IPL जिंकणाऱ्या RCB ला आणि हरणाऱ्या पंजाब किंग्सला किती रुपये मिळाले?

फोटो स्रोत, Getty Images
आयपीएल 2025 चा अंतिम सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 18 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.
पंजाब किंग्सला आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, विजय असो वा पराभव, दोन्हीही संघांना प्राईझ मनी म्हणून भरपूर पैसा मिळाला आहे.
आरसीबीला जिंकल्यानंतर प्राईझ मनी म्हणून 20 कोटी रुपये मिळाले आहेत तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या पंजाब किंग्सला 12.5 कोटी रुपये मिळाले आहेत.
याशिवाय, आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनला ऑरेंज कॅप मिळाली आहे. त्याने 15 सामन्यांमधील 15 इनिंग्समध्ये 759 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.
फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीमध्येही गुजरात टायटन्स संघाचा दबदबा दिसून आला. या टीममधील प्रसिद्ध कृष्णाला सर्वाधिक म्हणजेच 25 विकेट्स घेतल्याबद्दल 'पर्पल कॅप' मिळाली आहे.
आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघापैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव हा 'मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर' ठरला आहे.
तर, राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीला 'सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन' हा अवॉर्ड प्राप्त झाला आहे.
सात सामन्यांमधील सात इनिंग्समध्ये वैभवने 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा केल्या आहेत.
आयपीएल 2025 चा फेयरप्ले अवॉर्ड चेन्नई सुपर किंग्सला प्राप्त झाला आहे.
अंतिम सामन्यात काय काय घडलं?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव करत आयपीएल 2025 चं विजेतेपद मिळवलं आणि त्यासोबतच विराट कोहलीची 18 मोसमांपासूनची प्रतीक्षा संपुष्टात आली.
2008 साली आयपीएलला सुरुवात झाली, तेव्हापासून विराटनं हे स्वप्न पाहिलं होतं. त्याच वर्षी विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतानं दक्षिण आफ्रिकेला हरवून अंडर-19 वर्ल्डकप जिंकला होता.
पण तरीही विराट ज्या दिल्लीत जन्मला त्या दिल्लीच्या फ्रँचायझीनं विराटऐवजी प्रदीप सांगवानला त्यांच्या संघात घेतलं. तेव्हा सुदूर दक्षिणेतील बंगळुरूच्या संघाने विराट कोहलीला फक्त बारा लाखांमध्ये त्यांच्या संघात घेतलं होतं. तो सौदा अखेर फायद्याचा ठरला.
आयपीएलच्या 18 मोसमांतील प्रवासात विराटने या टीमची साथ कधीही सोडली नाही. त्यानं अनेकदा स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. विराटसोबत बंगळुरूच्या संघात जगभरातील दर्जेदार खेळाडूंचा भरणा होता, पण त्यांचं जेतेपदाचं स्वप्न हुलकावणी देत होतं.
18 नंबरची जर्सी घालणाऱ्या विराट कोहलीचं स्वप्न 18 व्या मोसमाअखेर पूर्ण झालं आहे.
अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाबसमोर 191 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण पंजाबला 7 बाद 184 धावाच करता आल्या.
भुवनेश्वर कुमार, जॉश हेझलवूड, कृणाल पंड्या, सुयश शर्मा आणि यश दयाला या आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांवर दबाव टाकला आणि अखेर बंगळुरूच्या फॅन्सचं 18 वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं.

फोटो स्रोत, Getty Images
बंगळुरूच्या टीमनं गेल्या सहा मोसमांत बंगळुरूनं पाचवेळा प्लेऑफ गाठला होता. तर फायनल गाठण्याची ही चौथी वेळ होती. याआधी 2009, 2011 आणि 2016 साली ते RCB फायनलमध्ये पोहोचले होते, पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
अखेर चौथ्या प्रयत्नात बंगळुरूचं स्वप्न साकार झालं.
'आज मी लहान बाळासारखा झोपणार आहे'
अहमदाबादमध्ये सामना संपल्यावर समालोचक मॅथ्यू हेडनला पहिली प्रतिक्रिया देताना विराट म्हणाला, "शेवटचा बॉल टाकला गेला, तेव्हा माझं ऊर भरून आलं. भावनांचा बांध फुटला."
हा विजय संघासाठीच नाही, तर चाहत्यांसाठीही महत्त्वाचा असल्याचंही विराटनं सांगितलं.
"मी या टीमसाठी माझी उमेदीची वर्षं दिली, माझ्या कारकिर्दीची 18 वर्षं दिली. हो, कधी असे क्षणही आले होते की मी दुसरा विचार करतही होतो, पण नाही... RCBसोबतच मला हा क्षण जगायचा होता, आणि आज तो क्षण प्रत्यक्षात उतरला आहे"

