अशोक गेहलोत-सचिन पायलट: नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीवरून राजस्थानचं राजकारण का तापलंय?

अशोक गेहलोत, सचिन पायलट

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मोहर सिंह मीणा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

असं म्हणतात दोन तलवारी एका म्यानेत बसत नाहीत. सध्या याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालंच तर राजस्थान काँग्रेस डोळ्यासमोर येईल.

राजस्थान मध्ये 2020 साली अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर होती. आज पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण झाली असून जयपूर ते दिल्लीपर्यंतचं राजकारण तापलं आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याची निवड करणं काँग्रेससाठी सर्वात मोठं राजकीय संकट बनलंय.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या पाठिशी असलेल्या आमदारांनी सचिन पायलट यांना उघड उघड विरोध करायला सुरुवात केली आहे.

त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसणं सचिन पायलट यांच्यासाठी सध्या तरी अवघड बनलंय.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना समर्थन म्हणून अनेक आमदारांनी आपले राजीनामे काँग्रेस हायकमांडकडे पाठवले आहेत. यातून काँग्रेस हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय.

नव्या मुख्यमंत्री निवडीच्या संदर्भात जी फीडबॅक बैठक झाली त्यावर गेहलोत यांच्या समर्थकांनी बहिष्कार टाकला असून यातून स्पष्ट राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न झाला आहे.

एका बाजूला राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार मात्र याविषयावर मौन बाळगून आहेत.

नेमका वाद काय आहे?

तर माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या आहेत त्यानुसार, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत अशोक गेहलोत यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री असलेल्या गेहलोत यांनी मात्र अध्यक्षपदासाठी अर्जचं भरलेला नाही.

अशोक गेहलोत यांनी हल्ली हल्लीच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आलं.

सचिन पायलट, राहुल गांधी

फोटो स्रोत, ANI

या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, काँग्रेसमध्ये एक व्यक्ती आणि अनेक पदांवर राहिल्याची उदाहरण आपल्याला दिसतील.

त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून निदान हे तरी स्पष्ट आहे की त्यांना राजस्थानचं मुख्यमंत्रीपद सोडायचं नाहीये.

दरम्यान राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा रंगू लागली. सोबतच पायलट हे राहुल गांधींचे जवळचे सहकारी मानले जातात.

मात्र पायलट यांच्या नावाच्या चर्चेने सगळं राजकारण ढवळून निघालं. त्यांच्या नावाला प्रचंड विरोध सुरू झालाय.

गेहलोत यांच्या समर्थकांनी सचिन पायलट यांच्या नावाला उघडपणे विरोध केलाय. तसेच दोन वर्षांपूर्वी सरकार पाडण्यासाठी कट रचल्याचे आरोपही पायलट यांच्यावर केले आहेत.

गेहलोत यांच्या समर्थकांनी रविवारी रात्री विधानसभा अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन आपले राजीनामे सादर केले आहेत.

यावर गेहलोत समर्थक असलेले राज्यमंत्री सुभाष गर्ग म्हणतात की, "दोन वर्षांपूर्वी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार पडण्याचा कट कोणी रचला हे हायकमांडने लक्षात ठेवावं."

हायकमांडसाठी मेसेज

नव्या मुख्यमंत्र्याच्या नावावर चर्चा करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्याचे प्रभारी अजय माकन यांना जयपूरला पाठवण्यात आलं होतं.

25 सप्टेंबर रोजी ही बैठक ठरली मात्र बैठकीची वेळ दोनदा बदलण्यात आली. तरीही गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.

बैठक होण्यापूर्वी गेहलोत यांच्या समर्थकांनी कॅबिनेट मंत्री शांती धारीवाल यांच्या घरी जमा व्हायला सुरुवात केली.

अशोक गेहलोत, सचिन पायलट

फोटो स्रोत, VISHAL BHATNAGAR/NURPHOTO VIA GETTY IMAGES

धारीवाल यांच्या घरी बैठक पार पडल्यानंतर सर्व आमदारांनी विधानसभा अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांनी शासकीय निवासस्थान गाठलं आणि आपले राजीनामे सादर केले.

दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट, त्यांचे समर्थक आमदार अजय माकन, मल्लिकार्जुन खर्गे हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमदारांची वाट पाहत होते.

गेहलोत समर्थक आमदारांनी बैठकीवर बहिष्कार टाकत, राजीनामे देऊन एक मेसेज द्यायचा प्रयत्न केलाय. तो मेसेज म्हणजे जर पायलट यांना मुख्यमंत्री कराल तर सरकार कोसळू शकतं.

