कृत्रिम साखर खाऊ नका, असं WHOने सांगितलं आहे, कारण-

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
डायबिटीस, मधुमेह, साखर – नावं अनेक, पण आजार एक. आपल्या रक्तातली साखरेची पातळ वाढली की आपण साखर, गोडधोड सारंकाही सोडून पर्याय म्हणून काही कृत्रिम साखरेकडे वळतो.
आता, फक्त मधुमेह असलेलेच नाही तर आता निरोगी दिसणारी तरुण मंडळीसुद्धा साधं कोल्डड्रिंक नाही तर डायट सोडासारखे पर्याय घेतायत.
पण आता यातली कृत्रिम साखरसुद्धा फायद्याची नाही तर नुकसान करणारी ठरू शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे. सोमवारी म्हणजेच 15 मेला जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने एक अहवाल जारी करत म्हटलंय की कृत्रिम साखर (non-sugar sweeteners) वापरल्याने प्रौढांमध्ये किंवा मुलांमध्ये शरीरातली चरबी कमी करण्यास मदत होत नाही.
उलट या कृत्रिम साखरेच्या वापराचे दीर्घकालीन दुष्परिणाम असू शकतात, जसं की टाईप 2 डायबेटीस, हृदयविकार आणि मृत्यूचा धोका लोकांना जास्त असू शकतो, असंही WHOने म्हटलं आहे.
नॉन-शुगर स्वीटनर्सबद्दल झालेल्या एकूण 283 अभ्यासांचा एकत्रित अभ्यास करून WHOने हे म्हटलं आहे. आता हे artificial sweeteners म्हणजे काय?
बाजारात उपलब्ध अनेक प्रोडक्ट्स, जसे की Sugar Free, Equal, Sweetex, SugarLite, इत्यादी. यात acesulfame K, aspartame, advantame, cyclamates, neotame, saccharin, sucralose, stevia असे अनेक केमिकल्स असतात, ज्यात गोडवा तितकाच असतो, पण कॅलरीज शून्य असतात.
आणि हो, हा सल्ला फक्त मधुमेह असलेल्यांनाच नाही तर निरोगी लोकांनाही देण्यात आला आहे. असं का?
‘डाएट सोडा’ सोडा, त्यात ‘डाएट’ नाहीच
WHOने दिलेली ही सूचना फक्त मधुमेहींसाठीच आहे, असं नाही. सामान्य निरोगी लोक म्हणून आपण सगळेच कधी ना कधी असे कृत्रिम साखर असलेले पदार्थ घेतोच, अनेकदा नकळतही.
आजकाल आपण कोक ऐवजी डाएट कोक घेतोय, फळांचा ताजा रस पिण्याऐवजी पॅकेज्ड फ्रूट ज्यूस पितोय. कंपन्या ते कितीही ताजं असल्याचा दावा करत असल्या, तरीही त्यात थोड्याअधिक प्रमाणात “added sugars” म्हणजे वरून कृत्रिम साखर मिश्रित असतेच. आणि हीच साखर म्हणजे नॉन-शुगर स्वीटनर्स.
याचं आणखी एक कारण शारीरिक नाही तर मानसिकसुद्धा आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की “झिरो-कॅलरी” शुगर आहे, म्हणजे एकऐवजी दोन-तीन टॅबलेट चहामध्ये टाकल्या तरी चालेल. कधीकधी डाएट सोडा पिणारेही असंच करतात – कॅलरीज नाहीय ना, मग काय फरक पडतो.
पण यामुळे शरीरात कृत्रिम साखर वाढतेच, ज्याची आपल्याला जाणीव होत नाही. अनेकदा ही कृत्रिम साखरच आपल्या मेंदूला संदेश पाठवते आणि आपल्याला आणखी गोड खायची इच्छा होते, असंही जाणकारांचं म्हणणं आहे.
मग करावं काय?

फोटो स्रोत, Getty Images
WHOच्या आहार आणि अन्न सुरक्षेचे संचालक फ्रान्सेस्को ब्रांका यांनी म्हटलंय, “दीर्घकाळाचा विचार केल्यास, साध्या साखरेऐवजी कृत्रिम साखर घेतल्याने वजन नियंत्रणात ठेवायला मदत होत नाही. लोकांनी साखरेचं सेवन कमी करायला इतर नैसर्गिक गोड पदार्थांचा विचार करायला हवा, जसं की फळं, साखर नसलेले गोड पदार्थ आणि पेय, इत्यादी.”
“कृत्रिम साखरेमुळे वजन कमी करण्यास मदत होते, यात फार सत्य नाही. त्यात काही पोषणही नसतं. निरोगी राहायला लोकांना आहारातली एकूणच साखर कमी करायला खूप आधीच सुरुवात करायला हवी,” असंही ते सांगतात.
काही डॉक्टर चहात साखरेऐवजी गुळाचं पावडर टाकण्याचा सल्ला देतात. तर जेवणानंतर गोड म्हणून खारीक, अंजीर, मनुका खाऊ शकता, असं सांगतात. अनेक जण साखरेऐवजी मधाचाही सल्ला देतात. पण त्यात एक अडचण आहे, जी मधुमेहतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश शिवणे यांनी आधीच सांगितली होती.
"कित्येक लोक विचारतात की मध किंवा कृत्रिम साखर माझ्यासाठी चांगली आहे का? तर कृत्रिम साखरेचा अतिमाराही शरीरासाठी वाईट आहे. त्याचेसुद्धा शरीरावर दुष्परिणाम होतात, कारण शेवटी ते एक रसायन आहे. भारतात उपलब्ध मधापैकी 80-85टक्के ब्रँड्समध्ये साखर टाकलेली असतेच, त्यामुळे ती नैसर्गिक आहे, असं म्हणता येणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
WHOच्या या सल्ल्यानंतर नीती आयोगाचे आरोग्य सदस्य व्ही. के. पॉल हेही म्हणालेत की आपल्याला आपल्या एकूणच आहारात बदल करण्याची गरज आहे. "स्पष्टपणे जास्त साखर खाणं हे रोगांना आमंत्रण देणारं ठरतं. हे टाळायला आपण आपल्या आहार कार्यक्रमात बदल करण्याची गरज आहे. जास्त मीठ खाल्यानेही उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.
"त्यासोबतच आळसपणा, कुठलाही व्यायाम न करणं आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. हे टाळायला आपण नियमितपणे योग, शारीरिक व्यायाम करायलाच हवा. आणि भारत सरकारच्या आरोग्य कार्यक्रमात या गोष्टींचा समावेश आहेच," असं ते सांगतात.
फक्त आहारातले बदलच नव्हे तर शारीरिक हालचाल, व्यायाम, या गोष्टीसुद्धा आपल्याला दीर्घकाळासाठी सुदृढ राहायला मदत करू शकतात. पण हो, कृत्रिम साखरेचं सेवन टाळण्यापासून आपण सुरुवात करावी, असं WHO ने म्हटलंय.
पण हो, कुठलेही लाईफस्टाईल चेंजेस करण्यापूर्वी एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









