विराटची 166 धावांची खेळी, भारताचा 317 धावांनी प्रचंड विजय

विराट कोहली (फाईल फोटो)

फोटो स्रोत, DANIEL POCKETT-ICC

फोटो कॅप्शन, विराट कोहली (फाईल फोटो)

विराट कोहली, शुभमन गिल यांची तडाखेबंद शतकं आणि त्यांना गोलंदाजांची मिळालेली तोलामोलाची साथ यामुळे भारतीय संघाने तिरुवनंतपुरम इथे झालेल्या तिसऱ्या वनडेत श्रीलंकेचा तब्बल 317 धावांनी धुव्वा उडवला.

भारतासाठी धावांच्या फरकाने मिळालेला हा सर्वोत्तम विजय आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 95 धावांची खणखणीत सलामी दिली.

रोहित 42 धावा करुन तंबूत परतला. यानंतर गिलला अनुभवी विराट कोहलीची साथ मिळाली.

दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 110 चेंडूत 131 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यान गिलने वनडेतलं दुसरं शतक साजरं केलं.

शतकानंतर त्वेषाने फटकेबाजी करताना शुभमन बाद झाला. त्याने 97 चेंडूत 14चौकार आणि 2 षटकारांसह 116 धावा केल्या. यानंतर कोहलीला श्रेयस अय्यरने साथ दिली. कोहलीने चौकार षटकारांची लयलूट करत वनडेतलं 46वं तर एकूण 74वं शतक झळकावलं.

घरच्या मैदानावर सर्वाधिक शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत कोहली अव्वल स्थानी आहे.

वनडेत सर्वाधिक शतकांच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून विराट अवघी तीन शतकं दूर आहे. विराट-श्रेयस जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 71 चेंडूतच 108 धावांची वेगवान भागीदारी केली.

शतकानंतरही कोहलीचा वेग मंदावला नाही. कोहलीने 110 चेंडूत 13 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 166 धावांची खेळी केली.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कोहलीने 15 जानेवारी या तारखेला झळकावलेलं हे चौथं शतक आहे. श्रेयसने 38 धावा केल्या. भारतीय संघाने 390 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. मोहम्मद सिराजने सलग 10 ओव्हर्स टाकत श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं.

मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत सिराजला चांगली साथ दिली. कोहलीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. भारतीय संघाची पुढची मालिका न्यूझीलंडविरुद्ध 18 तारखेपासून सुरु होत आहे.

भारताने आजच्या सामन्यासाठी हार्दिक पंड्या आणि उमरान मलिक यांना विश्रांती देत सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी दिली होती. मात्र दोघांनाही फलंदाजी किंवा गोलंदाजी करावी लागली नाही.

भारतीय डावादरम्यान श्रीलंकेचे जेफ्रे व्हँडरसे आणि अशिन फर्नांडो यांच्यात चेंडू सीमारेषेजवळ अडवताना टक्कर झाली. दोघांनाही दुखापत झाली.

व्हडरसेला चक्कर येण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्याच्याऐवजी बदली खेळाडूला खेळवण्याचा निर्णय झाला. व्हँडरसे आणि अशिन दोघांनाही एक्सरे चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)