फोटो स्रोत, Getty Images
एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलबाबत बोलताना विराट म्हणाला, "एबी डिव्हिलियर्सने आमच्या संघासाठी जे केलं आहे ते अविश्वसनीय आहे. हा विजय त्याचासुद्धा आहे. आम्हा सगळ्यांसोबत आज तो देखील मंचावर असेल, त्याची ती योग्यता आहे.
"माझ्या कारकिर्दीतला सर्वोत्तम क्षणांपैकी हा एक आहे. माझं हृदय, माझा जीव बंगळुरूमध्ये आहे. मी माझ्या आयपीएलचा शेवटचा सामनासुद्धा याच संघासाठी खेळेन. आज मी एखाद्या लहान बाळासारखा झोपणार आहे."
बंगळुरूच्या डावात काय घडलं?
आज संध्याकाळी पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं.
बंगळुरूचे पहिले दोन फलंदाज सातव्या षटकात 56 धावांत माघारी परतले. जेमिसननं फिल सॉल्टला 18 धावांवर बाद केलं. श्रेयस अय्यरनं त्याा झेल टिपला.
तर पहिल्या क्वालिफायर सामन्यात चांगली फलंदाजी केलेल्या मयांक अग्रवालला देखील मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. त्याने 18 बॉल्समध्ये 2 चौकार एका षटकारासह फक्त 24 धावा केल्या.
युझवेंद्र चहलनं त्याला अर्शदीपकरवी झेलबाद केलं.
त्यानंतर विराट कोहलीनं रजत पाटीदारसह 40 धावांची भागीदारी केली. पण पाटीदार 26 धावांवर असताना जेमिसननं त्याला पायचीत केलं.

फोटो स्रोत, Getty Images
विराट कोहली मोठी खेळी खेळण्यासाठी सज्ज झाल्यासारखा वाटत होता, पण त्याचं अर्धशतक सात धावांनी हुकलं. विराट 43 धावांवर बाद झाला.
पण विराट कोहली बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या जितेश शर्माने जेमिसनच्या ओव्हरमध्ये चौकार आणि षटकार खेचून बंगळुरूचा डाव रुळावर आणला. त्यानं आणि लियाम लिव्हिंगस्टननं फटकेबाजी करून डावात रंगत आणली.
पण लिव्हिंगस्टन 25 आणि जितेश 24 धावांवर माघारी परतले. तर रोमेरो शेफर्डनं 1 षटकार आणि एक चौकार ठोकला, पण तो 17 धावांवर पायचीत झाला. पाठोपाठ कृणाल पंड्या आणि भुवनेश्वर कुमार स्वस्तात बाद झाले.
पंजाबची शिस्तबद्ध गोलंदाजी
पंजाबच्या गोलंदाजांनी फायनलमध्ये पहिल्या षटकापासूनच अत्यंत शिस्तबद्ध मारा केला.
पहिल्या षटकात अर्शदीप सिंगने फिल सॉल्टच्या पायावर गोलंदाजी केल्यामुळे काही धावा गेल्या पण त्यानंतर काइल जेमिसन, युझवेंद्र चहल आणि इतर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली.
अर्शदीपनं 4 षटकांत 40 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. तर काईल जेमिसननं 4 षटकांत 48 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स काढल्या.

फोटो स्रोत, Getty Images
युझवेंद्र चहलनं फायनलमध्ये 4 ओव्हर्समध्ये फक्त 37 धावा देऊन मयांक अग्रवालची महत्त्वाची विकेट काढली.
अफगाणिस्तानच्या अजमतुल्लाह ओमरझाईने देखील चांगली गोलंदाजी केली. त्याने विराट कोहलीची विकेट घेतली पण शेवटच्या दोन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार दिला. ओमरझाईने 4 ओव्हर्समध्ये 35 धावा देऊन 1 विकेट घेतली.
विजयकुमार विषकने देखील अत्यंत कंजूस गोलंदाजी करून 4 ओव्हरमध्ये फक्त 30 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली.
ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेते
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा)
- साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - 759 धावा
- सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स) – 717 धावा
- शुबमन गिल (गुजरात टायटन्स) – 650 धावा
- मिचेल मार्श (लखनौ सुपर जायंट्स) – 627 धावा
- विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) – 657 धावा
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स)
- प्रसिध कृष्णा (गुजरात टायटन्स) – 25 विकेट्स
- नूर अहमद (चेन्नई सुपर किंग्स) – 24 विकेट्स
- ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स) – 22 विकेट्स
- जोश हेझलवूड (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) – 22 विकेट्स
- साई किशोर (गुजरात टायटन्स) – 19 विकेट्स
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











