Ind Vs Eng: विराट कोहलीच्या फलंदाजी आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह का निर्माण होत आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सुरेश मेनन
- Role, संस्थापक संपादक, विस्डन इंडिया अल्मनॅक
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची बॅट त्याच्यावर रुसल्याचं दिसून येतं.
ऐन मोक्याच्या क्षणी विराट कोहली आपल्या नावाला साजेशी कामगिरी करू न शकल्याने संघ अडचणीत आल्याचं आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहोत.
विराटच्या अपयशामुळे भारतीय फलंदाजी फळीवर अनपेक्षित दबाव निर्माण होतो.
कधीकाळी खोऱ्याने धावा ओढणाऱ्या विराट कोहलीच्या गेल्या काही दिवसांतील आकडेवारीवर नजर मारल्यास हा फरक लक्षात येऊ शकतो.
विराट कोहलीच्या बॅटमधून शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये नोंदवलं गेलं. त्यानंतर क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये 51 डावांत विराट एकही शतक झळकावू शकला नाही.
इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक विजय संपादित केल्यानंतर पुढच्याच सामन्यात हेडिंग्ले मैदानावर भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागला.
या पराभवामुळे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. मालिकेतील चौथा सामना ओव्हल येथे 2 सप्टेंबरपासून खेळवण्यात येईल. या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांच्या कामगिरीवर सर्वांची विशेष नजर असणार आहे.
कोहलीच्या बॅटला काय झालं?
विराट कोहली मागच्या काही काळापासून स्विंग गोलंदाजांविरुद्ध चाचपडताना दिसत आहे. विशेषतः ऑफ-स्टंपबाहेरील चेंडू खेळताना कोहली विरोधी संघाच्या जाळ्यात अडकत असल्याचं दिसतं.
जे चेंडू न खेळता अलगद मागे सोडून द्यायला हवेत, अशा चेंडूंवर अनावश्यक फटका खेळून विराट आपली विकेट गमावत आहे. गोलंदाजही अशाच प्रकारचे चेंडू टाकून विराटच्या 'इगो'समोर आव्हान उभं करत आहेत.
त्याच कुरघोडीत अडकून विराट बहुतांशवेळा विकेटकिपरकडे झेलबाद झाल्याचं दिसून येतं.
विराट कोहलीच्या आधी आणि नंतर फलंदाजीला येणारे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे दोघेही संयमी फलंदाज म्हणून ओळखले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्यात कोण बॉस आहे, हे सिद्ध करण्याची घाई करताना ते कधीच दिसत नाही. पण दोघेही इंग्लंडमध्ये आपल्या फॉर्मविरुद्ध झगडत असल्याने त्याच्या भारतीय फलंदाजीच्या मध्यफळीवर अधिक परिणाम दिसून येतो.
2018 ला भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी विराट कोहलीने अतिशय दिमाखदार कामगिरी करताना दोन शतकं आणि एकदा 97 धावा अशा मोठ्या खेळी केल्या होत्या.
त्यावेळी जेम्स अँडरसनसारख्या स्वींग गोलंदाजालाही कोहलीने थकवलं होतं. यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात कोहली स्वींग चेंडू बऱ्याचदा बाहेर मारुन सोडत आहे. पण आत येणारे चेंडू खेळताना त्याची विशेष अडचण होते.
विराट कोहलीवर खेळाचा खूपच जास्त दबाव आहे का, हासुद्धा एक प्रश्न आहे. सध्या एकामागून एक कसोटी मालिका, त्यामध्ये योग्य टीम निवडणं, योग्य रणनिती आखणं, अशा अनेक जबाबदारी त्याला पार पाडाव्या लागतात.
इंग्लंडचे माईक ब्रियरली आणि भारताचे टायगर पतौडी यांनी वैयक्तिक कामगिरीतील अपयशानंतरही संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलं होतं.
भारतही काही अंशी अशाच प्रकारची कामगिरी सध्या करताना दिसत आहे.
विराट कोहली मागवतो तिच डिश सहकारी मागवतात तेव्हा...
विराट कोहलीला संघाचं नेतृत्व करायला आवडतं. आपल्या प्रतिमेची छाप संघावर सोडणं त्याला छान वाटतं. विरोधी खेळाडूंप्रमाणेच आपल्या संघातील खेळाडूंनाही काही आव्हानं देणं त्याला आवडतं.
एक कर्णधार म्हणून कोहलीचा रेकॉर्ड उत्तम आहे. शिवाय कर्णदारपदी असतानाही त्याचा बॅटिंगमधील रेकॉर्ड तुलनेने चांगला आहे.

फोटो स्रोत, GARETH COPLEY
आजघडीला 37 टेस्ट विजयांसह भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून कोहलीला ओळखलं जातं.
