You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विम्याचे 7 कोटी मिळवण्यासाठी आधी खून केला आणि मग रचलं स्वतःच्या मृत्यूचं नाटक
- Author, प्रवीण शुभम
- Role, बीबीसीसाठी
आंध्रप्रदेशातील तेलंगणा सचिवालयात काम करणारा तो एक सरकारी कर्मचारी होता.
त्याच्या नावे करोडोंचा विमा उतरवला होता. जिवंत असेपर्यंत तर विम्याचे पैसे मिळणार नाहीत म्हटल्यावर त्याने जिवंतपणी स्वतःच्या मृत्यूचं नाटक रचलं.
पण हे नाटक त्याने रचलं कसं?
9 जानेवारीला मेडक जिल्ह्यातील टेकमाळ मंडल येथील व्यंकटापूर तलावाजवळ एक अर्धवट जळालेली गाडी सापडली. या गाडीत एक मृतदेह सुद्धा होता. स्थानिकांनी या घटनेची माहिती टेकमाळ पोलिसांना कळवली. पोलिसही लागलीच घटनास्थळी पोहोचले आणि तपासाची चक्र फिरली.
सुरुवातीला झालेल्या प्राथमिक तपासात मृतदेह धर्मा नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा व्यक्ती तेलंगणा सचिवालयात काम करत होता.
हा मृतदेह धर्मचाच असल्याची माहिती धर्माची पत्नी नीला आणि कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.
कुटुंबीयांनी दिलेली माहिती खरी असल्याचं मानून पोलिसांनी आयपीसीच्या कलम-174 अंतर्गत संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
व्यंकटापूर ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी तलावाजवळ साफसफाई करण्यासाठी आले होते. तिथे तलावाच्या काठावर त्यांना पेट्रोलची बाटली दिसली.
ती बाटली उचलताना त्यांच्या नजरेस अर्धवट जळलेली कार आणि आतमध्ये मृतदेह आढळून आला.
त्यांनी तत्काळ व्यंकटापूर गावच्या सरपंचांना घटनेची माहिती दिली.
गावचे सरपंच लच्छा गौड सांगतात, गावातील कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना एक मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब माझ्या कानावर घातली. तसं तातडीने मी टेकमाळ पोलीस स्टेशनला ही बातमी कळवली.
लच्छा गौड पुढे सांगतात, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. तिथं धर्माची पत्नी आणि कुटुंबातील सदस्य सुद्धा आले होते. मृतदेह पाहताच त्यांनी हा धर्माचा मृतदेह असल्याच्या गोष्टीला दुजोरा द्यायला सुरुवात केली. हा मृतदेह वरून जळाला असला तरी त्याचे पाय जळाले नव्हते. ते पाय पाहून आणखीन एका नातेवाईकाने हा व्यक्ती धर्माचं असल्याचं सांगितलं.
इथेच खरी मेख होती...
मेडक जिल्ह्याच्या एसपी रोहिणी प्रियदर्शिनी यांनी प्रसारमाध्यमांना या संपूर्ण घटनाक्रमाविषयी माहिती देताना सांगितलं की..
धर्मा हा मेडक जिल्ह्यातील टेकमाळ मंडल येथील भीमलतांडा गावचा रहिवासी.
तो 2007 पासून तेलंगणा सचिवालयातील पाटबंधारे विभागात सहाय्यक विभाग अधिकारी म्हणून कार्यरत होता.
अधिकारी म्हणून नोकरी करण्यापूर्वी त्याने सहा वर्ष सरकारी शिक्षक म्हणून काम केलं होतं.
दोन मुली, एक मुलगा आणि पत्नी नीला असं त्याचं कुटुंब. दोन मुली आयआयटीमध्ये शिकतायत तर एक मुलगाही शाळेत जातो.
त्याचं उर्वरित कुटुंब भीमलातांडा इथं राहायला आहे, तर धर्मा आपल्या पत्नी आणि मुलांसमवेत कुकटपल्ली इथं फ्लॅट घेऊन राहतो. कुटुंबियांना भेटण्यासाठी म्हणून अधूनमधून त्याची भीमलतांड्याला चक्कर असते.
2018 पासून धर्माला शेअर मार्केटचं व्यसन लागलं होतं. मोठ्या प्रमाणावर पैसे कमावण्याच्या नादात तो मार्केट मध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करू लागला. सुरुवातीला त्याला मोठा नफाही मिळत होता. पैसे मिळू लागले म्हटल्यावर तो चैनीचं आयुष्य जगू लागला.
पण 2019 मध्ये आलेला करोना त्यानंतर भडकलेलं युक्रेन-रशिया युद्ध, या सगळ्यामुळे शेअर बाजार कोसळलं. त्यात धर्माचे देखील पैसे बुडाले.
पैसे बुडाले म्हटल्यावर त्याने कर्ज काढायला सुरुवात केली. आणि कर्जाचे पैसे डबल करण्याच्या अपेक्षेने पुन्हा शेअर बाजारात गुंतवले. पण यावेळीही त्याचं नशीब जोरावर नव्हतं, त्याचे हे ही पैसे बुडाले. आता डोक्यावर 85 लाखांचा कर्जाचा डोंगर उभा राहिला होता.
लोक कर्ज मागायला दारात येऊ लागले म्हटल्यावर घरात पैशांवरून वाद वाढले. पैसे कसे फेडता येतील या दृष्टीने तो घरातील सदस्यांशी चर्चा करू लागला. यात निजामाबाद जिल्ह्यातील नवीपेठ इथं राहणारी त्याची मोठी बहीण सुनंदा तेजवत आणि सीसी कॅमेरा टेक्निशियन म्हणून काम करणारा भाचा श्रीनिवास यांच्या तो सतत संपर्कात होता.
