मोसादचं नेटवर्क ते रिअल टाईम पाळत, इस्रायलनं इराणमध्ये घुसून कसा हल्ला केला?

फोटो स्रोत, IDF
- Author, बीबीसी पर्शियन सर्व्हिस
इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर असं दिसून आलं की, इस्रायलने केवळ हवाई हल्लेच केले नाहीत, तर फार पूर्वीपासून जमिनीवरून हल्ल्यांसाठीची मोर्चेबांधणी देखील केली होती. बऱ्याच काळापासून इस्रायल गुप्तमार्गाने इराणमध्ये घुसून या हल्ल्याची तयारी करत होतं.
याआधी इराणी अधिकाऱ्यांनी इस्रायल त्यांच्या संरक्षण दलामध्ये घुसखोरी करू शकतं, असा अंदाज वर्तवला होता. या संपूर्ण घटनाक्रमात इस्रायलची गुप्तचर संस्था 'मोसाद'ची भूमिका नेमकी काय होती हे समजून घेणं सोपं नाही.
सामान्यतः इस्रायल मोसादच्या कारवायांबाबत कुठेही भाष्य करत नाही. इराणमध्ये झालेल्या कारवाईमध्ये तर आणखी काही गुप्तचर संस्थांचा हात असण्याची शक्यता आहे.
असं असलं तरीही मोसादने इराणमध्ये घुसून हल्ल्यांचं ठिकाण निवडण्यात आणि या संपूर्ण कारवाईला प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जातंय.

फोटो स्रोत, ATTA KENARE/AFP via Getty Images
या हल्ल्यानंतर झालेल्या बातम्या आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून हे दिसून येतं की, इराणमध्ये असणारी पाणबुडीविरोधी यंत्रणा, क्षेपणास्त्रांची गोदामं, सैनिकी नियंत्रण कक्ष आणि निवडक लोकांना लक्ष्य करून अतिशय अचूक हल्ले करण्यात आले.
प्रदीर्घ काळापासून इस्रायल इराणमध्ये करत असलेल्या गुप्तचर कारवायांमुळेच हे हल्ले शक्य झाल्याचं दिसून येतंय.
इराणच्या गुप्तचर यंत्रणेचं मोठं नुकसान
इस्रायलने केवळ इराणच्या आण्विक आणि लष्करी तळांवरच हल्ले केले नाहीत, तर या हल्ल्यांमध्ये इराणच्या गुप्तचर यंत्रणेचं देखील मोठं नुकसान झालं आहे. यामुळे इराणचे नेते आणि लष्करी अधिकारी गोंधळात पडले आहेत.
अशा परिस्थितीत, हल्ल्यांच्या पाचव्या दिवशी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डने जारी केलेल्या अधिकृत निवेदनातून असे दिसून येते की, सरकारच्या सर्वोच्च स्तरावर गुप्तचर धोक्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

फोटो स्रोत, MAJID SAEEDI/GETTY IMAGES
इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डने जारी केलेल्या निवेदनात इराणच्या लष्करी अधिकारी आणि त्यांच्या सुरक्षा पथकांना मोबाईल फोन, स्मार्ट घड्याळे किंवा लॅपटॉप सारखी कोणतीही उपकरणे न वापरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
केवळ अधिकाऱ्यांसाठीच नाही, तर सामान्य नागरिकांसाठी देखील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. इंटरनेट किंवा तत्सम नेटवर्कशी जोडणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कमीत कमी वापर करण्यास सांगण्यात आलं आहे.
या सूचना केवळ सावधगिरीचा उपाय म्हणून दिलेल्या नाहीत, तर इराणच्या अंतर्गत सायबर सुरक्षेत मोठी घुसखोरी झाल्याची शक्यता यावरून दिसते.
इराणमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी
इस्रायली आणि पाश्चिमात्य माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, केवळ इराणच्या संवेदनशील माहितीवरच हल्ला झालेला नाही. तर इस्रायलने इराणमध्येच शस्त्र बनवून ती निश्चित ठिकाणी तैनात करण्यासाठीची यंत्रणा विकसित केलेली आहे.
इस्रायलने इराणमध्ये बनवलेलं स्थानिक एजंट्सचं जाळं, त्यांना सुरक्षा देण्यासाठी बनवलेल्या यंत्रणा, वाहतूक व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कथितरित्या ही कारवाई केली. याच तयारीच्या आधारे इस्रायलने काही दिवसांपूर्वी इराणवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे.
लष्करी व्यवहारांवर लक्ष ठेवणाऱ्या 'द वॉर झोन' या पोर्टलने आणि इतरांनी दिलेल्या बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, इस्रायलने तस्करीच्या विविध मार्गांचा वापर करून संवेदनशील ड्रोन आणि क्षेपणास्त्र उपकरणे इराणमध्ये पोहोचवली.
इराकमधून जाणाऱ्या मालाच्या ट्रक्समध्ये, प्रवाशांच्या सुटकेसमध्ये आणि व्यावसायिक कंटेनर्समध्ये या ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचे सुटे भाग इराणमध्ये पोहोचवले गेले.
इलेक्ट्रॉनिक फ्युज, आधुनिक इलेक्ट्रो-ऑप्टिकल कॅमेरे, हलक्या वजनाचे इंजिन, लिथियम बॅटरी, जीपीएसवर चालणारी मार्गदर्शक उपकरणं आणि सुरक्षित कम्युनिकेशन डिव्हाईस अशा उपकरणांची तस्करी करण्यात आली.
या बातम्यांमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे सुटे भाग एका गुप्त ठिकाणी जोडण्यात आले. मोसादने मागच्या काही वर्षांमध्ये इराणमध्ये अशी काही ठिकाणं तयार केली होती. याच ठिकाणी ही आक्रमक शस्त्रं तयार करण्यात आली.
इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तेहरानजवळच्या एका तीनमजली इमारतीमध्ये इस्रालने आक्रमक शस्त्रास्त्रं तयार केली होती. याच इमारतीत शस्त्रांचं गोदाम असल्याचं देखील इराणने सांगितलं आहे.
इराणच्या सरकारी टीव्हीवरील एका बातमीपत्रात दाखवलं आहे की, या इमारतीत कमीत कमी एक ड्रोन, त्याचे सुटे भाग, ड्रोनचे पंख आणि इतर अनेक उपकरणं ठेवण्यात आली होती.
'द वॉर झोन' या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, तिथे एक 3D प्रिंटर देखील होता आणि त्याचाच वापर करून युक्रेनमध्ये ड्रोनचे सुटे भाग बनवले जात होते.

