अशोक गहलोतः राजस्थानच्या 'जादूगारा'ला यावेळेसही यश मिळणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, त्रिभुवन
- Role, जेष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
आजपासून 50 वर्षांपूर्वी जोधपूरपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका लहानशा गावातलं, पीपाडमधलं, दृश्य, एक 20-22 वर्षांच्या तरुणाने लहानशा दुकानावर खतं आणि बियाणं विकायला सुरुवात केली.
अत्यंत नम्र असणारा हा मुलगा सायकलवर भरल्लेया पिशव्या लादून घंटी वाजवत जायचा.
हरितक्रांतीची सुरुवात झाली होती. त्याकाळात खतं आणि बियाण्यांची दुकानं मारवाड प्रांतातही सुरु झाली. या युवकानेही दुकान सुरु केलं. ग्राहकांची वाट पाहात दोन्ही हातांवर हनुवटी टेकवून अनेकदा हा मुलगा गहन विचारात गढलेला आढळायचा.
तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की हा मुलगा राजस्थानच्या राजकारणाचा प्रमुख चेहरा बनेल.
पीपाड, बूचकला, जाटिसाबास, बंकालिया, सिंधीपुरासारख्या गावात राहाणारे आणि नव्वदीच्या आसपास असणारे अनेक वृद्ध राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे किस्से सांगतात.
गहलोत यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात म्हटलं, “मी स्वतः पीपाड गावात 50 वर्षांपूर्वी खतं आणि बियाण्यांचं दुकान सुरू केलं होतं. आज जनतेच्या आशीर्वादाने या जागी पोचलो आहे. आज पीपाडमध्ये परत आल्यानंतरही पुन्हा तेच प्रेम मिळालं आहे. हीच माझ्या जीवनाची कमाई आहे.”
पण त्यांची कमाई फक्त एवढीच नाही. जयपूरशी प्रत्येक बाबतीत फटकून वागणाऱ्या जोधपूरच्या सरदारपुरा भागात गेलात तर तुम्हाला भाजपचेही असे काही समर्थक सापडतील ज्यांची इच्छा आहे की गहलोत यांचा विजय व्हावा.
कारण? ते मुख्यमंत्री झाले तर जोधपूरसाठी बरंच काही करू शकतील.
राजस्थानच्या राजकारणात पूर्व आणि पश्चिम भागाला जोडून ठेवण्याचं अवघड काम गहलोत यांनी केलं त्यामुळेच त्यांना ‘जादूगार’ म्हणतात.
मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी लागली तेव्हा त्यांनी आपल्यासाठी सरदारपुराची जागा निवडली.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी या जागेसाठी इथून तीन वेळा आमदार झालेल्या मानसिंह देवडा यांचं राजीनामा देण्यासाठी मन वळवलं. त्यांनी राजीनामा दिला. गहलोत यांनी निवडणूक जिंकल्यानंतर देवडा यांना राजस्थान हाऊसिंग बोर्डाचे अध्यक्ष बनवलं आणि कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला
गहलोत जोधपूर शहरातून पाच वेळा खासदार झाले. याच जोधपूरमधला एक मतदारसंघ असलेल्. सरदारपुरातून ते पाच वेळा आमदार झाले. आता सहाव्यांदाही जिंकतील अशी चिन्हं आहेत.
सरदारपुरात गहलोत यांना वारंवार यश का मिळतं?
राजकारणचा विश्लेषक असणारा एक तरुण म्हणतो, “माळी-मुसलमानांचं सोशल इंजीनिअरिंग, अठरापगड जातींना एकत्र बांधण्याचा अनुभव, बूथ मॅनेजमेंट, विकासकामं आणि मतदारसंघात सतत सक्रीय असणं या सगळ्यामुळे त्यांना यश मिळतं.”
भाजपची डाळ त्यांच्यासमोर शिजली नाहीये. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र गहलोत यांच्या स्थानाला धक्का लागला जेव्हा भाजपच्या गजेंद्रसिंह शेखावत यांनी अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यांना हरवलं होतं.
यंदा गहलोत यांच्या विरोधात भाजपने जोधपूर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक महेंद्रसिंह राठोड यांना उतरवलं आहे. गहलोत यांच्या तुलनेत ते कमजोर उमेदवार समजले जात आहेत.
याही वेळेस गहलोत जिंकतील अशी खात्री अनेकांना आहे. पण काही अडचणीही आहेत.

फोटो स्रोत, ASHOK GEHLOT/FACEBOOK
त्यांच्या जवळचे समजले जाणारे रामेश्वर दाधीच आधीच त्यांची साथ सोडून गेलेत. त्यांनी सूरसागरच्या जागेवरून बंडखोरी केली आणि नंतर भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ निवडणुकीतून माघार घेतली. गहलोत यांचे विश्वासू सुनील परिहार यांनीही बंडखोरी केली आहे आणि शिवानातून निवडणूक लढवत आहेत.
