विराटच्या हॉटेलमधल्या खोलीचा व्हीडिओ लीक, संतापलेल्या अनुष्काने म्हटलं...

फोटो स्रोत, Cameron Spencer
भारतीय क्रिकेट टीम चा माजी कर्णधार विराट कोहली सध्या फॉर्ममध्ये आहे आणि सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.
पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरुद्ध त्याची खेळी असो किंवा दक्षिण अफ्रिकेविरुद्ध त्याचं अपयश असो विराट सातत्याने चर्चेत आहे.
मात्र आता विराट कोहली स्वत: नाराज आहे आणि त्याचं कारण आहे त्याच्या प्रायव्हसीवर आलेली गदा.
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे आणि त्याच्या हॉटेलच्या खोलीचा व्हीडिओ लीक होण्यावर नाराजी दर्शवली आहे.
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कोहली म्हणाला की, खेळाडू आणि सेलिब्रिटींना फक्त मनोरंजनाचं साधन समजू नये.

कोहलीने जो व्हीडिओ शेअर केला आहे त्यात दिसतंय की कोहली खोलीत नसताना एक व्यक्ती त्याच्या खोलीत प्रवेश करत आहे.
या घटनेवर काय प्रतिक्रिया?
कोहलीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरने ही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, "हे हास्यास्पद आणि अस्वीकार्ह आहे."
विराट कोहलीच्या खोलीचा व्हीडिओ लीक झाल्याप्रकरणी त्याची पत्नी अनुष्का शर्माही अतिशय संतप्त झाली आहे.
अनुष्काने इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हीडिओ शेअर करत एक नोटसुद्धा लिहिली आहे.
अनुष्का लिहिते, "फॅन्सने आमच्यावर अजिबात दया माया न दाखवण्याच्या घटना या आधीही घडल्या आहेत. मात्र हा अगदी कळस होता. हे मानवाधिकाराचं उल्लंघन आहे."

फोटो स्रोत, David Gray
सेलिब्रिटी आहात त्यामुळे हे सगळं सहन करायलाच पाहिजे असं ज्यांना वाटतं तेही या समस्येचा एक भाग आहेत. थोडा आत्मसंयम ठेवणं सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. तुमच्या बेडरुमध्येच हे सगळं व्हायला लागलं तर मर्यादा कुठे राहिली?"
या वर्षी जानेवारीत विराट कोहलीची मुलगी स्टेडिअम मध्ये दिसली तेव्हा तिचा फोटो काढण्यात आला होता. यावरही विराट कोहलीने प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित केला होता.
त्यावेळीही त्याने मुलीचा फोटो शेअर न करण्याचं आवाहन केलं होतं.
अनुष्काने त्यावेळीही या प्रकाराचा विरोध केला होता. आपल्या मुलीचा फोटो काढून कोणी सोशल मीडिया वर शेअर करण्याच्या विरोधात असल्याचं ती म्हणाली होती.
यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता.
लंडन आणि पॅरिसमधून सुटीवरून परतल्यावर मुंबईला परत आल्यावर विराट, अनुष्का आणि त्यांची मुलगी वामिका यांचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला होता.
तेव्हा फोटो काढणाऱ्या लोकांना विराट म्हणाला होता, "वामिकाला जाऊ द्या, कॅमेरा खाली करा. ती सध्या झोपेत आहे. तिला गाडीत बसू द्या, मग आम्ही पुन्हा परत येतो."
त्यानंतर वामिकाला गाडीत सोडून विराट आणि अनुष्का परत आले आणि फोटो काढून घेतले.

फोटो स्रोत, Anushka Sharma
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा स्वत:चे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र मुलीच्या प्रायव्हसीसाठी ते कायम आग्रही असतात.
त्यांच्या विनंतीचा मान राखल्याबद्दल एकदा अनुष्काने फोटोग्राफर्सचे आभारही मानले होते.
हॉटेलने मागितली माफी
ज्या हॉटेलमध्ये विराटच्या खोलीचा व्हीडिओ शेअर झाला त्या हॉटेलच्या व्यवस्थापनाने झालेल्या प्रकाराची माफी मागितली आहे. त्यांनी एक निवेदन जारी केलं आहे. "आम्ही या घटनेबद्दल माफी मागतो. भविष्यात अशी कोणतीही घटना घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणतात, "क्राऊन हॉटेल ने या प्रकरणात तातडीने कारवाई केली आहे. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला हटवण्यात आलं आहे."
ओरिजिनल व्हीडिओसुद्धा सोशल मीडियावरून हटवण्यात आला आहे. क्राऊन हॉटेल एका तटस्थ कंत्राटदारातर्फे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन प्रशासनाने दिलं आहे.
आयसीसीच्या मते प्रायव्हसीचं अशा प्रकारे उल्लंघन अतिशय निराशाजनक आहे. कोहलीचं यामुळे नुकसान झालं आहे. खेळाडूंची प्रायव्हसी जपली जावी यासाठी योग्य सुरक्षा मिळेल या दृष्टीने आम्ही पावलं उचलू असंही त्यांचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








