एकाच कुटुंबातील 7 जणांची ‘हत्या,’ 5 नातेवाईकांवर संशय आणि 7 अनुत्तरीत प्रश्न

    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये पारगाव जवळून वाहणाऱ्या भिमा नदीच्या पात्रात 18 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान 7 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ ऊडाली होती.

मृतदेहांची ओळख पटल्यानंतर ते एकाच कुटूंबातले असल्याचं समोर आलं आणि या मृत्यूंच्या मागचं गूढ वाढलं.

हे आकस्मिक मृत्यू होते की घातपात झाला होता या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

बीबीसी मराठीने ग्राऊंडवर जाऊन या पूर्ण घटनाक्रमाचा तपशील जाणून घेतला.

18 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान काय घडलं?

भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारीला 2023 रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला. 20 जानेवारीला एका पुरुषाचा मृतदेह मिळाला.

पुढच्या दिवशी आणखी एका महिलेचा तर त्याच्या पुढच्या दिवशी आणखी एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

त्यानंतर पोलिसांनी बोटींच्या सहाय्याने भिमा नदीच्या पात्रात शोध मोहिम सुरु केली. त्यामध्ये 24 जानेवारीला तीन लहान मुलांचे मृतदेह सापडले.

नदीपात्रात मिळालेल्या एका मृत महिलेजवळ एक मोबाईल फोन सापडला. त्यावरुन या मृतांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. नातेवाईकांनी या सातही मृतदेहांची ओळख पटवली.

एकाच कुटूंबातल्या 7 लोकांचे मृतदेह

हे सातही मृतदेह एकाच कुटुबीयांचे असल्याचं समोर आलं. त्यामध्ये मोहन उत्तम पवार (वय 45), संगिता मोहन पवार (वय 40), राणी शाम फलवरे (वय 24, मोहन पवार यांची मुलगी), शाम पंडित फलवरे (वय 28, मोहन पवार यांचे जावई), रितेश शाम फलवरे (वय 7), छोटू शाम फलवरे (वय 5 ), कृष्णा शाम फलवरे (वय 3) यांचा समावेश होता.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मोहन पवार, पत्नी संगिता, मुलगी राणी, जावई शाम, नातु रितेश, छोटू, कृष्णा आणि मुलगा अनिल यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यात राहत होते.

मागच्या एक वर्षापासून अहमदनगर जिल्हातल्या पारनेर तालुक्यातल्या निघोज गावात ते राहत होते.

मजुरी करुन हे कुटूंब चरितार्थ चालवत होतं. मोहन पवार यांचा मोठा मुलगा राहूल हा त्याच्या पत्नीसोबत मजूरीसाठी दुसऱ्या गावात राहायचा.

मृतदेह सापडल्यावर काय झालं?

मोहन पवार आणि त्यांच्या कुटूंबियांचे मृतदेह 18 जानेवारीपासून एक एक करुन पारगाव जवळच्या भिमा नदीच्या पात्रात सापडू लागले. या घटनेत पोलिसांनी अकस्मात मृत्यूंची नोंद केली होती.

यातल्या सुरुवातील सापडलेल्या चार मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात आलं. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल आला.

तसंच चारही मृतदेहांवर जखमा नाहीत, असं पोस्टमार्टम अहवालात म्हटलं असल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं होतं.

3 मृतदेहाचं पुन्हा पोस्टमार्टम

दुसरीकडे पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, दौंडमधल्या सात जणांच्या हत्याप्रकरणात तीन मृतदेहांचं परत शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे. २६ जानेवारीला ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची टीम यवतमध्ये पोहोचली. जिथे या मृतदेहांना पुरलं होतं तिथून बाहेर काढून त्यांचं परत शवविच्छेदन करण्यात आलं. त्याचे रिपोर्ट अजून आलेले नाहीयेत.

"सगळ्या मृतदेहांचं शविविच्छेदन केलेलं नाहीये. सुरुवातीला तीन मृतदेहांचे शवविच्छेदन यवतमध्ये करण्यात आलं होतं. त्यांचं अजून डिटेल शवविच्छेदन करण्याच्या अनुषंगाने आम्ही ससूनची टीम बोलावली होती. २६ जानेवारीला डिटेल पोस्टमार्टम झालं. ससूनचे एक्सपर्ट टीमचे डॉक्टर असतात.