फोटो स्रोत, Mizan
सोमवारी (16 जून) इराण पोलिसांच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार तेहरानच्या एका परिसरातून मोसादसाठी काम करणाऱ्या दोन 'एजंट्स'ना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 200 किलोपेक्षा जास्त स्फोटके, 23 ड्रोनचे भाग, लाँचर, नियंत्रण प्रणाली आणि एक निसान कार जप्त करण्यात आली.
इराणच्या आण्विक कार्यक्रमात महत्त्वाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्फहानमध्ये इराण पोलिसांच्या डेप्युटी कमांडरने एका वर्कशॉपवर छापा मारला. अमेरिकेने याच इस्फहानवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.
या वर्कशॉपमध्ये मोठ्या संख्येने ड्रोन आणि मायक्रो ड्रोन बनवणारी उपकरणं ठेवली गेली होती. या वर्कशॉपवर झालेल्या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली होती.
बातम्यांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इथे थ्रीडी प्रिंटर आणि स्थानिक उपकरणं वापरून ड्रोन बनवले जात होते. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरल्या जात होत्या. जेणेकरून जास्त सामानाची तस्करी करावी लागणार नाही आणि इराणी सुरक्षा यंत्रणेला याचा सुगावा लावता येणार नाही.
बीबीसी स्वतंत्रपणे या दाव्यांची पुष्टी करत नाही.
इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी याआधी देखील अनेकांना इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटक केलेली आहे. यापैकी काही प्रकरणांमध्ये इराणी अणुशास्त्रज्ञांच्या हत्येची कबुली घेऊन अनेकांना बरीच वर्षं तुरुंगात घालवावी लागल्यानंतर ते लोक निर्दोष आढळून आले होते आणि त्यांची सुटका करण्यात आली.
स्मार्ट शस्त्रं आणि रिमोटचा वापर करून हल्ला
स्थानिक आणि परदेशी माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, इस्रायलच्या गुप्त कारवाईचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी इराणमध्ये हलक्या, अचूक आणि दूरस्थपणे नियंत्रित होणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली तयार केल्या.
एका विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेल्या या आधुनिक क्षेपणास्त्रांना कुठल्याही ऑपरेटरशिवाय वापरता येतं. तांत्रिक पातळीवर विचार केल्यास हे एक असं ऑपरेशन होतं जे पारंपरिक पद्धतीला छेद देतं.
इराणच्या 'प्रेस टीव्ही' ने त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर लिहिलं, "इराणी गुप्तचर संस्थांनी स्पाइक क्षेपणास्त्र लाँचर्स जप्त केले आहेत जे विशेषतः इराणी हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य करण्यासाठी डिझाइन केलेले होते. या प्रणाली इंटरनेट-ऑटोमेशन आणि रिमोट कंट्रोलने सुसज्ज होत्या. ही प्रणाली मोसादचे एजंट चालवत होते."