जोधपूरमध्ये राहाणारे प्रसिद्ध साहित्यिक सत्यनाराण म्हणतात की, “गहलोत यांनी उत्तम काम केलं आहे. लोकांना ते फारच आवडतात. भाजपचे लोकही त्यांचं कौतुक करतात आणि डावेही. पण यावेळी त्यांचे स्वतःचे लोक त्यांची साथ सोडून चाललेत. विद्यापीठातले निवृत्त लोकही नाराज आहेत कारण त्यांना तीन तीन महिने पेन्शन मिळालेली नाही. ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाहीत. पण त्यांच्यासमोर असणारे विरोधी उमेदवार कमजोर आहेत.”
सत्यनारायण म्हणतात की, “यावेळी एक प्रश्न वारंवार विचारला जातोय की एकाच व्यक्तीवर एवढी कृपा का केली जातेय? गहलोत यांनी गेल्यावेळी सूरसागरमधून प्राध्यपक अयूब खान यांना तिकीट दिलं होतं पण हरले.”
“यावेळी आचारसंहिता लागण्याच्या थोडं आधी अयूब खान यांना राजस्थान लोकसेवा आयोगाचा सदस्य बनवलं. तेही कमी की काय म्हणून अयूब खान यांच्या मुलाला सूरसागरमधून आमदारकीचं तिकीट दिलं. त्यांना वारंवार प्राधान्य का दिलं जातंय हा प्रश्न लोक विचारत आहेत.”
सूरसागरहून यंदा भाजप नेत्या सूर्यकांता व्यास यांचं तिकीट कापलं गेलंय, त्या गहलोत यांची मुक्त कंठाने प्रशंसा करतात. असं करणाऱ्या त्या एकट्या नाही. विरोधी पक्ष असलेल्या भाजपात त्यांचे अनेक प्रशंसक आहेत.”
गहलोत गांधीवादी समजले जातात पण यावेळी त्यांनी नेता म्हणून स्वतःची एक वेगळी प्रतिमा बनवली आहे.
राजस्थानात यंदा त्यांना पक्षांतर्गत सचिन पायलट यांच्याकडून आव्हान आहे तर बाहेरून भाजपकडून. पण तरीही त्यांनी जी तत्परता आणि राजकीय कौशल्य दाखवलं यावरुन त्यांचं नवं रूप जनतेसमोर आलं. त्यांच्या भाषेला धार चढली होती आणि त्यांची कामाची पद्धतही बदलली होती.

फोटो स्रोत, Getty Images
अनेकदा असंही झालं की त्यांच्या भाषेवरून त्यांच्यावर टीका झाली. त्यांच्या समर्थकांनीही मान्य केलं की त्यांनी असं बोलायला नको होतं.
भाजपने दलिताचं शोषण केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला आमदारकीचं तिकीट दिलं तर गहलोत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पीडितांना भेटायला हॉस्पिटलमध्ये पोचले.
त्यांचे आपल्या विरोधकांशीही चांगले संबंध आहेत. जोधपूरमध्ये त्यांच्याविरोधात लढणारे राजेंद्रसिंह सोलंकी असोत वा राजेंद्र गहलोत वा मेघराज लोहिया किंवा महेंद्र कुमार झाबाक किंवा शंभुसिंह खेतसार. कोणाहीशी त्यांचे संबंध बिघडले नाहीत अपवाद फक्त भाजपमध्ये नवं शक्तीस्थान म्हणून पुढे आलेले गजेंद्रसिंह शेखावत. या दोन नेत्यांच्या संबंधात मात्र कटूता आहे.
विश्लेषकांचं म्हणणं आहे की गहलोत यांनी याआधी कधी धर्म किंवा जातीच्या आधारावर राजकारण केलं नाही, पण यावेळी पहिल्यांदा त्यांनी आपल्या जातीचा ओझरता उल्लेख केला. त्यांचा प्रयत्न होता की त्यांच्या जातीचे लोक त्यांच्याकडे आकर्षित व्हावेत.
त्यांनी हुशारीने आपल्याला राजकारणातला माळी म्हटलं. असा माळी जो बागेच्या सौंदर्यासाठी प्रत्येक प्रकारच्या झाडाची आणि रोपाची काळजी घेतो. त्यांच्या बोलण्याचा रोख स्वतःची जात माळी असण्याकडे होता.
त्यांचे टीकाकार म्हणतात की जेव्हा गहलोत राजकारणाच्या बागेचा उल्लेख करतात तेव्हा त्यांच्या हातात एक अदृश्य कात्री असते. ही कात्री वापरून ते त्या रोपांची काटछाट करतात जी पुढे जाऊन त्यांच्यापेक्षा मोठी होतील.
हेही वाचलंत का?
हा व्हीडिओ पाहिलात ?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