स्थानिक पातळीवर काही मीस झालं असेल तर त्यांच्याकडून ते डिटेल्स मिळू शकतात. त्याचा अहवाल अजून आलेला नाहीये. आला की आम्ही तुम्हाला कळवू. २६ तारखेला संध्याकाळपर्यंत हे काम सुरु होतं. या केसमध्ये आम्ही कुठलाही चान्स घेत नाही आहोत. त्यामुळे सगळ्या गोष्टी एक्सपर्टकडून करुन घेतोय. अजून आमचा तपास सुरु आहे. शेअर करण्यासारखं सध्या काही नाहीये," अशी माहिती अंकित गोयल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

यामध्ये मृत मोहन पवार, संगिता पवार आणि राणी फलवरे यांच्या मृतदेहांचं परत शवविच्छेदन करण्यात आलंय. सुरुवातीला यवतच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं होतं. त्यांचा बुडून मृत्यू झाला आणि शरिरावर कोणत्याही जखमा नाहीत, असं शवविच्छेदन अहवालात म्हटलं होतं.

आत्महत्या की घातपात?

या घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जाईल असं पुणे ग्रामीण पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं.

“या तपासादरम्यान काही पुरावे समोर आले. त्यावरुन यांची हत्या करण्यात आली असं निदर्शनास आलं,” अशी माहिती पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

शाम फलवरे यांच्या आजोबा आणि इतर कुटूंबियांशी बीबीसी मराठीने संवाद साधला. त्यामध्ये शाम फलवरे आत्महत्या करणं शक्यच नाही असं त्यांनी सांगितलं.

“शामची आई लहानपणी सोडून गेली. त्याचे वडील वारले. त्यानंतर मी आणि माझ्या बायकोने मिळून त्याचा सांभाळ केला. तो त्याच्या सासरी राहायचा. अधून मधून इंदापूरमध्ये येऊन आम्हाला भेटायचा. चार पैशांची मदत करायचा."

"कधी कधी त्याच्या लेकरांनाही घेऊन यायचा. त्याच्या सासरच्या घरात काय वाद होते याची आम्हाला कल्पना नाही. पण तो आत्महत्या करणं शक्य नाही. तो पट्टीचा पोहणारा होता. एक माणूस आत्महत्या करेल. सात लोकं कसं काय आत्महत्या करतील? त्याचे लहान तीन लेकरं कसे काय आत्महत्या करतील?,” असं मृत शाम फलवरेंचे आजोबा मारुती फलवरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

हत्येप्रकरणी पाच नातेवाईकांना अटक

सात जणांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याच कुटूंबातल्या पाच जणांना अटक केली आहे. पुण्याचे एसपी अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली.

"याप्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. हे पाचही जण मृतकांचे नातेवाईक आहेत. हे पाचही जण एकाच गावात राहतात."

"या पाचमध्ये अशोक कल्याण पवार, श्याम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, कांताबाई सर्जेराव जाधव हे सगळे निघोज, पारनेर तालुका, अहमदनगर इथेच राहतात," असं अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

हत्येमागचं कारण काय?

मोहन पवार यांच्या कुटुंबियाच्या हत्येमागचं प्राथमिक कारण समोर आलं असल्याचं अंकित गोयल यांनी सांगितलं.

"मृत कुटुंब तिथेच राहत होतं. हे चुलतभाऊ आहेत. आरोपीपैकी मोठा भाऊ अशोक पवार त्यांचा मुलगा (धनंजय पवार) याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. याबाबत अपघाताची केस पुणे शहर पोलिसांकडे दाखल आहे. या अपघातासाठी आता ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा मुलगा जबाबदार आहे. असा राग त्यांच्या मनात होता. प्राथमिक तपासात आम्हाला हे समजलं आहे.

त्या रागातून या लोकांची हत्या करण्यात आलेली आहे. पाचही आरोपी हे सख्खे भाऊबहीण आहेत. चार भाऊ आणि एक बहीण आहे. आणखीही काही आरोपी समोर येऊ शकतात. त्याबाबत तपास सुरू आहे," असं गोयल म्हणाले.

हत्येमागे आणखी काही कारण आहे याचाही तपास पोलीस करत आहेत.