गेहलोत यांना पाठिंबा देणारे अपक्ष आमदार संयम लोढा माध्यमांशी बोलताना सांगतात की, "निर्णय जर आमदारांना अनुरूप असा असेल तर सरकार टिकेल. निर्णय अनुरूप नसेल तर सरकार कसं काय टिकेल?"

पायलट यांच्याकडे किती आमदारांचे संख्याबळ आहे?

राजस्थानच्या राजकारणात अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात स्पर्धा असल्याचं आता कोणापासून लपलेलं नाही.

सध्या राजस्थान मध्ये काँग्रेसचे बहुतांश आमदार गेहलोत यांच्या पाठीशी असल्याचं चित्र आहे. 2020 मध्ये ज्या आमदारांनी पायलट यांना समर्थन दिलं होतं तेही आमदार आता गेहलोत यांच्या तंबूत शिरले आहेत.

गेहलोत यांच्या 80 समर्थक आमदारांनी राजीनामे दिले आहेत. तर पायलट यांच्या समर्थनात जेमतेम डझनभर आमदार दिसतात.

मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी गेहलोत यांच्या समर्थनात 92 आमदार असल्याचा दावा केलाय. त्यांनी केलेला दावा आणि विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आलेले राजीनामे यावरून तरी पारडं गेहलोत यांच्या दिशेने झुकल्याचं दिसतं.

त्यामुळे पायलट मुख्यमंत्री होतील याबाबत थोडी साशंकता निर्माण होते आहे.

सचिन पायलट, राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

2020 मध्ये पायलट यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन हरियाणा गाठलं होतं. त्यांच्या या बंडखोरीमुळे त्यांना सर्वाधिक विरोध होतोय, त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी अडथळा निर्माण झाला आहे.

या संपूर्ण घडामोडींवर राजस्थान मधील वरीष्ठ पत्रकार ओम सैनी सांगतात, "राजस्थानच्या राजकारणात टिकून राहणं पायलट यांच्यासाठी आता कठीण बनलंय. निदान काँग्रेसमध्ये राहून तरी त्यांना मुख्यमंत्री बनता येणं शक्य नाही. त्यामुळे काँग्रेस सोडूनचं त्यांना त्यांची राजकीय कारकीर्द वाढवली पाहिजे."

ते पुढे सांगतात, "काँग्रेसने सचिन पायलट यांना एखाद्या मुलाप्रमाणे अडॉप्ट केलं होतं. पण पायलट यांना विशेष अशी समीकरण तयार करता आली नाहीत. जसं की, हायकमांडने पाठवलेल्या ऑब्जर्वर समोर गेहलोत यांच्या समर्थकांनी तीन अटी ठेवल्या. या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर राजस्थान मध्ये काँग्रेसची नौका गटांगळ्या खाईल."

गेहलोत समर्थक आमदारांची पहिली अट म्हणजे विधिमंडळाची बैठक आता 19 ऑक्टोबर नंतर व्हावी. दुसरी अट म्हणजे विधानसभेचे अध्यक्षांचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही प्रस्ताव पारित केला जाणार नाही. आणि तिसऱ्या अटीनुसार सरकार वाचवण्यासाठी ज्या 102 आमदारांनी पाठिंबा दिलाय त्यांच्यापैकी एकाची मुख्यमंत्री म्हणून निवड करावी."

दिल्लीतून निर्णय होणार का?

राजस्थान मध्ये राहुल गांधींचे विश्वासू म्हणून सचिन पायलट यांच्याकडे पाहिलं जातं.

पण तिकडे अशोक गेहलोत यांची गांधी घराण्याशी असलेली जवळीकही कोणापासून लपलेली नाही.

त्यामुळे जोवर गांधी घराण्याची संमती मिळत नाही तोपर्यंत तरी त्यांना काँग्रेस अध्यक्षपद मिळणार नाही, हे सुद्धा निश्चित आहे.

राजस्थानमध्ये गेलेले अजय माकन आणि खर्गे आता दिल्लीच्या मार्गाला लागले आहेत. गेहलोत समर्थक आमदारांनी ज्या प्रकारे बैठकीवर बहिष्कार टाकला तो प्रकार पाहता हायकमांड नाराज होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष होणार का? सोबतच राजस्थानच्या मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याचा शोध नव्याने सुरू होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)