दौंड हत्या प्रकरण: कुटुंबातील 7 जणांना का संपवलं, नदीपात्रातल्या घटनेबाबत पोलिसांनी दिली माहिती

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात भीमा नदीपात्रात आढळलेल्या 7 मृतदेहांबाबत पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. वैयक्तिक वादातून झालेली हत्या असंच याचं स्वरूप असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्याचे एसपी अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. ते म्हणाले, "चार दिवसांच्या अंतरात सात मृतदेह मिळाले. त्यांची ओळख पटली होती. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही चार पथकं तयार केली".

"पाच जणांना अटक केली आहे. हे पाचही जण मृतकांचे नातेवाईक आहेत. हे पाचही जण त्याच गावाच राहतात. या पाचमध्ये अशोक कल्याण पवार, श्याम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, कांताबाई सर्जेराव जाधव हे सगळे निघोज, पारनेर तालुका, अहमदनगर इथेच राहतात"

"मृत कुटुंब तिथेच राहत होतं. हे चुलतभाऊ आहेत. आरोपीपैकी मोठा भाऊ अशोक पवार त्यांचा मुलगा (धनंजय पवार) याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. याबाबत अपघाताची केस पुणे शहर पोलिसांकडे दाखल आहे. या अपघातासाठी आता ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा मुलगा जबाबदार आहे. असा राग त्यांच्या मनात होता. प्राथमिक तपासात आम्हाला हे समजलं आहे.

त्या रागातून या लोकांची हत्या करण्यात आलेली आहे. पाचही आरोपी हे सख्खे भाऊबहीण आहेत. चार भाऊ आणि एक बहीण आहे. आणखीही काही आरोपी समोर येऊ शकतात. त्याबाबत तपास सुरू आहे", असं गोयल म्हणाले.

आणखी काही हत्येमागचं कारण आहे का याचा तपास करत आहोत. दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीच्या पात्रात ठराविक अंतराने 7 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

24 तारखेला तीन लहान मुलांचे मृतदेह आढळल्याने याप्रकरणाचं गूढ वाढलं. 4 दिवसांच्या अंतरात 7 मृतदेह सापडले. ज्यांचे मृतदेह आढळले ती सगळी माणसं बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट झालं आहे. मोहन पवार हे आपली पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडं यांच्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज इथे राहत होते. मोलमजुरीचं काम करुन हे कुटुंब उदरनिर्वाह करत होतं. सातपैकी चार मृतदेहांचं शवविच्छेदन झालं असून या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. चारही मृतदेहांवर कोणत्याही स्वरूपाच्या जखमा नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं होतं.

ब्लॅक मॅजिकचा मुद्दा नाही- पोलीस

“करणी (ब्लॅक मॅजिक) वगैरेचा मुद्दा सध्या तरी काहीच नाही. आरोपींच्या मनात राग होता. यांनी मारलं असं प्रथमदर्शनी दिसत आहे. आरोपींच्या सखोल चौकशीतून आणखी गोष्टी उघड होतील. त्यांची मानसिक स्थिती काय होती, त्यांनी हत्या कशी प्लॅन केली, कुठे केला, घटनाक्रम काय होता हे हळूहळू स्पष्ट होईल. प्राथमिक माहिती आम्ही दिली आहे”, असं पोलिसांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “मुलाच्या मृत्यूच्या रागातून संपूर्ण कुटुंब संपवण्याचा कट आरोपीने रचला. आम्ही अटक केलेल्या लोकांचे जवाब नोंदवून घेतले. त्यांच्या बोलण्यात तफावत आढळली. हत्या नेमकी कशी केली हे पुढील तपासात स्पष्ट होईल”.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)