T-20 मध्ये दोन्ही डावांत पडला 517 रनांचा पाऊस, ऐतिहासिक सामन्यात द. आफ्रिकेचा विजय

फोटो स्रोत, Getty Images
व्हीडिओ गेममध्ये वाटावा असा खेळ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 सामन्यात पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेंच्युरिन इथे झालेला सामना वादळी ठरला. दोन्ही डाव मिळून 517 धावांचा पाऊस पडला.
वेस्ट इंडिजने जॉन्सन चार्ल्सच्या शतकाच्या बळावर 20 ओव्हरमध्ये 258 धावांचा डोंगर उभारला. पुढच्या काही तासात दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या आधारे हे प्रचंड लक्ष्य 6 विकेट्स आणि 7 चेंडू राखून पारही केलं. ट्वेन्टी20 प्रकारात हा धावांचा सर्वोत्तम पाठलाग आहे.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी साधली. तिसरा सामना मंगळवारी जोहान्सबर्ग इथे होणार आहे.
वनडे प्रकारात 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 434 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता, त्या सामन्याच्या आठवणीदेखील या मॅचमुळे ताज्या झाल्या आहेत.
वेस्ट इंडिजतर्फे जॉन्सन चार्ल्सने 39 चेंडूत शतक पूर्ण केलं. आफ्रिकेच्या गोलंदाजाचा समाचार घेताना चार्ल्सने 46 चेंडूत 10 चौकार आणि 11 षटकारांसह 118 धावांची अविश्सनीय खेळी केली.
कायले मेयर्सने 27 चेंडूत 51 धावा करत त्याला तोलामोलाची साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 58 चेंडूत 135 धावांची भागीदारी केली.
चार्ल्स तंबूत परतल्यानंतर कर्णधार रोव्हमन पॉवेलने 19 चेंडूत 28 तर रोमारिओ शेफर्डने 18 चेंडूत 41 धावांची वेगवान खेळी केल्या. वेस्ट इंडिजने 258 धावांची मजल मारली. दक्षिण आफ्रिकेतर्फे मार्को यान्सनने 3 विकेट्स घेतल्या.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रचंड लक्ष्याचं जराही दडपण न घेता क्विंटन डी कॉक आणि रिझा हेन्ड्रिक्स जोडीने 65 चेंडूत 152 धावांची स्फोटक सलामी दिली. या जोडीने पाचव्या ओव्हरमध्येच संघाचं शतक फलकावर लावलं.
क्विंटनने 43 चेंडूत शतकाला गवसणी घातली. क्विंटनने 44 चेंडूत 9 चौकार 8 षटकारांसह 100 धावांची अफलातून खेळी साकारली. क्विंटनचं ट्वेन्टी-20 प्रकारातलं हे पहिलंच शतक आहे.
रीझाने 28 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर रायली रुसो आणि डेव्हिड मिलर झटपट बाद झाले.
पण कर्णधार एडन मारक्रमने 21 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 38 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हेनरिच लासेनने 7 चेंडूत 16 धावा करत मारक्रमला चांगली साथ दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