हत्येमागे काळ्या जादूचा मुद्दा नाही - पोलीस

“करणी (ब्लॅक मॅजिक) वगैरेचा मुद्दा सध्या तरी नाही. आरोपींच्या मनात राग होता. त्यातून त्यांनी मारलं असं प्रथमदर्शनी दिसत आहे. आरोपींच्या सखोल चौकशीतून आणखी गोष्टी उघड होतील. त्यांची मानसिक स्थिती काय होती, त्यांनी हत्या कशी प्लॅन केली, कुठे केली, घटनाक्रम काय होता हे हळूहळू स्पष्ट होईल. प्राथमिक माहिती आम्ही दिली आहे”, असं अंकित गोयल यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “मुलाच्या मृत्यूच्या रागातून संपूर्ण कुटुंब संपवण्याचा कट आरोपीने रचला. आम्ही अटक केलेल्या लोकांचे जवाब नोंदवून घेतले. त्यांच्या बोलण्यात तफावत आढळली. हत्या नेमकी कशी केली हे पुढील तपासात स्पष्ट होईल.”

‘लहान मुलांचा काय दोष होता?’

मोहन पवार यांचा लहान मुलगा काही दिवसांपूर्वी पळून गेला होता. तो अजूनही इतर कुटूंबीयांच्या संपर्कात नाही, असं मोहन पवार यांचा मोठा मुलगा राहुलने सांगितलं.

पोलिसांनी या सात हत्यांच्या संदर्भात त्यांच्याच चुलत भावंडांना अटक केली. त्यांनी हे कृत्य केलं अशी मनात शंकाही आधी आली नव्हती असं मोहन पवार यांचा सख्खा भाऊ लहू उत्तम पवार यांनी सांगितलं.

आता अटकेत असलेले ते चुलत भावंडं मृतदेह ताब्यात घेण्यापासून ते अंत्यविधी होण्यापर्यंत सोबत होते. लहू पवार यांच्या सोबत होते.

इतक्या टोकाला जाण्याइतपत त्यांच्यात काय बिनसलं याचं त्यांना आश्चर्य वाटतंय. त्यांचे आधी काही वाद नव्हते किंवा पोलिसांमध्ये काही तक्रारी गेल्या नाहीत असंही त्यांनी सांगितलं.

काहीही वाद असले तरिही राणीच्या तीन लहान मुलांचा काय दोष होता? त्यांना का मारलं? असा उद्विग्न प्रश्न लहू पवार यांनी विचारला.

“आमचं मूळ गाव बीडमधलं गेवराई तालुक्यात आहे. आम्ही सगळेच मोलमजुरी करतो. मी एका कारखान्यातून दुसऱ्या कारखान्यात काम करतो. माझ्या भावाचं कुटुंब आणि त्या चुलत भावंडांमध्ये काही वाद होता, याची आम्हाला काही कल्पना नाही. तसा त्यांच्या काही घटनाही नाही. यांचे मृतदेह ताब्यात घेणे, अंत्यविधी करणे या सगळ्या गोष्टी करताना ते आमच्या सोबत होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उचललं,” असं लहू पवार यांनी सांगितलं.

“पण कौटुंबिक काहीही वाद असले तरिही पुतणीच्या लहान लेकरांचा काय दोष होता? त्यांना का मारलं? माझ्या भावाच्या कुटूंबाला न्याय मिळाला पाहिजे,” असं लहू पवार यांनी पुढे बोलताना सांगितलं.

7 अनुत्तरित प्रश्न

सात जणांच्या या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी पाच लोकांना अटक केली असली तरी अजूनही बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत.

  • निघोजमध्ये राहणाऱ्या मोहन पवार यांचं कुटुंब पारगावमध्ये काय करत होतं?
  • चार प्रौढ आणि तीन लहान मुलां हत्या एकाच वेळी कशी केली गेली?
  • यामध्ये किती लोक सामिल आहेत?
  • पुरलेले मृतदेह पुन्हा बाहेर काढण्याची वेळ का आली?
  • मृतदेहांचं पुन्हा पोस्टमार्टम का करण्यात आलं?
  • जर पोलिसांच्या म्हणण्यानुसार या हत्या आहेत तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पाण्यात बुडून मृत्यू आणि जखमा नाहीत, असा अहवाल कसा समोर आला?
  • आरोपींना अटक केल्यावर गुन्ह्याची कबूली दिली आहे का, या प्रश्नाचं उत्तर देणं पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी का टाळलं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)