विम्याच्या पैशाने कर्जे फेडण्याची क्लुप्ती
शेवटी या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने जीवन विमा योजनेची निवड केली.
धर्माने त्याच्या नावे एकूण 25 विमा पॉलिसी उतरवल्या होत्या. या सर्व विमा पॉलिसी 7.4 कोटी किमतीच्या होत्या.
पण धर्मा ह्यात असेपर्यंत ही रक्कम त्याला मिळणार नव्हती. मग जिवंत असतानाच हे पैसे कसे मिळवता येतील यासाठी त्याने एक योजना आखली. या योजनेत धर्माची पत्नी, मोठी बहीण, भाचे आणि मुलगा आणि स्वतः धर्मा सामील होता.
पोलीस आणि गावकऱ्यांना धर्मा मेलाय याची खात्री पटणं गरजेचं होतं. त्यासाठी धर्माच्या मृतदेहासारखं दिसणारं मिळत जुळतं प्रेत त्याठिकाणी ठेवणं गरजेचं होतं. आणि ही योजना आखण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी धर्माचं कुटुंब सलग एक वर्ष काम करत होतं.
आंब्याच्या बागेत काम देतो असं म्हणत गुंडाळलं...
मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नामपल्ली मेट्रो स्टेशनवर धर्माची ओळख अंजय्या नावाच्या व्यक्तीशी झाली. हा अंजय्या दिसायला धर्मासारखाच होता.
निजामाबाद येथील आंब्याच्या बागेत काम देतो असं सांगत धर्माने त्याला गुंडाळलं.
कटाचा एक भाग म्हणून धर्माने सेकंड हँड कार खरेदी केली.
7 जानेवारीला धर्मा, अंजय्या आणि धर्माचा भाचा श्रीनिवास असे सगळेजण नामपल्ली मेट्रो स्टेशनवर भेटले.
दरमहिन्याला 20 हजार पगार ठरला आणि अंजय्या काम करायला तयार झाला. हे तिघेजण आता निजामाबादकडे निघाले.
त्याचदिवशी खरं तर अंजय्याचा काटा काढण्याचा विचार होता. पण अंजय्या नशेत असल्यामुळे ही योजना दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आली.
दारू पिऊन गाडी चालवली आहे असं जर आढळलं तर विम्याचे पैसे मिळणार नाहीत असा त्यांचा समज झाला.
जीव घेतला आणि गाडी पेटवली
पुढे खूप प्रवास करायचा आहे, असं सांगत धर्मा अंजय्या आणि भाचा श्रीनिवास त्या रात्री निजामाबाद येथील एका लॉजवर थांबले.
दुपारच्या जेवणानंतर अंजय्या बाहेर जातो असं सांगून निघून गेला आणि परत आलाच नाही. त्यामुळे अंजय्याला मारण्याचा प्लॅन कॅन्सल झाला.
8 जानेवारीच्या पहाटे, जम्मू निजामाबाद रेल्वे स्टेशनच्या कुली अड्ड्यावर धर्माची बाबू नावाच्या माणसाची भेट झाली.
या बाबूला काम देतो असं सांगितल्यावर बाबूही धर्मासोबत जायला निघाला. त्याची दाढी केली, केस कापले, चांगले कपडे घालायला दिले.
आणि शेवटी त्याच रात्री धर्मा आणि श्रीनिवासने त्याला व्यंकटापूरजवळील तलावाजवळ आणलं. बाबूला गाडीत बसवून त्याची गाडी पेट्रोल टाकून पेटवून दिली.
सुरुवातीला गाडीत एकटं बसायला बाबू तयार नव्हता. त्यावेळी धर्मा आणि श्रीनिवासने बाबूला सोबत नेलेल्या काठ्या कुऱ्हाडीने मारले.
बाबू मेलाय याची खात्री पटल्यानंतर मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर ठेवण्यात आला.
धर्मा जिवंत आहे हे कसं समजलं?
हा मृतदेह धर्माचा नसावा याबाबत सुरुवातीपासूनच पोलिसांना शंका होती. शिवाय धर्माच्या घरच्यांच्या वागण्यामुळे सुद्धा पोलिसांच्या शंकेला खतपाणी मिळालं. पोलिसांनी घरच्या सदस्यांवर पाळत ठेवायला सुरुवात केली. कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाचा रंग धर्माच्या स्किन टोनशी जुळत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला तेव्हा निजामाबादमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या धर्माचे व्हिडिओ फुटेज पोलिसांना मिळाले. शेवटी पोलिसी खाक्या दाखवल्यावर कुटुंबीयांनी धर्मा जिवंत असल्याचं सांगितलं.
सध्या अंजय्या आणि बाबूची चौकशी सुरू आहे.
बाबूची हत्या केल्यावर धर्मा इंदूरला पळून गेला होता. तो त्याच्या मूळ गावी परतत असताना त्याला पोलिसांनी अटक केली असल्याचं मेडक जिल्ह्याच्या एसपी रोहिणी यांनी सांगितलं.
त्यांनी पुढे सांगितलं की, विम्याच्या पैशाने कर्ज फेडायचं कुटुंबातील एका सदस्याला धर्माच्या जागेवर सरकारी नोकरी लावायची, आणि पत्नीला पेंशन मिळवून द्यायची अशी योजना होती.
या प्रकरणी आयपीसी कलम 302, 364, 120 बी,201, 202 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्मासोबत त्याची पत्नी, मोठी बहीण, मुलगा आणि भाच्याला अटक करण्यात आली. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)