सुरुवातीपासूनच कोहलीला एक आक्रमक स्वभावाचा कर्णधार म्हणून पाहिलं गेलं आहे. याच आक्रमकपणाची झलक भारतीय संघामध्ये पाहायला मिळते.
भारतीय क्रिकेट संघ थांबला होता, त्या हॉटेलमध्ये कोहलीसोबत एकत्रित भोजन घेण्याचा योग मला आला होता. त्यावेळी मी पाहिलं की कोहली काय ऑर्डर करतो ते इतर खेळाडू पाहत होते. त्यानंतर तीच डिश ते आपल्यासाठी मागवत असल्याचं निरीक्षण मी केलं.
याचाच अर्थ कोहली आपल्या प्रत्येक कृत्यातून आपल्या टीमला प्रेरणा देण्याचं काम करतो, असं म्हणता येईल.
सध्या कोहली खराब फॉर्मशी झुंज देत असला तरी तो आपल्या मेहनतीच्या जोरावर पुनरागमन करणार हे नक्की आहे.
भारतीय संघाने आक्रमकतेची मर्यादा ओलांडली?
कर्णधार कोहलीवर अचानक ही वेळ का आली? लॉर्ड्सवर इंग्लंड संघाला शेवटच्या दिवशी केवळ 60 षटकांच्या आत गुंडाळून भारताने ऐतिहासिक आणि दिमाखदार विजय मिळवला.
पण त्याच्या पुढच्याच सामन्यात विराट कोहलीला त्याची बॅटिंग आणि कर्णधारपद यांबाबत स्पष्टीकरण द्यावं लागत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हेडिंग्लेवर खेळपट्टीचं स्वरुप पाहून तो फसला. पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारून केवळ 78 धावांत गारद होण्याची नामुष्की संघावर ओढवली. त्यानंतर त्याच खेळपट्टीवर इंग्लंडला त्याच्या पाचपट धावा करताना त्याने पाहिलं.
या सामन्याच्या ब्रेकदरम्यान टीव्हीवर 2002 साली भारत आणि इंग्लंडदरम्यान हेडिंग्लेवरच खेळवण्यात आलेल्या एका सामन्याची क्षणचित्रे दाखवण्यात आली.
या सामन्यात भारताचा कर्णधार सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती. त्यावेळी त्याच्या संघात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड होते. तिघांनीही शतकं झळकावली. अखेरीस संघाला विजय मिळाला होता.
विराट कोहली जेव्हा जेम्स अँडरसनसारख्या अकराव्या क्रमांकाच्या खेळाडूवरही बाऊन्सरचा मारा कर, असं गोलंदाज जसप्रीत बुमराहला सांगतो, त्याच वेळी त्याचे मनसुबे स्पष्ट होतात.

फोटो स्रोत, Getty Images
विराट कोहली यांमधून आपल्या आक्रमकतेचीच प्रचिती पुन्हा-पुन्हा सर्वांना देतो. लॉर्ड्सवर इंग्लंडचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना भारतीय खेळाडूंचं हसणं-खिदळणं, त्यांनी केलेली वक्तव्ये सर्व माईकवर ऐकायला मिळाली होती.
त्यावेळी एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या स्तंभात मी म्हटलं होतं. आपली क्रिकेट टीम अशीच आक्रमक आपल्याला पाहावी लागणार आहे का, ही 22 यार्डांची खेळपट्टी आणि सगळं आपलंच असल्याच्या अविर्भावात वागणं गरजेचं असतं का, असा प्रश्न मी त्यावेळी विचारला होता.
मला त्यावरून अनेक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. मोठ्या संख्येने कोहलीचे चाहले त्याची बाजू घेऊन मला भांडू लागले. पण कोहलीने आपल्या मर्यादा ओलांडल्या असं वाटणारेही अनेकजण होते.
तुम्हाला कोणता कोहली हवा आहे? मवाळ कोहली की आक्रमकतेने विजय मिळवून देणारा कोहली, असा त्याचा सार होता. विजय मिळाल्यानंतर टीका कुणीच करत नसतं.
पण तरीही कर्णधारपदाचा अर्थ नेहमीच आक्रमकपणा दाखवावा असं नाही. त्यामुळे चांगलं खेळणं हाच एकमेव पर्याय खेळाडूंसमोर राहतो.
खेळामध्ये 'जो जिता वही सिकंदर'... असं म्हटलं जातं. पण हा विजय चांगल्या कामगिरीचं प्रदर्शन करूनच यायला हवा.
त्यामुळे कोहलीला एक फलंदाज म्हणून आपली कामगिरी उंचवावी लागेल. त्यानंतर भारताने ही क्रिकेट मालिका जिंकल्यास बाकीच्या सगळ्या गोष्टी विस्मरणात जातील, हे नक्की.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