फोटो स्रोत, Telegram
स्पाइक क्षेपणास्त्र लाँचर्सच्या फोटोवरून असं दिसून येतं की, ही क्षेपणास्त्रं एखाद्या वाहनावर किंवा ड्रोनवर बसवलेली नव्हती. जमिनीवर कॅमफ्लाज कव्हरमध्ये लपवलेल्या एका ट्रायपॉडवर त्यांना बसवण्यात आलं होतं.
हे लाँचर्स इलेक्ट्रो-ऑप्टिकल मार्गदर्शन प्रणाली, अत्याधुनिक कॅमेरे आणि उपग्रह अँटेनाने सुसज्ज होते. त्यामुळे त्यांना दूरवरून आदेश देता येतो.
इस्रायलमध्ये यापूर्वीही रिमोट-कंट्रोल्ड शस्त्रे वापरली आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये, इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराणच्या अणुकार्यक्रमात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाची अशाच एका रिमोट-कंट्रोल्ड शस्त्राने हत्या करण्यात आली होती, जी पिकअप व्हॅनवर बसवण्यात आली होती आणि घटनेच्या वेळी कोणताही हल्लेखोर तिथे उपस्थित नव्हता.

फोटो स्रोत, MAJID SAEEDI/GETTY IMAGES
इराणची हवाई सुरक्षा प्रणाली निष्प्रभ करणं
अनेक अहवालांमध्ये दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने इराणवर हवाई हल्ले करण्याआधी इराणची हवाई सुरक्षा प्रणाली उद्ध्वस्त करण्यासाठी अतिशय पद्धतशीर हल्ले केले आणि हा त्यांच्या कारवाईचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता.
या रणनीतीमध्ये छोट्या आत्मघाती ड्रोन्सचा वापर करण्यात आला. तसेच इराणच्या जमिनीवर असलेली गाईडेड क्षेपणास्त्रं आणि इलेक्ट्रॉनिक शस्त्रांचा वापर केला गेला. इराणच्या रडार यंत्रणेला उद्ध्वस्त करण्याच्या सामूहिक उद्देशाने हे हल्ले करण्यात आले.
इराणच्या डिफेन्स मिसाईल लॉन्च प्लॅटफॉर्मवर हल्ले करून इस्रायलच्या हल्ल्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी हे हल्ले केले गेले.
लष्करी घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या एका वेबसाइट्सनुसार, ऑपरेशनच्या सुरुवातीला, लहान आणि हलक्या क्वाडकॉप्टरसारख्या ड्रोन आणि मायक्रो-ड्रोनचा एक गट एकाच वेळी सक्रिय करण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांत हे ड्रोन आधीच अनेक भागात लपवलेले होते, असे मानले जाते.
अचूक लक्ष्य भेदत कमांड सिस्टीम उद्ध्वस्त करणे
इस्रायलच्या कारवाईचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी इराणी सैन्य आणि रिव्होल्यूशनरी गार्डसाठी महत्त्वाचे निर्णय घेणारी व्यवस्थाच कमकुवत केली. प्रमुख पदांवर असलेल्या व्यक्तींना लक्ष्य करून हे करण्यात आलं.
याबाबत प्रकाशित झालेल्या अहवालांनूसार मोसाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इराणमधील गुप्त माहिती आणि स्मार्ट शस्त्रांच्या मदतीने इस्रायलच्या योजनेनुसार इराणची कमांड सिस्टीम उद्ध्वस्त करण्याचा, इराणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांमध्ये अडथळे आणण्याचा आणि इराणी लष्कराच्या तयारीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, TASNIM/KHAMENEI
ऑपरेशनच्या सुरुवातीला, काही हल्ले लष्करी तळांवर किंवा क्षेपणास्त्र प्लॅटफॉर्मवर केले गेले नाहीत, तर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या घरांवर किंवा कार्यालयांवर केले गेले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे हल्ले इराणमधून स्पाइक क्षेपणास्त्रांचा वापर करून करण्यात आले. ही क्षेपणास्त्रे लाईव्ह कंट्रोलद्वारे इमारतींमधील माणसांना थेट लक्ष्य करू शकतात.
गुप्त माहितीच्या आधारे लष्करी अधिकारी लक्ष्य
पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध होतं की, इस्रायलची गुप्तचर तयारी केवळ हल्ल्यापूर्वी मर्यादित नव्हती, तर हल्ल्यांदरम्यानही इराणच्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं.
तिसऱ्या दिवशी झालेल्या हल्ल्यात रिव्होल्यूशनरी गार्डच्या गुप्तचर शाखेचे प्रमुख मोहम्मद काझेमी आणि त्यांचे सहाय्यक यांना लक्ष्य करण्यात आले.
त्याच वेळी, आधी मारल्या गेलेल्या कमांडरच्या जागी नियुक्त करण्यात आलेला अधिकारी देखील चार दिवसांनी मारला गेला.
अमेरिकन थिंक टँक 'हडसन इन्स्टिट्यूट'च्या अहवालात म्हटले आहे की, इस्रायलची संपूर्ण रणनीती ही अनेक वर्षांच्या तयारीचा परिणाम आहे. यामध्ये सतत माहिती गोळा करणे, रिअल-टाइम पाळत ठेवणे आणि निश्चित केलेल्या लक्ष्यांपर्यंत खोलवर पोहोचणे अशा पायऱ्यांचा समावेश होता.











