ती जाहीर केली. त्याआधी त्याने भारताला आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर नेले होते.

महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Getty Images

माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री अनेकदा भारताने निर्माण केलेला सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून धोनीचं वर्णन करतात. मात्र, यावर वादविवाद होऊ शकतो. पण आता हे सर्वमान्य आहे की धोनी गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांच्या श्रेणीत येतो.

तर सध्याचा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी काय घेऊन आला आहे?

धोनी अजूनही आयपीएलमध्ये का खेळतोय?

वयामुळे धोनीवर शारीरिकदृष्ट्या परिणाम झाला असावा. काही वेळा ते सामन्यांत दिसतंही. पण तो मानसिकदृष्ट्या अजूनही मजबूत आणि अत्यंत स्पर्धात्मक आहे.

गेल्या हंगामात, त्याने फिनिशरच्या भूमिकेपासून स्वतःला दूर केलं होतं. त्याने रणनीती अशा प्रकारे बदलली की, तो एक छोटी पण महत्त्वाची खेळी खेळू शकेल जी सामन्याच्या निकालावर परिणाम करू शकेल.

इम्पॅक्ट प्लेअर नियमानुसार आयपीएलमधील संघांना खेळाच्या परिस्थितीनुसार अतिरिक्त विशेषज्ञ फलंदाज किंवा गोलंदाज निवडण्याची परवानगी मिळते. धोनी या भूमिकेत चांगल्या प्रकारे बसू शकतो. तसेच, धोनी कर्णधारासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकतो.

महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Getty Images

धोनीला संघात कायम ठेवणे ही सीएसकेसाठी मोठी गोष्ट नाही. त्याचे आकर्षण सीएसकेच्या चाहत्यांपुरतेच मर्यादीत नाही. त्यामुळं फ्रँचायझी आणि आयपीएल दोघांनाही मोठे आर्थिक आणि ब्रँडिंगचे फायदे मिळतात. चेन्नई सुपर किंग्सने म्हटल्याप्रमाणे, धोनीशिवाय आयपीएल 'अकल्पनीय' आहे.

यामुळे भारतीय आणि परदेशी दोन्ही तरुण खेळाडूंसाठी संधी मर्यादित होऊ शकतात. परंतु रवी शास्त्री हा युक्तिवाद फेटाळून लावतात.

ते म्हणतात, "इंडियन प्रीमियर लीग मुक्त बाजारपेठेवर चालते. फ्रँचायझी मालक भावनिक नसतात. त्यांना माहिती असते की मैदानावर आणि मैदानाबाहेर त्यांच्यासाठी काय चांगले आहे."

माजी भारतीय सलामीवीर रॉबिन उथप्पा धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांसाठी खेळला आहे.

उथप्पा म्हणतो, "धोनीकडे दुर्लक्ष करणे हा धोका तुम्ही स्वतःच्या जोखमीवर पत्करू शकता. आम्हाला अजूनही त्याच्यात जुनी जादू दिसते."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.